मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका- डॉ.धोंडोपंत मानवतकर

महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका.
- डॉ.धोंडोपंत मानवतकर





सर्वच महापुरुषांचे कार्य हे देशातील जनतेच्या हितासाठी होते म्हणून त्यांना कुठल्याही एका जातीत बंदिस्त करु नका, किंवा त्यांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना डॉ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, साहित्यरत्न अण्णा भाऊसाठे यांची जयंती आता नाचून नव्हे, तर वाचून साजरी करण्याची गरज आहे. 
         केदार वाकडी (ता.मंठा ) येथे दि.२९ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर लहुजी साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
        यावेळी सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ बापु वटाणे म्हणाले की, "मातंग समाजाने  सर्वांगिण परिवर्तनासाठी धर्मांतराच्या दिशेने पावलं टाकण्याची गरज आहे. "जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव" अण्णाभाऊचे हे गीत परिवर्तनाच्या चळवळीचा विचार मांडणारे आहे. याचा विचार मातंग समाजाने केला पाहिजे.
      दुपारी ४ वाजता साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर उपस्थितांनी आपले विचार मांडले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदार वाकडी येथील माजी सरपंच केदारी पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर व रंगनाथ बापू वटाणे हे उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक महेश कव्हळे, कृष्णा कव्हळे,विष्णू कव्हळे,अंगद कव्हळे यांच्यासह राजेश तांबे, पिराजी हजारे,जयभीम सेनेचे उद्घवभाई सरोदे, पिराजी पवळे, प्रभाकर कांबळे आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश आठवे यांनी केले, तर गजानन पवार यांनी आभार मानले.
     सायंकाळी ६ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जवळपासच्या खेड्यातील अनेक तरुण सहभागी झाले होते.
     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार,अशोक हातागळे,किशोर पवार, राजेश वाघमारे, ओम पवार, शिवाजी थोरात, गजानन पवार, अनिल कांबळे, अशोक पवार, राजेश लोंढे, विक्रम पवार, दत्ता पवार, अजय पवार, संदीप पवार आदीं तरुणांनी परिश्रम घेतले.

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचे आकाशवाणीवर काव्यवाचन

डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचे

 आकाशवाणीवर काव्यवाचन

https://youtu.be/2NA6XN9aaUA


औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात ध्वनी मुद्रण प्रसंगी टिपलेल्या डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या काव्यवाचनातील  काही निवडक भावमुद्रा....

काव्यवाचन करताना- डॉ.धोंडोपंत मानवतकर

  मराठवाडयातील सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचे आज दि.२२ ऑगस्ट रोजी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून सायंकाळी ठीक ६:३५ वाजता "साहित्य सौरभ" या मालेत काव्य वाचन होणार आहे.
      " एफ.एम.101.7 आकाशवाणी औरंगाबाद  सर्व जनात सर्वांच्या मनात " ही  आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची निर्मिती असून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

    
हा कार्यक्रम प्रत्यक्ष रेडिओवर किंवा NewsOnAir ही App डाऊनलोड करून ऐकता येईल. 
        मंठा येथील कवी डॉ.धोंडोपंत मानवतकर हे कवी, लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे अंतरसाक्षी, रुपांतर, ओढाळ सुरांच्या देही, व लोकशाहीचा जाहीरनामा हे कवितासंग्रह प्रकाशित असून विद्रोही साहित्याचा निर्माता, व काव्यप्रभा ही पुस्तकेसुद्धा प्रकाशित आहेत. मंठा, जि. जालना येथील आविष्कार साहित्य मंडळाचे ते संस्थापक, अध्यक्ष असून गेली ४० वर्षापासून ते  लेखन करतात व तीस वर्षापासून आविष्कार साहित्य मंडळाद्वारे वाङ्मयचळवळ चालवतात.


     

अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून विविध कविसंमेलनात व शिबिरात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, संपादक, प्रकाशक व सामाजिक कार्यकर्ता अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण कवींच्या कवितेवर संशोधनपर ग्रंथ विद्यापीठात सादर करून कवितेवर पीएच्.डी ही उच्चविद्याविभूषित पदवी प्राप्त केली आहे.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

जालना जिल्ह्यातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ - एक दृष्टिक्षेप

जालना जिल्ह्यातील साहित्यिक व  
सांस्कृतिक चळवळ - एक दृष्टिक्षेप.....

लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर



कवी धोंडोपंत मानवतकर यांच्या ऑडिओ कॅसेट चे प्रकाशन करताना माजी आमदार प्राचार्य धोंडीरामजी राठोड, कथाकार, गीतकार प्राचार्य भगवानराव देशमुख,संगीतकार- रमेश धायडे,
 कवी, प्रा.जयराम खेडेकर, यावेळी कवी प्रभाकर शेळके,
 कवयित्री संजीवनी तडेगावकर,प्राचार्य कुं.पी.इंगळे उपस्थित होते.

मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या
एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनास दिग्गज साहित्यिकांची हजेरी.
कवी, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांचा जालना महोत्सवात सत्कार करताना आमदार बबनराव लोणीकर.

जालना जिल्ह्यातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा आलेख.

