बुधवार, ३ एप्रिल, २०२४

माय तुहे किती आठव आठवू..! आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब



|| मंथनाचे पैलू ||
-------------------------------------------------------------------लेखांक -३५



"माय तुहे किती आठव आठवू..."
आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

         कवी डॉ.सर्जेराव जिगे लिखित " माय तुहे किती आठव आठवू " या  काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा आज दि.४ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील 'मठपिंपळगाव' येथे मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.
       "माय तुहे किती आठव आठवू " ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल...इतकी  सहज सुंदर झालेली आहे. आईचे श्रमसंघर्षातील कष्टप्रद जीवन व स्वभावचित्रण प्रस्तुत संग्रहात यथार्थपणे प्रतिबिंबीत झाले आहे.
      'आई 'हा अनेक लेखकांचा, नाटककारांचा, कादंबरीकारांचा, कवींच्या कवितांचा विषय झालेला आहे. आईच्या प्रेमाविषयी बऱ्याच म्हणी, सुविचार, इतकेच नव्हे; तर चित्रपटही आलेले आहेत. गद्य,पद्य, चित्रकारिता अशा वेगवेगळ्या प्रकारे आईचा महिमा उदधृत झाल्याचे आपण अनुभवले आहेच.   
       स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील कवी यशवंत दिनकर पेंढारकर, यांची (स्वामी तिन्ही जगाचा... किंवा आई म्हणोनी कोणी..), कवी माधव ज्युलियन यांची..(प्रेम स्वरुप आई ), कवी भा.दा.पाळंदे यांची...(थोर तुझे उपकार ), नंतर  कवी ग्रेस,यांची.. (ती गेली तेव्हा रिमझिम...), कवी सुरेश भटांनी तर या पृथ्वीलाच 'आई' संबोधले आहे त्यांची प्रसिद्ध कविता.. ( गे मायभू तुझे मी...), कवी नारायण सुर्वे यांची...(माझी आई) , इंदिरा संत यांची..(आई), आनंद यादव यांची..( मायलेकरं ), कवी फ.मुं. शिंदे,यांची (आई एक नाव असतं, घरातल्या....), अलिकडच्या पिढीचे  स.द.पाचपोळ यांची...( हंबरून वासराले...), धोंडोपंत मानवतकर यांची..(नको नको सांगू माये...), अशोक पाठक यांची...(दिसे आईच्या डोळ्यात), स्वाती दांडेकर यांची.. (झुलाघर),  सुषमा जाधव यांची..(माय म्हन्ते)...तसेच गद्यलेखनात सकाळचे संपादक  उत्तम कांबळे यांचे...(आई समजून घेतांना ) आईविषयी लेख, कविता लिहिणाऱ्या अशा अनेक कवीं व कवयित्रींची, लेखकांची नावे सांगता येतील; परंतु विस्तार भयास्तव ते सांगणे टाळतो. तूर्तास कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या "माय तुहे किती आठव आठवू "या संग्रहाचे प्रकाशन होत आहे, या संग्रहात अभंग शैलीतून आईविषयीची दीर्घ कविता आली आहे, त्यांच्या कवितेचा उलगडा करून घेऊ.
           कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार,चित्रकार हे सर्वच प्रतिभावंत आपापल्या शैलीतून किंवा माध्यमातून सामाजिक, राजकीय, प्रापंचिक, वैयक्तिक विषयांना उजागर करत असतात. शैली आणि माध्यमे विभिन्न असली, तरी आपला विषय वाचकांना रुचेल, समजेल आणि तो वाचकांच्या पसंतीस उतरून तो मनात खोलवर रुजेल ही अपेक्षा ठेवून कलावंत आपल्या विषयाचे प्रतिपादन करत असतो.
