शनिवार, ४ मे, २०२४

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

         भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी  भारतातल्या खेडोपाडी, वाडी, वस्तीवर साजरी होत आहे. मोठमोठ्या   शहरात जयंती महोत्सव साजरा होतांना दिसतो आहे.जयंतीचे स्वरूप विस्तारतांना दिसते आहे; परंतु जयंती सोहळ्यातून वैचारिक प्रबोधनाची चळवळ होत आहे का ? की, नुसते जयंती सोहळे पहायला मिळताहेत कारण "सोहळे आणि चळवळ"  या दोन बाबी अत्यंत भिन्न आहेत,अशा काही बाबींचा जयंतीच्या निमित्ताने विचार करणे महत्वाचे वाटते म्हणून त्याअनुषंगाने थोडेसे विचार मंथन..! 
         तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना व कार्याला कोटी कोटी अभिवादन..! 

 जयंती साजरी करण्यामागील हेतु व उद्देश

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो ; परंतु जयंती का ? व कशासाठी साजरी करायची ? तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे आदानप्रदान व्हावे, प्रचार-प्रसार व्हावा आणि समाजप्रबोधन व्हावे हा यामागील हेतु असावा व तसाच आंबेडकरी जनतेच्या विचारधारेचा उद्देशही असायला हवा.  
           जो कोणी बाबासाहेबांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दररोज करत असेल... तो व्यक्ती  बाबासाहेबांची जयंती दररोज साजरी करत असतो. बाबासाहेबांचा तोच खरा अनुयायी असतो, त्यालाच जयंती साजरी करण्याची खरी व्याख्या समजलेली असते.
         जे जे कोणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केवळ डी.जे.लावून, मदिरा प्राशन करून, नटून थटून नाचत असतील, असा सोहळा करणे म्हणजे जयंतीचे केवळ प्रदर्शन होय ! असे माझे वैयक्तिक मत आहे. असा प्रदर्शन सोहळा साजरा करणारांनी आत्मचिंतन करून स्वतःला विचारावे आपण खरंच बाबासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत का ? आपण खरंच बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी आहोत का ? आपण खरंच बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत का ? आपण त्यांच्या विचारांंशी प्रतारणा तर करत नाहीत ना ?, असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजे. कारण त्या महापुरुषाने रात्रंदिवस केवळ आणि केवळ समाजाच्या उत्थानासाठीच आपले आयुष्य खर्ची घातले उपेक्षित समुदायाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.  पशुवत जीवन जगणाऱ्या समुहाला अज्ञान,अंधकार,अस्पृश्यता, बहिष्कृतता, अशा विषमतावादी व्यवस्थेच्या चिखलातून बाहेर काढून  माणूस बनविले, यासाठी बाबासाहेब अहोरात्र काम करत राहिले, अभ्यास करत राहिले. त्या महामानवाचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या उपकाराचे उतराई होण्याचा आम्ही जन्मोजन्मी प्रयत्न केला तरी आमच्याकडून त्या उपकाराची परतफेड होऊ शकणार नाही.

बाबासाहेबांच्या उपकाराचे कसे होणार उतराई ?

         बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपल्याकडून कधीच होणार नाही, आमच्या कार्यकर्त्यांच्या, अनुयायांच्या मनात बाबासाहेबांच्या  उपकाराचे उतराई होण्याचा विचार जर मनात आलाच तर त्यासाठी काय करावे लागेल ? ...तर त्यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल ! त्यांनी विषमतेविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या चळवळीचा रथ पुढे नेण्याचे काम करावे लागेल. त्यांनी दिलेल्या पवित्र बुद्ध धम्माचे आचरण करावे लागेल ! बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करावा लागेल !  हे काम कोणाचे आहे, तर हे एकट्यादुकट्याचे काम नाही, ते संपूर्ण समाजबांधवांचे काम आहे, व येणाऱ्या प्रत्येक पिढीचे काम आहे; परंतु आजच्या पिढीकडून ते होतांना दिसते का ?...तर याचे उत्तर "नाही" असेच येईल.! मग याला कोण जबाबदार असेल तर..यासाठी मागील प्रत्येक पिढी जबाबदार असेल! मागच्या पिढीचे काम आहे की, येणाऱ्या प्रत्येक पिढीला बाबासाहेबांच्या विचारांशी जोडून ठेवणे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करायला भाग पाडणे, त्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या भाषणांतील विचारांवर मुद्द्यावर सतत चर्चा करायला लावणे, समुहात नेहमी एकीची भावना टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत ठेवणे, समाजात निर्माण होणाऱ्या अनेक संघटनांना आवर घालणे, 

