‘मामं’ म्हणजे काय ?
इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले आहे. प्रा. मा.मं.देशमुख यांच्या जीवन चरित्रावर प्रसिद्ध लेखक अभ्यासक डॉ.अशोक राणा ( यवतमाळ ) यांनी लिहिलेला लेख.
डॉ.अशोक राणा,यवतमाळ.
‘मा.मं.' म्हणजे इतिहास, ‘मामं’ म्हणजे प्रबोधन आणि ‘मामं’ म्हणजे स्वस्त पुस्तकं. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रबोधनासाठी इतिहासाचा योग्य वापर करून लिहिलेली पुस्तकं स्वस्तात उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणजे ‘मामं’. असा ‘मामं’ चा थोडक्यात परिचय करून देता येईल. यापलीकडे सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय प्रबोधनाचा जागर करण्यासाठी पायाला भिंगरी लागल्यागत भटकणारा माणूस म्हणूनही त्यांचा परिचय महाराष्ट्रभर आहे. गेल्या शतकामध्ये त्यांची व्याख्याने न ऐकलेली व्यक्ती अभावानेच आढळेल.
वाचक चळवळ
“ ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट,त्याचं घर होईल सपाट “ हे वाक्य कानी पडलं की एकच नाव ओठावर येते व ते म्हणजे मा.म.देशमुख. “ वाचाल,तर वाचाल ” हेही त्यांनी कानोकानी पोहोचविलेलं वाक्य मराठीतील वाक्प्रचारासारखं अनेकांच्या ओठावर स्थिरावलेलं आहे. एका परीने त्यांनी एकाकीपणे वाचक चळवळ महाराष्ट्रात रुजविलेली आहे. परंतु,या दृष्टिने त्यांची दखल कुणी घेतल्याचे दिसून येत नाही. अर्थात, शासनाने या कार्यासाठी त्यांना सन्मानित केले नाही. परंतु,त्याची तमा कधीही त्यांनी बाळगली नाही. शासकीय पुरस्कार,पदव्या,सन्मान या प्रलोभनापासून तर ते खूपखूप दूर आहेत. आकाशवाणी,दूरदर्शन, वृत्तपत्रे यांच्या प्रसिद्धीचाही स्पर्श त्यांना झाला नाही. तरीही जनसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलेली व्यक्ती म्हणून ‘मामं’ चा उल्लेख करावा लागेल.
शासकीय पुरस्कार,मान-सन्मान व पैसा प्राप्त करण्यासाठी हातभार जिभा काढून लाल गाळत राजकीय नेत्यांच्या उंबरठ्यावर उभी असलेली लाचारांची फौज पाहिली की, ‘मामं’ च्या स्वाभिमानाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमान व स्वातंत्र्य कशाला म्हणतात,हे समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. त्यांनी नागपूरच्या रेशीमबागेतील प्रतिगामी धटिंगणांची लक्तरे वेशीवर टांगलीत व त्यांच्याशी चार हात केले. त्यातून त्यांच्या काळ्याकुट्ट भूतकाळाची ओळख मराठी वाचकाला झाली.
सत्यशोधनाचा वसा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधनाचा वसा घेतलेली जी काही मोजकी माणसे महाराष्ट्रात आहेत,त्यापैकी एक आहेत मा.म.देशमुख. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोल्हापुरात उभारणाऱ्या भाई माधवराव बागल यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. भारतीय जनतेला माहितीचा अधिकार मिळावा म्हणून लोकचळवळ उभारणारे न्या.पी.बी. सावंत त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून धावून आले. भारतीय कृषिक्रांतीचे प्रणेते भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणाची गंगा पोहोचविणारे शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे सान्निध्य त्यांना लाभले. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे लोकविद्यापीठाचे स्वप्न साकारणारे वीर उत्तमराव मोहिते यांची प्रेरणा त्यांच्या इतिहास संशोधनाला मिळाली. संत गाडगेबाबांची शिकवण अंगिकारून अज्ञान व अंधश्रद्धेची जळमटे नाहीशी करण्याचे स्फुरण त्यांना मिळाले. भारतात बहुजनवाद रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या मा.कांशीरामजी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भारतभर भ्रमण केले.
