गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

आमदार बच्चूभाऊ कडू

आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची भूमिका रास्त.....आणि पवित्रा सकारात्मक. 

प्रासंगिक - डॉ.धोंडोपंत मानवतकर



























          आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व त्यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काल क्रिकेटपट्टू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. ते आंदोलन सचिन तेंडुलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीच्या विरोधात होते. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता. त्यांचे म्हणणे रास्त होते. आणि त्यांची मागणीही रास्त होती. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानणाऱ्यांची संख्या अगणित आहे. म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करणे गैर नाही. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमधील योगदान पाहून त्यांना भारताने 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानच केलेला आहे. भारतरत्न ह्या सर्वोच्च सन्मानाचे मानकरी अत्यंत बोटावर मोजण्याइतके आहेत. देशासाठी ज्यांनी फार मोठा त्याग केला आहे, फार मोठी कुर्बानी दिलेली आहे अशांना भारत सरकार 'भारतरत्न' हा पुरस्कार देते. 'भारतरत्न' हा भारत देशाची इभ्रत मोठी करणारा पुरस्कार आहे, तो पुरस्कार भारत सरकारने शहीद भगतसिंग यांना, महात्मा फुले यांना, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना दिलेला नाही; परंतु तो सचिन तेंडुलकर यांना दिलेला आहे, असे आ.बच्चूभाऊ कडू यांचे म्हणणे आहे.म्हणून  भारतरत्न दिलेल्या सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या, जुगाराच्या जाहिराती करू नये. तो भारतरत्न पुरस्काराचा अपमान आहे, नाहीतर 'भारतरत्न' हा पुरस्कार परत करावा व खुशाल जाहिराती कराव्यात. तुम्हाला भारतरत्न पुरस्कार असल्यामुळे तुम्हाला अशा ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणे शोभणारे नाही. हा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता.आ. बच्चूभाऊंचा हा विचार अतिसामान्य माणसालाही पटणारा आहे. भारतरत्न हे जर पैशासाठीच जाहिराती करत असतील तर येत्या गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी गणपतीजवळ दहा दिवस एक दानपेटी ठेवून तो सर्व निधी सचिन तेंडुलकर यांना देऊ. हा विचार खोचक नसून किंवा विरोधासाठी विरोध नसून समजावणीच्या सुरातला आहे. 
           अगोदरच अनेक कुटुंब या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीमुळे उध्वस्त होत असल्याचे दिसत असताना तरुण पिढीला चांगले विचार देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जेणेकरून 'भारतरत्न' समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून   समाजातील तरुणांना चांगला आदर्श मिळावा, चांगली प्रेरणा मिळावी. भारतरत्न मिळालेला व्यक्ती तरुणपिढ्यांचा आयकॉन ठरावा. आयडॉल ठरावा. क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या जुगाराच्या जाहिराती करून तरुणांची आपल्या कर्तृत्वाबद्दल असलेली अस्मिता गमावू नये. अत्यंत सरळ ,साधा, खरा विचार  आ.बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा होता. 
         आमदार बच्चूभाऊ कडू हे नेहमी विकृतीवर बोट ठेवत आले आहेत. त्यांची आंदोलने तरुणांचा आणि शेतकरी वर्गाचा कैवार घेणारी असतात. मात्र अनेक पुढारी हे तरुण पिढीचा वापर केवळ मागे मागे फिरण्यासाठी करतात म्हणून आजचा बहुसंख्य तरुण बेरोजगारी व महागाईच्या विळख्यात सापडलेला आहे. शेतकरी वर्ग कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडलेला आहे.