 अत्यल्प लोकसमुहाचे विविध संघटनात विघटन..!

       भारतातील  इतर समाजाच्या तुलनेत बौद्ध समाज संख्येने अत्यल्प  आहे. संख्येने अत्यल्प असलेल्या समाजात अनेक पक्ष आणि संघटना निर्माण होत असल्यामुळे समाज विखुरला जातो. समाजाअंतर्गत कलह होऊन त्यातून अत्यंत अल्प समुहाचे विघटन होते. म्हणून समाजात एकीचे बळ निर्माण करण्यासाठी व बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्यासाठी एवढेच करावे लागेल... विविध संघटना व पक्ष निर्माण प्रक्रियेला आळा घालावा लागेल !  समुहाची एकजूट असावी लागेल.  बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करणे व ते पुढील पिढीसाठी 'बावीस प्रतिज्ञांचे' विचारधन वाटत राहणे, त्यातून सामाजिक परिवर्तन व सामाजिक विकास करण्याचे काम सतत करता येईल. हे काम कोणाचे आहे ? तर हे काम सर्व समाजबांधवांचे आहे. त्यातही समाजाचे पुढारी व शिक्षित बांधवांची ही खरी जबाबदारीच आहे; परंतु असे घडतांना दिसते का ? तर याचे उत्तर "नाही" असेच येईल.
 
हिंदू म्हणून जन्माला आलो असलो; परंतु....

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." 
बाबासाहेबांनी केलेला निर्धार हा हिंदू धर्माच्या सांगोपांग अभ्यासातून आलेला होता. बाबासाहेबांना हिंदू धर्मातील वर्गभेद, वर्णभेद,धर्मभेद मान्य नव्हते. जाती जातीची उतरंड मान्य नव्हती. उच्च-नीच, स्पृश्य - अस्पृश्य असे भेद मान्य नव्हते, हिंदू धर्माच्या विकृतरितीबाबत बाबासाहेब म्हणतात,"ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो; पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे." 
         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील चालीरितीला, भेदाभेदाच्या वर्तनाला वेडगळपणा म्हटले आहे. रानटी प्राण्यांना देव म्हटले जाते, नरकाडी करणाऱ्या गाईला गो-माता म्हटले जाते, त्यांची पुजा केली जाते आणि माणसांचा विंटाळ केला जातो. त्याला अस्पृश्य ठरवले जाते. त्याची अस्पृश्यता पाळली जाते. अशी हिंदू धर्माची रुढ असलेली परंपरा बाबासाहेबांनी नाकारली होती. कारण बाबासाहेबांचा विचार हा समानतेचा विचार होता. त्यांना नेहमी वाटायचे,"ज्या धर्मात माणसांमाणसामध्ये समानता नसेल आणि माणसाला माणूस म्हणूनच वागवले जात नसेल तर त्या धर्माला आपला धर्म का म्हणायचे ? बाबासाहेब पुढे म्हणतात, "ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे." बाबासाहेबांनी हिंदू धर्मात असलेल्या मानवी वर्तनाच्या विकृतीला रोग म्हटले आहे, शिरजोरीची सजावट म्हटले आहे. 
           हिंदू धर्मातील मानवी अधिकारांबाबत बाबासाहेब म्हणतात, "
जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे."
सर्व मानव जातीचे कल्याण हे शिक्षित झाल्याशिवाय किंवा धनसंचय केल्याशिवाय होणारच नाही, त्याबद्दल बाबासाहेब म्हणतात,"जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे, ती एक शिरजोरीची सजावट आहे, किंवा वेडगळपणा आहे. हिंदू धर्माची अशी वेगवेगळ्या दृष्टीने व्याख्या करणारे बाबासाहेब हिंदू धर्माचा त्याग करणार नाहीत तर काय करतील ?
             डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच धर्माचा अभ्यास केला होता. सर्व धर्माच्या मानवी हक्काबाबत अभ्यास केला होता, कोणकोणत्या धर्मात मानवीमूल्ये जपली जातात त्या धर्माचा स्वीकार करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले होते आणि सर्व धर्माच्या अभ्यासातून शेवटी बाबासाहेबांनी 'बुद्ध धम्म' स्वीकारला.

