बुधवार, १८ जानेवारी, २०२३

|| गनीम || पुस्तक परीक्षण -डॉ.धोंडोपंत मानवतकर

भेदाधिष्ठित शोषणाचे षड्यंत्र उजागर करणारा कवितासंग्रह - गनीम


-----------------------------------------------------------------------
'गनीम' हा कवी डॉ.उत्तम अंभोरे यांचा तिसरा कवितासंग्रह होय..! या संग्रहापूर्वी त्यांचे 'धगीवरची अक्षरं' व 'पत्ता बदलत जाणारा गनीम' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. 
        'गनीम' हे या संग्रहाचे अत्यंत सूचक असे नामाभिधान असून एकूण कवितांचा मथितार्थ या शीर्षकातच दडलेला आहे. शोषणाची विविध रूपे उलगडताना असे सिद्ध होते की,  विषमतावादाच्या मुळाशी अनाकलनीय, अदृश्य आणि अनभिज्ञ अशी विकृत स्वरुपाची व्यवस्था आहे, जी इथल्या सकल याती बांधवांना पारंपारिक शोषणाच्या जोखडातून  सुटू देत नाही. 
        अदृश्य रूपाने शोषण करणारा 'गनीम' आपले स्वरुप बदलत जातो. त्याची ती कूटनीती सोशिकांच्या लक्षात येत नाही, तो आपले काम अगदी रंग,रुप,आकार, बदलून साळसूदपणे करत राहतो. 
        पारंपारिक धर्मकारणाची जी विषमताधिष्ठित वर्णशृंखला आहे तिच्यावरच आधारित वर्गशृंखला आहे. जी प्रत्येक जात समुहाला आपापल्या समुहातून बाहेर पडू देत नाही. दैन्य, दारिद्र्य, जातीभेद टिकून कसे राहतील यासाठी हा 'गनीम' विविध रुपे धारण करत असतो. कविला या गनीमाच्या अनेक रुपांचं झालेलं आकलन आणि संशोधन प्रस्तुत संग्रहात प्रकर्षाने नोंदवलेलं आहे ; मात्र असं आकलन वंचित,पीडित,अज्ञानी, दरिद्री समुहाला झालेलं नाही. किंबहुना ते उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषितांनाही  झालेलं नाही, इतकेच नव्हे; तर या समुहातील स्वार्थी पुढाऱ्यांनासुद्धा झालेलं नाही. याचे कारण यातील काही समुह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच कष्टत असतो, तर काही समुह फक्त आपल्या स्वार्थीपणाच्या गर्तेतून बाहेर पडत नाही. 
        कविने स्वतःच्या संशोधनातून गनिमाची ओळख पटवून घेतलेली आहे. त्याच गनीमाची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि समग्र समाज या अदृश्य, बहुरुपी गनीमापासून सावध व्हावा. हाच एक उद्देश कवीच्या काव्यनिर्मितीच्यामागे दिसून येतो.
       समाजव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पनांचा कार्यकारणभाव आणि वर्चस्वासाठी वर्णवादाची व वर्गवादाची संकल्पना निर्माण करणारा व ती शतकानुशतके टिकवून ठेवणारा मार्ग म्हणजे देव, धर्म, दैव, कर्मकांड होय !
    उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ आदी भेदाभेदांची ही जी निर्मिती आहे... ती एका विशिष्ट समुहाचे श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यासाठीची आहे. म्हणून एका समुहाची श्रीमंती व श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यासाठी इतर समुहात भेदाभेद उभे करण्याचे विकृत षडयंत्र चालूच असते. जो तो समुह आपापल्या समुहात राहून जातीयद्वेषात निरंतर कसा अडकून पडेल व त्यातून एकाच समुहाचे श्रेष्ठत्व कसे अबाधित राहील ही अनभिज्ञ खेळी कैक शतकांपासून सुरू आहे. या खेळीच्या विषारी षडयंत्राचे वेगवेगळे पैलू आहेत. त्या पैलूंची सहज उकल होत नाही; म्हणून कवीने त्या पैलूंना 'गनीम' असे नाव दिले आहे; कारण त्या पैलूंचा दीन दुबळ्यांचे, गरीब वंचितांचे शोषण करण्यासाठी व भेदाभेद टिकवून ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे वापर केला जात असतो. 
     सर्वसामान्य जनतेला शोषणाचे प्रकार कळत नाहीत.. किंवा ज्यांना ज्यांना कळाले आहेत त्यांनी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला त्यांच्या आयुष्यात काटेपेरणी केली गेली. काहींना साम, दाम, दंड, भेद नीती वापरून कसे संपवता येईल किंवा कसे झुलवत ठेवता येईल याबाबतही हा 'गनीम' सतर्क असतो. तो आपले अस्तित्व, आपले ठिकाण आणि आयुधं कोणती आहेत हे कळू देत नाही. म्हणूनच कवी आपल्या कवितेतून 'गनीमाची अगोचर अपरुपे आणि त्याच्या अस्तित्वाच्या खुणा सांगण्याचा प्रयत्न करतात...