               कवी डॉ.सर्जेराव जिगे यांनीसुद्धा ग्रामीण संस्कृतीत   वावरलेल्या आईच्या स्वभावधर्माचे  कर्तव्याविषयीचे इत्थंभूत वर्णन "माय तुहे किती आठव आठवू" या खंडकाव्यात केले आहे. आईसोबतच कुटुंबाचा, परिसराचा, परिस्थितीचा, घरअंगणाचा, शेतीमातीचा, देवधर्म, दैव, कर्म, संस्कार तसेच ग्रामसंस्कृतीचा, परंपरांचा,परंपरांशी निगडित रीतीभातीचा, नीति-अनीतिचा,भेदाचा, माणसांंमाणसातील जिव्हाळ्याचा, थोडक्यात म्हणजे हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे एखाद्या मानवी विषयाला अनेक कंगोरे असतात.. त्या कंगोऱ्यांना स्पर्श करतच प्रपंचाचा गाडा पूर्णत्वाकडे जात असतो. तद्वतच आईच्या कष्टमय, सोशिक,धैर्यशील व संघर्षमय जीवनाचे, सुख-दुःखाचे अनेक कंगोरे या संग्रहात आले आहेत.
           डॉ.सर्जेराव जिगे यांनी आपल्या आईची स्मृती जागविण्यासाठी, तिच्या उपकाराचे उतराई होण्यासाठी हा लेखनप्रपंच केलेला आहे. खरेतर आईच कुटुंबाचा पाया असते आणि तिच्यातूनच प्रपंचाचा विस्तार होत जातो.. म्हणूनच कवी फ.मुं. शिंदे यांच्या "आई एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं" ह्या नऊ शब्दांच्या पंक्तीच आईच्या अस्तित्वाचं मूल्यमापन नोंदवत राहतात. तिची सहनशीलता, तिची सोशिकवृत्ती, तिचा संयम, तिची धडपड, तिचं नियोजन, तिची सचोटी, तिची काटकसर, तिचं रागावणं, तिचं जीव लावणं,  कुटुंबाने तिच्यावर लादलेलं स्वीकारणं, तिची सासरची काळजी, माहेरची ओढ,  तिने जिव्हाळ्यातल्या मर्मबंधी व सृजनबंधी नात्याचा टिकवून ठेवलेला गहिवर, तिच्या प्रापंचिक संचिताचा झालेला गूढगुंता,  स्त्री म्हणून आचरणासंबंधीची तिच्यावर असलेली सामाजिक बंधने, त्यातूनही तिच्या आवडीनिवडीवर लादलेली बंधने..अशा सगळ्या बाबी स्त्रीच्याभोवती फिरत असतात. इतक्या जोखडात राहूनही ती स्वतःच्या स्वाभिमानाबरोबरच माहेरची आणि सासरची अब्रू राखते..थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तिची "आई" म्हणून कुणीच जागा घेऊ शकत नाही.
         जोपर्यंत आपण आईच्या सानिध्यात असतो तोपर्यंत तिच्या असण्याबद्दलचे आपल्याला महत्व वाटत नाही; परंतु आई जेव्हा आपल्याला सोडून जाते, तेव्हा मात्र आपल्या तनामनात पोरकेपणाची फार मोठी पोळकी निर्माण झालेली असते....तिच्यासोबत आपल्या बालपणापासून ते..ती असेपर्यंतच्या प्रत्येक आठवणींना आपण काळजात साठवतो, त्या आठवणींनी काळजात घर केलेलं असतं. तिच्या आठवणींची काळजाला कुरुपं झालेली असतात. ती कुरुपं अधूनमधून सलत राहतात. केवढाही बलवंत, श्रीमंत किंवा तिन्ही जगाचा स्वामी असला तरी तो आईविना पोरकाच असतो.
         कितीही निष्ठूर माणूस असला तरी, त्याला आईची आठवण आली की,तो उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडतो, कारण त्याला पुरुष म्हणून जगाला अश्रू दाखवता येत नाहीत ....
        कवी सर्जेराव जिगे यांनी आईच्या सुख-दुःखाचा, तिच्या स्वभावधर्माचा, कर्तव्याचा, धारिष्ट्याचा, धार्मिकवृत्तीचा लेखाजोखा शब्दांकित केला आहे...त्यांचे आईविषयीचे स्वभावचित्रण अभंगाचे रूप घेऊन आले आहे. "माय तुहे किती आठव आठवू" हा कवितासंग्रह शेतीमातीला विठ्ठल मानून काळया आईची सेवा करणाऱ्या आईला व आईसम कष्ट करणाऱ्या सर्व माय-माऊल्यांना अर्पण केलेला आहे.