     जालना जिल्ह्याची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख करून देताना जालना शहरासह जालना जिल्ह्याच्या साहित्यिक  चळवळीची आणि सांस्कृतिक परंपरेची  माहिती नोंदविणे म्हणजे इतिहासाला उजाळा देणे होय...!
      जालना जिल्ह्याचा साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेताना जालना शहराची ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्टया असलेली ओळख व श्रीमंती माहित करून घेणे क्रमप्राप्तच ठरते.
      जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले असून या नदीच्‍या किनाऱ्यावर मम्मादेवीचे एक सुंदर मंदिर आहे. हे ठिकाण शहराच्या मध्‍यभागी असून या ठिकाणाला 'मस्तगड' असे संबोधले जाते. आता या शहराची भौगोलिकदृष्टया व्याप्ती वाढली आहे. मराठावाडयातील एक महत्‍वाचे शहर म्हणून जालन्याची ख्याती होती, ती आजही आहे. पूर्वी जालना शहराला मातीविटांची संरक्षण भिंत होती हे शहर पूर्णतः सुरक्षित होते. 
     आज जो मोती तलाव आहे तो तलाव मलिक अंबरच्‍या काळात जमशेद खान याने शहराच्या पश्चिमेला तयार केला होता. असा राजपत्रित पुरावा आहे. ह्या शहराचे पूर्वीपासून एक वेगळे महत्व आहे. या शहरासाठी प्रचलित अशी एक म्हण आहे. "जालना सोने का पालना".
        अगदी सोळाव्या शतकातही या शहराची श्रीमंती दूर दूर ज्ञात होती.     "जालना सोने का पालना" या म्हणीवरून असे लक्षात येईल की,एकेकाळी जालना शहर खूप श्रीमंत होते. सुरत शहराबरोबरच जालना शहरालाही लुटल्याचा इतिहास आहे, म्हणजे सोळाव्या शतकात जालना हे शहर सुरत शहरासारखे श्रीमंत असावे. असे म्हणणे वावगे ठरु नये.
       पूर्वी जालन्याची ओळख ही एक प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून होती; मात्र अलिकडील काळात जालना जिल्ह्याकडे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून पाहिले जाते.
      जालना शहराचे प्राचीन नाव 'जनकपूर' होते,असे ऐकिवात आहे. जनकपूर पत्रिका नावाने एक नियतकालिकही प्रकाशित होत असे. जनकपूर या नावाचे रुपांतरण जालना झाले असावे. जसे "कलापूर" चे कोल्हापूर पडले आहे तसे... असो.
       १ मे १९८१ रोजी जालना या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जालना शहराला जिल्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले. जालना शहराची ख्याती सर्वदूर होतीच. आता या शहराला जिल्हा म्हणून वेगळे महत्व आहे; जिल्हा झाल्यानंतर साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींना बळ आले.
      जालना जिल्ह्यात आठ तालुके आहेत, जालना, अंबड,घनसावंगी,बदनापूर भोकरदन, जाफ्राबाद परतूर आणि मंठा  या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीने जिल्ह्याला समृद्ध केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जालना जिल्ह्यातील व काही तालुक्यातील अनेक गावात साहित्य आणि सांस्कृतिक मंडळे कार्यरत होती. ती काहीअंशी आजही कार्यरत आहेत. काही ठिकाणी नव्याने ही मंडळे वाढली आहेत. जिथे अशा चळवळी झाल्या आहेत किंवा त्या सतत सुरूच आहेत त्या गावांचे योगदान अगदी मोलाचे आणि महत्वाचे आहे. 
     सांस्कृतिक चळवळ हेच गावाचं वैभव असतं किंबहुना देशाचं वैभव असतं आणि देश हा अनंत गावे आणि शहरे मिळून झालेला असतो. म्हणून गावागावात वेगवेगळ्या कार्यक्रमाची परंपरा सातत्याने सुरू असावी. ती तेथील जनमनावर चांगले संस्कार करत असते, ती असते संस्कृती... आणि ती जीवंत ठेवण्याचं काम सांस्कृतिक चळवळीने केले पाहिजे. असे होताना दिसत नाही; म्हणून विज्ञानयुगात मानवाच्या भौतिक जगण्याने हळूहळू नैसर्गिक जगणे संपुष्टात येऊ लागले आहे; माणूस भौतिक साधनांच्या प्रलोभनात गुरफटला आहे. त्याचे मनोरंजनाचे आणि जगण्याचे स्त्रोत बदलले आहेत. त्याच्या आनंदाची साधने बदलली आहेत. त्याच्या पारंपरिक कलाकौशल्यावर गंडांतर आले आहे. तो वर्तमानाच्या भौतिक बदलाचा बळी ठरत आहे, तर नव्या पिढीने भौतिक बदल स्वीकारले आहेत. पारंपारिक कला कालौघात नष्ट होत आहेत. त्या पारंपारिक कलेने एकाचवेळी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे काम केलेले होते. आज त्या पारंपारिक कलाकौशल्याकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यायाने कलावंतांकडे दुर्लक्ष होत आहे. कलावंतांकडे दुर्लक्ष म्हणजे कलावंताच्या समस्यांकडे दुर्लक्ष. कलावंत, विचारवंत, प्रज्ञावंत संपले तर हा देश केवळ कामगारांचा देश होईल. आणि कालांतराने कामगारच यंत्र बनतील. यंत्र म्हणजे भावना नसणे, कल्पना नाही, संवेदना नाही. म्हणून आनंद नाही.. मग जगण्यात आनंदच नसेल तर जगणे नीरस होऊन बसेल..यासाठी पारंपारिक कलाकौशल्याचा वापर होणे ही मानवी आनंदाची नांदी मानने योग्य होईल. यासाठी आधुनिक प्रगतीबरोबरच पारंपरिक कला, कौशल्य आणि त्याचा निर्माणकर्ता कलावंत जगला पाहिजे, आणि तो या राष्ट्राने जपला पाहिजे, जगवला पाहिजे... मात्र वर्तमान काळात असे होतांना दिसत नाही.  
     अलिकडे १५ वर्षाच्या कालखंडात कलावंताच्या समोर अनेक समस्या उभ्या आहेत. टी.व्ही. सिरियल्स तसेच अनेक लाईव्ह कार्यक्रम पहायला मिळतात म्हणून ग्रामीण कलावंतांची कोंडी झाली आहे. कलावंतांची उदासिनता वाढत आहे. चळवळी करणाऱ्यांची मानसिकता बदलत आहे. अनेक सांस्कृतिक चळवळीची समीकरणं बदलली आहेत.  व्यावसायिकतेच्या अंगानं जाणारे कलावंत मानधनाशिवाय फिरकत नाहीत. ज्याला सामाजिक ऋण म्हणावे ते कुठे दिसत नाही. तरीही मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ही मंडळी पदरमोड करून  कार्यक्रम करत असतात...हेही नसे थोडके.
        मराठी साहित्य आणि संस्कृती ही अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. साहित्य हे पौराणिक कथावर आधारित होते, तर संस्कृती ही लोकसंस्कृती होती. पारंपारिक दंतकथा व मिथकांचा आधुनिक साहित्यात आजही दृष्टांत म्हणून वापर केला जातो. या देशात
लोककलेने आणि लोकसंस्कृतीने माणूस घडवला. हुशार केला. तो जगण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अर्थात स्वानंदासाठी विविध कलांचा वापर करत गेला. त्याने जगण्याचे, आनंदाचे आणि माहितीचे अर्थात प्रबोधनाचे वेगवेगळे माध्यम निर्माण केले. ते त्याने जपले. ते तो आजही जपतोय ती माध्यमे म्हणजे कला, साहित्य, संस्कृती. ही संस्कृती माणूस सूज्ञ करणारी होती. शहाणा करणारी होती. माणूस शहाणा करण्याचंही प्रबोधन करणारी होती. माणसं एकत्र करून माणुसकी जपणारी होती. जीव लावणारी होती.षड्विकारांचे निर्दालन करणारी होती.
आणि सद्गुणांचा प्रचार, प्रसार करणारी होती. माणूस सर्वश्रेष्ठ आहे. तो इतरांचाही उद्धार करू शकतो. म्हणून कला, साहित्य आणि संस्कृती दुसरं तिसरं काही नसून माणसाच्या कर्माचे, नितीधर्माचे आणि त्याच्या वर्तनाचे मूल्यमापन करणे म्हणजे साहित्य आणि संस्कृती होय..!
       मराठी साहित्यात सुप्रसिद्ध असलेले "महदंबेचे धवळे" हे आद्यकवयित्री महदंबा ऊर्फ़ महादाईसाची ही निर्मिती आहे. मराठी साहित्यातील "महदंबेचे धवळे " टाळून साहित्यविश्वाला पुढे जाताच येत नाही, याच महदंबा आद्यकवयित्रिचा जन्म जालना जिल्ह्यातील ( पूर्वीचा अंबड ) व आत्ताच्या घनसावंगी तालुक्यातील 'रामसगाव' येथील आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांच्या 'महदंबा' ह्या आवडत्या शिष्या होत.
        घनसावंगी तालुक्यातील परंतु; परतूर जवळ असणारे 'जांब समर्थ 'हे गाव 'दासबोध' लिहिणारे संतकवी रामदास स्वामी यांचे जन्मगाव होय. त्यांनी मनाचे श्लोक, दुकांडी रामायण, करुणाष्टके अशी विपुल साहित्यनिर्मिती सोळाव्या शतकात केली आहे. 
      संगमुळी घराण्याकडून लिहिला गेलेला 'व्यंजन भागवत' ग्रंथ त्याचप्रमाणे "शृंगारसागर" हा बाळकृष्णबुवा चिखलकर यांनी लिहिलेला ग्रंथ तसेच - रेणुकादास धुमाळे यांनी 'संत सखुबाई' व 'राजा हरिश्चंद्र ही नाटके लिहिली होती. अॅड. स. कृ.निरखी यांचे 'हस्तलिखित' 'कृष्णमंदिर'. अॅड. श्री द.ग. देशपांडे यांचे 'आत्मोन्नती' हे मासिक तसेच अॅड माणिकराव परळीकरांचा 'मानवेंद्र सावरकर' हा ग्रंथ आणि लेखक श्री.ना. हुधार यांचे आध्यात्मिक लेखन. ही सगळी लेखक मंडळी जालना जिल्ह्यातीलच आहेत. ह्या निवडक नोंदी संक्षेपाने घेतलेल्या आहेत. आणि त्या स्वातंत्र्यपूर्वकालीन आहेत.
कृष्णराव फुलंब्रीकर हे जालना जिल्ह्यातीलच. यांनी आपल्या गायकीच्या स्वरांनी संगीतक्षेत्रात आपली नाममुद्रा कोरली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्याचे नाव अजरामर केले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जालना शहरात एक नाट्यगृह बांधून त्याचे नावच कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह असे दिले आहे.
       जालना जिल्ह्यात नाट्य चळवळही होती. प्रा. मुरलीधर गोल्हार, अॅड. सौ.माधवी गोल्हार ,सूर्यकांत सराफ, अॅड. भगवंत दंडे ,लक्ष्मीकांत प्रामाणिक, शंकर परचुरे, गणेश जळगावकर,  डॉ. संभूस, सौ. कुसुमावती देशपांडे,, सौ. उषा घोटनकर, सौ. सुनीता देशपांडे, सुभाष कन्नडकर यांचे नाट्य चळवळ चालवण्यासाठी महत्वाचे योगदान आहे.
         मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्योत्तर कालात लेखन करणारे लेखक, कवी डॉ. शिवाजीराव गऊळकर यांचा 'अपर्णा' काव्यसंग्रह प्रसिद्ध... तसेच त्यांचा 'जालहनापूरचा हकिकतनामा', साधना, उपासना, गोविंदभाई श्रॉफ वरील 'निर्मोही' हा चरित्रग्रंथ' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. जालना शहरातील दिवंगत साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार प्रा.भगवान काळे त्यांची प्रसिद्ध असलेली कादंबरी 'कर्मरेखा' 'संत जगमित्रनागा, 'संदर्भग्रंथ-मराठवाडा सारस्वत, 'मराठवाडा काल आणि आज, 'आपला जालना जिल्हा "तसेच राष्ट्रगुरू समर्थ रामदास, 'श्री महागणपती राजुरेश्वर अशी त्यांची साहित्य संपदा प्रकाशित आहे.
        जालना शहरातील कवी, कथाकार म्हणून किशोर घोरपडे यांचे 'दलदल आणि 'खळाळ' हे कवितासंग्रह तर 'धग' हा कथासंग्रह व 'मालक' , 'आता फसायचं नाही' ह्या एकांकिका. यांसह 'नवे कीर्तन, सोयरीक, 'पिंजरा' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक ठिकाणी कविसंमेनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. जालना शहराच्या साहित्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. किशोर घोरपडे यांचेच समकालीन नाटककार डॉ.रुस्तुम अचलखांब हे जालना जिल्ह्यातील मानेगावचे होते. यांचे 'गावकी' हे आत्मचरित्र, अभिनयशास्त्र, कैफियत, रंगबाजी, ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा 'अब्राईत' हा कवितासंग्रह आणि "आंबडेकरी शाहीरीचे नवेरंग" ह्या सांगितीकीचे प्रयोग दिग्दर्शन व लेखन. 'कैफियत' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर गाजले.
       मूळचे जालन्याचे;परंतु सेलू येथे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरीत झालेले नंतर पुणे येथे रमलेले दिवंगत जेष्ठ साहित्यिक कवी, लेखक, समीक्षक, ललित लेखक, संपादक,चित्रकार प्रकाश कमतीकर यांचा साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. त्यांचे ललित निबंधसंग्रह "समांतर काव्यसमीक्षा, शब्दुली कथासंग्रह, तसेच 'आत्मबिंब' हे नाटक व "शब्दांकित" काव्यसंग्रह प्रकाशित असून ललित लेखनात त्यांचा चांगला हातखंडा होता.
      रेखा बैजल या जालना शहरातील प्रसिद्ध कथालेखिका, कादंबरीकार, कवयित्री, नाटककार आहेत. त्यांच्या विज्ञानकथा, तपस्या, मानस, किडनॅपिंग, 
स्वप्नस्थ, आदिम, स्पंदन, 'पक्षी जाय दिगंतरा, हे कथासंग्रह तर देवव्रत, अग्निपुष्प, युगावर्त, तृप्ता, प्रकाशाची फुले, जलपर्व, या कादंबऱ्या याशिवाय आकाशओढ, 'भिंत काचेची' ही नाटके आणि मम्मीरोबो व "आदिम' या एकांकिका असे विपुल लेखनासह - "काटा रुते कुणाला' या चित्रपटाचे लेखन त्यांनी केलेले आहे. जालना शहरातील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांची ख्याती आहे.
      दिवंगत कवी बलवंत धोंगडे यांनी जालना शहरातील साहित्य सांस्कृतिक चळवळीला रंग भरला, त्यांच्या कारकीर्दीत श्रेयस' या नावाने चाललेल्या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीने जालना शहरात सांस्कृतिक मेजवानी मिळत होती. या सांस्कृतिक चळवळीत राजकारण नव्हते. बलवंत धोंगडे म्हणजे कलासक्त माणूस.
अत्यंत प्रतिभावंत, आणि तितकाच शिस्तीचा प्रशासकीय अधिकारी. त्यांच्या शिस्तीचा धाक होता.परंतु त्यांच्या रोमारोमांत दडलेला कलावंत त्यांच्या 'रंग ओले जपताना,' सावल्या, सांजवनातील कविता हे कवितासंग्रह वाचतांना दिसून येतो. 
 'कवितेसाठी एक दिवस" या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते. कवितेसाठीचा हा सोहळा अनेक रसिकांच्या हृदयात घर करून आहे.
      रंगभूमीवरील अभिनेत्री  दळवी यांचा जन्म जालना शहरातीलच. जालन्याचे कवी, नाट्यलेखक, मनसोक्त माणूस जेष्ठस्नेही अशोक लोणकर यांचा 'काजळखुणा व "सैराट मनाच्या अपरंपार आभाळात" हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. नाटकाचे जाणकार म्हणून व एका वेगळ्या ढंगाची धीरगंभीर कविता लिहिणारे कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
      जयंत आंबेकर यांचा उपदर्शन' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित. लक्ष्मीकांत प्रामाणिक यांचा सरोवर. विद्या अनगरकर' यांचे 'न संपणारं स्वगत, तसेच एहत्तेशाम
देशमुख यांचे " कुंपणातील हुंदके 'हे कवितासंग्रह प्रकाशित.
आम्ही कवितेचे देणे लागतो" या निख्खळ भूमिकेतून लेखन करणारे व कवितेसाठी चळवळ चालविणारे, उर्मीचे संपादक, कवी प्रा.जयराम खेडेकर यांचे ऋतुवंत, मेघवृष्टी  हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून ते दरवर्षी "कवितेचा पाडवा" हा कवितेसाठीचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित करतात. कवितेसाठी "ऊर्मी" नावाचे द्विमासिकही ते चालवितात. त्यांच्या 'मेघवृष्टी' कवितासंग्रहाला महाराष्ट्राचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे.
      रुपचंद्र काकडे यांचा' ओंजळ' यासह हिंदी रचनांची अनेक पुस्तके प्रसिद्ध. ऐथानिया निर्मल यांचा भक्तिज्योत. उत्तम वावस्कर यांचा 'हिरवे जग', ल.मा खरात यांचा "गायरानातल्या कविता' प्रकाशित. सिल्वर मुलुकवाड यांचा 'फोकस' हा संग्रह.  सत्यशोधक महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक  प्रा.जी. ए. उगले यांचे 'महात्मा फुले- एक मुक्तचिंतन, महात्मा फुले आणि ज्ञानोदय हे ग्रंथ. याशिवाय सत्यशोधक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असून सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
      डॉ.संभाजी खराट यांनी 'सत्यशोधकी जलसे, शेतकऱ्याचा कैवारी, लोकरंग' सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि निर्मिक, सत्यधर्म, हुकुमशहा, 'संत गाडगे महाराज' ही ग्रंथसंपदा प्रकाशित. रेवगाव येथील प्रा.राम कदम यांच्या 'पारडं" कथासंग्रहाला 'बाबुराव बागुल पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
       जालन्याच्या पत्रकारिता, साहित्य,आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.डॉ.रावसाहेब ढवळे यांचे 'सत्यशोधक वसा आणि वारसा, शोकात्म प्रेमकहाणी, प्रणयरंग, प्राक्तनाची कोरीव लेणी' ही पुस्तके प्रसिद्ध. त्यांनी जालना जिल्ह्याचे वृत्तांत लेखन आणि वाचन औरंगाबाद आकाशवाणीवरून केलेले आहे. जालना शहरात अनेक वर्षे वास्तव्यास असलेले कवी गीतकार प्रा.डॉ.दासू वैद्य यांचा "तूर्तास' 'हा काव्यसंग्रह व नुकताच 'मेळा 'हा' ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. चित्रपट गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. साहित्य, नाटक, चित्रपट, चित्रकला अशा विषयात त्यांना रुची आहे. सध्या ते औरंगाबाद विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत. प्रा.डॉ.उत्तम अंभोरे यांचा 'पत्ता बदलत जाणारा गनिम' आणि 'धगीवरची अक्षरं' आणि "गनिम" हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित. "कथा बुद्ध जगाच्या" हा कथासंग्रह प्रकाशित. ते सध्या औरंगाबाद विद्यापीठात इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जालन्याचे कवी, समीक्षक- प्रा.डॉ.केशव सखाराम देशमुख नांदेड विद्यापीठात कार्यरत आहेत तसेच प्रा.बी.वाय. कुलकर्णी हे वैचारिक लेखन व सामाजिक आणि राजकीय विश्लेषण करून व्यवस्थेवर प्रकाश टाकणारे लेखक व व्याख्याते आहेत.
       जालना शहरात गेल्या अनेक वर्षापासून काही कार्यकर्ते व्याख्यानमाला घेतात यातून नव्या पिढीला प्रेरक विचार मिळतात. आणि शहरातील रसिक श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागवली जाते. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, राजर्षी शाहू व्याख्यानमाला, चेतना व्याख्यानमाला, या व्याख्यानमालांचे कार्य अत्यंत महत्वाचे असून या व्याख्यानमालांमधून नामवंत साहित्यिक, विचारवंतांच्या  विचारातून  समाजप्रबोधन  होते आणि नवी वैचारिक लेखन, वाचन करणारी पिढी तयार होते.
         साहित्यिकांना व सांस्कृतिक चळवळींना विचारपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, साहित्य मंडळे, सांस्कृतिक प्रतिष्ठाने, प्रसार माध्यमे, साप्ताहिके, दैनिके, मासिके, त्रैमासिके यांची भूमिका साहित्यिक व कलावंत घडविण्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. जालन्यातील कवी आणि कथाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संपादक विनायक दहातोंडे यांनी १९९१-९२ पासून केले आहे. किंकाळी "नावाचे मासिक हे नवोदितांच्या दर्जेदार साहित्याला प्रसिद्धी देऊन लेखक, कविंना नावारूपाला आणले आहे.  दैनिक आंदोलन, दैनिक दुनियादारी, दैनिक रामविचार, या वृत्तपत्रांनीसुद्धा दिवाळी अंकातून नवोदिताना न्याय दिला आहे.
        जालना जिल्ह्यात केवळ मराठी साहित्याचेच लेखक,कवी निर्माण झाले असे नाही, तर जालना शहरात हिंदी, ऊर्दू, इंग्रजीतून लेखन करणारे लेखक, कवी विचारवंत आहेत. जालन्यात ऊर्दूचा वेगळा आविष्कार गझल, व मुशायऱ्याच्या कार्यकमातून दिसून येतो. यामध्ये फकरे महाराष्ट्र, शम्स जालनवी, शकील जालनवी, मेहरा युसूफ काविश, रज्जाक तालीब, कासीम खालीब, उरुज महमद, अन्वर जालनवी, अब्दुल कदीर, 'लहर, इसाखाँ गाझी, प्रा.अब्दुल रहीम 'अरमा', हमीद अली शरीफ, सुनिल लोणकर 'दर्द' अशी शायर मंडळी गझल लेखन
 आणि गझल मुशायऱ्यात सहभागी होतात, कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. कवी गझलकार कै.राय हरिश्चंद्रजी दुःखी यांच्या नावाने तर साहनी परिवार साहित्यिकांना गुढी पाडव्याच्या दिवशी पुरस्कार देऊन सन्मान करतात.
     डॉ.राम अग्रवाल व डॉ. ई.व्ही रामकृष्णन यांचे साहित्यलेखन इंग्रजी माध्यमातून होते, तर हिंदी साहित्याचे लेखक अभ्यासक म्हणून डॉ.शांतीलालजी जैन, पंडित गंगाप्रसाद विष्णुजी शर्मा, रामकृष्ण "शोला", प्रा.विजयकुमार शर्मा, शांतीलाल बरलोटा, शिवकुमार बैजल, शशिकांत पटवारी, जगन्नाथ सिंह परिहार, या लेखक, कवींचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो.
       एकपात्री प्रयोगाचे लेखन, सादरीकरण करणारे नाटककार प्रा.संजय लकडे यांनी "धुमील की पटकथा" 'हा एकपात्री नाट्यप्रयोग केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर पं.बंगाल,आसाम, आंध्रप्रदेश, हिमाचल आदी राज्यात जाऊन जालन्याचे नाव गाजवले. प्रा.संजय लकडे यांचे मराठी साहित्यातही योगदान उल्लेखनीय आहे.
           जालना जिल्ह्यात त्रैभाषिक कविसंमेलनांचेही आयोजन केले गेलेले आहे. जालना शहरातील नाट्यांकुर, श्रेयस, मराठवाडा नाट्य परिषद, कैवल्यसंवाद, कलोपासक, न्यायश्री, प्राची मत्स्योदरी थिअटर्स, याच शहरासह जिल्हयात, सेवली, जाफ्राबाद, गुंज, भणंग जळगाव, पारध, नालेवाडी यांच्यासह मंठा, हेलस, पाटोदा, वझर सरकटे, ढोकसाळ, अशा काही गावांची नावे घेता येतील.
        सौ. संजिवनी तडेगावकर, डॉ. प्रभाकर शेळके, कैलास भाले, राम गायकवाड, अक्षय घोरपडे, सुहास पोतदार,  खेडेकर, , किशोर भालेराव, प्रा. उद्धव थोरवे, प्रा. विद्या भिल्लारे, प्रल्हाद सोळुंके,, ग.कि.  मगरे, अनिरुद्ध मोरे, कुणाल दहिवले, विद्या दिवटे,अर्जुन शेजूळ, संजय काळे, सुहास सदावर्ते, विनोद वीर, संतोष दह्याळकर, दिनेश पाचारे या कवींचा या ठिकाणी नामोल्लेख करणे उचित ठरेल. प्रा.डॉ. केशव देशमुख यांची साहित्यकृती म्हणजे पाढा' हा कवितासंग्रह, 'भाषा चिंतन, तंतोतंत, अथक, 'चालणारे अनवाणी पाय, गाथा, ' ही पुस्तके प्रसिद्ध असून ते सध्या स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत. या विद्यापीठात सध्या कार्यरत असलेले मराठीचे प्रपाठक प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर है परतूर तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील आहेत. कवी, समीक्षक, कथाकार, अनुवादक, भाषांतकार त्यांचे "गाव आणि शहराच्या मधोमध, 'सृजनपंख, 'जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, 'खजिना आनंद कथांचा, ही पुस्तके प्रकाशित.
   कवयित्री रेखा गतखणे (जाधव) यांचा कुंकू आणि 'माझ्या आठवणीचं गोदण' हे काव्यसंग्रह प्रकाशित.  सौ.रत्नमाला मोहिते (जाधव) यांचा 'गंध ओल्या मातीचा " हा कवितासंग्रह. अॅड. विठ्ठल काष्टे यांचा 'तुझ्या-माझ्यातले' हा काव्यसंग्रह प्रकाशित. सदाशिव जोशी यांचा 'सुगंध.   प्रकाश ताडले यांचा 'स्पर्शुली' प्रल्हाद सोळुंके यांचा 'मळवट 'संभाजीराव भाले याचा "वाटेवर आयुष्याच्या.  शैलेन्द्र टिकारिया यांचा "स्वप्नात, थवे चातकाचे' हे काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांनी अडीचशेच्या पेक्षा जास्त नाटकांना स्वरसाज चढविला आहे.
     कवी आणि गझलकार सुनिल लोणकर यांचा " दिवस कवितेचे' विस्तव, वास्तव आणि ती' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. प्रा. पंढरीनाथ सारके यांचा "मनाचे वारुळ "हा ललित लेखसंग्रह. प्रा. मुरलीधर गोल्हार यांचे 'प्रश्नांकित आणि उध्वस्त' ही नाटके आणि अनेक नाटकामधून भूमिका करणारे हे रंगकर्मी आहेत..प्रा. बसवराज कोरे यांचे 'मन्मथस्वामी गाथा आणि शब्दशिल्प' या  पुस्तकांचे संपादन,अनेक पथनाट्यात महत्वाची भूमिका व प्रबोधन कार्य. अनेक वृत्तपत्रातून स्फुट लेखन प्रकाशित.
       नारायणराव मुंढे यांचे, 'मागे फिरा पतंगांनो" हे पुस्तक. रेखा नाथ्रेकर यांचे 'अक्षर.  राम गायकवाड यांचे 'ठणक' आणि 'उसवताना' हे काव्यसंग्रह व स्फुट लेखन प्रकाशित. कवी, कथाकार, नाटककार म्हणून डॉ.प्रभाकर शेळके यांची ओळख साहित्य क्षेत्रात सर्वदूर आहे. त्याचे 'सारं करपलं रान आणि 'जातीअंताचे हुंकार" हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत या दोन काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. व्यवस्थेचा बैल आणि खोसाटा हे कथासंग्रह तर कोरोना राक्षस बालनाट्य व मातेचं लेकरू बालकथासंग्रह आणि आंबेरकरी एकांकिका ही पुस्तके प्रकाशित आहेत. कवी कैलास भाले हे दरवर्षी एक कविसंमेलन घेऊन आपल्या मातोश्रीच्या स्मृतिप्रित्यर्थ चांगल्या साहित्यकृतीला  पुरस्कार देतात, ही सुध्दा कवितेसाठीची एक चळवळ आहे. त्यांच्या नावे 'पोळणाऱ्या सावल्या" अस्वस्थ हे काव्यसंग्रह असून पोळणाऱ्या सावल्या या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला आहे. सदरहु संग्रहातील कवितेचा समावेश विद्यापीठीय अभ्यासक्रमात झालेला आहे.
     कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी कवितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे 'फुटवे, चिगूर, अरुंद दारातून बाहेर पडताना, 'आणि 'झरे मोकळे झाले' ही पुस्तके प्रकाशित आहेत.  प्रा. सुरेखा मत्सावार यांची 'कशिदा, रानपाखरं, कर्दळी, गुलबक्षी, लक्ष्मणरेखा, रानझुला,"राजस्वप्न" किनारा व स्वप्नांच्या अलिकडले' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रा. राजकुमार बुलबुले, कवी एकनाथ शिंदे, कवयित्री ज्योती धर्माधिकारी यांचा साहित्यातील सहभाग मोलाचा आहे.
मोहन हिवाळे, अशोक घोडे, गणेश कंटुले, शंकर बावणे, दिगंबर दाते, साहील पाटील, श्रीकांत गायकवाड,
बाबासाहेब गोन्टे,मिलींद घोरपडे, स्वाती बालूरकर, हनुमंत घोरसड, नारायण खरात, कैलास रत्नपारखे, विजय जाधव, प्रा. रेणुका भावसार, कवी राम सुपारकर,   पंडित रानमाळ,  अजय देसाई, जगन्नाथ काकडे, ,श्रीमंत ढवळे,मोईनुद्दीन सिद्धिकी, संजय सरदार, कवी-पत्रकार,गीतकार, नाटककार विनोद जैतमहाल, बंडू काळे, कवी गणेश खरात. कवी गीतकार, विनायक पवार, अण्णासाहेब शिकारे अशा अनेक नवोदितांची व प्रथितयश लेखक, कवीं नावे सांगता येतील. या कवींचा आणि कलावंतांचा जालना शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत करण्यात फार मोठा वाटा आहे.
      अठरावे अस्मितादर्श साहित्य संमेलन' कै. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह जालना येथे  १६ व १७ मे १९९२ ला पार पडले  प्रा. प्रल्हाद लुलेकर, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. बी.एम. साळवे, बाबुलाल पंडित, किशोर घोरपडे, रामराव रत्नपारखे, शिवाजीराव आदमाने, श्री लक्ष्मीनारायण पिंपरिये यांच्या आयोजन संयोजनातून पार पडले.
      मातृभूमी सेवा संस्थेच्या वतीने परिवर्तनवादी 'अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, मोहन हिवाळे, डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. राजकुमार लोखंडे, प्रा. विजय कुमठेकर , प्रा. पंढरीनाथ सारके, यांच्या  परिश्रमांतून सन १९९९, २०००, २००१, २००५ ला संपन्न झाले आहेत. वाटूर येथे 'ऊर्मी'चे पहिले साहित्य संमेलन दि. १६ फेब्रुवारी २००३ ला पार पडले. 
         'दुसरे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संमेलन दि. २५ व २६ डिसेंबर २००४ ला संपन्न झाले. 
      मुक्ता साळवे साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडणारे पत्रकार राजेंद्र घुले यांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतही महत्वाचा सहभाग राहिलेला आहे.
            . मराठवाडा साहित्य परिषद व मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने '२७ वे मराठवाडा साहित्य संमेलन' ७ व ८ जानेवारी २००६ ला पार पडले. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन, एका लेखकाची प्रकट मुलाखत  अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
      जालना शहरात अलिकडेच कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या कवितेवर आधारित सुंदर सांगितिक कार्यक्रम पार पडला.
तालुक्यातील आठ तालुक्याचा साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या नोंदीही संक्षेपाने घेतल्या आहेत.