"आताही शत्रूंच्या छावण्यांची 
पुराणी ठिकाणं तीच ती समजून
पाडून घेताहोत आपल्याच पायावर
दगड
आपण फक्त भावनिक शब्दहल्लकल्लोळात नि
शत्रू आपणास लोळवून जातो.

कवी आपल्या शत्रूंच्या अनेकांगी मनसुब्यांना जाणतो. विचारवंतांना, प्रतिभावंतांना, संशोधकांना शत्रूच्या अदृश्य गनीमाचा शोध घेता येतो; मात्र सामान्य माणसाला या अनाकलनीय षडयंत्राच्या 'गनीमाचा कधीच सुगावा लागत नाही.
     खरेतर कवी हा एक फिलॉसॉफर असतो.तो नेहमीच चिंतनाच्या मुळाशी जात असतो. त्यातही आंबेडकरवादी कवी हा व्यवस्थेच्या षडयंत्राचे वेळोवेळी विच्छेदन करत असतो; किंबहुना तो भविष्यकाळाचा भाष्यकार असतो; म्हणूनच हा षडयंत्रकारी 'गनीम' वेळोवेळी उध्वस्त करत असलेल्या पिढ्यांची व उद्याच्या पिढीच्या अंकुरांची कविला चिंता वाटते.. 

"आपण गर्क..भूतकालीन संघर्षाचे
अर्क काढून काढून चघळण्यात नि
शत्रू आपल्याच घोषणेसह...
आपल्या अंकुरांनाही उध्वस्त करीत
जातो पुढे पुढे..!
म्हणून कवी लिहितो....

"आता थोडं सावध व्हायलाच  हवं
पाठीशी उभं असणाऱ्यावर  नि
पाठीवरून हात फिरवणाऱ्यावरही शंका घ्यायला हवी."
कवीच्या शंकेला कारणही तसंच आहे 
"शत्रू शुगरकोटेड असतो नि
आपली फसगत होते."

कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी आपल्या कवितेतून नव्या पिढिला सामाजिकभान आणि जाण यावी यासाठी शत्रूच्या अनेक रुपाची ओळख करून देत सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.. नव्हे त्यांच्याठायी समाजाप्रती असलेली तळमळ व अस्मिता त्यांना अस्वस्थ करते आणि कविता जन्म घेते...
ते आपल्या 'हवालदिल' या कवितेत लिहितात....

"त्यांचे सारेच आंडू-पांडू  संत नि
संस्कृतीचे मोहक आलेख
आपल्याला वरचेवर सरपटत ठेवतात". 
याच कवितेत कविला हेही सांगावयाचे आहे की,
"माफक बंडखोरांचे आता त्यांना
तसे काहीच नसते सोयरसुतक..!"
 
       षडयंत्रकारी व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारे काही बंडखोर त्यांच्या गळाला लागणारेही असतात म्हणून कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी बंडखोरांबाबत माफक हा शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे. शोषकांच्या डावपेचांची जाणीव आणि बंडखोर बांधवांच्या कमजोर नाड्यांची सतावणारी चिंता याच घुसमटीतून या कवितेचा जन्म झालेला आहे.
      विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विकृतीकरणातून होत असलेल्या सामाजिक छळांचे आणि शोषणाचे अनेक संदर्भ उजागर करताना कवी आपल्या 'समरसता' या कवितेतून गनिमाच्या स्वरूपाचे दर्शन घडवतात....
"त्यांचं समरसनं
वाळवीच्या स्पर्शासारखं
पोखरत जाऊनही
सतत मातीचे वंशज भासविण्याचं
मातीच्या मुलाम्याखाली वावरण्याचं
आता त्या एकिकरणातही 
सतत पराभूततेचाच इतिहास,
आपला नुस्ता ऱ्हास ऱ्हास.
'समरसता' एक निमित्त
बाकी तेच ते
पुराणसुक्त !"