अशा या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाची प्रेरणा घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांपैकी मीही एक आहे. भारतातील साहित्य संस्थांमध्ये चालणाऱ्या जातीयवादी कट-कारस्थानांची माहिती देणारे ‘साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही’ हे माझे पहिले पुस्तक होय. त्याचे प्रकाशन २७ डिसेंबर१९८७ रोजी ठाणे येथे झालेल्या तथाकथित अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कविवर्य प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्याला वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी दिल्यामुळे त्याची खूप चर्चा महाराष्ट्रभर झाली. त्यानंतर ‘सा.बहुजन नायक’ वाचक-लेखक मेळाव्याच्या निमित्ताने आर्वी येथे झालेल्या ‘पहिल्या बहुजन साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद मला मिळाले. या संमेलनाचे उद्घाटन प्रा.मा.म. देशमुख यांच्या हस्ते झाले. माझ्यासाठी हा सन्मानाचा प्रसंग होता. यानिमित्ताने पहिल्यांदाच मी मामं.च्या सोबत विचारपीठावर स्थानापन्न झालो.
बहुजन समाज पक्षाच्या उभारणीत मामं.चे मोलाचे योगदान होते. त्यामुळे मलाही त्यात सहभागी होण्याची इच्छा झाली. भिंती व रस्ते रंगविणे, पोस्टर, बिल्ले स्क्रीन प्रिंटींगद्वारे छापणे,भाषणे देणे इ.उपक्रमात माझा सहभाग वाढला. त्यामुळे मला महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेरसुद्धा जावे लागले.
त्यांची व्याख्याने ऐकून व पुस्तके वाचून मला शिवरायांच्या राज्याभिषेकाच्यावेळी झालेल्या त्यांच्या अपमानाची जाणीव झाली. त्यातून माझे ‘शिवाजी शूद्र कसा ?’ हे पुस्तक आकाराला आले. १९८८ मध्ये यवतमाळ येथील नगर वाचनालयात साम्यवादी विचाराच्या संघटनांनी ‘जातीयवाद विरोधी मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्यातील प्रमुख वक्ते कॉ.गोविंद पानसरे व अध्यक्ष मी होतो. या प्रसंगी कॉ.पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ” या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्याच विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी शिवसेनेच्या लोकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. यानंतर मी कॉ.पानसरे यांचे पुस्तक वाचले. त्यातून मला ‘शिवाजी शूद्र कसा ?” या पुस्तकाचे शीर्षक सुचले. आज महाराष्ट्रभर हे पुस्तक वाचले जाते व त्यामुळे लेखक म्हणून मला ओळख मिळाली.
रामदासाची लंगोट
रामदासावर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मा.म.होत. हे वाक्य आपणास धक्कादायक वाटू शकते. परंतु,आजवर रामदासावर जेवढे लेखन सातत्याने त्यांनी केले,ते पाहिले असता आपणास त्याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या काही निष्कर्षांवर डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे स्वीय सचिव वीर उत्तमराव मोहिते यांचा प्रभाव होता. अमरावतीच्या प्रभात टॉकीजमध्ये ‘भगवा झेंडा’ या चित्रपटात रामदासांच्या पाया पडताना शिवाजी महाराजांना दाखविले होते. या अनैतिहासिक प्रसंगामुळे शिवरायांचा अपमान झाला आहे,असे वाटल्यामुळे उत्तमराव मोहिते यांनी चित्रपटाचा पडदा फाडला होता. त्यामुळे पोलीस त्यांना घेऊन जात होते. डॉ.पंजाबराव देशमुख यांना ते दिसले तेव्हा त्यांनी त्यांना सोडविले. उत्तमराव मोहिते यांच्या या धाडसामुळे त्यांनी त्यांना ‘वीर’ ही पदवी दिली. त्यामुळे ते वीर उत्तमराव मोहिते या नावाने ओळखले जाऊ लागले.
