गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात...
- डॉ.धोंडोपंत मानवतकर


        
मंठा /प्रतिनिधी
        "आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्याकडून चांगली प्रेरणा, चांगला आदर्श आणि चांगले संस्कार मिळतात आणि तेच संस्कार माणसाचं आयुष्य सुंदर करतात" असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
        मंठा येथील संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था व बाल -सुधारगृहाच्या वतीने डॉ.मानवतकर यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी धोंडोपंत मानवतकर यांना शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी नाट्यकर्मी सतीश खरात व जय मराठवाडा टिव्हीचे पत्रकार महादेव पाखरे यांनी डॉ.मानवतकरांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
                  आपल्या भाषणात बोलतांना डॉ.मानवतकर यांनी वृक्ष हेच माणसाचे खरे सगेसोयरे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,शिल्पकार जसा दगडाची मूर्ती कोरतांना दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकतो तद्वतच प्रत्येक माणसाने आपल्यातील दुर्गुण कायमचे काढून टाकले पाहिजे तरच तुमचे आयुष्य सुंदर व सुसंस्कारी होईल...यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
          वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे नाट्य व सिनेकलावंत सतीश खरात लिंबेवडगावकर यांनी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांना भेट म्हणून दिलेल्या वटवृक्षाचे वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरात रोपण करण्यात आले. 
        याप्रसंगी वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात वृक्षदिंडी काढण्यात येऊन डॉ.मानवतकर यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण केले. यावेळी ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी व वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर संत तुकारामांचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे" हा अभंग आळवून कार्यकमात रंग भरला.
         संस्थेचे सचिव शुभम कृष्णाजी शेंडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचलन केले, शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...