हे संदर्भ उजागर करण्याचा कवीचा उद्देश हाच की, प्रस्थापितांनी आता पारंपारिक मिथकांद्वारे, दंतकथांद्वारे या भाबड्या जनतेला देवाधर्मात आणि कर्मकांडात अडकवू नयेच शिवाय भेदाभेदांच्या चौकटी उभ्या करू नयेत.   डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता  समाजाला शहाणे करून सतर्क राहण्याचा सल्ला देते. ही कविता 'गनीमाचे नकळत स्वरुप सांगतांना गनिमाच्या गळाला लागलेल्या फितूर लोकांमुळे पुढच्या पिढीचे किती नुकसान झाले हेही सांगावयाचे टाळत नाही. समाजातील काही कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी. फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारांशी केलेली प्रतारणाही ही कविता आवर्जून नोंदवते.
    कवी डॉ.उत्तम अंभोरे आपल्या मनोगतात म्हणतात,"कविता हा अतिशय गांभिर्याने घेण्याचा विषय आहे" ते शतप्रतिशत खरेही आहे; कारण विद्रोही काव्याची निर्मितीच असत्याचा पर्दाफाश करण्यासाठी झालेली आहे.
      बाबासाहेबांनी व त्यांच्या समकालीन निष्ठावंतांनी समतेसाठी व्यवस्थेशी केलेला विद्रोह अलिकडचे कार्यकर्ते का विसरलेत..? की, त्यांची केलेली दिशाभूल त्यांच्या लक्षात येत नाही... म्हणून कवी लिहितात,..

"विद्रोहाची माय रडते ढसाढसा नि
विद्रोहाशी नाळ जोडून
अस्मितेचे मळे फुलविणारे
तळ्याच्या फिरतात काठाकाठानं
त्यांचं विद्रोहाचं शस्त्र हरवलंय कुठं  नि
पाण्याच्या बुडबुड्यासंगं त्यांचं प्रेम.'

        कवी डॉ.उत्तम अंभोरे यांचे सामाजिक निरिक्षण अत्यंत सूक्ष्म आणि चिकित्सक आहे.
      सामाजिक अस्मितेचा आव आणत तळ्याच्या काठकाठाने फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे विद्रोहाचे शस्त्र तळ्याच्या बुडाशी हरवलंय आणि त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यासंगं कार्यकर्त्यांचे प्रेम. अत्यंत चपखलपणे मारलेला टोमणा सामाजिक भान आणून देणारा आहे.
     कारण एखाद्या कुत्र्याला जरी दगड फेकून मारला तर तो दगडाला चावत नाही, तर दगड ज्या दिशेने आला आहे त्या दिशेच्या माणसाचा शोध घेऊन त्यालाच चावतो; परंतु आमच्या बंडखोरांचा विद्रोह नेमका कशाप्रकारे आणि का? डायव्हर्ट होतोय याची कारणंही ते आपल्या 'प्रगती' या कवितेतून उलगडून दाखवतात ...

