पुस्तक परीक्षण
स्त्रीच्या अभिज्ञ जाणिवांचे मर्मसंचित-
'प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे '
डॉ.धोंडोपंत मानवतकर
कवयित्री आशा अशोक डांगे यांचा " *प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे'* हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या अगोदरच्या 'परिघाबाहेर' या काव्यसंग्रहातील कविता अभ्यासकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
स्वानुभूतीच्या जाणिवांची स्पंदने अंतर्मनाच्या गाभाऱ्यात अनेकांगी आवर्तने निर्माण करतात तेंव्हा कविच्या मनोभूमीत हुंकाराचं शब्दसंचित नोंदवलं जातं आणि तीच असते कविच्या कवितेची निर्मिती.
आशा डांगे यांच्या 'प्रिय,हा कण गॉड पार्टिकल आहे" या दुसऱ्या संग्रहातील कविता वाचतांना कवितेचे अभ्यासक आणि समीक्षकांना कवयित्री अनुराधा पाटील आणि वृषाली किन्हाळकर यांच्या कवितेची आठवण व्हावी अशा धाटणीच्या कविता प्रस्तुत संग्रहात समाविष्ट आहेत.
अलीकडे संहितानिष्ठ भाषेच्या अंगाने जाणारी दर्जेदार कविता लिहिणारा वर्ग संख्येने कमीच असला; तरीही गेल्या तीन चार दशकांपासून मराठवाड्यातील अनेक कवी, कवयित्रींच्या नवकवितेने मराठी काव्यसृष्टीला नवा आयाम आणि नवे परिमाण दिले आहे. अनेक कवयित्रींकडून नव्या जाणिवांसह नवा सृजनाविष्कार उत्कटतेने शब्दबद्ध होतांना दिसतो आहे.
आशा डांगे यांच्या या संग्रहातील कविता समाजातील अविवेकी व स्वार्थी वृत्तीचा शोध आणि वेध घेणाऱ्या आहेत. वर्तमानाच्या हलकल्लोळात आजही स्त्री ही परंपरेने घालून दिलेल्या जोखडाचीच पाठराखण करताना दिसते आहे..म्हणून कवयित्री लिहिते...
"चतुर्थीचा चंद्रही तू
उपवास सोडण्याकरिता
असलेला विधी म्हणून
शोधत असतेस !"
का नाही भरून घेत
दोन्ही कवेत
खिडकीबाहेरून
दिसणारं हे
अनंत आकाश..?
अनेक कविंच्या कवितेतून केवळ प्रश्नांचीच मालीका उभी केली जाते; मात्र कवयित्री आशा डांगे आपल्या कवितेमधून परंपरावादी जोखड झुगारून मुक्त होण्यासाठीचा सल्ला आणि तेवढ्याच ताकदीचा पर्यायही देतात,स्त्रीच्या स्वत्वशोधाची पायवाट सांगणारी परिभाषा उपरोक्त कवितेत दिसून येते.
प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या शीर्षककाव्याच्या काव्यपंक्ती अशा...
माझा पैस तुझ्यासाठी
विस्तीर्ण करत गेले मी...
तुझा कण आपोआप
पसरत गेला माझ्यात
..............
'प्रिय, हा कण
अनादिकालापासून
गॉड पार्टिकल आहे
हे कसं
विसरतोस तू..!
'प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे' हे या संग्रहाचे नामाभिधान वाचकांना वरवर भ्रमित करणारे वाटेल; त्याबाबतचा उलगडा करणे अपरिहार्यच वाटतो. सृष्टीची निर्मिती जशी एका सूक्ष्म कणापासून झाल्याचे संशोधनात आढळले..तीच प्रक्रिया सृष्टी आणि सजीवसृष्टी यांच्या बाबतीत साम्य दर्शविते. सजीवांची निर्मितीसुद्धा एकाच सूक्ष्म कणापासूनची आहे, म्हणून ती गॉड पार्टिकल आहे' असा मथितार्थ प्रस्तुत संग्रहाच्या नामाभिधानाशी अनुबंधित होतो.