वीर उत्तमराव मोहिते यांनी ‘रामदासाचा राष्ट्रद्रोह’ स्पष्ट करून त्यांना ‘आदिलशहाचा हेर’ म्हटले. हाच धागा पुढे धरून ‘मामं’नी रामदासाच्या कृष्णकारस्थानाचा पर्दाफाश केला. रामदासाच्या उपदेशातून ब्राह्मण संघटित झाले व त्यामधून पेशवाई अस्तित्वात आली. या संशोधनाला सर्वसामान्य वाचक व श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘मामं’ना यश आले. त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रबोधन होऊन अनेक पुरोगामी संघटनांना कार्यकर्ते मिळाले. एका व्यक्तीने प्राणपणाने आपल्या स्वीकृत कार्यासाठी प्रबोधनाचा जागर सुरू ठेवला तर माणसे बदलतात,हे या निमित्ताने महाराष्ट्राला कळले. शिवचरित्रात रामदासाची घुसखोरी कशी व कुणी केली यावर सातत्याने ‘मामं’ नी लेखन व भाषणे केल्यामुळे रामदासांना नाकारण्याची मानसिकता नव्या पिढीत तयार झाली. पुरंदरेंच्या पिलावळीने रामदासाला शिवचरित्रात प्रतिष्ठित करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. परंतु,त्यांना हार मानावी लागली. ‘मामं’च्या प्रबोधनामुळे रामदासाची केवळ लंगोट शिल्लक राहिली. पत्रकारितेचा आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,अशा आचार्य अत्रेसारख्या लेखकाने त्यांच्या विरोधात आपली लेखणी झिजविली. तशीच मराठी गझलची चळवळ करणाऱ्या कविवर्य सुरेश भटांनीही त्यांच्या विरोधात लेखनकामाठी केली. त्यांनी थेट ‘मामं’च्या देशमुख या आडनावावरच घाव घातला.
देशमुखी वतनाचे मूळ
१९९९मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने ‘शिवराज्य पक्षा’ची घोषणा झाली. या नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी प्रा.मा.म..देशमुखांची निवड झाली. या पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी मामं.नी पत्रकार परिषद घेतली. दूरदर्शनवर तिचे प्रसारण झाले. त्यामुळे मामं.ना पहिल्यांदा व्यापक प्रसारमाध्यम मिळाले. या घटनेमुळे त्यांच्या विरोधकांचा जळफळाट होणे स्वाभाविक होते.
सुरेश भट नागपूरच्या दै.लोकमतमध्ये या दरम्यान ‘सारासार’ या शीर्षकाखाली एक सदर लिहित असत. त्यांनी या सदरातील एका लेखात शिवराज्य पक्षावर टीका केली. त्याचबरोबर या पक्षाचे अध्यक्ष म्हणून ‘मामं’वरही आगपाखड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी ‘देशमुखी वतन’ हे मुसलमानी अमदानीत निर्माण झाले असे विधान केले. आपल्या या विधानाचे खंडन करून ते खोटे आहे,हे कुणी सिद्ध केले तर मी कविता करणे सोडून देईन अशी घोषणाही त्यांनी या लेखात केली होती. या लेखावर मामं.नी प्रतिक्रिया काही दिली की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु,मामं.वरील आरोपांचे खंडन करण्याकरिता एक लेख लिहून सुरेश भटांकडे मी पाठविला. परंतु,त्यांनी तो प्रकाशित केला नाही. या लेखात ‘देशमुखी वतन’ हे मुसलमानी राजवटीत व मुसलमानांनी निर्माण केले नसून त्यापूर्वीही ते अस्तित्वात असल्याची माहिती मी दिली होती. हा लेख पुढे देत आहे. या लेखाचे शीर्षक होते-
बोगस कोण ? मा.म.देशमुख की सुरेश भट !
