शुक्रवार, १४ मार्च, २०२५

दै."निळे प्रतीक" वर्धापनदिनाच्या निमित्ताने....एक दृष्टिक्षेप
वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप, त्यांचे प्रश्न, संपादकांची भूमिका आणि वाचकांची बदलती अभिरुची.   

          निळे प्रतीक' या साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात व्हावे, ही अनेक दिग्गज मान्यवरांची, लेखकांची व वाचकांची इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे. दैनिकांत रुपांतर व्हावे, ही सर्वांची इच्छा असणे हे शतप्रतिशत मान्य आहे; परंतु दैनिक चालवणे तितके सोपे राहिलेले नाही ; म्हणून साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात करून ते चालवायचे. हा संकल्प सहज सोपा नक्कीच नाही; परंतु आमचे जिवलग मित्र 'निळे प्रतीक'चे संपादक मा.रतनकुमारजी साळवे यांनी संभाजीनगरसह महाराष्ट्रातील मान्यवर मित्र, साहित्यिक मित्र, उद्योजक मित्र, संस्थाचालक, वाचकप्रेमी, यांच्या इच्छेखातर साप्ताहिक 'निळे प्रतीक'चे रुपांतर दैनिकात करावयाचा संकल्प केला आणि तो पूर्णही करत आहेत ; परंतु ह्या संकल्प पूर्तीसाठी भविष्यात किती अडचणींना तोंड द्यावे लागणार.. हे संपादकांनी गृहीत धरलेले असेलच.  दैनिकात रुपांतर केल्यानंतर दैनिकांसाठी येणाऱ्या अडचणींना संपादकांनाच तोंड देत रहावे लागणार...हे सर्व ज्ञात असूनही संपादकस्नेही मा.रतनकुमारजी साळवे यांनी आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राचे रुपांतर दैनिकात केले, ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. तेवढीच ती धाडसाची आहे. आजमितीला वृत्तपत्र चालवण्यासाठी धाडस करणे, ही बाब अंगावर काटा आणणारीच आहे... कारण आज आपण आभासी जगात वावरतोय..! आभासी जग म्हणजे थोडंफार खरं आणि बाकी सारं फसवं जग. या फसव्या जगात वावरूनही एकमेकांवर विश्वास ठेवायचा आहे, ही जरा तारेवरचीच कसरत आहे. ह्या तारेवरच्या कसरतीचा स्वीकार करून आपला खेळ सुरु ठेवावा लागणार आहे, हे संपादकांना माहित आहेच.
        निळे प्रतीक'चे रुपांतर दैनिकात करण्यासाठी रतनकुमारजी साळवे यांनी आपल्या सर्व वाचक, मित्र मैत्रिणींना, उद्योजकांना, विविध क्षेत्रातील मान्यवरांना दैनिक सुरु करण्यापूर्वी लिखित स्वरूपात आवाहनच केले होते...ते म्हणतात, "साप्ताहिक निळे प्रतीक" या वृत्तपत्रास आपण मागील १५ वर्षापासून तन,मन,धनाने साथ दिली आहे. आम्ही आपल्या कायम ऋणातच राहू इच्छितो. केवळ आपल्याच भरोशावर "निळे प्रतिक"ने महाराष्ट्रभर चळवळीचे वृत्तपत्र म्हणून नावलौकिक संपादन केले आहे. अशा पार्श्वभूमीवर आम्ही आपले एका महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू  इच्छित आहोत. १५ वर्ष यशस्वीरित्या अखंडित सुरू असलेल्या साप्ताहिक "निळे प्रतीक" चे रूपांतर आपण दैनिकांत करणार आहोत. हा संकल्प आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही सोडला आहे. सध्या आपला देश खडतर परिस्थितीतून वाटचाल करत आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याची चर्चा सर्वसामान्यात जोर धरत आहे. संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी म्हणून तुमची आमची जबाबदारी फार मोठी आहे. ही लढाई यशस्वीरित्या लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीने दैनिक सुरू करण्याचे धाडस केले आहे. आपण आमच्या या संकल्पपूर्तीसाठी पूर्वीप्रमाणेच साथ देऊन सहकार्य कराल ही नम्रपणे विनंती करतो..!" अशा प्रकारचा संदेश व विनंतीवजा आवाहन संपादकमित्र रतनकुमार साळवे यांनी समाजबांधवांना व संपूर्ण समाजाला केले होते... काही समाजबांधव सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशीसुध्दाआहेत. अनेकांचे सहकार्य मिळत आहे; परंतु हे सहकार्य आजीव सभासदाच्या रुपाने अखंड मिळावे अशी अपेक्षा आहे.
               निळे प्रतीक 'चे रुपांतर दैनिकात झाले खरे;परंतु हे दैनिक चालविण्याची जबाबादारी फार मोठी आहे. म्हणून समाजात ज्यांचा सधन व्यक्ती म्हणून नावलौकिक आहे अशा समाजबांधवांनी निळे प्रतीक च्या दैनिकाला जाहिरातीच्या व धम्मदानाच्या रुपाने अखंड मदत करावयाची आहे. बऱ्याच समाजबांधवांनी "निळे प्रतीक " साप्ताहिक असताना सर्वतोपरी मदत केलेली आहेच. रतनकुमार साळवे यांनी सुध्दा या वृतपत्राच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाची दखल घेतलेली आहेच. त्यांना निळे प्रतीक' च्या विचारपीठावर मानसन्मान दिलेला आहे.   
         निळे प्रतीक'हे वृत्तपत्र नव्हे, तर ही एक परिवर्तनाची चळवळ आहे. आणि एखाद्या चळवळीला हक्काचे वृत्तपत्र असले पाहिजे म्हणून निळे प्रतीक हे दैनिक म्हणून नव्हे तर सैनिक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.    शिवाय 'निळे प्रतीक'ही एक बहुदेशीय संस्था आहे. 'निळे प्रतीक' ही संस्था आणि 'निळे प्रतीक ' वृतपत्र हे दोन्ही वेगवेगळे नसून एकजीव आहेत. 'निळे प्रतीक'च्या माध्यमातून अनेक वर्षापासून मित्रवर्य रतनकुमारजी साळवे हे समाजातील कर्तबगार व कार्यकुशल लोकांचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या नावाने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत आहेत. अनेक  गुणवंत, विचारवंत, कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, समाजसेवक, कलाकार, कर्तव्यदक्ष अधिकारी, अशा समाजबांधवाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना निळे प्रतीक'ने विविध पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे. याच माध्यमातून वृद्धिंगत झालेला 'निळे प्रतीक'चा नावलौकिक आपणास दिसून येतो आहे.
           निळे प्रतीक' हे शीर्षकच आंबेडकरवादी विचारधारेचा प्रचार - प्रसार करण्याचा विचार आपल्यासमोर ठेवते. आंबेडकरवादी विचाराधारा ही मानवतावादाचा पुरस्कार करणारी आहे. संविधानात आलेला मानवतावादाचा विचार हा समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार होय. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्राने पुढाकार घेतला पाहिजे. गुंडशाही, झुंडशाही आणि हुकुमशाहीला खतपाणी घालणाऱ्या वृत्तींना आणि विचारांना नेस्तनाबूत करण्याचे काम वृत्तपत्र करू शकते. हे केवळ दैनिक 'निळे प्रतीक'चेच काम नसून सर्वच वृत्तपत्राचे काम आहे, नव्हे, ती वृतपत्राची खरी जबाबदारी आहे. 

