बुधवार, २७ एप्रिल, २०२२

इतिहासकार लोकहितवादी- एक मौलिक संदर्भग्रंथ.





इतिहासकार लोकहितवादी- एक मौलिक संदर्भग्रंथ 


लेखक -प्रा.डॉ.सदाशिव कमळकर
परिक्षण-डॉ.धोंडोपंत मानवतकर

       "इतिहासकार लोकहितवादी" या ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी पीएच.डी.संशोधनाच्या औचित्याने हे लेखन केले असले; तरी हा ग्रंथ इतिहासाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी अत्यंत मौलिक ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
          गोपाळ हरी देशमुख ऊर्फ़ लोकहितवादी यांच्या ऐतिहासिक कार्यकर्तृत्वाला इतिहासकार म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी केलेले हे संशोधन निष्कर्षाच्या कसोटीवर उतरले असून सदरहु विषयाला सिद्ध करण्यांत प्रा.डॉ.कमळकर यशस्वी झाले आहेत.
         गोपाळ हरी देशमुख ऊर्फ़ लोकहितवादी यांची ओळख "लोकहितवादींची शतपत्रे" एवढीच सीमित  होती. कदाचित ती द्वेषमूलक असावी,असे वाटते.
       गोपाळ हरी देशमुख ऐवजी "लोकहितवादी" या टोपणनावाने लेखन करण्याचे कारण 'गोपाळ हरी देशमुख' यांना अनेक कार्यालयात नोकऱ्या कराव्या लागल्या. नोकरीत व्यत्यय न येता आपणास परखड व रोकठोक लेखन करून सामाजिक परिवर्तन घडवून आणता यावे. म्हणून त्यांनी "लोकहितवादी" हे नाव धारण केले. आपल्या अनेक लेखातून त्यांनी अज्ञानी, आळसी, दुर्व्यसनी व धर्माचे अवडंबर माजविणाऱ्या लोकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
          लोकहितवादींचा दृष्टिकोन सार्वजनिक हिताचा होता. लेखनशैलीतून येणाऱ्या शब्दांत वरवर त्यांचा स्वभाव अत्यंत तामस, कठोर वाटत असला तरी तो तसा नव्हता.जसे की.."फणसाअंगी करड काटे।‌ आत साखरेचे गोटे । " अशी त्यांची स्वभाववृती होती. त्यांच्या लेखनातच कठोरपणा होता  प्रत्यक्ष बोलण्यात मात्र तो नव्हता, हे त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून लक्षात येते.
              गोपाळरावांचा जन्म १८२३. खरे आडनाव सिंधये. चित्पावन. कोकणातले घराणे.पेशव्यांकडून मिळालेल्या देशमुखी वतनावरून देशमुख नाव धारण केलेले. त्यांचे शिक्षण पुण्यातील गव्हर्नमेंट इंग्रजी शाळेतले म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व. संस्कृत, गुजराथी, फारशी भाषेचा अभ्यास. इंग्रजीवर असलेल्या प्रभुत्त्वामुळे इंग्रजांच्या विविध ठिकाणांच्या ऑफिसांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत सामाजिक कार्यात मोलाचा वाटा असलेल्या गोपाळ हरी देशमुखांनी मुंबईच्या "प्रभाकर' पत्रा मधून "लोकहितवादी" नावाने लेखन केले. १८६६ ला निबंधसंग्रह प्रकाशित केला.
              विष्णुशास्त्री चिपळूणकर हे लोकहितवादींच्या सामाजिक परिवर्तनाच्या लेखनाच्या विरोधात टीका करत राहिले; मात्र लोकहितवादी म्हणायचे.. वेद, पुराणे, स्मृती यांचे प्रामाण्य झुगारून द्या. शास्त्राची आज्ञा मानण्याची गरज नाही. चिकित्सक लिखानातून त्यांनी शास्त्री, पंडितांची निंदा, करून संस्कृत विद्येवर कोरडे ओढले. खोट्या, भाकडकथांवर आधारित ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या अवास्तव पोथी, पुराणाला विरोध दर्शविण्यासाठी करत.चिकित्सावादी,निर्भयी,रोकठोक, वास्तववादी इतिहासाचे लेखन करणारे लोकहितवादी यांना "इतिहासकार" म्हणून कर्मकांडी समुहाने कधीच मान्यता दिली नाही किंवा दिली नसती; परंतु त्यांच्या इतिहास लेखनाचा आवाका व व्यासंग लक्षात घेतल्यास त्यांना इतिहासकार म्हणूनच संबोधने उचित ठरेल, असे ठाम सांगता येते.
        "सुराष्ट्र देशाचा ससाक्ष‌ इतिहास" लंकेचा इतिहास, उदेपूरचा इतिहास, आगमप्रकाश, निगमप्रकाश, सुराष्ट्र देशाचा इतिहास,पृथ्वीराज यांचा इतिहास, राजस्थानचा इतिहास,पानीपतची लढाई,भरतखंडपर्व,गीतातत्व, प्राचीन विद्या आणि रिती, अशा अनेक प्रांताचा इतिहास लिहिणारे लोकहितवादी हे खरे इतिहासकार ठरतात. त्यांनी इतिहासाचे लेखन हे अस्सल संदर्भसाधनाचे पुरावे घेवूनच केलेले आहे.त्यांनी इतिहासाचे लेखन हे ताम्रपट,शिलालेख, यांचा आधार व साक्ष पुरावे, देऊन केले आहे.
            वास्तववादी व चिकित्सक असे इतिहासाचे लेखन करणारे लोकहितवादी यांच्याकडे इतिहासाच्या संदर्भसाधनांचा विपुल साठा होता. इतिहासाचे गाढे व्यासंगी असणारे लोकहितवादी हे अनेक वृत्तपत्राचे जनक, व  लेखक, निबंधकार, सामाजिक विकृत रूढी परंपरांना फाटा देणारे उच्चविद्याविभूषित होते.
         लोकहितवादी हे वेगवेगळय़ा कार्याच्या अग्रणी होते. लोकहितवादीच्या कार्याचा आवाका फार मोठा असल्याचे पुरावे आणि संदर्भ प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी सदरहु ग्रंथात नोंदवून लोकहितवादी कसे इतिहासकार ठरतात हे ठामपणे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
           प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी "इतिहासकार लोकहितवादी" या संदर्भग्रंथाद्वारे लोकहितवादींच्या कार्यकर्तृत्वाला इतिहासकार म्हणून
सिद्ध करून इतिहासाच्या ग्रंथ दालनात एका मौलिक अशा नव्या ग्रंथाची भर टाकली आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक विद्यार्थी सदरहु ग्रंथाचे खुल्या दिलाने स्वागतच करतील या अपेक्षेसह प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांच्या आगामी लेखनास मनस्वी शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...