शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर - एक तत्वदर्शी ज्ञानवृक्ष




ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर - एक तत्त्वदर्शी ज्ञानवृक्ष

लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


   
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीतील अनेक संताचे कार्य बहुमोलाचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पर्यायाने देशाच्या जडणघडणीत मराठवाड्यातील संतांचा फार मोठा वाटा आहे. आपण म्हणाल, “महाराष्ट्राचे नाव पुढे करण्याऐवजी आपण मराठवाड्याचे नाव पुढे करीत आहात. होय, त्याचे कारणही तेवढेच गूढ आणि महत्त्वाचे आहे. गूढ असे की, आपला मराठवाडा हा पूर्वीचा महाराष्ट्र होता. त्याचे सप्रमाण पुरावे देता येतात. प्रा. प्रल्हाद लुलेकर व डॉ. सतीश बडवे संपादीत 'मराठवाड्यातील साहित्य या ग्रंथात प्रा.लुलेकर लिहितात, “अशोकाच्या आलेखात सर्वप्रथम देशनामे ( देशांची नावे ) आढळतात. प्राचीन साधनात प्रतिष्ठानचा (पैठण) उल्लेख महाराष्ट्राची राजधानी म्हणून करण्यात आला आहे. यावरूनच आजचा मराठवाडा हा मूळचा महाराष्ट्र होय !
   वारकरी संप्रदायाची पायाभरणी करणारे संत ज्ञानेश्वर हे पैठण तालुक्यातील आपेगावचे. संत एकनाथ हे पैठणचे. 'विवेकसिंधू'चे रचनाकार आद्यकवी मुकुंदराज हे अंबाजोगाईचे. महाकवी भास्कर भट्ट बोरीकर हे परभणी जिल्ह्यातील बोरीचे. आद्यकवयित्री महदंबा जालना जिल्ह्यातील रामसगावच्या. संत जनाबाई परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील होत्या. संत विठोबा खेचर औंढा नागनाथचे. संत दासगणू हे नांदेडचे. संत नामदेव हे परभणी जवळच्या नरसीचे. संत गोरोबा कुंभार हे उस्मानाबादचे. मराठवाड्यातील अशा अनेक संतांची नावे अभिमानाने सांगता येतील ज्यांची जन्मभूमी व कर्मभूमी ही मराठवाडाच आहे.
    अकराव्या शतकात कृष्ण रामदेवराय यादव काळात विधी, यज्ञ, पूजा, मंत्र-तंत्र, होम-हवन, जादूटोणा, या श्रद्धांनी उच्छाद मांडला होता.  मुले-मुली होण्याकरिता दगडाच्या देवांना नवस सायास करणे, अंगारे धुपारे, उतारे-पातारे अशा अनेक थोतांडाच्या गर्तेत बुडून समाज रसातळाला जात असताना या अराजकतेवर सामाजिक विकृतीवर, दगडाच्या देवावर, व्यंगावर, संतांनी अभंग, ओव्या, भारुडे लिहून तर काही संतांनी कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्या विरोधात लेखन करून सामाजिक संतुलन राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संत नामदेव महाराजांनी भारतभ्रमण करत भारतीय समाजव्यवस्थेतील सामान्य जनतेच्या मागासलेल्या मनाचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अधिकतर समाज दगडाचीच पुजा करतो आणि त्यालाच ईश्वर मानतो. म्हणून संत नामदेव महाराज लिहितात...

"नामदेव कहे | सुनो रे धगडा ||
 आत्म देव पुजौ |न पुजौ दगडा || किंवा 
" देव दाखविल ऐसा नाही गुरू ।
 जेथे जाय तेथे दगड शेंदरू ||

त्याकाळी संतांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी भक्ती संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची निर्मिती केली  आणि त्याद्वारे या त्या संप्रदायांनी सामाजिक विकृतीवर ओरखडे ओढून समाजप्रबोधन केले.
     आजही मराठवाड्यातील अनेक गावामध्ये खरे संत, खरे प्रबोधनकार आहेत. काही होऊन गेले आहेत. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातही असे अनेक संत होऊन गेले आहेत.. त्यात संत रामगिरी बाबा, संत दुनियादास महाराज, संत देविदास महाराज, संत बाबाराव महाराज किर्लेकर या संतांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशा विवेकवादी संतांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांची स्मृती जागविण्यासाठी त्यांच्या कारकिर्दीचा जागर व्हावा, अशाच एका तत्त्वचिंतक संताचा गौरवग्रंथ काढण्यासाठी काही मंडळींनी पुढाकार घेतला आहे त्या ग्रंथासाठी लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
      जालना जिल्ह्यातील, मंठा तालुक्यातील "किर्ला" या गावात एक संत होऊन गेले. ते म्हणजे गुरुवर्य ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर. ते वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक, वेदाभ्यासी, प्रबोधनकार, तत्वचिंतक, कीर्तनकार, प्रवचनकार होते. त्यांच्या विचार व कार्यावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.
    ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आपला शिष्यवर्ग तयार केला होता. या शिष्यवर्गाच्या माध्यमातून कीर्तन व प्रवचनांचे कार्यक्रम घडत होते. अनेक गावात संप्रदायाची प्रबोधनकारी चळवळ उभी केली होती. पारंपारिक भाकडकथांमधून अनुयायांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. अशा थोर विभुतीच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करतो. आमचे स्नेही श्री.भागवतराव काकडे सर हे महाराजांच्या विचार व कार्यावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करीत आहेत. कोणत्याही कार्यासाठी, कुणाला तरी पुढाकार घेण्याची गरज असते. त्याशिवाय ते कार्य पुढे जात नाही. या गौरवग्रंथाच्या निमित्ताने महाराजांच्या सानिध्यात अनेक अनुयायी घडले. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा सुंदर योग आहे. ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांच्या सानिध्यातून त्यांच्या तात्त्विक चिंतनातील बारकावे मला अनुभवता आले. त्यांच्या प्रवचनातून मिळालेली तत्त्वचिंतनाची शिदोरी माझ्या आकलनक्षमतेतून प्रस्तुत लेखनप्रपंचाद्वारे मांडत आहे.
      ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांचा मला सन २००४ पासून सहवास लाभला आहे. मंठा येथील एम.एस.ई.बी.च्या प्रांगणात आयोजित केलेल्या प्रवचनातून त्यांचे विचार ऐकण्याचा योग मला आला होता. त्या प्रवचनातून त्यांच्या विचारांची तात्त्विक बैठक मला अनुभवता आली.
      साधारणपणे नेहमीच महाराजांचा पोशाख पांढरी शुभ्र टोपी, पांढरा खमीस, पांढरे धोतर. भाळावर गंध, गळ्यात ठोकर मण्यांची तुळसीमाळ, अत्यंत साधी राहणी हे त्यांचे व्यक्तिविशेष. मात्र त्यांचा अध्यात्माचा अभ्यास गाढा होता. मंठ्यातील कार्यक्रमात श्री.घोरबांड साहेब, श्री. संपत अण्णा गोरे, श्री.विवेक सोनटक्के यांच्या मैत्रीमुळे मी प्रवचनाचा लाभार्थी झालो. तसेच महाराजांच्या अनेक कार्यक्रमाला मी उपस्थित असायचो. या प्रवचनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजांवर प्रेम करणारी अनेक शिष्य मंडळी जोडली गेली होती. त्या मित्रमंडळींनी महाराजांना माझी, प्रा. प्रदीप देशमुख आणि कवी विवेक सोनटक्के आम्हां तिघांची साहित्यिक म्हणून ओळख करून दिली होती. त्यानंतर आम्ही महाराजांच्या विचारांचे भोक्ते झालो. का झालो? कारण वारकरी संप्रदायात काही प्रमाणात आंधळी भक्ती असते. ती विचारधारा महाराजांच्या प्रवचनात दिसून आली नाही. तर 'डोळस श्रद्धा' हा त्यांच्या प्रवचनाचा मूलभूत गाभा होता.
     द्वैत आणि अद्वैत विचारांवरही ते बराच वेळ बोलून अद्वैताच्या बाजूने रसिक श्रोत्यांची संमती घेत असायचे. अद्वैत म्हणजे एकेश्वरवाद. देव ही कल्पना समजून उमजून स्वीकारण्याची असते. ती सहज स्वीकारण्याची नसते. याविषयी महाराज अनेक उदाहरणे देत असायचे. यावरून महाराज एकेश्वरवादी होते असे ठामपणे सांगता येते.
      महाराजांची एक चांगली शैली होती. ते बऱ्याच गोष्टींचा श्रोत्यांकडून खुलासा करवून घेत असायचे. या अनुषंगाने अधूनमधून विनोद करून श्रोत्यांना खूप हसवायचे. महाराजांचा प्रामाणिक हेतू हा की, अनुयायी कर्मकांडाच्या बाहेर पडले पाहिजेत. म्हणून महाराजांनी कीर्तनापेक्षाही जास्त प्रवचनाला (पाठाला) महत्त्व दिले होते. कारण कीर्तनातून असे चिंतनशील विषय मांडणे अवघड असतात म्हणून त्यांच्यामध्ये प्रवचनातूनच खरोखर परिवर्तन होऊ शकते. भक्तांना किंवा रसिकांना अशाच प्रवचनाच्या माध्यमातून विचार देता येतात.