संग्रहातील बहुतांशी कवितेतील भावाभिव्यक्ति ही स्त्रीच्या अभिज्ञ जाणिवांचे मर्मसंचित होय.! जे स्त्रीच्या संयमी आणि शोषिक मनाचे मर्मबंध उलगडून दाखविते.
'वेदनेचे रसायन
साऱ्या अंगभर
अभिसरत असताना
शाश्वत त्यागाचं तू
समीकरण मांडलंस..!
सिद्धार्थाच्या गृहत्यागानंतर यशोधरेची झालेली विरहावस्था सदोदीत होणाऱ्या विखारी दंशापेक्षा कमी नव्हती जी सिद्धार्थासारख्या पुरुषानेसुद्धा समजून घेतली नाही.. असा आशय व्यक्त करणारी कविता...
सिद्धार्थापासून
तथागतापर्यंतचा प्रवासही
तुझ्या करुणेच्या
संपृक्त वाटेवरूनच
झाला आहे ना यशोधरे..!
यशोधरेच्या संयमातली, शोषिक वृत्तीतली, तिच्या समर्पणातली अर्धांगिणीची वेदना सिद्धार्थच काय आजवर कोणताही पुरुष समजून घेऊ शकला नाही. कवयित्री एवढेच सांगून थांबत नाही, लोकांचा आदर्श ठरवलेल्या रामालासुदधा ती प्रश्न विचारते..
'तू कसा रे
ओळखू शकला नाहीस
अग्निपरिक्षेला' सामोरी जाणारी
ती रामभार्या
निष्कलंकीत आहे म्हणून...!
कवयित्रीने ऐतिहासिक व पौराणिक मिथकांच्या प्रतिमांचा आधार घेत अविवेकी वृत्तीचा खरपूस समाचार घेतला आहे.
स्त्री पावित्र्याबाबतच्या संकल्पनाच खोट्या ठरवतांना कवयित्री आपल्या 'कवच कुंडल' या कवितेतून पुरुषांच्या स्वभावधर्माचे वाभाडे काढते. या कवितेतील कवयित्रीचा शब्दप्रहार झोंबणारा आहे.
बाईचं नुसतं शरीर पाहून
स्खलित होणारा तुमचा पुरूषार्थ
मला नेहमीच जाणीव करून देतो
मी असुरक्षीत असल्याचं...
याहीपुढे जाऊन याच कवितेत कवयित्री म्हणते........
एक तर
झुगारून द्याव्या वाटतात
योनी पावित्र्याच्या
निरर्थक संकल्पना..किंवा
नेहमीसाठी षंढ कराव्या वाटतात
वासनांध नजरा.....
या दोन्हींपैकी काहीच जमत नाही म्हणून
स्त्री तशीच गुद्मरत जगते एखाद्या कवच कुंडलाच्या शोधात प्रत्येकवेळी अंग- प्रत्यंगावरून फिरणाऱ्या नजरा झेलत..स्त्रीच्या स्वातंत्र्याचे तर सोडाच तिला तिच्या सुरक्षिततेची हमी घेणाराचीच हमी वाटत नाही... म्हणून कवयित्री म्हणते
माझ्यातील ती
वेळप्रसंगी
होत असते पुरुषी
हा कवयित्रीच्या तक्रारीचा निर्भयी हुंकार आहे. तो प्रातिनिधिक स्वरूपात शब्दांकित केला आहे.
ही आदीम भूक
पोटाबरोबरच बुद्धीची
भावनेची, मनाची, तनाची
सामाजिकतेची, प्रतिष्ठेची,
प्रेमाची, मायेची, पैशाची,
सुखाची, वर्चस्वाची
ही भूक जाणीव करून देते
अपुर्णत्वाची,
खूप सारं असून
खूप काही नसल्याची
या समग्र जाणीवांचे सत्व आणि स्वत्व या संग्रहातील कवितेत दिसून येते.