बाबासाहेबांनी का स्वीकारला बुद्ध धम्म  ?

      बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का स्वीकारला ? याची कारणे....पुढील प्रमाणे सांगता येतात.... बुद्धधम्मात कर्मकांड नाही, उचनिचता नाही,  देव-देव नाही,  जिथे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा पवित्र हेतु आहे. अवडंबर नाही, मोक्ष, नरक, स्वर्ग ह्या कल्पनांना थारा नाही. दैव,नशीब,पंचांगी भविष्य, त्याचा प्रचार-प्रसार नाही, कुठल्याही अवताराचे, चमत्काराचे समर्थन नाही, भेदभाव नाही, थोतांड नाही, वर्णभेदाची उतरंड नाही. प्रज्ञेला म्हणजे ज्ञानाला, हुशारीला महत्व आहे. शीलाला महत्व आहे, करुणा उत्पन्न व्हावी असा आदरभाव आहे.
        हिंदू धर्मात अस्पृश्य मानलेल्या सर्व जातींचे जे जे हक्क नाकारले ते ते बुद्ध धम्मात नाकारलेले नाही. ते हक्क मिळण्याची समानता आहे. 
समानता ही समग्र मानव जातीचे कल्याण होण्यासाठी कारणीभूत ठरते. कारण समानतेमुळेच समग्र मानव जातीचा विकास होऊ शकतो; मात्र असमानता म्हणजेच विषमता ही मानवी उत्कर्षाच्या आड येते. म्हणून ज्या धर्मात समानता म्हणजेच समता असेल तो धर्म व पर्यायाने त्या धर्मातील मानव जातीचा समुदाय वेगाने विकास करू शकतो. हा बाबासाहेबांचा समतेचा विचार भारतातील जनतेने अंगिकारला असता तर भारत हा देश जगात महासत्ता बनला असता. 
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी असलेले गुण म्हणजे प्रज्ञा शील आणि करुणा होत. तथागताकडे असणाऱ्या गुणांचा बाबासाहेबांनी अंगीकार करून समाज घडवण्याचे व्रत हाती घेतले होते. बाबासाहेबांनी  तत्कालीन अस्पृश्य असणाऱ्या महार समाजाला १९५६ ला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध केला. बाबासाहेबांचे हे पाऊल तथाकथित हिंदू धर्माला हादरा देणारे होते. ही भारतातील हिंदूवादी समाजव्यवस्थेतील अत्यंत क्रांतिकारी घटना होती. 
      भारतीय मानवसमुहात असलेली भेदनीती व जातीची विषमता मोडीत काढण्यासाठी अनेक क्रांतिकारक संत,थोर पुरुष इथल्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध लढले आहेत. 
          सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यात महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा होता.

बाबासाहेबांचा समतावादी विचारच देशाला तारेल..!