       प्रवचनातूनच मोक्ष-मोक्ष म्हणत भरकटलेल्या वृत्तीला नेमका विचार देता येतो. असे महाराजांनी एके दिवशी मंठा येथील बसस्टॉपवर झालेल्या भेटीत एका तासाच्या चर्चेतून सांगितले होते.
    आमचे मित्र विवेक सोनटक्के यांनी मला सांगितले की, महाराज 'ओशों'च्या विचारांचे अभ्यासक आहेत. म्हणून मी एके दिवशी महाराजांना प्रश्न विचारला. " महाराज मी 'ओशो' ची तर काही तरुण सागर महाराजांची पुस्तके वाचतो. ओशोबद्दल तुमचे मत काय आहे?” महाराज म्हणाले, “मला जरी ओशोचे विचार आवडत असले किंवा तात्त्विक वाटत असले तरी आपल्या प्रवचनाला येणारे सर्वच लोक सुशिक्षित नाहीत. कुणी शेतकरी, कुणी व्यापारी, शिक्षक, कामगार किंवा मजूर आणि बऱ्याच प्रमाणात अशिक्षित आहेत. वेगवेगळ्या वयोगटाचे लोक आहेत. म्हणून 'ओशोंचा विचार हा खूप खोलाचा आहे. त्यामुळे तो सगळ्यांनाच समजेल असे नाही.
      महाराज पुढे बोलू लागले. मी कीर्तनकार व प्रवचनकार आहे. कीर्तनापेक्षा प्रवचनातून चिंतनशील विचार समजतात. त्यातून एक चिकित्सा करणारा वर्ग तयार होतो. प्रबोधनही होते आणि आपल्यालाही आनंद मिळतो. मंठा शहरात भागवत गीतेतल्या बाराव्या अध्यायातील भक्तियोगावर प्रवचन चालू होते. आणि महाराजांनी भक्तीविषयावर बोलताना सहज सांगितले की, अनेक लोक भक्तीत अडकून पडतात. त्या लोकांना अशा विधा (वैधी) भक्तीतून बाहेर काढायचे आहे. मला विधा भक्ती म्हणजे काय समजले नाही. मी त्यांना प्रश्न विचारला महाराज विधा भक्ती म्हणजे काय ? महाराजांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले. 'भक्तीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सुरुवातीला दोन प्रकार सांगतो. एक विधा भक्ती (वैधी) आणि दुसरी 'रागानुगा' भक्ती,' पुढे महाराज म्हणाले, 'विधा भक्ती म्हणजे विधा, कर्मकांड करत केलेली भक्ती म्हणजे 'विधा भक्ती होय आणि रागानुगा 'भक्ती' म्हणजे कर्मकांड न करता भगवंताविषयी दाखवलेलं सरळ सरळ प्रेम म्हणजेच रागानुगा भक्ती होय.' महाराजांचा हा भक्तीचा प्रकार सांगण्यामागे चांगला हेतू होता. कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठीच प्रवचनाची गरज आहे. असा खुलासाच त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या विवेचनातून व्यक्त झाला होता.
       ह.भ.प. बाबाराव महाराजांची भूमिकाच मुळात कर्मकांडी लोकांना आंधळ्या भक्तीतून बाहेर काढण्याची होती. कारण संपूर्ण समाज कर्मकांडाच्या आहारी गेलेला आहे आणि अशा अंधभक्तांना वाटते की, पापमुक्त होण्यासाठी किंवा सुखी होण्यासाठी विधी, कर्मकांड केल्याशिवाय आपणास सुख मिळणार नाही किंवा आपण पापमुक्त होऊ शकणार नाही. या भ्रमात माणूस अंधभक्त होत गेलेला आहे. या अंधभक्तीत गुरफटलेला समाज जगाच्या विचारवादी प्रवाहाबरोबर राहण्याऐवजी तो मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला जाईल. यासाठी त्याने अशा अंधभक्तीत अडकून पडू नये. यासाठीच अशा प्रवचनातून समाजाला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. असा त्यांच्या प्रवचनाचा गाभा आणि हेतू होता.