        एकीकडे भारतात कोट्यावधी तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. कमालीच्या महागाईने गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस त्रस्त आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाने गरीबांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजवले आहेत. तरुणांना चांगले शिक्षण घेण्यासाठी तारुण्य गमवावे लागत आहे. उपवर झालेली मुले, मुली कुटुंबाला आपला हातभार लागावा यासाठी नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. देशातल्या तरुणाईपुढे जगण्याचे प्रश्न आहेत. नोकरीच्या, रोजगाराच्या संधी मिळून आयुष्यात स्थैर्य कसे लाभेल यासाठी तरुणवर्ग चिंतातूर आहे.
           आजच्या तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारकडे कोणतेच ठोस कार्यक्रम नाहीत. नोकरीच्या परिक्षेच्या अर्जासाठी कोटी रुपये उकळले जातात आणि ऐनवेळी सांगितले जाते की, परीक्षा रद्द झाल्या. म्हणजे भारत सरकार तरुणवर्गाचे अशाप्रकारे शोषण करत आहे. एकतर डोक्याचा भुगा होईस्तोवर अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी करायची आणि ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्या म्हणून ऐकून घ्यावयाचे. अशा सगळ्या बाजुंनी होणारे शोषण आणि त्या शोषणाचे परिणाम भोगणारे तरुण जीवन संपविण्याचा विचार करणार नाहीत तर काय करतील ?
      कोट्यावधींची संपती असणाऱ्या एखाद्या पुढाऱ्यांने किंवा कोट्याधीश कलावंतांने, किवा एखाद्या उद्योगपतीने किंवा एखाद्या कोट्याधीश क्रिकेट पट्टूने तरुणवर्गासाठी आपल्या मिळकतीतला दहा पाच टक्के हिस्सा तरुणांच्या शिक्षणावर खर्च केला का ? दहा-पाच तरुण दत्तक घेतलेले आहेत का? उलट या तरुणांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत. तरुणांची मने भरकटवली जात आहेत. त्यांना संभ्रमात टाकण्यात येत आहे. त्यांना ऑनलाईन जंगली रम्मी सारख्या आभासी खेळाला बळी पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे समोर केले जातात. 
       जपान, चीन,अमेरिका, कॅनडाचा तरूण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. मोठमोठ्या हुद्यावर जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. मात्र आमच्या भारतातल्या तरुणांना कावडयात्रा, पायीदिंडी काढण्यासाठी पुढारी लोकांकडून पैसा पुरवला जातो. त्यांना शिक्षणापासून, परिवर्तनीय विचारापासून दूर भरकटवले जाते, त्यांच्या डोक्यात धर्मद्वेषाचे, जातीयद्वेषाचे विचार पेरण्याचे काम केले जाते. तरुणांची मने भरकटवण्यामागे सत्ताधारी लोकांचा स्वार्थी विचार असतो.
         अलिकडे अनेक अभिनेते भंकस जाहिराती करत आहेत. त्या जाहिरातीतले ते स्वतः काहीच वापरत नाहीत; मात्र आडमाप पैसा घेऊन जाहिराती करतात. ते स्वतः कोकाकोला, थम्सअप, स्प्राईट सारखे भंगार थंडपेय पीत असतील का ? अजिबात नाही, कारण त्यांना सौंदर्य जपावे लागते आणि सौंदर्य जपण्यासाठी आहारावर खूपच नियंत्रण ठेवावे लागते. मग अभिनेता, अभिनेत्री यांनी स्वतःला जपावे. आणि इतरांनी कसल्याही वस्तु पदार्थ, थंडपेय खरेदी करून आपले आरोग्य बिघडवावे का ? दुसऱ्याबद्दल चांगला विचार या नावलौकिक मिळवलेल्या लोकांच्या मनात येवू नये का ?  एवढा सदसद्विवेकीविचार या जाहिराती करणाऱ्या लोकांच्या डोक्यात यावा. भरकटलेल्या तरुणांनी आभासी जगातील कोणत्याही भूलव्या प्रकाराला बळी पडू नये व  सर्वोच्च न्यायालयानेही अशा भूलव्या जाहिरातींवर, आभासी ऑनलाईन जंगली रमी सारख्या जाहिरातीवर निर्बंध लावावेत. जेणेकरून या देशातल्या तरुणपिढ्यांची फसवणूक होणार नाही; आजचा तरुण हा उद्याच्या विज्ञानवादी, प्रगतीशील मजबूत भारताचा सक्षम नागरिक असावा म्हणून तरुणवर्गाच्या भविष्याचा विचार हाच प्रगतशील राष्ट्राचा विचार असेल !
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...