अंबड तालुका
----------------------------
        अंबड हे  शहर जालना शहराच्या दक्षिणेस. जालना–गेवराई रोडवर असून एके‍काळी हे शहर भरभराटीस होते.याची तेथील जुन्या वास्तुच्या भग्नावशेषावरून प्रचिती येते तसेच हे मराठवाडयातील एक महत्त्वाचे व्‍यापारी केंद्र होते. 
        अंबडला मत्स्योदरी देवीचे भव्य मंदिर आहे. ज्या टेकडीवर हे मंदिर वसले आहे त्या टेकडीचा आकार माशाच्या आकारासारखा असल्यामुळे या देवीला मत्स्योदरी असे नाव पडले आहे. नवरात्रात या ठिकाणी यात्रा भरते.
         अंबड तालुक्याने महाराष्ट्राला अप्पासाहेब जळगांवकरांसारखे संगीत क्षेत्रातील कलावंत दिले आहे. गोविंदराव जळगांवकर हे अंबडला संगीत महोत्सव कार्यकम दरवर्षी घेत असत ही संगीत प्रेमींसाठी खूप छान मेजवानी होती.यामुळे गोविंदरावचे नाव आणि अंबडचे नाव महाराष्ट्राला माहित झाले. अंबड येथील संगीत महोत्सवाच्या चळवळीचे सातत्य गोविंदरावचे सुपुत्र अरूणराव जळगांवकर यांनी टिकवून ठेवले आहे.
       अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील नाट्यपरंपरा उल्लेखनीय आहे. या गावात अभिनेते निळू फुले, अभिनेते डॉ. श्रीराम लागू, प्रा.डॉ.लक्ष्मण देशपांडे यांचे पाय या भूमीला लागले आहेत, वऱ्हाड निघालं लंडनला चा पहिला प्रयोग ह्या गावाने घेतल्याचे ऐकिवात आहे.
         महाराष्ट्राला परिचित असणारे फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे प्रवक्ते प्रा.डॉ.प्रल्हाद जी. लुलेकर हे अंबड तालुक्यातील सुखापुरीचे. ते एक वक्ते, कवी, लेखक, समीक्षक, वैचारीक लेखक आहेत. त्यांचे 'मोगडा' हे पुस्तक विविध बलुतेदार जाती कामगारांचा वेध घेणारे आहे, 'आले ढग गेले ढग' हा कवितासंग्रह, वेधक आणि वेचक, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, हे समीक्षाग्रंथ, वेदनांचा प्रदेश, जातक (दत्ता भगत यांच्या गौरवग्रंथाचे संपादन, 'प्रतिमेचे प्रदेश, 'पंचधारांचा प्रदेश,' 'मराठवाड्यातील साहित्य (संपादन) 'साहित्याचे सांस्कृतिक संचित' अलिकडेच 'मराठवाड्यातील मराठी वाङमयाचा इतिहास' हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.  ही साहित्यसंपदा प्रकाशित असून दलितेत्तरांसाठी डॉ.बाबासाहेब आंबडेकर या पुस्तकाने विक्रीचा विक्रम केला आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा दोन पुस्तकांना पुरस्कारही मिळाला आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाचे, व विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्याने अगदी सामान्य माणसांची वेदना शब्दांकित केली आहे. मराठवाड्यातील साहित्याची आणि साहित्यिकांची दखल घेऊन प्रोत्साहन देणारे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व आहे. 
        नांदेड विद्यापीठात मराठी विभागात कार्यरत असलेले कवी, समीक्षक, अनुवादक प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर हे कुंभारी पिंपळगावचे, संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. राम रौनेकर, कवी व्याख्याते दीपक राखुंडे, कादंबरीकार व कथाकार विजय जाधव, प्रा.डॉ. मारोती घुगे, कवयित्री मंगला धुपे, विद्या दिवटे,कथाकार व कवी अशोक चोरले, लोककला व नाट्यशास्त्राचे अभ्यासक डॉ.विनोद जाधव.
       लिटल चॅम्प विजेती गायिका कार्तिकी गायकवाड आणि तिचा छोटा भाऊ कौस्तुभ गायकवाड यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. यांचे मूळ गाव अंबड तालुक्यातील बारसवाडा हे आहे. या गावातील संगीतकार गायक कल्याणराव गायकवाड हे देहू,पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. ह्या सर्व साहित्यिक, कलावंतांचे योगदान महाराष्ट्रासाठी अत्यंत उल्लेखनीय आहे.

घनसावंगी तालुका
------------------------------
घनसावंगी हे गाव गोदावरीच्या किनारी वसलेले आहे. या शहराचा साहित्यिक आणि सांस्कृतिक अंगाने आढावा घेताना घनसावंगी हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातही महत्वााचे ठिकाण मानले जात होते.
इथे असलेले काही भग्नावेशातील घटक, काही वस्‍तु यावरून या गावाचे किती महत्व होते याबाबची खात्री पटते. या शहरात नरसिंहाच्‍या नावाने दरवर्षी यात्रा भरते.  घनसावंगी तालुक्यात असलेले जांब समर्थ हे गाव संत रामदास स्वामी यांच्या नावाने महाराष्ट्राला परिचित आहे. याच गावातील नाट्यलेखक,नाट्यदिग्दर्शक व नाट्यकलावंत राजकुमार तांगडे यांचे आकडा हे नाटक व "शिवाजी द अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" हे महानाट्य सर्वदूर पोहचले आहे. तांगडे यांनी लिहून सादर केलेल्या या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर झाले आहेत. यांचेच चुलत बंधू संभाजी तांगडे यांनी सुद्धा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट व झुंड या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
        घनसावंगी येथील नाटककार व कथाकार  संतोष जोशी, यांचाही नाट्य चळवळीत महत्वाचा सहभाग आहे. कवितेची जाण आणि आवड असणारे कलाशिक्षक अशोक एम.जोशी यांनीही या शहरात कविसंमेलनाचे आयोजन करून नवोदितांना याद्वारे ऊर्जा दिली. कवी नारायण खरात यांनीही कवी संमेलनाचे आयोजन करून नवोदितांना विचारपीठ मिळवून दिलेले आहे. अलिकडेच कवी नारायण खरात यांचा "हेही दिवस जातील" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या अनेक बालकविता वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या आहेत. ते सातत्याने काव्यलेखन करतात.

बदनापूर तालुका
---------------------------------
बदनापूर तालुक्यात अलिकडच्या काळात
साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचा वारसा चालवताना नव्या पिढीतील रोशणगावचे कवी पांडुरंग गिराम यांनी बदनापूर येथे उत्कर्ष वाङमय मंडळाची स्थापना करून कवितेच्या, साहित्याच्या प्रेमापोटी  २०१६ पासून स्वतः पदरमोड करून साहित्य संमेलने  घेत आहेत कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन असे कार्यक्रम या संमेलनात ठेवतात. मराठी साहित्यप्रेमींना संधी मिळावी म्हणून हा आटापिटा पांडुरंग गिराम करतात. 
       मराठी विषयाचे व्यासंगी अभ्यासक, समीक्षक, प्रवक्ते डॉ.देवकर्ण मदन हे  बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील आहेत. 
        प्रा.डॉ.सर्जेराव जिगे, प्रा.शिवाजी हुसे, प्रा.डॉ.शशिकांत पाटील, प्रा.भारतभूषण शास्त्री, कवी राम गायकवाड यांच्या पुढाकारातून आणि कवी पांडुरंग गिराम यांच्या अथक परिश्रमातून शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दरवर्षी घेतले जाते.
     अनेक दिग्गज साहित्यिकांनी येथे हजेरी लावलेली आहे. कवी पांडुरंग गिराम यांनी रोशणगाव येथे संमेलने घेऊन साहित्य चळवळ जोपासली. बदनापूर तालुक्यातील  नवोदित कवी, लेखकांना पांडुरंग गिराम यांची  ही साहित्य चळवळ एक आदर्श निर्माण करून प्रेरणा देणारी आहे.

भोकरदन तालुका
------------------------------
भोकरदन तालुक्याने महाराष्ट्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. महाराष्ट्रात स्वातंत्र्य पूर्व काळापासून अनेक तालुक्यातील गावांनी शाहिरी, पथनाट्य, आणि नाटक परंपरा जोपासली आहे.
       भोकरदन तालुक्यातील बरांजळा साबळे, चांधई ठोंबरी ( महादेवाची चांधई )   पारध (शाहूराजे ), जवखेडा ठोंबरे, आव्हाना, चांधई टोपली, अन्वा.  या सर्व गावांमध्ये अनेक वर्षापासूनची नाट्यपरंपरा, सांस्कृतिक परंपरा ही हौसी कलावंतांनी जोपासली आहे.
        पारध (शाहुराजे ) या गावात ह्या गावात पाराश्वर महाराज मंदिर आहे. पोळ्याच्या तिसऱ्या दिवशी हेडंबाची (भीमाची आई) मिरवणूक काढली जाते. ही परंपरा शतकापूर्वीची आहे. या गावात
गेल्या दिडशे वर्षापासूनची नाट्य परंपरा आहे.  पुंडलिकबुवा जोशी यांनी सुरू केलेली नाट्य परंपरा आज बाविसाव्या शतकातही सुरुच आहे. ही परंपरा अखंड  सुरू राहण्यासाठी पारध येथील पत्रकार, नाट्य कलावंत, दिग्दर्शक रविंद्र लोखंडे हे प्रयत्नशील असतात. इथे नाट्यस्पर्धा सुद्धा घेतल्या जातात.
       पुंडलिकबुवा जोशी यांच्या तत्कालीन नाटकातील भूमिका करणारे नाट्यकलावंत नामदेव काटोले (वय ९०) रामदास येंडोले , देविदास तेलंग्रे हे कलावंत हयात आहेत. हे बुजुर्ग कलावंत लोक नव्या पिढीतील रविंद्र लोखंडे, शाहीर सुभाष सुरडकर, बंकिमचंद्र लोखंडे यांना मार्गदर्शन करत असल्यामुळे या गावातील नवीन हौसी कलावंत पांडू लोखंडे, धनू देशमुख,विनोद आघाव,नारायण बडनेरे या कलावंतांनी पुंडलिकबुवा पासून आलेली ही नाट्य परंपरा सुरू ठेवली आहे, हे विशेष. पारध येथील कवी गंगाधर आंबेकर व विवेकानंद भारती यांची साहित्य क्षेत्रात कवी म्हणून वेगळी ओळख आहे.
        भोकरदन तालुक्यातील शाहीर गुलाबराव नळणीकर (नळणी), शाहीर साहेबराव ठोंबरे (जवखेडा ठोंबरे), शाहीर गणपतराव ठोंबरे (चांधई ठोंबरे), शाहीर भीमा घोरपडे नाट्य कलावंत ( चांधई टेपली), आदी शाहीर कलावंत मंडळींनी कलाक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवले आहे. 
         चांधई ठोंबरी येथील नव्या पिढीचा कवी, कथाकार, नाट्यकलावंत ,अभिनेता कैलास वाघमारे यांनी चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवले आहेत. कैलास वाघमारे यांची पत्नी मिनाक्षी राठोड ह्या सुद्धा एक अभिनेत्री आहेत. कैलास वाघमारे यांनी अनेक चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत त्यांनी चांधई ठोंबरीचे नाव (महादेवाची चांधई ), भोकरदन तालुक्याचे नाव व जालना जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावले आहे.

 जाफराबाद तालुका
--------------------------------
जाफ्राबाद हे शहर खेळणा आणि पुर्णा नदीच्‍या संगमावर वसलेले आहे. गावाच्या संरक्षणासाठी पूर्वी सर्वच गावांना  संरक्षण भिंत असायची तशी मजबुत दगडी भिंतीची तटबंदी याही गावाला हेाती; मात्र कालौघात ती जमीनदोस्त झाली आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी या गावाला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. अगदी पूर्वी पासून या गावाला साधूसंतांचा वारसा लाभलेला आहे. गावात दक्षिणोत्तर दोन भक्कम वेशी आहेत. विविध जातीधर्माची देवी-देवतांची मंदिरे देवस्थाने आहेत म्हणून
 या गावातील सर्व जातीधर्माची लोक सर्वच उत्सवात आनंदाने सहभागी होतात. या गावाला कलेचा वारसा लाभलेला आहे. या गावातील रंगपंचमी प्रसिद्ध आहे. पंचमीला  दक्षिणेला कलगी व उत्तरेस तुरावाले याच वेशीतून आईच्या सोंगाचे गावात आगमन करतात. या कलगीतुऱ्यातून, हलगी तुणतुण्यावर लोकगीते गायली जातात. अक्षयतृतीयेला  संपूर्ण रामायण सोंगाच्या माध्यमातून सादर करत असायचे. ही कलावंतांची भूमी आहे.
शाहीर नानासाहेब परिहार, कोवाड व शाहीर अप्पासाहेब उगले यांचे शाहीरी प्रबोधनाचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
शाहीर अप्पासाहेब उगले यांची दोन्हीही मुले त्यांच्या शाहिरीचा वारसा पुढे नेतांना दिसताहेत. 
       नाट्यकलावंत, वक्तृत्व, कवी, लेखक, साहित्यिक व चित्रपट कलावंत सुद्धा या तालुक्याने महाराष्ट्राला दिले आहेत. गायन वादन, लेखन, शिल्पकला, चित्रकला, काष्टकला, शाहिरी अशा अनेक कलांनी सर्वगुण संपन्न हे गाव आहे. शाहीर 
 या ठिकाणी नवयुवक नाट्यमंडळ, संत सावता नाट्यमंडळ, किसान नाट्यमंडळ, बालनाट्य मंडळ अशा अनेक नामवंत नाट्यमंडळांद्वारे जनजागृतीचे अभियान राबविले जाते. याच तालुक्यातील खासगाव येथील शाहीर यदमाळ यांचे शाहीरीचे योगदान सर्वश्रुत आहे. याच तालुक्यातील आसई येथील शाहीर इंगळे व
त्यांच्याच घराण्यातील प्रबोधनकार कॉम्रेड प्रा. डॉ. समाधान इंगळे यांचेही प्रबोधनाचे काम वाखाणण्याजोगे आहे.
        अतिशय गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कलाकौशल्याने नावारूपाला आलेले डॉ.गणेश चंदनशिवे हे सध्या मुंबई विद्यापीठात नाट्य विभाग प्रमुख आहेत. ही  बाब केवळ टेंभुर्णी किंवा जाफ्राबाद तालुक्यालाच नव्हे ;तर जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह आहे. ते उत्तम शाहीर,कवी, नाट्यकलावंत, गायक आहेत. त्यांना आपल्या कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळालेला आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटापासून त्यांची ओळख जालना जिल्ह्याला अधिक दृढ झाली आहे व  जिल्ह्याला स्वाभिमानही मिळाला आहे. याच गावातील कवी, कथाकार बबन महामुने यांची साहित्यिक म्हणून जिल्ह्यातच नव्हे; तर महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांची मुलगी रेणुका महामुने- जोशी ही अभिनेत्री आहे. संजय मघाडे, करीना जैस्वाल, समीक्षा चंदनशिवे, चित्रकार संतोष औटी यांच्यासारख्या कलावंतांनी टेंभुर्णीची ओळख महाराष्ट्राला करून दिली आहे. टेंभुर्णी येथील घोडके सरांनी आपल्या संगीत क्लासेसच्या माध्यमातून अनेक कलावंत विद्यार्थी घडविले आहेत.

परतूर तालुका
-----------------------------------
       परतूर हे शहर औरंगाबाद- नांदेड या रेल्वे मार्गावर आहे. हा तालुका अगोदर परभणी जिल्हयात होता. परतूर तालुक्यानेही अनेक नामवंत साहित्यिक महाराष्ट्राला दिले आहेत. येथील साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेताना  साहित्यातले अनेकांनी गुरु मानलेले कुरुंदकर यांचे गुरु असलेले प्रा.भालचंद्र महाराज कहाळेकर हे परतूरचे असून 'हरिश्चंद्राख्यान' हे पुस्तक त्यांनी संपादित केले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य भगवंतराव देशमुख यांचा जन्म परतूर तालुक्यातील पारडगाव येथील आहे.
परतूर तालुक्यातील आष्टी गावातील संतकवी लक्ष्मण महाराज यांनी पाचशेपेक्षा जास्त अभंगाचे लेखन केले आहे. नंतरच्या काळात १७ व्या शतकातील आनंदी  स्वामी महाराज, रंगनाथ महाराज, मकाजीबुवा यांच्यासह १९ व्या शतकात वळणीचे काळुबुवा महाराज यांनी लिहिलेल्या पारंपारिक व आध्यात्मिक लेखनाची प्रेरणा येथील मराठी साहित्य लिहिणाऱ्या लेखकांना मिळाली आहे.
सध्याच्या परतूर तालुक्यातील सातोना हे गाव प्रसिद्ध साहित्यिक, कवी बी.रघुनाथ (भगवान रघुनाथ कुलकर्णी) यांचे असून त्यांचा जन्म १९१३ स्वातंत्र्यपूर्व कालातील आहे. त्यांची प्रसिद्ध पुस्तके म्हणजे "नागझरीचे पाटील, फकिराची कांबळी, राधा, साकी, खाटकाची गाय, 'छागल' हे कथासंग्रह आडगावचे चौधरी, 'जगाला कळले पाहिजे, व 'म्हणे लढाई संपली "आदी कादंबऱ्या प्रसिद्ध. तसेच 'पुन्हा नभाच्या लाल कडा, किंवा 'मराठवाडी लेणे, 'आलाप आणि विलाप' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध.  कवी बी. रघुनाथ यांच्या बऱ्याच कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 
       परतुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाटक व संगीत नाटकाची परंपरा होती. माणिकराव देशपांडे, प्रभाकरराव देशपांडे यांनी ही परंपरा जपली, जोपासली, परतुरात गोंधळाची कला ही पारंपारिक पद्धतीने द. या. काटे यांचे पूर्वज भागुजी काटे यांच्यापर्यंत ही गोंधळ परंपरा चालत होती. 
        परतूरचे दिवंगत कवी भिवराजी आढाव अगदी १९८५-८६ पासून साहित्य संमेलने, कविसंमेलने, काव्यस्पर्धा घेऊन नवोदितांना प्रोत्साहन देत असत.  भिवराजी आढाव यांनी परतूर येथे आविष्कार साहित्य मंडळाची स्थापना करून ते नियमित कवी संमेलनाचे आयोजन करीत असत. खूप साहित्यिक मंडळी त्यांच्या कार्यक्रमात हजर असायची. प्रा. सुभाष चव्हाण, यांचा कविसंमेलनात सूत्रसंचालनातील सक्रीय सहभाग. प्रा.भगवानरान दिरंगे, यांचा काचपाणी हा कवितासंग्रह प्रकाशित आहे  वि.रा.पवार, आर.डी खरात, प्रदीप चव्हाण, अशोक बोर्डे, मंगेश मोरे, अजय देसाई, राजकुमार भारुका आदी नवोदितांच्या सहभागातून परतूर शहरात ही साहित्य चळवळ चालू होती. आता भिवराजी यांचे चिरंजीव रमेश आढाव ही चळवळ चालवतात. भिवराजी आढाव यांचे दोन कवितासंग्रह, एक वात्रटिकासंग्रह "आई" सूर्यफूल, लाडीगोडी' हे कवितासंग्रह व एक कथासंग्रह प्रकाशित आहे. कवी भिवराजी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर पदरमोड करून लघुपटाची निर्मिती केली होती. दिवंगत कवी भिवराजी आढावानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रमेश आढाव यांनी अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने, कविसंमेलने घेऊन वारसा चालवला. त्यांच्या नावे दरवर्षी संमेलन घेतले जाते. परतूरचे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे यांचे वैचारिक लेखन, परतूरचे प्रा.डॉ.अशोक देशमाने हे सध्या डॉ.बा.आं.मराठवाडा विद्यापीठातून मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा "वारकरी आविष्कार" हे पुस्तक प्रकाशित आहे.  परतूर तालुक्यातील कावजवळा येथील सुप्रसिद्ध असलेले कथाकार व कादंबरीकार प्रा. छबुराव भांडवलकर यांचे बईनामा, डोह, उन्हाळी दिवस, हुरहूर हे कथासंग्रह व उमनी, कोतवाल, उभारी, थेट सरपंच, बोंडअळी ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध असून वैचारिक लेखनही प्रसिद्ध आहे. त्यांच्या हुरहूर कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
        बाबुलतारा येथील दुनियादास महाराजांचे शिष्य संजय मामा काळे यांनी सदगुरू दुनियादास महाराजांवर लिहिलेला चरित्रग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
        परतूर शहरातील कलावंत सुप्रसिद्ध बासरीवादक राम हिवाळे, लक्ष्मण बंड, कु. निकिता लक्ष्मण बंड,गायक हेमंत पहाडे, संगीत विशारद विजय बांडगे यांचे परतूरच्या सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यात महत्वाचा सहभाग असतो.
        परतूर तालुक्यातील शेवगा ह्या गावातील कवी, लेखक, पत्रकार असलेले राजेंद्र दळेकर हे २०१६ पासून आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात वृत्त विभागात (casual Announcer )  वृत्तनिवेदक आहेत. सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, आदी वृत्तपत्रातून प्रासंगिक आणि सामाजिक विषयावर लेखन करतात. औरंगाबाद, पुणे, मुंबई शहरात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी निवेदनं केलेली आहेत. सोबतच कडकलाथ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विकृतीवर बोट ठेवण्याचं पत्रकारीतेचं कामही "कडकलाथ" या चॅनलच्या माध्यमातून ते करतात. परतूर तालुक्यातील खांडवी या गावातील विष्णुपंत बरकुले यांची कन्या श्रावणी बरकुले ही इंद्रजीत भालेराव व बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे मुखोद्गत वाचन आपल्या विशेष शैलीत करत असते तिच्या  काव्यवाचनाचे महाराष्ट्रभर कौतुक केले जाते. परतूर येथील मिलिंद अवसरमोल, राहुल पंडागळे, राज माळोदे, यांचे काव्यलेखन प्रा. शरद बोराडे, प्रा. सखाराम टकले, यांचा कविसंमेलनातील सहभाग, प्रा.सुभाष चव्हाण यांचा तत्कालीन सहभाग आणि परतूरच्या साहित्य संमेलनाचे संयोजन व यातील सक्रीय सहभाग साहित्य-चळवळींना बळ देणारा होता. वाटूर येथे प्रा.रंगनाथ खेडेकर यांनीही एक दिवसीय साहित्य संमेलनाचे व काही वर्ष "दुधात सांडले चांदणे " या कविसंमेलनाचेही त्यांनी आयोजन केले होते. अनेक नामवंत कवीं साहित्यिकांनी वाटूर येथे हजेरी लावलेली आहे.

 मंठा तालुका
--------------------------
मंठा हे शहर औरंगाबाद-नांदेड रोडवर आहे. मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून  शहराच्या उत्तरेस टेकडीवर रेणुका देवीचे भव्य मंदिर आहे. नवरात्रात व चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. गाड्या ओढण्याची नवसाची ही परंपरा अजुनही चालू आहे. येथील गुरांचा बाजार व केळी प्रसिध्द आहेत. 
      मंठा शहरासह तालुक्यात सांस्कृतिक चळवळी चालू असतात. अनेक मंडळे, संघ, प्रतिष्ठाने कार्यरत होती. त्यामध्ये कस्तुरी प्रतिष्ठान, आविष्कार साहित्य मंडळ, मंठा तालुका पत्रकार संघ, गुरूकृपा मित्रमंडळ, सनी मित्रमंडळ, साने गुरूजी कथामाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,  फुले,शाहु,आंबेडकर प्रतिष्ठान तसेच सेवली, ढोकसाळ, हेलस, वझर, सरकटे, पाटोदा आदि खेड्यातील कलावंत मंडळी विविध नाटकाचे प्रयोग करून गावकऱ्यांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम करीत असत. ती सांस्कृतिक परंपरा निष्ठावान माणसे व नवीन निर्माण होणाऱ्या कलावंताअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. नाटककार बाबा कुलकर्णी, विश्वनाथ जोगी,एंडाईत, ईश्वर गजलकर, सखाराम काऊतकर, कोंडीराम घनवट, गौतम वाघमारे, गुलाब जाधव, नंदकिशोर प्रधान, धोंडोपंत मानवतकर यांनी चालवलेली ही  नाट्यपरंपरा १९९२ पर्यंत चालू होती.
      भानुदास गोंधळी म्हणून प्रसिद्ध असलेले भानुदास इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळाची परंपरा चालवली. बऱ्याचशा पारंपरिक कला ह्या उदरनिर्वाहासाठी सादर केल्या जात असत. अलिकडच्या पिढीने उदरनिर्वाहाची पारंपारिक पद्धती मोडीत काढली. या बरोबरच कलाही लोप पावत गेल्या आहेत.
        मंठा येथे नाटकाची परंपरा बंद पडल्यावर १९९२ ला  डॉ.धोंडोपंत मानवतकर व त्यांच्या मित्रांनी आविष्कार साहित्य मंडळ स्थापन केले. याच काळात दत्तात्रय हेलसकर व गौतम वाव्हळ या दोन शिक्षक मित्रांनी सुरू केलेली साने गुरूजी कथामाला ही दोन दशके चालली व   दत्तात्रय हेलसकरांच्या निधनानंतर कथामाला बंद पडले. तीन दशकांपासून फक्त आविष्कार साहित्य मंडळ टिकून आहे. धोंडोपंत मानवतकर, विवेक सोनटक्के, म.वि.हिंगे, पी.व्ही. तालीमकर, सदाशिव कमळकर, प्राचार्य के.पी. इंगळे, प्रा.शोभा डहाळे, पी.टी प्रधान, प्रा.प्रदीप देशमुख, अरूण चव्हाण, राजकुमार कुलाल, अनिल पांडे, संतोष मोरे, शिवाजी जाधव, बाबुजी तिवारी, बालासाहेब वाघमारे, ओमप्रकाश राठोड, प्रा.अशोक पाठक, प्रा. अशोक खरात आदी साहित्यप्रेमींनी मंठ्यातील आविष्कार साहित्य मंडळाद्वारे दिग्गजांना बोलावून दरवर्षी सलग तीन साहित्य संमेलने घेतली. नंतर कविसंमेलने घेऊन ३० वर्षे साहित्याची चळवळ जोपासली आहे.
       या मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. धोंडोपंत मानवतकर यांचे अंतरसाक्षी, रुपांतर, 'ओढाळ सुरांच्या देही' व 'लोकशाहीचा जाहीरनामा', हे चार कवितासंग्रह,  'काव्यप्रभा' व विद्रोही साहित्याचा निर्माता' हे दोन संपादित पुस्तके असे एकूण सहा पुस्तके प्रसिद्ध     समाजभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांने ते सन्मानीत आहेत. कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, संपादक,प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ता आहेत. येथील आविष्कारचे   प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांचे "अंतरीच्या गूढगर्भी" व "इतिहासकार लोकहितवादी" ही दोन पुस्तके प्रकाशित आहेत. प्रा.प्रदीप देशमुख यांचा 'उतरंड' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सुंदर सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंठा व परतूर शहरात ज्यांची कवी,कलावंत म्हणून ओळख असलेले प्रा.अशोक पाठक यांचे 'मी अंश त्या गर्भाचा', पक्षी उडून जातात व "सलत राहतं काहीतरी" हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.  मंगरुळ ता. मंठ्याचे दिवंगत बालकवी, कथाकार शिरीष पद्माकर देशमुख यांचा  "बारीक सारीक गोष्टी" व 'फरदड ' हे कथासंग्रह प्रसिद्ध असून या कथासंग्रहाला नुकताच कविवर्य नारायण सुर्वे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातून या कथासंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
     तळणीचे सचिन चौकसकर यांचा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून   . तळणीचे दिवंगत कवी पि.यु.सरकटे यांचा 'निळकंठ' 'काव्यसंग्रह प्रकाशित. तळणीचे प्रदीप ईक्कर यांचाही "हिरवा पांडुरंग" हा ग्रामीण काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तळणी परिसरातील दत्ता खुळे, श्रीराम गडदे, मंठा येथील डॉ. गोपाळ तुपकर हेही काव्यलेखन करीत आहेत. अनिल उ. खंदारे यांनीसुद्धा अ.भा. साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.  
मंठा येथील वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर मदने माऊली यांनी त्यांच्या वारकरी  शिक्षण संस्थेच्या माध्यमातून २० वर्षात ३००० विद्यार्थी संस्कारक्षम व मृदंगाचार्य केले आहेत. संगीत अलंकार असलेले गुरुवर्य विनोद डव्हळे यांचे शिष्य गायक- विठ्ठल सूर्यवंशी, विजय शिंदे, भक्ती भूतेकर कु. निशिगंधा मानवतकर व शिवाजी काकडे आदी संगीत विशारद आहेत.
        मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ (अमरगड) येथे सत्यवचनी, सत्यशोधक  सदगुरू दुनियादास महाराजांची ही कर्मभूमी आहे. याच ठिकाणी महाराजाची समाधी आहे. आध्यात्माचे सखोल ज्ञान असणारे  दुनियादास महाराज यांचा अनुयायी वर्ग महाराष्ट्रात विखरलेला आहे.
       मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील महाराष्ट्राला परिचित असणारे गायक प्रा. राजेश सरकटे,प्रमोद सरकटे, विनोद सरकटे त्यांचेच बंधू संजय सरकटे यांनी चित्रपटात भूमिका केल्या आहेत व त्यांची मुलगी अनुष्का सरकटे यांनी काही मालिका मध्ये भूमिका केल्या आहेत.
      वझर येथील  शाहीर सुरेश जाधव व  यशवंत जाधव यांनी आपल्या शाहिरीचा अटकेपार झेंडा लावला आहे. हेच गाव जन्मभूमी असलेले व परभणी येथे स्थायिक झालेले डॉ.जगन सरकटे यांनी "दिसतं तसं नसतं"या चित्रपटाची निर्मिती करून भूमिकाही साकारली आहे. ओंकार अप्पा शिवे यांनी वझर सरकटे येथे नाटकाची परंपरा अनेक वर्षे चालवली.
         हेलस येथे नाटकाची परंपरा ही दिडशे वर्षापासूनची आहे, ढोकसाळ, लिंबेवडगांव इथेही नाटकाची परंपरा चालू होती.
        पाटोदा येथील कलाप्रेमी नेतृत्व पंकज बोराडे हे दरवर्षी दिवाळीला अनेकांचा गौरव करणारा दीपोत्सव कार्यक्रम घेत असत.
       मंठा येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक, कलावंत सतीश खरात यांनी मंठा शहरात हौसी कलावंतांचा  एक ग्रुप तयार केला आहे. याद्वारे ते एकांकिका व प्रयोग करत असतात. त्यांचे सहकारी  विकास बोरकिनीकर, प्रशांत शिंदे, कोंडीराम तात्या घनवट, धनश्री खरात, पल्लवी खरात, सानिका सवणे, राजू वाघमारे, चंदू तळेकर, गणेश खिस्ते यांचा सक्रीय सहभाग असतो. 
      मंठा तालुक्यातील काही कलावंत शॉर्ट फिल्मकडे वळलेले आहेत यामध्ये कलावंत सतीश खरात, उद्धवराव काकडे, तुकाराम वैद्य, अशोक खवणे, जितेंद्र निखाडे, भगवान शिंदे, शुभम उबाळे, पवन झोल अशा काही हौसी कलावंतांचीही मंठा तालुक्यात चळवळ आहे. विक्रांत पंडित हा मुंबई विद्यापीठातून नृत्याची पदवी संपादन केलेला मंठ्यातील तरूण नृत्यकलावंत व नृत्यदिग्दर्शक आहे. त्याने मंठा व परतूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नृत्याचे शिक्षण देऊन कलेची चळवळ चालवली आहे.
       जालना शहरात व जिल्ह्यात साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सतत होत असतात अर्थात या कार्यक्रमांसाठी जालना शहरातील व जिल्ह्यातील राजकीय मंडळीचा महत्वाचा आणि मोलाचा अर्थपूर्ण वरदहस्त असतो. हे मुद्दाम सांगितले पाहिजे. म्हणूनच जालना जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ मिळते. सर्वांच्या सहकार्यातून जालना शहराचं आणि जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक पटलावर नेहमी अग्रभागी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू..!
      अगदी कमी कालावधीत व घाईगडबडीत काही मान्यवर कवी, लेखक कलावंताचा नामोल्लेख करणे व नोंदी घेणे विसरू शकते किंवा काहींच्या नावाची पुनरावृत्तीही होऊ शकते, त्याबद्दल मनस्वी दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या संक्षिप्त वर्णनास विराम देतो..!
✍️
लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...