    महाराज कर्मकांड, सोंगढोंग या विकृतीवर आपल्या सात्त्विक आणि विनोदी भाषेतून आसुड ओढत असायचे. महाराजांच्या प्रवचनात काही जाणकार होते. काही देव-देव करणारे होते. तर काही भजन पाठ करून म्हणणारे होते. त्यावेळी महाराज सोंग - ढोंगावरही बोलायचे. आणि पुन्हा मूळ मुद्यावर यायचे, कारण त्यांना वाटायचे की, ज्यांच्यासाठी आपण प्रवचन करतो आहोत. तो श्रोतावर्ग, अनुयायी वर्गच दुखावला जाऊन आपल्या प्रवचनातून व आपल्यापासून दूर जाऊ नये, त्यांची आणि आपली ताटातूट होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत होते.
     ह.भ.प. बाबाराव महाराज गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथासह अनेक ग्रंथांचे पारायण करायचे. वारकरी संप्रदाय, भक्ती सांप्रदाय या अनुषंगाने येणाऱ्या सर्व आध्यात्मिक शास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. भगवद्गीतेतील १. अमूर्त विशारदयोग, २. सांख्ययोग, ३. कर्मयोग, ४. ज्ञानकर्म संन्यास योग, ५. कर्मसंन्यासयोग, ६. ध्यानयोग, ७. ज्ञानविज्ञान योग, ८. अक्षरब्रह्म योग, ९. रामविद्यायोग, १०. विभूती योग, ११. विश्वरूपदर्शन योग, १२. भक्तियोग, १३. क्षेत्रक्षेत्रज्ञ योग, १४. गुणप्रथयोग, १५. पुरुषोत्तम योग, १६. देवातूर योग, १७. श्रद्धाप्रय योग, १८. मोक्ष संन्यास योग अशा अठरा अध्यायावर महाराजांचे प्रवचन होत असायचे; परंतु मला ज्ञानेश्वरातील 'पसायदान' पाठाला आवर्जून उपस्थित राहता आले. त्यावेळी मला महाराजांच्या ज्ञानाची व्याप्ती कळाली होती. महाराजांची प्रवचन करण्याची शैली अतिशय परिणामकारक होती. अगदी मनाला रुजणारी आणि अंतर्मनाला भावणारी होती. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, अनेक जाणकार व अभ्यासू श्रोते महाराजांच्या सहवासात घडले. महाराजांच्या अगाध ज्ञानाची अनेकांना प्रचिती आली. महाराजांच्या जवळ असलेली ज्ञानाची शिदोरी काहींना घेता आली. तर काही शिष्यांना ती घेता आली नाही. महाराज हे एक ज्ञानयोगी होते. महाराजांच्या चिंतनाची खोली आणि तात्त्विक अभ्यासाची बैठक माझ्या बुद्धीला पटली होती. म्हणून महाराजांच्या काही दिवसांच्या सानिध्यात 'मोक्ष' म्हणजे काय ? सूक्ष्म देह आणि स्थूल देह म्हणजे काय ? व काही आध्यात्मिक बाबतीतल्या जाणिवांचे आकलन झाले. ते केवळ महाराजांच्या सांनिध्यानेच, हे मान्यच करावे लागेल..! महाराजांच्या प्रवचनातून व काही प्रत्यक्ष भेटीतून तात्त्विक गोष्टींचा मला झालेला उलगडा हा आयुष्यभर आठवणीत राहण्याजोगा आहे.
      महाराजांनी स्वतःच्या चिंतनातून मला 'मोक्षाचा सहज अर्थ सांगितला आणि कोणकोणत्या मोहाचा क्षय झाला पाहिजे, तर षड्विकारांच्या मोहाचा नाश झाला पाहिजे. याविषयी आमची भरपूर चर्चा झाली. षड्विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे टाळायला पाहिजे. या विकारांच्या अतिमोहातून मुक्त व्हायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीची व ऱ्हासाची प्रक्रिया समजून घेणे हाच मोक्ष आहे. मात्र बरीच शिष्य मंडळी, भक्त मंडळी काही वारकरी संप्रदायाची मंडळी आयुष्यभर 'मोक्ष' मिळावा म्हणून, जप, तप, साधना करत असतात. आयुष्यभर 'मोक्षाचा' अर्थ न समजलेली मंडळी, भोंदू साधूंच्या पायावर लोटांगण घालताना दिसतात. 'साधूंचे पाय चेपताना दिसतात. गंध, टिळा, माळा, जटा, भगवी वस्त्रे घालून समाजात अवडंबर दाखवतांना दिसतात अशा लोकांना मोक्षाची व्याख्याच कळालेली नसते. म्हणून ते खोट्या अविर्भावात वावरत असतात.