*वृतपत्राचे बदलते स्वरूप व त्यांचे प्रश्न* 

         वृत्तपत्रांचे अच्छे दिन केव्हाच संपले आहेत. वृत्तपत्रांची जागा विविध चॅनेलने घेतलेली आहे. प्रिंट मिडियाची जागा इलेक्ट्रॉनिक मिडियाने घेतली आहे. वृतपत्राचे स्वरूप बदलले आहे. आता वृत्तपत्र सोशल मिडीयावर ऑनलाईन पद्धतीने 'पीडीएफ'च्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागले आहे. वृतपत्र विकत घेऊन वाचणारा वाचक कमी झाला आहे. वृतपत्रातून दिल्या जाणाऱ्या सामाजिक, राजकीय स्वरुपाच्या जाहिरातीला आळा बसला आहे. कारण समाज माध्यमाद्वारे अनेक प्रकारच्या जाहिराती करणे सोपे झाले आहे ; म्हणून वृतपत्रासाठी मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या... वृतपत्र जाहिरातीच्या पैशावर चालत होते. ती वृतपत्रांना मिळणारी मिळकत बंद झाली आहे. परिणामी वृतपत्र चालवण्यासाठी  मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. म्हणजे वृतपत्र चालवायचे कसे असे अनेक प्रश्न वृतपत्र मालकांसमोर उभे आहेत.