         कवीच्या अस्वस्थ मनाच्या गाभाऱ्यात स्मृती-विस्मृतीतल्या अनेक घटनांची घुसळण सुरू असते. अंतर्मनाच्या कप्प्यात भूतकालीन प्रसंगाचे कढ दाटलेले असतात. ते कढ मनाचा बांध फोडू नयेत म्हणून कवी त्यांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून देत असतो. आशय, विषय अभिव्यक्ती ही कविच्या मनाची रुपे,अपरुपे शब्दांशी नातं जोडून भावनांना बंदिस्त करत असतात. भावना आणि आठव ह्यांचं नातं चिखलाचं असतं. चिखलातून माती आणि पाणी वेगवेगळे करता येत नाहीत... तद्वतच माय आणि लेकरांच्या नात्याला वेगवेगळे करता येत नाही...माय दृष्टीआड झाली की, तिचा विरह जीवघेणाच असतो...ती दृष्टीआड झाली तरी..तिची प्रतिमा, तिचे स्वभावचित्र डोळ्यांसमोर सतत तरळत असते...त्यातूनच भावनांचे उमाळे आणि आठवांचे कढ दाटून येतात आणि कविता जन्म घेते...
           माय मही भोळी  | भोळा तिचा भाव |
           पंढरीचा राव | मायबाप ||
  पृ.२१
कवी डॉ.जिगे यांनी आपल्या संग्रहात पहिल्याच कवितेत आईचा भोळा स्वभाव आणि तिचा भोळा भाव असल्याचे सांगत ती निस्सिम विठ्ठलभक्त असल्याचेही सांगितले आहे. आईवडील जसे आपल्या पोटच्या मुलासाठी संकटात धावून येतात तद्वतच कवीची आई सुख-दुःखात, संकटात ती पंढरीच्या विठ्ठलाचा धावा करते, ती विठ्ठलाला मायबापच मानते. तिचा अंबाबाई तुळजाभवानी प्रतीही भक्तिभाव आहे, परंतु आई काम करत करतच नामस्मरण, देवधर्म, पुजा-अर्चा करते. ती आपल्या प्रपंचात कामाला इतके महत्व देते की, ती कामालाच चारीधाम समजते.  स्वतःचे दु:ख, वेदना लपवून समग्र समाजाबद्दल कळवळा नि चिंता व्यक्त करणारे आईवडील हे आपले दैवत असून त्यांचे कर्तव्य अवर्णनीय असल्याचे कविने म्हटले आहे. आईने आयुष्यात भोगलेल्या अत्यंत खडतर घटनांचे हे कथाकाव्य असल्याची प्रचिती पहिल्या कवितेपासूनच येऊ लागते.
        "माय तुहे किती आठव आठवू "आईवरील दीर्घ कवितेसाठी कवीने   अभंग काव्याचीच निवड का केली असावी ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे; त्याचे उत्तर असे की, अभंग काव्यप्रकार वाचकांना सहज समजतो आणि तो मनात रुजतो. शिवाय एकूणच कवितेतून असे दिसून येते की, कविचे आईवडील हे पांडुरंगाचे भक्त आहेत. त्यांच्या प्रपंचाचा सगळा हवाला ते पांडुरंगावर टाकतात. घरात भक्तीचे वातावरण असल्यामुळे कविच्या रचनेतून अभंग काव्यप्रकाराची निवड होणे साहजिकच आहे.
         आधुनिक काळात केशवसुतांपासून मर्ढेकर- करंदीकर यांच्या पुढच्या पिढीतील दिलीप चित्रे - अरुण कोल्हटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. त्याही अगोदर अभंगाच्या वृत्ताचा वापर करून 'अखंड' या शीर्षकांतर्गत म.जोतीराव फुले यांनी विपुल काव्यलेखन करून समाज सुधारणेचे व सत्यधर्माची शिकवण देण्याचे काम केले. म.फुले यांचे काव्य अभंगाचेच रूप घेऊन ग्रामसंस्कृतीतील विकृतीला चव्हाट्यावर आणते. 