    महाराजांच्या सानिध्यात जीवनाकडे सकारात्मक बघण्याची दिव्यदृष्टी मिळाली. स्थूलदृष्टीत जी उतावीळ भूमिका असते ती सूक्ष्म दृष्टीत नसते. कारण सूक्ष्मदृष्टीत चिंतनशीलता असते. ती चिंतनवृत्ती असते, जे समोर दिसते त्याच्या पलिकडे बघण्याची क्षमता निर्माण होणे, विचार करण्याचे बौद्धिक ज्ञान प्राप्त होणे. मूलभूत अशा स्थूल अर्थाला जखडून न राहता मनन, चिंतनातून,अभ्यासातून सूक्ष्मदृष्टी प्राप्त होऊ शकते. हा विचार महाराजांच्या सहवासात मला मिळाला. बरेच महाराज मंडळी देवाचे निर्गुण निराकार स्वरूप सांगतात. सगुणभक्ती, निर्गुणभक्ती सांगतात; परंतु बाबाराव महाराज किर्लेकर यांनी आम्हाला द्वैत आणि अद्वैताचा विचार सांगितला. म्हणून आम्हाला परमेश्वर किंवा ईश्वर ही संकल्पना कळाली. ईश्वर ही केवळ मानण्याची बाब नाही. तर ती जाणून घेण्याची गोष्ट आहे. महाराजांच्या वाणीतून, अभ्यासातून भगवद्गितेतील भक्तियोग आणि ज्ञानेश्वरीतील पसायदान या दोन ग्रंथातील कठीण विषयाचे काही अंशी आकलन झाले. महाराजांकडे अगाध ज्ञान होते. 'जे जे आपणांसी ठावे ते ते इतरां शिकवावे' या उक्तीप्रमाणे ते त्यांच्याजवळची शिदोरी कीर्तनाच्या माध्यमातून अनुयायांना वाटत गेले.
     मला मंठा येथील एम.एस.ई.बी. मंदिरात तसेच गुरुकृपा मंगल कार्यालयात त्यांच्या प्रवचनाला हजर राहता आले. महाराजांच्या प्रवचन श्रवणातून जीवनविषयक आणि शास्त्रविषयक काही संकल्पना स्पष्ट समजल्या होत्या.
   ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर यांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून सामाजिक स्तरावर असलेले पराकोटीचे अज्ञान दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अनेक भक्तांना अज्ञानातून, कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठीच महाराज कीर्तन व प्रवचन करीत राहिले. त्यांनी वारकरी सांप्रदायाची चळवळ उभी केली. महाराष्ट्रात अनेक संतांनी केलेली भक्तीची चळवळ ही केवळ भक्तीची चळवळ नव्हती. तर ती मुक्तीची चळवळ होती. कर्मकांडातून सामान्य माणूस, अज्ञानी माणूस मुक्त व्हावा. हा या भक्ती चळवळीचा खरा उद्देश होता. बराचसा अज्ञानी वर्ग अंधश्रद्धेतच आणि भक्तीतच अडकून पडला असल्याने तो बाहेर काढणे महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा जो खरा उद्देश होता. ती संताची खरी चळवळ होती.
    ती फक्त अज्ञानी समाजाला कर्मकांडातून आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठीच होती. महाराजांचे कार्य सुद्धा अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्य होते. त्यांच्या प्रबोधनपर कार्याचा गौरव व्हावा. त्यांनी मराठवाड्याच्या प्रवित्र भूमीत जे अनमोल कार्य केले आहे. त्या मौलिक योगदानाचे यथोचित कौतुक व्हावे. त्यांच्या अद्वितीय प्रबोधनपर कार्याची दखल घेतली जावी. त्यांच्या निस्वार्थी कार्यातून नवोदित प्रबोधनकारांनी प्रेरणा घ्यावी. महाराजांचे विचार व कार्य पुढे निरंतर सुरू रहावे हाच एक निर्मळ हेतू या गौरवग्रंथाच्या निर्मितीमागे आहे, असे मला वाटते.
     ह.भ.प. बाबाराव महाराज किर्लेकर हे खरे ज्ञानयोगी, मोक्षयोगी होते. 'एक तत्त्वदर्शी ज्ञानवृक्षच' होते. याचा प्रत्यय मला आणि अनेक शिष्यांना आलेला आहे. महाराजांच्या प्रगल्भ विचारांची व प्रबोधनकार्याची अनेकानेक शिष्योत्तमांनी वीणा हाती घ्यावी, हीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल..!

✍️९८९०८२७४१४

डॉ.धोंडोपंत मानवतकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...