वृत्तपत्र संपादकाची भूमिका

        या अगोदर वृत्तपत्राचा मालक आणि संपादक वेगवेगळे असायचे. त्यांची भूमिकाही पारदर्शी असायची. निःस्पृह, निर्भिड, निष्पक्षपातीपणा त्या वृतपत्रातील बातम्यामधून दिसून येत होता. थोडक्यात म्हणजे सर्वत्र पारदर्शीपण होता. म्हणूनच 'वृतपत्र हा समाजाचा आरसा आहे' असे म्हटले जात होते. परंतु अलिकडच्या काळात वृत्तपत्राचा मालकच संपादक म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. त्याच्याजवळ पत्रकारितेची पदवी किंवा त्याला सामाजिक भान नसले तरी चालते. म्हणून मालकाच्या बुद्धीला वाट्टेल त्या बातम्या, वाट्टेल त्या जाहिराती आणि मनमानीपणा वाढीस लागला आहे. मूळात पत्रकारितेची पदवी असलेला अनुभवी पत्रकार वर्ग, संपादक वर्ग आता वृतपत्रात दिसून येत नाही. म्हणून बातमीमध्ये असलेली सत्यता, किंवा पारदर्शकता किंवा बातम्यासाठी असलेला निकषही उरलेला नाही. स्वतः मालकच संपादकाची भूमिका निभावतोय म्हणून त्याचेकडून चांगल्या संपादकाची अपेक्षा करता येईलच असे नाही.. वृत्तपत्राचा मालकच वृत्तपत्राची सर्व जबाबदारी पार पाडत आहे. 
        याअगोदर काही वृतमानपत्रे एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या मालकीची असत. म्हणून ते त्यांच्याच बातम्या टाकत असत. ५० % त्यांच्याच पक्षाचा कैवार घेत असायचे. बाकी ५० टक्के सामाजिक बांधिलकी जपत होते. मात्र अलिकडे तशी परिस्थिती नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आपली स्वतंत्र वृतपत्रे आहेत. एवढेच काय त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र चॅनेल सुध्दा आहे. म्हणून इतर वृत्तपत्रांना जाहिराती मिळण्याचा प्रश्नच नाही... म्हणून जाहिरातीच्या जीवावर छापले जाणारे वृतपत्र बंद पडली आहेत. कारण छपाईचा खर्च निघत नाही म्हणून पीडीएफ केलेले वृत्तपत्र समाज माध्यमावर फिरत असते. पीडीएफमुळे छपाईचा खर्च टाळता आलेला आहे. म्हणून बरीच वृत्तपत्रे संपादकाच्या स्वतःच्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी व प्रसिद्धीसाठी ऑनलाईन वृतपत्रे चालू आहेत.त्या वृतपत्रांकडून कोणत्याच प्रकारची अपेक्षा करता येत नाही.

वाचकांची अभिरूची

      वृत्तपत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेता वाचकांची अभिरुची बदलणेही नवलाचे नाही. प्रवाहाबरोबर सगळीच माध्यमे बदलत आहेत. त्यात वाचकांची अभिरुची बदलली म्हणून नवल वाटायलाच नको.
इलेक्ट्रॉनिक मिडीयाने प्रिंट मिडियावर घाव घातला आहे. दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, नियतकालिके, अनियतकालिके ही प्रसारमाध्यमे आज संकटात आहेत. त्यांच्यासमोर आर्थिक संकट हे एकच कारण नसून वाचकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लेखकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनतेला नेमके काय वाचावयास द्यावे हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण वाचकांची अभिरुची बदललेली आहे. वाचकांना नेमके काय लागते याचाही सुगावा घेणे अवघड झाले आहे. नियतकालिके चालविण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत वृत्तपत्र चालवणे कठीण होऊन बसले आहे. तरीही वृत्तपत्र चालवण्याचे धाडस करणे आणि त्यातही फुले, शाहू,आंबेडकरी  चळवळीची परिवर्तनवादी विचारधारा घेऊन वृत्तपत्र चालवायचे ही  तर अत्यंत धाडसाची बाब आहे.
          समाजबांधवांच्या सहकार्यावर वृतपत्र चालवताही येईल; परंतु समाजबांधव पाठीराखे होऊन उभे राहिले पाहिजे. तेही अखंड उभे राहिले पाहिजे... तरच परिवर्तनवादी विचारधारेचे वृतपत्र अखंड चालवणे शक्य आहे. 'निळे प्रतीक ' चे संपादक रतनकुमार साळवे यांना सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन "निळे प्रतीक " चा हा किल्ला सहज सर करता येईल या अपेक्षेसह निळे प्रतीक चे संपादक रतनकुमार साळवे व त्यांच्या सोबत असणाऱ्या 'निळे प्रतीक'च्या परिवाराला वर्धापन दिनानिमित्त मनस्वी खूप शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
भ्रमणभाष्य - ९८९०८२७४१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मा.मं. म्हणजे काय ? - लेखक- डॉ.अशोक राणा, यवतमाळ.

‘मामं’ म्हणजे काय ?                                 इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक   मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...