          कवी डॉ.जिगे यांनी आपल्या आईच्या कष्टप्रद आयुष्यात उद्भवलेल्या भल्यबुऱ्या प्रसंगांना अभंग रचनेच्या चरणखंडात शब्दबद्ध केले आहे.
                 माय उठे तव्हा | झोपलेलं जग |
                 पोटाची ती आग | जात्यावर ||
पृ.२४
कवीच्या आईच्या समकालीन स्त्रिया सकाळी चार वाजता उठून, चार पायल्या जात्यावर दळण दळत असायच्या. एक किलोमीटरवरून नदीचे पाणी आणून रांजण भरत असायच्या.  स्वयंपाक, न्हाणं, धूणं सगळं आटोपून नवऱ्यासोबत शेतात जाऊन खांद्याला खांदा लाऊन कष्ट करावे लागे. सगळं वेळेवर करूनही सासूबाईचे टोमणे ऐकून घ्यायचे..गणागोताची सरबराई करायची. डोळ्यात अश्रू दाबत कष्ट सहन करत संसार ओढायचा. मन मोठं करून गोरगरिबांना मदत करायची. एकाचवेळी नात्याचे अनेकांगी पदर जपून ठेवण्याची मानसिक तयारी करतांना आईची कितीच दमछाक होत असेल हे तिच्या मनाचा वेदनांकित गाभाराच जाणो..!
                       पक्वान्न करीती | ती सणासुदीला
                       शिळच पोटाला | खायी माय ||
पृ.२४
मनाचा मोठेपणा असणाऱ्या कविच्या आईची वृत्ती परोपकारी होती.    स्वतः उपाशी राहून भूकेल्यांना खाऊ घालण्यात तिला समाधान मिळे. सहरहु संग्रहात आलेली रचना कठीण, संदिग्ध किंवा शब्दबंबाळ नाही. प्रत्येक प्रसंग लगेच समजतो नि वाचक तत्कालिन परिस्थितीचा विचार करू लागतो.
                     मायीने पाहिले | ऊन पावसाळे |
                     शिवारात मळे | बहरले ||
पृ.२६
       किंवा      काळीला खुर्तून | माय थकलेली |
                    रात जागलेली  | खळ्यावर  || 
पृ.२७
आईच्या आयुष्याची सर्वस्तरावर परवड होत असूनही तिचे धीरोदात्तपणे प्रपंचाला सामोरे जाणे ही प्रक्रिया सहज नसून कमालीच्या कसरतीची आहे.  प्रस्तुत संग्रहातील रचनेतून कृषिवलांची भाषा, त्यांची साधने, यांत्रिक उपकरणांच्या कचाट्यात शेतीविषयक व दैनंदिन वापरात येणारे ग्रामीण शब्द लोप पावत चालले आहेत. प्रस्तुत संग्रहातील कवितेत ग्रामीण शब्दांचा यथायोग्य वापर करण्यात आला आहे. काठवती, घोंग्ता, हारखून, महामूर, खुर्तून, हातनी, उफनी, तिव्हा,मदन, बरकत,पांदन, कुरुपं, सपन, खोप, मुरत, गोठ म्हणजे गोष्ट, मुऱ्हाळी, शबुद, वावर,वापसा, माचवा,भकास,आबादानी,अशा ग्रामीण बोलीत येणाऱ्या शब्दांचा मुद्दाम वापर केलेला आहे. कवीचा जन्म खेडेगावातला असल्यामुळे त्यांच्या कवितेत ग्रामीण बोलीचे शब्द सहज येतात. याबरोबरच कवीचा शहराशी घरोबा झाल्यामुळे प्रमाणभाषा आणि ग्रामबोली यांची सरमिसळ दिसून येतो.
                        गणगोत तिनं | सांभाळले खूब |
                        जगण्याची ऊब | ओवीतून ||
पृ.४२
या अभंग प्रकारात ६-६-६-४ अशा मात्रा असतात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडात यमक साधावे लागते. कवीने उपरोक्त तिसऱ्या चरणाच्या शेवटी येणाऱ्या ऊब या शब्दाच्या यमकासाठी दुसऱ्या चरणात ' खूब ' ह्या फारसी अरबी शब्दाचा वापर करून यमक तर साधलेच; परंतु पंक्तीच्या आशयबोधात बाधा उत्पन्न होऊ दिली नाही. महाराष्ट्रावर अनेक सत्तांचा अमल झाल्याने त्या त्या काळात त्यांनी आपली भाषा रुजवली व ती मराठीमय झाली. समग्र समाज दैनंदिन व्यवहारात अनेक भाषा बोलत असतो. मराठी भाषेत हिंदी, उर्दू, फारशी, अरबी, इंग्रजी अशा विविध भाषांच्या काही शब्दांनी शिरकाव केलेला आहेच.. असो !