            "सर्वांचे कल्याण होवो" हा सिद्धार्थ गौतम बुद्धांचा समतावादाचा वैश्विक विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अंगिकारण्याआधी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला व शेवटी बुद्धधम्माची निवड करून हिंदू धर्माचा त्याग केला... आणि भारतातील लाखो दु:खी,पीडित,अस्पृश्य, बहिष्कृत समुहातील लोकांसोबत माणूस म्हणून जगण्यासाठी समतावादी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदू धर्मात असलेल्या विषमतावादाचे उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण भारतच बौद्धमय करण्याचा त्यांचा पवित्र हेतु होता. हे त्यांनी  "प्रबुद्ध भारत" नावाने सुरू केलेल्या वृतपत्राच्या शीर्षकावरून कळून येते.
              प्रबुद्ध भारत म्हणजे समतावादी विचारांचा भारत. जिथे जिथे समता असेल तिथे तिथे वर्णभेद, वर्गभेद नसतील व एककल्ली व्यवस्था नसेल..! जिथे भेद निर्माण होत नाही, तिथे कलह निर्माण होऊ शकत नाही. जिथे कलह नसेल, तिथे शांतता असेल, जिथे शांतता असेल तिथे सुख असेल ! अशा सुखी भारताची संकल्पना बाबासाहेबांच्या मनात होती. ह्या संकल्पनेला इथल्या विषमतावादी व्यवस्थेने नाकारले होते, ते आजही नाकारलेलेच आहे. याचे कारण हेच की, इथल्या विषमतावादी लोकांचे श्रेष्ठत्व टिकवून ठेवायचे असेल तर जातीभेद धर्मभेद, वर्गभेद, वर्णभेद टिकून राहिले पाहिजे. यासाठी मूठभर श्रीमंताच्या हातात देशाची सत्ता असेल आणि सत्ताधारी हे मूठभर लोकांच्या धर्मसत्तेचे गुलाम असतील आणि धर्मसत्ता ही ऐतखाऊंच्या मुठीत असेल, असा हा भारतातील विषमतावादाचा सिद्धांत सांगता येतो.
             परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय भारत होता. जिथे समग्र मानव जातीच्या कल्याणाचा विचार होता. समतावादाचा विचार होता. तो विचार जर रुजला असता तर सुखी आणि समृद्ध भारत आपणास पहावयास मिळाला असता. देशात शांतता नांदली तरच देश सुखी आणि समृद्ध होईल. परंतु देशात शांतता नांदत नसेल तर देश सुखी आणि समृद्ध कधीच होणार नाही.
           सध्या तर देशात शांतता नसून अराजकता माजली आहे.
 अशा या अराजक व्यवस्थेत सध्या देशातली जनता भयभीत आहे. जनता भयभीत करण्याला कारणीभूत इथले सत्तांध आणि धर्मांध लोक आहेत. ह्या सत्तांध ,धर्मांध आणि व्यापारी सत्ताधाऱ्यांनी देशाची संपती अतीश्रीमंतांना किरायाने देण्याचा सपाटा लावला आहे. हे मूठभर श्रीमंत लोक भारतातीलच आहेत म्हणून ठीक आहे. ह्या सत्ताधारी लोकांनी भारतीय संपती जर भारताबाहेरच्या देशातल्या श्रीमंतांना विकली तर भारतीय जनतेला पुन्हा इंग्रजांच्या गुलामगिरीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर देशाला अबाधित ठेवायचे असेल तर बाबासाहेबांचे समतावादी विचारच या देशात सुख,समृद्धी, शांतता निर्माण करू शकतात. बाबासाहेबांचा संविधानात आलेला विचार हा समतेचा विचारच देशाला तारू शकेल ! म्हणून केवळ एकाच जातसमुहाकडून बाबासाहेबांची जयंती साजरी न होता ती वैश्विक पातळीवर साजरी  व्हावी. बाबासाहेबांच्या विचारांची संपूर्ण भारत देशाला गरज आहे. म्हणून बौद्ध बांधवांसह भारतातील सर्व धर्मियांना बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करण्याची गरज आहे.
जयभीम ! जयभारत !!

✍️ डॉ.धोंडोपंत मानवतकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...