तिच्या उल्हासाचे,आनंदाचेही दमन केलेल्या असतात कांही रात्री, कांही दिवस. सुखोपभोगातला आनंदही तिच्या वाट्याला येतोच असं नाही..
प्रत्येक लाटेलाच
कुठे जमतो किनाऱ्यावर
तिचा इतिहास
कोरून ठेवायला..!
कवयित्रीने काही घटनांना नैसर्गिकवभाव नांचे घटकांच्या प्रक्रियेची प्रतिके आणि उपमा देऊन अर्थच्छटांचे भावविश्व अभ्यासकांसमोर ठेवले आहे. जे अर्थान्वेषणालाही आव्हान देते.
स्त्रीच्या कुस्करलेल्या भावनांचे अनेकांगी प्रस्तरं उलगडणाऱ्या कांही कवितेत पुरुषांबद्दल तक्रारीचा सूरही आढळतो. यावर कवयित्री लिहिते..."
"माझ्या आसवांचे
कोणतेच संदर्भ कधीच
उजागर होऊ दिले नाहीत मी." हा कवयित्रीचा आंतरिक हुंकार आहे. ती पुरुषासोबत सार्वत्रिक पातळीवर लढत राहते..स्वतःची इच्छा मारून ती समर्पित होतांना त्याच्यातल्या पराभूत पौरुषी अभिनिवेषाची जाणीवही ती निर्भयपणे करून देते...
निमूट समर्पित होताना
तिच्यातील आंदोलनं
कधीच जाणवू देत
नाही बाई
विजयाचा अविर्भाव
मिरवणारा तो खरंतर
झालेला असतो
पराभूत स्वतः मध्येच
स्त्री-पुरुषांच्या नैतिक,अनैतिक, सामाजिक,सांस्कृतिक बांधिलकीच्या अनुबंधाची परिमिती आणि परिणती रूपकात्मक मुखवटा धारण करते तेव्हा त्या रचनाबंधाला नियम आणि संयमाचे सात्त्विक आणि तात्विक अधिष्ठान असते.
सामाजिक बांधिलकीच्या अन्वयासह प्रापंचिक सहजीवनाचे गीतही ती होऊ इच्छिते...जे सजीवांच्या निरंतर ओठांवर असेल..!
कदाचित...
आपल्या नंतरही असेल
आपलीच गोष्ट,
आपलीच गाणी गायली जातील
सृजनाच्या उत्क्रांतीनंतर
सृष्टीतील प्रत्येक जीवांच्या
ओठांवर..!
कवयित्री आशा डांगे ह्या नावाप्रमाणेच आशावादी आणि सकारात्मक ऊर्जेने काव्य लेखन करत आहेत. त्यांच्या कविता काव्यसृष्टीचा परीघ विस्तारीत करणाऱ्या आहेत. प्रस्तुत संग्रहात एकूण अठ्ठेचाळीस दर्जेदार कविता आहेत.
कवयित्रीच्या भावनांची ही अतुट शृंखला शब्दसंचिताच्या प्रमेयाशी सलगी करते. या काव्यसंग्रहासाठी प्रसिद्घ समीक्षक डॉ.ऋषिकेश कांबळे यांची पाठराखण लाभलेली असून डॉ.कविता मुरूमकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. कवितांचा काव्याशय चित्रबद्ध करणारी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची रेखाटने तसेच चित्रकार संतुक गोळेगावकर यांचे सुंदर मुखपृष्ठ या संग्रहाच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. कवयित्री आशा डांगे यांच्या या साहित्यकृतीचे वाचक, कवी, समीक्षक स्वागतच करतील या अपेक्षेसह त्यांच्या आगामी साहित्यकृतीसाठी मनस्वी शुभेच्छा..!
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा