बुधवार, २५ जानेवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर

उपेक्षितांचं जग..."








लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


            मित्रांनो..! आपल्या अवतीभवती उपेक्षितांचं फार मोठं जग आहे.त्या उपेक्षितांच्या जगाकडे आपण नेहमीच कानाडोळा करत आलो आहोत. जणू आपल्याला त्या घटकाशी काही  देणंघेणं नाही, अशा अविर्भावात आपण वावरत असतो. उपेक्षितांची वेदना, त्यांचे जटिल होऊन बसलेले मूलभूत प्रश्न आणि त्यांचा जगण्याचा संघर्ष हा "जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे.!"
     २६ जानेवारी जवळ येतीय.. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष चालू होईल....उघड्या नागड्या आदिवासींच्या, पाल ठोकून राहणाऱ्या उपेक्षितांच्या मनात पुन्हा स्वातंत्र्याचे, मानवी हक्कांचे, जगण्याचे, संघर्षाचे.. प्रश्न मनातल्या मनात घोळू लागतील आणि लगेच विरघळूनही जातील बर्फासारसे..!
             औरंगाबादसारख्याच अनेक शहराच्या उड्डाण पुलाखाली ह्या निराधार उपेक्षितांचा भातुकलीचा संसार मांडलेला असतो. त्यांच्याकडे बघितले की, वाटते या उपेक्षितांपर्यंत १९४७ च्या स्वातंत्र्याची वार्ता अजून गेलीच नाही की काय..? आणि ज्या पुलाखाली त्यांनी संसार मांडलाय त्याच उड्डाण पुलाला नाव दिलेलं आहे "स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल"  पुलाखाली बाजुलाच पुतळा होऊन हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब हे या उपेक्षितांचा भातुकलीचा संसार पहात उभे आहेत, कित्येक वर्षापासून..! त्यांनाही वाटत असेल, हल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी या बेघर असणाऱ्या पुलाखालच्या माणसांना आधुनिक जगाच्या प्रवाहात आणलं पाहिजे.. परंतु.. छे.!  ते निवडणूकीच्या मतदानासाठी बाहेर देशातून विमानाने खर्च करून आणतील ;परंतु अशा उपेक्षितांना आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात आणणार नाहीत. 
         सिडको कॉर्नरला सिग्नलजवळ
येणाऱ्या जाणाऱ्या मोटार गाड्यांच्या गर्दीतून पादचारी कसाबसा रस्ता काढत पुढे पुढ जात असतो...हे पुलाखालचं उपेक्षितांचं जग या चंगळवादी उद्विग्न जगाकडे टुकूटुकू बघत आपल्या संसाराचा एकेक दिवस ढकलत असते उपाशी-तापाशी.
      काही वंचित,पीडित, निराधार कुटुंब हे शहरातील अडगळीत पडलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपमध्येही आपला संसार थटवतात. त्यांना ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीच पर्वा नसते...काही कुटुंबाचा संसार तर रस्त्याच्या कडेला उघड्यावर उभा केलेला असतो. तिथे सुरू असतो  त्यांचा लहान मुलांना क्रिकेटच्या बॅट करून विकण्याचा पोटभरु धंदा....वास्तविक पाहता क्रिकेटच्या जगाचा आणि त्यांचा काहीच संबंध नसतो....एकाला एक बॅट तयार करुन विकल्यावर पाच-पंचवीस रुपये कमवून देते, तर तीच बॅट क्रिकेटपटूंना कोटी रुपये कमवून देते...पंचवीस रुपये आणि कोट्यावधी रुपये यामध्ये कमालीची तफावत असते... मग "सबका साथ सबका विकास" कसा शक्य असेल..?
      उड्डाण पुलाखाली राहणाऱ्यांनी कसा आणि कुठे लावावा "हर घर तिरंगा?"
 ज्या उपेक्षितांना घरकुलाची गरज आहे त्यांना कसे मिळतील घरकुलं.. त्यांच्याजवळ घरकुलासाठी लागणारे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि रहिवाशी प्रमाणपत्रच नसते...कारण पुलाखाली राहणाऱ्या कुटुंबाला गावच नसते...जिथं भरला दरा, तोच गाव खरा" जिथं पोट भरेल तिथेच रहायचं.. कायमचे बस्तान कुठेच नसेल तर कुठून मिळणार त्यांना रहिवासी प्रमाणपत्र..? कुठून मिळणार आधार कार्ड..? जर कोणतेच दाखले मिळणार नसतील तर....पुलाखाली व  पालावर राहणारा माणूस या देशाचा नागरिक गणला जाईल का? तो जर एखाद्या राज्याचा नागरिकच नसेल तर तो भारतीय नागरिक म्हणून मुख्य प्रवाहात कसा येईल..? त्याचे मूलभूत हक्काचे प्रश्न कसे सुटतील.? त्याला कोणत्या कोर्टात न्याय मिळेल ? 
      "सबका साथ सबका विकास"च्या  योजनेत पुलाखालच्या माणसांचे कधी येतील अच्छे दिन..?"
     पाच सहा वर्षापूर्वी "काला पैसा लायेंगे, "अच्छे दिन आयेंगे" चा बोलबाला सुरू होता..नंतर "अच्छे दिन"ची तरुण मुले खिल्ली उडवू लागले...एका खेड्यातल्या चाळीत पत्राच्या पडक्या घरात राहणाऱ्या एका निराधार म्हातारीला ही दोनचार टवाळखोर मुले तिच्या घराजवळ जाऊन पुन: पुन्हा चिडवत म्हणायची "आच्छे दिन कधी येनार हे " ती म्हणायची "जाय ना भाड्या.!" हा व्हिडिओच खूप व्हायरल झाला होता... त्या म्हातारीच्या त्या बोलण्यावर ती मुले फिदी फिदी हसायची आणि पुन्हा तेच तेच वाक्य बोलून म्हातारीची शिवी खायचे. मला वाटतं ती शिवी त्या मुलांना लागत नसावी...असो. लागो कोणालाही..! मला वाटतंय तिला माहित होतं की काय, कोण जाणे..अच्छे दिन वगैरे काही नसतं... ती एक अंधश्रद्धा असते म्हणून.! 
       उपेक्षितांच्या जगाची ओळख करून घेणाऱ्या माणसांना असते त्यांची सहानुभूती आणि त्यांच्या विद्रूप जीवनाची अनुभूती...
            एके दिवशी सकाळीच भारत बाजारमधून ए.पी.आय.कॉर्नरजवळून फिरण्यासाठी पूर्वेला निघालो. काही अंतरावर नर्सरीचे दुकान, त्याच्या अलिकडे देवाच्या मूर्ती तयार करून विकणाराची मेनकापडाची खोपी. त्या खोपीसमोर अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या. त्यावर खूप धूळ साचलेली. अनेक वेळा बघितल्या तरी त्या जेवढ्याला तेवढ्याच दिसत असायच्या. म्हणजे त्या विकत होत्या किंवा नाही याबाबत तर मला शंकाच येत असायची. 
      खरेतर ते एक कलावंत, उत्कृष्ट शिल्पकार असूनही कित्येक वर्षापासून रस्त्याच्या कडेला खोपीसमोर मूर्ती तयार करून ठेवतात आणि ग्राहकांची वाट पाहत बसतात..हे वाट्याला आलेलं  दैन्य, दारिद्र्य हे त्या बिचाऱ्या मूर्त्या कशा संपवणार ? हे त्या कलाकाराला माहितच असते; कारण जाणून बुजून दगडाच्या मूर्त्याच त्या.!  कसला चमत्कार नि कसलं काय..? देवमूर्त्या विकल्या तरच चार पैसे मिळणार नि पोटाची खळगी भरणार..! नाहीतर दैन्य, दारिद्र्य आहेच पाचवीला पुजलेलं..!  
    बरे उपेक्षितांची ही दयनीय अवस्था सरकारच्या लक्षात का येऊ नये? अशा कलावंतांची दखल घेऊन त्यांच्या कलेला योग्य जागा, योग्य मानधन देऊन त्यांचं पुनर्वसन का करण्यात येऊ नये ? 
      क्रिकेट प्लेअर तयार होतील, राजकारणी तयार होतील, नट,नट्यां तयार होतील ;परंतु कलावंतांना कला ही निसर्गत:च मिळालेली देणगी असते. कलावंत हा देशाची सांस्कृतिक ओळख असतो.. म्हणून शासनाने शास्त्रज्ञ, कवी, लेखक, चित्रकार, विचारवंत, कलावंत, शिल्पकार यांची हेळसांड न करता देता त्यांना जपले पाहिजे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे. हे सरकारचे आद्यकर्तव्यच आहे.!
एका म्हाताऱ्याने तर सरकारचा उद्धारच केला.
      परवा पुणे गाडीतून उतरताना एका वयस्कर म्हाताऱ्याला मदत केली...आणि उतरल्यावर म्हणालो, "बाबा आता दबलंचोपलं घरीच राह्यलं पाहिजे." "आरं बाबू गाडी फुकटाची हाय मून पोरानं पाठीलं नातीकडं "  म्हातारं खोकलंत खोकलंत बोललं. मी लगेच म्हणालो,"बाबा आता पुढच्या महिन्यात लॉकडाऊन लागणार हे, जास्त गावं फिरू नका." माझं बोलणं संपायच्या आतच म्हाताऱ्याने तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडली नि म्हणालं,"हे सरकार आजून करुना आन्तय का काय रे बाबू..?"
       मला वाटलं मी जर हो म्हटलं तर म्हातारं  सरकारला पुन्हा एखादी शिवी देईल म्हणून मी लगेच म्हणालो,"येतो बाबा." आणि पेपर घेऊन घराकडे निघालो..! 
     अलिकडं असं वाटू लागलं की, आपलं लिहिण्या, बोलण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलंय की,काय ? एवढं सेन्सेटीव्ह वातावरण होऊन बसलंय. राजकारणातल्या कोणत्या   माणसाच्या बाजुने बोलावं अन् कोणत्या माणसाच्या बाजुने बोलू नये ? 
मोठा पेच निर्माण झालाय.!
चला,..हेही दिवस निघून जातील..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
लेखक - सामाजिक, साहित्यिक,सांस्कृतिक
चळवळीचे अभ्यासक आहेत.
१९ जानेवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...