                           माय मही चाले | तिफणीच्या मागं |
                           माय बापा संगं |  ढेकळात ||
पृ.५८
            कवी डॉ.जिगे यांनी केलेल्या काही रचना फार पूर्वी लिहून ठेवलेल्या असाव्यात असे वाटते किंवा आईच्या गतस्मृतींचा तो चलचित्रपट काळीजकप्प्यात दस्तऐवजासारखा जपून ठेवलेला असल्याने अनेक घटनांच्या नोंदी करता आल्या आहेत. केवळ नोंदीच नव्हे, तर त्या नोंदीच्या मुळाशी गहिवर येणाऱ्या भावनांचा उमाळा आहे, म्हणजे आठव आहे. कितीतरी आठवांचा हा शब्दवानोळा कवीने लेखक, वाचक,रसिकांसह साहित्यसृष्टीला बहाल केला आहे. कवीच्या आईप्रमाणेच समकालीन पिढीने आपली माय सुद्धा अशीच कष्टत,तिष्ठत आणि पिचत असल्याचे चित्र बघितले आहे, बघितले असेल. ग्रामीण कास्तकार कुटुंबाच्या प्रपंचात असलेली ही कमालीची अभावग्रस्तता तरीही आशावादी राहून चिवटपणे राब-राब-राबणाऱ्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनजाणिवांची प्रांजळ अनुभूती यापेक्षा दुसरी काय असू शकते ?
         कविने आपल्या संग्रहातील काही कवितांमध्ये आईच्या कृतार्थधर्मासाठी ऐतिहासिक,पौराणिक, मिथके वापरली आहेत.आईच्या सर्वस्पर्शी भावनांचे प्रस्तर उलगडतांना तिच्या प्रापंचिक प्रमेयाची कसोटी तिच्या मनाच्या मोठेपणाात व चांगुलपणातच असल्याचे सिद्ध केले आहे.
      डॉ.सर्जेराव जिगे यांची कविता कृषिवलांच्या श्रमजीवी संस्कृतीचे, माय-माऊल्यांच्या कष्टप्रद जीवनाचे यथार्थ दर्शन घडविते. शब्दमर्यादेमुळे सर्वच काव्यपदांचा उल्लेख शक्य नाही.  हा संग्रह संपूर्ण वाचल्यावरच ग्रामीण लेखक, कवींना ग्रामसंस्कृतीत वावरणाऱ्या माय-माऊल्यांच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नाचे संसारतत्व, तिची परवड आणि तिची सत्वधीरता समजून घेता येऊ शकेल..!
       प्रस्तुत संग्रहाच्या प्रस्तावनेत ग्रामीण साहित्याचे लेखक, अभ्यासक, समीक्षक डॉ.वासुदेव मुलाटे यांनी संग्रहात आलेल्या आईच्या समग्र जीवन जाणिवांचा चिकित्सकपणे परामर्श घेतला आहे. कविवर्य प्रा.फ.मुं.शिंदे यांची व प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांची असलेली पाठराखण या संग्रहाला अधिकच महत्व प्राप्त करून देते. चित्रकार सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ व जितेंद्र साळुंके यांची सूचक व समर्पक अशी रेखाटने संग्रहाच्या सौंदर्यात भर घालतात. आदित्य प्रकाशनाने संग्रहाची सुबक व आकर्षक अशी निर्मिती केली आहे. सत्तावन्न दीर्घ कविता असलेल्या सुंदर काव्याकृतीचे वाचक स्वागतच करतील. सुंदर संघटनकौशल्य असणारे व अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलणारे कवी डॉ.सर्जेराव जिगे यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

                  





चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...