 "सारा सुशिक्षितपणा..
आर्थिक सुरक्षिततेच्या कवचाखाली
प्रसिद्धीची दोन गोगलगायी शिंगं घेऊन 
लाचारीत सरपटत जाणारा अन्
उगाच रस्ता उजाडत गेल्याचं समाधान मानून धन्यता पावणारा !
बंडाचे झेंडे रोवण्याचं स्वप्नं
कधीतरी जोपासलं होतं...या
सुशिक्षितपणाच्या मातीत; पण
सारेच सांड आंडं ठेचून घेण्यासाठी
उत्सुक असल्याची वास्तवता...'
     उपरोक्त कविता विद्यमान पिढिला परखडपणे सुनावते की,"तुमच्या कुचकामी, लाचार सुशिक्षितपणाचे खापर तुम्ही अशिक्षित पिढीवर फोडणार असाल तर तुम्ही तुमच्याच लाचार मेंदूच्या शाईने लिहिताहेत तुमच्या मृत्यूचे जाहीरनामे."
     डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता समकालीन पिढीच्या अस्वाभिमानी, लाचार, बेईमानी, फितुर वृत्तीवर परखडपणे भाष्य करते किंबहुना ती अत्यंत तळमळीने प्रबोधनाचे काम करत भविष्यकाळाचाही वेध घेते.
     कविची समाजाप्रती असलेली अस्मिता, अस्मितेपोटी असलेली सामाजिक जाणीव, जाणिवेत असणारी संवेदनशीलता आणि त्याच संवेदनशीलतेतून निर्माण होणारी अस्वस्थता..ही कवीची अदृश्य वेदनाच आहे आणि ही वेदना कविला स्वस्थ बसू देत नाही. ती नोंदवायला भाग पाडते..मग ती कविता असो की, विचार. 
    साहित्याचे माध्यम कोणतेही असो, ग्रामीण असो, दलित असो, स्रीवादी असो, जनवादी असो, आदिवासी असो. सर्व स्तरावरून या शोषणाचा विरोध झाला पाहिजे; कारण एकाच समुहाचे शोषण होत नसून दलित, पीडित, वंचित, दुर्बल, कष्टकरी अशा अनेक घटकांची दिशाभूल करत शोषण केले जाते आणि ह्या सर्व घटकांचा शोषणकर्ता 'गनीम' मात्र एकच आहे. परंतु हा 'गनीम' सतर्क आणि संवेदनशील असणाऱ्या आंबेडकरवादी समुहावर प्रामुख्याने लक्ष ठेऊन असतो. या समुहाला जेव्हा ह्या गनीमाचा शोध लागत असतो तेव्हा त्या समुहाची दिशाभूल करण्याची रुपे बदलली जातात...अशी अपरुपे तो निर्माण करत असतो.
     अडीच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची मोडतोड करून आपली संस्कृती बहुजनांच्या माथी मारण्यात आली ती केवळ आंबेडकरवादी समुहालाच माहित आहे...म्हणून गनिमाचे लक्ष आंबेडकरी चळवळीकडे असते.
   बुद्धकालातील गणव्यवस्थेचे रुपांतर वर्णव्यवस्थेत करणारी व त्याचेच रुपांतर जातीप्रथेत करणारी व्यवस्थाच
शोषणाचा 'गनीम' ठरलेली आहे. ह्या धर्मवादी, कर्मकांडी, शोषणकर्त्या समुहासोबत चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर ह्या महामानवांनी जो विद्रोह केला होता, तो विद्रोह अजूनही करावा लागतो आहे. वास्तविक पहाता त्यांनी केलेला हा विद्रोह समता, बंधुता व मानवी हक्कांसाठीचा होता. तो मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठीचा होता, तो विद्रोह आजही आहे. मानवतावादासाठीचा हा विद्रोह  इतका टोकदार होऊनही इथली शोषणव्यवस्था आपली पकड सैल न होऊ देता वेगवेगळ्या मनसुब्यांद्वारे घट्ट टिकवून ठेवते.
           आजच्या पिढीचे अनेक कवी, लेखक, विचारवंत आपापल्या परिने मानवमुक्तीच्या विचारांचा प्रचार,प्रसार करत आहेत; मात्र विज्ञानयुगातही व्यवस्थेशी तडजोडीचे राजकारण करून परंपरांचा मूलतत्त्ववाद टिकवून ठेवण्यासाठी आमच्याच बांधवांकडून परिवर्तनावादाचा खून केला जातोय.! ही बाब आमच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याचवेळी आमच्या ओठांवर विद्रोहाच्या गाण्याऐवजी असतात..
"स्वातंत्र्याची गाणी
हम होंगे कामयाब,
किंवा 
क्रिकेटचे स्कोअर, 
किंवा
चित्रपट नट्यांचे गोडवे.
काळ्या चित्रफितीतून होतात रुपांतरीत... ढंगदार रंगसंगतीत नि
पठारापल्याडचे डोंगर झरे आटून
चालल्याचीही नसते खबर;
शहाणपणाची झूल पांघरून
दिसांधळ्यांच्या ते आडोसगावात."
विद्रोहाची माय रडते ढसाढसा नि
बाप जसाच्या तसा उभा..
डोळे पांघरून आकाश कवेत
घेण्यास सज्ज.
     या देशात लोकशाहीची घटनामूल्ये मुद्दामच न रुजू देण्यात व छळ करण्यात मूलगामी शोषण व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.. तो अगदी गावापासून ते राजधानीपर्यंत..
" हे माझ्या प्रिय गावा
तू तर सतत नाडतच नेलं
तोंड दाबून दिला बुक्यांचा मार
मनातही नाही जिंकायचं येऊ दिलं /७७

" हे माझ्या प्रिय गावा
तू माझ्या आया-बहिणींनांही
माणूस म्हणून कधी पाहिलेच नाही.
त्यांना म्हणाला..
आई-माई-बाई नावापुरता,
गायीला म्हणाला माय, पण..
यांच्या गळ्याचं दावं सोडलं नाही.