“ ही ‘शिवराज्य पार्टी’ की बहुजनांच्या नावावर निघालेले नवीन नाटक !” या शीर्षकाखाली दै.लोकमत दि.६-८-१९९९ च्या अंकातील ‘सारासार’ या सदरात सुरेश भटांनी लिहिलेला एक लेख प्रकाशित झाला आहे. संपूर्ण लेखामध्ये प्रा.मा.म.देशमुखांना त्यांनी महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ बोगस इतिहासाचार्य या शेलक्या विशेषणाने संबोधले आहे. या लेखाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचा परामर्श घेणे आवश्यक वाटले म्हणून या ठिकाणी लिहित आहे. सुरेश भटांच्याच सारासार(अविवेकी)लेखनशैलीचा अवलंब करून लिहायचे झाल्यास कविभ्रष्ट सुरेश भट(की भ्रष्ट) असा त्यांचा उल्लेख करता येईल किंवा ‘कवी’ या शब्दाचा वऱ्हाडी भाषेत होणारा ‘कळलाव्या’ हा अर्थ घेतल्यास ‘कविवर्य’ म्हणजे ‘कळीचा नारद’ असेच म्हणावे लागेल. पण आपल्या शिवराळपणालाच परखडपणा समजून सदैव याच्या ना त्याच्या चरणी लोटांगण घालणाऱ्या या तथाकथित कविश्रेष्ठां(?)साठी मायमराठीचा दुरूपयोग करण्याची माझी इच्छा नाही. यापूर्वी गंगाधर पानतावणे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होणार अशी माहिती कळल्याबरोबर व त्यानंतर यशवंत मनोहरांना अध्यक्षपद मिळाल्यावर सुरेश भटांनी जो त्रागा केला होता,तो साऱ्यांना माहित आहेच. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर हे पद मिळाले नाही म्हणून शरद पवार ब्राह्मणविरोधी आहेत असे भट म्हणत सुटले. पण त्यांच्या थिल्लरपणामुळे डॉ.मनोहरांच्या अल्पकालीन अध्यक्षपदाची माल डॉ.य.दि.फडके यांच्या गळ्यात पडली. तेव्हा मात्र य.दि.फडके यांच्या विरोधात भटांनी दंड थोपटले नाही. किंवा पवारांचा ब्राह्मणद्वेष त्यांना सिद्ध करता आला नाही. त्यानंतर शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आल्यावर भटांनी बाळ ठाकरे यांच्या पायाशी लोळण घेतले. तरीही त्यांना साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद मिळू शकले नाही. या साऱ्या लटपटी करण्याआधी बौद्ध धर्माच्या दीक्षेचे नाटकही त्यांनी करून पाहिले. आपल्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरविण्यासाठी आजवर सारे विदूषकी चाळे करणाऱ्या भटांनी मा.म.देशमुखांच्या इतिहास ज्ञानाची उठाठेव का करावी ते कळत नाही.
शिवराज्य पार्टी स्थापन करताना मा.म.देशमुखांनी जे निवेदन पत्र परिषदेत केले,त्यावर भटांचा मुख्य आक्षेप दिसतो. आपल्या आयुष्याची उणीपुरी विसेक वर्षे ज्यांनी बुजन समाज पार्टीत काढली व बहुजनवादडच अनेकदा पुरस्कार केला,तेच विचार पत्रपरिषदेत मा.मं.नी मांडले. पण बसपात असताना त्यांच्यावर इतके तोंडसुख घेण्याची हिम्मत भटांना झाली नाही. ती आजच का झाली ? त्यांनी बसपा सोडून शिवराज्य पार्टी काढली म्हणून ? बसपाचे पाठबळ मा.मं.च्या सोबत नाही या विश्वासाने तर त्यांना हुरूप आला नसेल ? किंवा शिवरायांवर पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेचा मतदार हिरावून घेण्याचा प्रयत्न मा.मं.नी केला या भीतीने तर ते चेकाळले नसावेत ? की शिवसेनाकारांच्या ताटाखालचे मांजर होण्याची संधी ते शोधात असावेत ? असे कितीतरी प्रश्न निर्माण व्हावेत असे विसंगत लिखाण भटांनी केले आहे.
ज्या ज्योतिबा फुल्यांना ब्राह्मणांनी मदत केली त्यांचे ऋण मानून गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब,इशारा यासारखी पुस्तके लिहून ज्योतिबांनी ब्राह्मणी काव्याची नाना रूपे व्यक्त केली आहेत,त्यांच्याच विचारसरणीवर आधारित विधाने मा.म. देशमुखांनी केलेली आहेत. तेव्हा त्यांच्या नावाचा त्यांनी पापी उपयोग केला असे कसे म्हणता येईल ? बौद्ध धर्म स्वीकारलेल्या सुरेश भटांनी पाप पुण्याच्या कल्पनांना कवटाळून बसावे हेही अनाकलनीयच आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना वारंवार ‘साध्वी’ या उपपदाने संबोधणे म्हणजे ऋतंभरा,प्रीतिसुधा यांच्या रांगेत त्यांना बसविणे नव्हे काय ? मराठी भाषेतील शब्दांविषयी तसेच भाषाशास्त्राविषयी असलेले भटांचे अज्ञान हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. पण इथे इतिहासाविषयीच्या त्यांच्या अज्ञानाचाच प्रामुख्याने विचार करुया !
