बुधवार, ४ मे, २०२२

तुम्ही जननायक व्हा; पण आम्हाला माणूस म्हणून जगू द्या.!

तुम्ही जननायक व्हा; पण 

आम्हाला माणूस म्हणून जगू द्या.!

राजसाहेब ठाकरे, 
स. न. वि. वि. 
---  
औरंगाबादमध्ये तुम्ही उत्तर सभा घेतली. अपेक्षेप्रमाणे शरद पवार आणि भोंग्यावर भाष्य केले. पूर्वीच्या सभेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची काही उत्तर दिली. साहेब तुम्ही पुन्हा म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जातिपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुरू झाले.’’ एकवेळ मान्य. पण, राजसाहेब खायला नाही पीठ अन् कशाला हवं विद्यापीठ म्हणून यापूर्वी १९७६ ते १९९४ या दोन दशकांत औरंगाबाद विद्यापीठाचे आंदोलन कुणी चिघळवले? या दोन दशकांत गावोगावी मराठा-नवबौद्ध दंगलीला कुणी खतपाणी घातलं हेही सांगा. दोन दशकं मराठवाडा जळत होता. त्यानंतर तर ९० च्या दशकात आमच्या बालपणी अख्ख्या देशात जाणून बुजून हिंदू-मुसलमान दंगली भडकवल्या गेल्या. त्यासाठी रथयात्रा कुणी काढली? ते जाऊ द्या. त्याही पूर्वी दलितांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं कुणी बांधले? या जातिपातीचं काय? कारण तुम्हीच म्हणाला इतिहास विसरू नका! साहेब असे प्रश्न खूप आहेत. तुम्ही उत्तर देऊच शकणार नाहीत. दिले तरी आज प्रबोधनकारांचे जसे ‘सोयीने’ संदर्भ दिले, तसेच देणार. समग्र प्रबोधनकार तुम्हीही नाही अन् पवार साहेबही सांगणार नाहीत. अन् तो अनेकजण वाचणार नाही; कारण आज त्यांच्या धडावर त्यांचे डोके नाहीच. एक सांगायचे. या दहा वर्षांत अपवादाने का होईना काही गावांमध्ये कांबळे-मेश्रामांच्या बरोबरीने देशमुख-पाटील भीमजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमात एकांब्याचा आर. आर. पठाण बाबासाहेबांवर व्याख्यान देतो आहे अन् त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी-कुलकर्णी करीत आहेत‌. हे चित्र समृद्ध भारतासाठी नक्कीच आशादायी आहे. मात्र, तुम्ही राजकारणी ‘भोंगे’ लावून यात मिठाचा खडा टाकत आहात. पण, हा भोंग्याचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे; कारण भोंग्यांचा त्रास हा हिंदूंना होत नाही अन् मुसलमानांही होत नाही तर तो होतो आम्हां ‘माणसांना’. आज जरा खेड्यात जाऊन पहा कर्णकर्कश आवाजात मोठा भोंगा लावून सुरू असलेला हरिपाठ मध्यान्ह रात्रीपर्यंत तर काकडा आरती पहाटेपर्यंत झोपूच देत नाही. सप्ताह तर अधूनमधून सुरूच असतात. दुपारची अजाण दुपारी काम करू देत नाही. मध्येच शाळेत प्रेड थांबवावा लागतो. यात सर्वाधिक त्रास होतो ते तान्ह्या बाळाला. ते बिचारे रडते, चिडचिड करते; कारण आपण हिंदू आहोत की, मुस्लिम हे त्याला अजून कळायचे आहे. आम्ही ‘माणसं’ तर गप्पच. कारण धर्मापेक्षा आपल्या संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही गप्प असतो. पण, हा मुद्दा उपस्थित करून हिंदू-मुसलमानांना नव्हे; तर आम्हां ‘माणसांना’ होणाऱ्या त्रासाला तुम्ही वाचा फोडली. 
पण साहेब, तो हनुमान चालिसाचा मुद्दा खूप खटकला. त्याचाही सर्वाधिक त्रास आम्हां ‘माणसांना’च आहे. हनुमान चालिसाचे उड्डाण तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवेल की नाही, माहीत नाही. पण, याचे जे परिणाम होतील ते नक्कीच धर्मांध हसन अन् किसनला जेलमध्ये पोचवतील. रामाचं घर जळेल अन् रहीमचं डोकं फुटेल. तुम्हाला सत्ता मिळेल, मुलगा मंत्रीही होईल. पण, समीर अनाथ होईल; अमिरच्या आई-वडिलांचा वृद्धापकाळातील सहारा हरवेल. एक पिढी उध्वस्त होईल. पण तुम्हाला त्यांचे काहीच सोयरसुतक नसेल. 
आणि आणखी एक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विचार आहेत हे तुम्ही सांगितले ते फार बरे केले. पण, हा विचार कृतीत आणला तो फुले-शाहू-आंबेडकरांनी. ‘भोंगे’ लावून हरिपाठ-अजाण म्हणणाऱ्यांनी नव्हे. त्यामुळेच शिवाजी या विचारांची शिकवण देणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. यात भलेही तुम्ही हिंदू जननायक व्हा; पण छत्रपतींच्या स्वराज्यासारखं प्रत्येकाला निर्भय अन् हिंदू-मुस्लिम म्हणून नव्हे; तर माणूस म्हणून जगू द्या. आमचे बाबूराव बागूल माणसाला म्हणतात..‌. 
‘वेदा आधी तू होतास 
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास 
तूच आहेस सर्व काही 
तुझ्यामुळेच सुंदर 
झाली ही मही’ 
++++
✍️

विकास वि.देशमुख

विकास वि.देशमुख - ९८५०६०२२७५





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...