      " नाही रे" वर्गाला कमालीची वाईट वागणूक देण्याचे कारस्थान केले गेले.. आज त्याचे स्वरुप फक्त रुपांतरीत झाले आहे. वागणूक तीच आहे, विषमता तीच आहे. ती टिकवून ठेवणारे ठेकेदार आता अधिकच सतर्क राहून आपल्या कुटनीतीचा रंग बदलत असतात..."नाही रे" वर्गाचे बंड आणि बंडखोरीही अशीच उध्वस्त केली जाते.

"नाही रे' वर्गाची बंडखोरी मुद्देसूद भाषणांचे बॉम्बगोळे
सारं काही शांतपणे ऐकून
डूख धरून बसलेल्या जनावरासारखे
'आहे रे' वर्गाने एकदाच आक्रमण केले
मार्क्स, हेगेल, फुले, आंबेडकर, लाल, काळे, निळे निशान...
लोकशाही वगैरे
सारेच जमीनदोस्त झाले" 
 
कवी डॉ.उत्तम अंभोरे यांची कविता "नाही रे" वर्गाच्या बंडाचे मनसुबे कसे हाणून पाडले जातात ते विद्रोही बंडखोरांच्या लक्षात आणून देण्याचे काम ही कविता करते.. इतकेच नव्हे,तर ती आंबेडकरी अनुयायींच्या काही चुकांनाही उजागर करताना दिसते. 

"काल
आपल्या घरी
निळा सूर्य
उगवल्याच्या गाथा
ओठाओठांवर,
गाथांना
कथनाचं एक रूप
कथांच्या दंतकथाच
आपण करीत जातो
आपलीही करतो
तोंडपूजा
अन् जमल्यास
पुतळ्याच्या सावलीत
विसावून जातो."
      
कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी आंबेडकरी अनुयायींच्या बऱ्याच गोष्टी कळत नकळत लक्षात आणून दिलेल्या आहेत. कारण कवी स्वतः आंबेडकरवादी विचारधारेशी एकनिष्ठ आहेत.. नव्हे; तो 
त्यांचा सत्यशोधकी, प्रामाणिक व स्वाभिमानी पिंड आहे. म्हणून समाजास्मितेपोटी त्यांना ह्या कवितेतून जे काही सांगावयाचे आहे ते निर्भयपणे व अधिकारवाणीने नोंदवलेलं आहे.
     दलित ही संकल्पना समस्त वंचित, पीडित,दुर्बल घटकांसाठी व परंपरेने बहिष्कृत केलेल्या समुहासाठी आलेली आहे. त्यांच्या व्यथा वेदनांना उजागर करणारं साहित्य हे दलित या संकल्पनेभोवती फिरत असले तरी ते मानवीमूल्यांच्या हक्कासाठी लिहिलेलं   साहित्य होय. म्हणून दलित साहित्य या संकल्पनेकडे मानवतावादासाठीचा विचार मांडणारे साहित्य या अर्थाने पाहणेच योग्य होईल. आंबेडकरवादी साहित्य हे कुठल्याही एका समुहाची पाठराखण करत नाही, तर ते मानवमुक्तीच्या संवैधानिक मूल्यांचे हक्क सांगणारे साहित्य आहे..कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या पानापानांवर मानवीमूल्यांचा आणि मानवमुक्तीचा जाहीरनामाच लिहून ठेवलेला आहे. संविधानच इथल्या समग्र वंचित, पीडितांच्या, दुर्बलांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडू शकते.ती ताकद फक्त  डॉ.आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या संवैधानिक विचारात आहे म्हणूनच आंबेडकरवादी विचारधारा किंवा आंबेडकरवादी साहित्य हे मानवी हक्कासाठीचा अधिकार मागणारे साहित्य असते..म्हणून ते साहित्य मानवतावादीच साहित्य ठरते.
    डॉ.उत्तम अंभोरे यांची 'गनीम' मधील कविता पारंपारिक विषमतावादी मूल्यांना नाकारते म्हणूनच ती प्रस्थापितांच्या शोषणाच्या  पैलूंचा पर्दाफाश करते..अर्थात या कवितेला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समतावाद हवा आहे.. जो बुद्ध,कबीर,फुले,मार्क्स, आंबेडकर या महामानवांना अपेक्षित होता..शोषितांच्या शोषणाच्या व छळांच्या अनेक क्लृप्त्या ती ऐकून घेण्याचा व सांगण्याचा अट्टाहास बंद केला पाहिजे म्हणून कवी त्वेषाने म्हणतात,...