समतेचा व जातीय विषमतेविरुद्धच्या लढ्याचा भटांनी उल्लेख करू नये. कारण की,त्यांनी यासाठी काहीही केलेले नाही. ‘बहुजन’ या शब्दाच्या व्याख्येतही त्यांनी आपल्या मेंदूला व्यर्थ शिणवू नये असे मला वाटते. विशेषतः मा.म. देशमुखांनी बहुजन हा जो शब्द वापरला आहे,तो दलित,आदिवासी,इतर मागासवर्गीय तसेच धार्मिक अल्पसंख्याक या अर्थाने. भटांनी त्याचा कुणबी-मराठा हा अर्थ घेतला. यातूनच त्यांची पूर्वग्रहित दृष्टी दिसून येते. बहुजनांच्या दंढारात (भटांचा शब्द) यांचा समावेश नसतो असे भट म्हणतात. ज्योतिबा फुले शेती करणारांना (कुळवाडी) कुणबी म्हणतात. मराठा नावाची जात महाराष्ट्रात नाही,तेव्हा कुणबीच स्वतःला मराठा म्हणवून घेतात ही वस्तुस्थिती आहे. इतिहासाचार्य राजवाड्यासारख्या संशोधकांनी कुणबी-मराठ्यांचे महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान मान्य केलेले आहे. तेव्हा त्यांना अशा प्रकारे हिणवून चालणार नाही. जातीय श्रेष्ठत्वाचा अभिमान मराठा म्हणविणारांना आहे. तसेच तो ब्राह्मणांनाही आहे. ब्राह्मणी अहंकारामुळे इतरांवर सतत अन्याय होत असला तरी त्यात ब्राह्मणांना नेहमीच फायदा झालेला आहे. याउलट क्षत्रियत्वाच्या मगरमिठीत सापडलेल्या मराठ्यांनी स्वतःबरोबर आजवर इतरांचेही नुकसान केलेले आहे. या गोष्टीची जाणीव होऊन आजचा मराठा समाज पुरेसा जागरूक झाला आहे. फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणाऱ्या या समाजाकडे भटांनी आता संशयाने पाहू नये व बहुजन समाजात फूट पाडण्याचा ब्राह्मणी कावा चालवू नये अशी माझी त्यांना विनंती आहे.
शेवटी,इतिहासाचा ’इ’ माहित नसलेल्या सुरेश भटांनी या क्षेत्रातही आपले नाक खुपसून आपले हसे करून घेतले आहे. म्हणून याविषयीही थोडक्यात माहिती पाहूया. त्यांनी आपल्या अंगाचा खकाना करून घेऊ नये. कारण की ही एक शास्त्रीय चर्चा आहे. या लेखाच्या शेवटी भट म्हणतात-“ ...पण मी बोगस इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख यांना येथेच माझ्या ऐतिहासिक ज्ञानात मोलाची भर पडावी म्हणून एक विनम्र प्रश्न विचारतो,असा कोणता देशमुख आहे की,ज्याची सनद शिवाजी महाराज किंवा नागपूरकर भोसल्यांकडून मिळालेली आहे ? सर्वच सनदा हैद्राबादच्या निजामाकडून किंवा दिल्लीच्या मोगल बादशहाकडून मिळालेल्या आहेत. माझे हे विधान खोटे असेल तर मी (तसे सिद्ध झाल्यास)मराठी भाषेत कविता करणार नाही! इस पार या उस पार !”
