गुरुवार, २१ जुलै, २०२२

भूतकाळ तुझ्या हातून निसटलाय...!

भूतकाळ तुझ्या हातून निसटलाय...!

डॉ.धोंडोपंत मानवतकर











पहाटवारा.... पक्षांची किलबिल... कावळ्यांची झाडेबदलण्याची प्रक्रिया.....बाजुच्या गोठ्यातून हंबरणाऱ्या गायींचे सूर.. मी.. मरगळलेल्या साखरझोपत.... स्वप्नाळल्या डोळ्यात अनामिक आभास.... . मध्येच कर्णमधुर स्पर्शवेडी स्वरचाहुल....गाण्याचं धृपद .....मलमली तारुण्य माझे...तू पहाटे पांघरावे.. मोकळ्या केसांत माझ्या.. तू जीवाला गुंतवावे... 

आकाशवाणीच्या गोड ध्वनीलहरी...अंथरुणावर कूस बदलत.. गाण्यात बुडालेला...मी.
गाणं रोमारोमांत पाझरत जाणार ं....अस्वस्थ करणारं ...
मनाला मनाचा प्रश्न...
मी तारुण्यात की, वृध्दावस्थेत...?
ही तर अवघडलेली अवस्था.....!. , 
मनाच्या डोहाला डहुळणारी गाण्याची ओळ....
जवळ आधाराला असलेलं निराधार मन....,
घर सुन्न... मौनातल्या हुंकाराला साक्षीदार असलेल्या अबोल भिंती......शेजाऱ्याच्या रेडिओवरून ऐकलेलं गाण्याचं धृपद प्पार भूतकाळात ओढत घेऊन गेलेलं..... माझं गालातल्या गालात स्मित..आणि डोळे अधोन्मिलीत...मनाला मनाचा प्रश्न...
अबे..... तू.... तू ना वृद्ध ना तरुण....!.
मी खरंच वृद्धत्वाकडे वळलोय.....?,
नाही ना खरं वाटत...!.  आरशात बघ... केसांचा रंग काय सांगतोय..?  मी खरंच उठून आरशासमोर..... सगळाच नूर न्याहाळत. ''अर्धे केस पांढरे नि अर्धे ......
काळ्यांना कुरुवाळत पांढऱ्यांना टाळत..दाढीवरून हात फिरवत....निसटलेल्या आयुष्याची वजाबाकी आणि उरलेल्या भविष्यकाळाची बेरीज करीत पुन्हा...अंथरुणावर..!
मित्रा..!
गेलेले पावसाळे... तुझे नाहीत, उरलेल्या आयुष्याचा भरवसा नसतो..!
दुःखाचे धागे लागत जातील.... सुखाच्या मागे धावणारं मन आता मुठीत ठेवायला शिक..! पण हो...माणसे मुठीत ठेवायला शिकू नकोस...!. कुणावरही मुठी आवळायला शिकू नकोस,.. मूठ उगारायला शिकू नकोस.....!... हे हात मुठी उगारायला दिलेत का... ? थोडंसं चिंतन कर..!
हे हात... गेलेल्या आयुष्यात किती जणांच्या पाठीवरून फिरलेत...! किती जणांची आसवे पुसायला सरसावलेत कि, कित्येकांसोबत दोनहात करण्यातच गुंतले होते...... भूतकाळ तुझ्या हातून निसटलेला आहेच... उरलेल्या आयुष्यात या हातांनी कुणाची आरती करता येईल का?  कुणाला शाब्बासकी देण्यासाठी पाठीवर पडतील का..?  निराधारांच्या सांत्वनासाठी पुढे करता येतील...? बघ... कुणाच्या मदतीला सरसावता आले तर....बघ कुणाच्या पाठीवरून फिरवता आले तर......!

                                                                       क्रमशः....

लेखन

डॉ.धोंडोपंत मानवतकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...