"नेहमी नेहमी
त्याच त्याच गोष्टी 
सांगण्याची नि ऐकण्याची
सवयच झालीये आपल्याला...
आता आपले कान कापले पाहिजेत नि
सांगणाराचे तोंड फोडले पाहिजे.

     डॉ.उत्तम अंभोरे यांच्या कवितेने मराठी कवितेचे वैचारिकविश्व  अधिकच व्यापक करून मराठी कवितेला नवा आयाम दिला आहे.
कारण डॉ.अंभोरे यांची कविता आक्रस्ताळेपणा करत नाही तर ती आता अनुभूतीच्या पातळीवर चिकित्सक आणि चिंतनशील होत  जाऊन ती आत्मशोध घेते. आत्मचिंतनातून आलेल्या या कवितेला वर्तमानातल्या भासमान जगाची ओळख झाल्यामुळे ती शोषणाच्या मूळगाभ्याचा शोध घेते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तात्विक विचारात सत्याचा शोध होता.सत्यासाठी लढण्याची धमक होती. बाबासाहेबांच्या विचारांचे सत्व आणि तत्व या कवितेने स्वीकारले आहे म्हणून ती इथल्या विषमतावादी मूल्यांना थेट नाकारते व भेदाधिष्ठित शोषणाचे षडयंत्र उजागर करत विकृत मनसुबे हाणून पाडण्याचे धाडस करते म्हणूनच दलित कवितेने, साहित्याने मराठी कवितेत,साहित्यात मोलाची भर घालून एक नवा आयाम, नवा प्रवाह दिल्यामुळे मराठी साहित्यविश्वाच्या समीक्षेला खरेतर हे आव्हानच ठरले आहे.
   डॉ.उत्तम अंभोरे यांच्या गनीम' या  संग्रहातील काही कविता सहज अर्थाला जन्म देणाऱ्या आहेत. कवितेतील उपमान आणि उपमेये ही उपहासगर्भ असले तरी ती  आशयछटांच्या कल्लोळात अडकत नाहीत किंवा दुर्बोध होतांना दिसत नाही. 'गनीम'मधील काव्यात येणाऱ्या 'प्रतिमा, प्रतिके वाचकांच्या चिंतनाची व्याप्ती वृद्धिंगत करणारी आहेत. मुक्तछंदात लिहिलेल्या दलितकाव्यात आपली स्वतंत्र धाटणीची सौंदर्यस्थळे आहेत; परंतु या धाटणीच्या सौंदर्यस्थळामागे कमालीची वेदना प्रश्नांकित झालेली दिसून येते...डॉ.उत्तम अंभोरे यांच्या कवितेने समाजातील गाफील समूहाला सावध करण्याचा वसा घेतला आहे. तिने विषम व्यवस्थेच्या कुठल्याही घटकावर बॉम्ब फेकण्यापेक्षा चिंतनाच्या मुळाशी जाऊन गनीमाची चिकित्सा केली आहे; म्हणून ती आपले वेगळेपण सिद्ध करते. ती कबीर, फुले,मार्क्स, बाबासाहेब यांच्या विचारांची वारसदार असून चिंतन आणि चिकित्सा हा तिचा स्थायीभाव आहे. विद्रोही कवी अर्जुन डांगळे यांच्या प्रस्तावनेने संग्रहाला उंची लाभली आहे. सौरव प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दर्जेदार संग्रहाचे सूचक,वेधक मुखपृष्ठ चित्रकार दासू भगत यांचे असून डॉ.उत्तम अंभोरे यांच्या चिंतनशील काव्याचा आकृतीबंध मराठी दलितकाव्यसृष्टीला नवा आयाम देणारा आहे.
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

गनीम - काव्यसंग्रह
कवी-  उत्तम अंभोरे
प्रकाशक - सौरव प्रकाशन,औरंगाबाद
स्वागतमूल्य - ₹ ३००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...