या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर टाकण्याकरिता नव्हे तर एक आव्हान म्हणून भटांनी ‘देशमुखी’ वतनाविषयीचा प्रश्न विचारला आहे. आणि त्यांचे विधान खोटे ठरल्यास आपण मराठी भाषेत कविता करणार नाही अशी प्रतिज्ञाही केली आहे. आपल्या इतिहासाच्या अज्ञानापोटी मराठी कविता पणाला लावण्याचा अविचार त्यांनी करू नये. कारण की,त्यांच्या कवितेचे अनेक चाहते आहेत तसा मी ही आहे. अर्थात यांत्रिक रचनेमुळे भटांची कविता आता तशीही कालबाह्य झाली आहे. म्हणून त्यांनी आता थांबणेच योग्य आहे. असो,सुरेश भटांच्या माहितीनुसार देशमुखीच्या सनदा हैद्राबादच्या निजामाकडून किंवा दिल्लीच्या मोगल बादशहांकडून मिळालेल्या आहेत,असे मोघम विधान करून आपले इतिहास(अ)ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्या माहितीनुसार फक्त हैद्राबादच्या निजामाचे १७२४ पासून अधिपत्य होते. अर्थात या साऱ्या सनदा त्यानंतरच्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. पंधराव्या शतकाच्या शेवटी अहमदनगर येथे अस्तित्वात आलेली निजामशाही भटांच्या गावीही नाही. त्याचप्रमाणे ज्या निजामशाहीचा उगम १३४७ मध्ये स्थापन होऊन १४९० ते १५२१च्या दरम्यान पाच शकले झालेल्या बहामनी राजवटीत ही देशमुखी वतन होते,याचा तर त्यांना गंधही नाही. याउलट १७२६ साली उदयास आलेल्या मोगल बादशहांनी दिलेल्या सनदा म्हणजे मुसलमानी अमदानीचे अपत्य होय व सारे देशमुख हे मुसलमानांचे चाकर असल्यामुळे त्यांचा शिवशाहीशी काहीही संबंध नाही. म्हणून मा.म.देशमुखांनी ’शिवराज्य’ हे आपल्या पक्षाला नाव ठेवण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही,असेच जणू ते सुचवीत आहेत. कारण की,शिवाजी महाराजांनी देशमुखीच्या सनदा दिलेल्या नाहीत.
या ठिकाणी सुरेश भट पुन्हा तोंडावर आपटले आहेत. त्यांच्या या विधानावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशपरंपरागत वतनाविषयीचे काय धोरण होते,याविषयी भटांना काहीच माहित नाही हे स्पष्ट होते. साऱ्या इतिहास अभ्यासकांना ठाऊक असलेली ही गोष्ट भटांना माहित नसणे स्वाभाविकच आहे. विशेषतः केवळ एक राजकीय धोरण म्हणून शिवरायांनी वंशपरंपरागत वतनांना विरोध केला होता असे सारे ब्राह्मणी इतिहासकार आजवर म्हणत आले आहेत. त्यांच्या भूमिकेला विरोध करणारा ‘शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक प्रयत्न ’ या शीर्षकाखाली डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला लेख ‘ मराठेशाहीचा मागोवा’ या ग्रंथात आलेला आहे. त्यात स्वराज्यातील सर्व वतनदारांची इनामे व हक्क लाजिमे अमानत म्हणजे सरकार जमा केले आणि त्यांच्या मोबदल्यात प्रत्येक वतनदाराच्या वतनाच्या इनामाचा व हक्क लाजिम्यांचा विचार करून ठराविक रक्कम ( शिवरायांनी) बांधून दिली. हे शिवरायांचे कार्य समाजक्रांतीला प्रेरणा देणारे आहे असे डॉ. पवार म्हणतात. पण ‘पवार’ या आडनावाची ॲलर्जी असल्यामुळे भटांकडून वरील लेख वाचवणार नाही. म्हणून त्यांनी डॉ.अ.रा.कुळकर्णी यांचा ‘संस्कृती संगम’ या ग्रंथातील ‘देशमुखी वतन’ हा लेख आपल्या नजरेखालून घालावा अशी मी त्यांना शिफारस करतो.
डॉ. अ.रा.कुळकर्णी यांनी देशमुखी वतन हे भारतात मुसलमानी अंमल सुरू होण्याआधीपासून चालू होते हे पुरेशा पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. मराठ्यांचा पहिला इतिहासकार ग्रांट डफ याचा असा समज होता की बहामनीपूर्व काळातील नाईक मंडळींनी मुसलमान बंडखोरांना मदत केली व तेच पुढे देशमुख बनले. पण त्यांचा हा समज खानदेशचा पोलिटिकल एजंट व फारशीचा तज्ज्ञ कॅप्टन जॉन ब्रिग्जने खोटा ठरविला आहे. त्याच्या मते देशमुख-देशपांडे या संस्था हिंदूंच्या आहेत. ‘मुसलमानांनी या संस्था निर्माण केल्या असे घटकाभर मानले,तर ज्या प्रदेशात मुसलमानांनी अद्याप पाऊल टाकले नव्हते, त्या म्हैसूर प्रांतात अशाच प्रकारचे अधिकारी अस्तित्वात कसे होते ? यावर विस्ताराने लिहून डॉ.कुळकर्णी यांनी इ.स.७५४-९७५ या काळात होऊन गेलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात ग्रामकूट या नावाचा एक ग्रामप्रमुख अधिकारी असे. देशग्राम कूट याचा अधिकार एखाद्या विभागावर-ग्रामांच्या समूहावर चालत असे.,” असे नमूद केलेले आहे. देशग्राम कूट या शब्दांचेच रुपांतर देशमुख असे झाल्यामुळे देशमुख ही संस्था इ.स.च्या आठव्या शतकापासून अस्तित्वात होती हे ही सिद्ध होते. शिवरायांनी ही संस्था खारीज केल्यामुळे त्यांनी वंशपरंपरागत सनदा देणे शक्यच नाही. पण मराठा अंमल सुरू झाल्यावर शिवपुत्र राजारामाने साऱ्या वतनांचे पुनरुज्जीवन केले. पेशवाईने तर त्यांना अधिक बळकट करून सर्व सामान्यांचे शोषण केले. हे सारे माहित नसणाऱ्या सुरेश भटांनी केवळ देशमुख वतनाविषयीच कुरापत काढली. देशपांडे वतनाविषयी त्यांची दातखिळी बसली आहे. मा.म.देशमुखांनी शिवशाहीवर बहुजात दृष्टिकोनातून पुराव्यांसह प्रकाश टाकला आहे. आता तुम्हीच सांगा,भट महोदय बोगस कोण ?
वरील लेख याठिकाणी देण्यामागील कारण म्हणजे मा.म.देशमुखांनी ज्या ‘शिवराज्य पक्ष’ ची घोषणा केली होती,त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न कविवर्य सुरेश भटांनी केला होता,तो चुकीचा होता हे आजच्या वाचकांना कळावे. त्याचप्रमाणे ‘देशमुखी वतन’ हे मोगलांच्याही पूर्वी अस्तित्वात होते,या ऐतिहासिक वास्तवाचाही परिचय व्हावा.
कविवर्य सुरेश भटांचा माझ्याशी व्यक्तिगत स्नेह होता व त्यांच्या कवितांचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासूनच होता. सातव्या वर्गाच्या ‘आमची मायबोली’ या पाठ्यपुस्तकात त्यांची ’गीत तुझे मी आई गाईन’ ही कविता मला होती. त्यांच्या काव्य लेखनाच्या प्रेरणा व्यक्त करणारा त्यांच्या आईच्या मुलाखतीवरील लेख मी लिहिला होता. विशेष म्हणजे ते व मी अमरावतीकर असल्यामुळे त्यांच्याशी माझी घट्ट मैत्री होती. त्यांच्या गझलांच्या अनेक खाजगी व जाहीर कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभावाखाली मीही गझला लिहिल्या. तरीही त्यांच्या विरोधात मला लिहावे लागले. त्याचप्रमाणे ते हयात नसताना हा लेख प्रकाशित करावा लागला. ही घटना माझ्यासाठी दुःखदायक आहे. २००३मध्ये यशोधरा प्रकाशन द्वारा प्रकाशित झालेल्या ‘साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही’ या माझ्या पुस्तकामधून याठिकाणी तो घेतला आहे.
बहुजन चळवळीतील ‘मामं’चे योगदान अतुलनीय असेच आहे. त्यांच्याविषयीच्या आदरभावामुळे मला हा लेख लिहावा लागला. त्यानंतर मी सा. चित्रलेखाच्या दिवाळी अंकासाठी ‘मामं’ची मुलाखत घेतली होती. ‘मामं’च्या एका पुस्तकात ती समाविष्ट असल्यामुळे ती वाचकांसाठी उपलब्ध आहे. त्यामधूनही मी ‘मामं’विषयी आदरभाव व्यक्त केला आहे. त्यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून इथेच माझ्या लेखणीला विराम देतो.
--------------------------------------------------------
ashokrana.2811@gmail.com