शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

उजेडाला पंख फुटले - प्रस्तावना - डॉ.धोंडोपंत मानवतकर

जीवनवादाच्या आणि कलावादाच्या आत्मद्वंद्वातील 
नीतितत्वांची मूल्यधर्मी काव्यसंहिता -
उजेडाला पंख फुटले


प्रस्तावना | डॉ.धोंडोपंत मानवतकर

           कविच्या काव्यनिर्मितीमागे एक निश्चित स्वरूपाचे प्रयोजन असते. अनेकदा कवीची अस्वस्थताच काव्यनिर्मितीची प्रेरणास्रोत बनते. खरेतर समाजवास्तवाच्या अंतरंगाचा शोध घेऊन भाव-अभावाचे दर्शन घडविणे हेच कविच्या कवितेचे प्रयोजन असावे... थोडक्यात सांगावयाचेच झाल्यास प्रसिद्ध आंग्लकवी मॅथ्यू अर्नोल्डच्या मते, तसेच  लेखक,चित्रकार डी.एच.लॉरेन्सच्या मते, आणि  ब्रिटीश कवी,लेखक लिओ टॉलस्टॉयच्या मते literature is the criticism of life साहित्य किंवा काव्य हे मानवी जीवनाची चिकित्सा करत असते म्हणजे ते मानवी जीवनावर भाष्य करत असते म्हणून एकूण साहित्याचे प्रयोजनच मानवी जीवनावर भाष्य करणे हे असावे. 
            संतांची कविता सुद्धा जीवनावर भाष्य करणारी होती. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
 "जो जे वांच्छिल। तो ते लाहो । प्राणिजात ॥" हे भगवंता ज्यांना जे हवं आहे त्यांना ते  मिळो.. या प्रार्थनेतून संत ज्ञानेश्वर सगळ्या प्राणीमात्राच्या सुखासाठी आर्जव करतात ते म्हणतात, "विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले" या वाक्याचा भावार्थ असा की, विश्वातील सर्वांचे दुःख, कळवळा आणि जिव्हाळा माझ्या हृदयात जाणवू लागला आहे आणि त्यामुळे त्यांचं दुःख दूर करण्याची तळमळ माझ्यात निर्माण झाली आहे.
          संतांची कविता प्रबोधनाचे काम करणारी होती, संतांची विभूती जगाच्या कल्याणा.. जगाच्या कल्याणाचा विचार करणे हेच संतांच्या कार्याचे ध्येय होते.  दुःख दैन्य, दारिद्रय, गरिबी, भेदाभेद, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत यांच्यामधील दरी दूर व्हावी हाच संतावळीच्या कार्याचा मुख्य उद्देश होता.
       संत तुकाराम महाराजांचे समग्र काव्य हे तत्कालीन धर्म आणि समाज व्यस्थेवरील भाष्य होते. मर्ढेकरांचे काव्य देखील तत्कालीन यंत्रयुगावरील भाष्य होते.  केशवसुतांना सुद्धा आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले गेले आहे. कवी कुसुमाग्रज प्र.के.अत्रे (केशवकुमार), वि.स.खांडेकर आणि पु.ल.देशपांडे.यांचे गद्य व पद्यवाङ्मय मानवी जीवनाविषयी भाष्य करणारे आहे. 
           मराठीमध्ये दलित साहित्याचा प्रवाहच उपेक्षितांच्या जीवनाविषयी भाष्य करण्यासाठी झालेला आहे. त्यातही  काव्य आणि आत्मकथने हा साहित्य प्रकार इ.स.१९६० नंतर मराठीत विशेष लोकप्रिय झाला. या दलित साहित्य प्रवाहाने मराठी साहित्याला समृद्ध केले. कवितेत नामदेव ढसाळ,अण्णाभाऊ साठे, दया पवार, राजा ढाले, वामन निंबाळकर अशा अनेक दलित कविंनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेला धारेवर धरले होते. दलित आत्मकथने ही तत्कालीन बहिष्कृत मानवी समुहाच्या खडतर जीवनाविषयी भाष्य करणारीच आहेत.
           निरक्षर असणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा आपल्या कवितेतून मानवी जीवनाचे तत्वज्ञान सहज मांडले आहे, कवी विंदा करंदीकर, कवी वसंत बापट, कवी . मंगेश पाडगावकर यांनी मानवी जीवनावर प्रेम करणारी ऊर्जादायी कविता लिहिली. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे म्हणणारे मंगेश पाडगावकर, जगण्यासाठीची ऊर्जा देतात. जगण्याचं बळ देतात. कवी माधव ज्युलियन आईला  प्रेमाचा सागर म्हणतात. अनेक कविंनी आपल्या कवितेतून निसर्गाची, निसर्गातील वृक्षवेलींची, पाना-फुलांची, पशू-पक्ष्यांची दानत नोंदवली आहे. काहीं कविंनी मानवी विकृतीला चव्हाट्यावर आणले आहे, तर काही कविंनी आपल्या साहित्यकृतीद्वारे मानवी गुणांचे, सद्गुणांचे वर्णन केलेले आढळते. काही कविंनी प्रेमाची, प्रेमातल्या विरहाची, विरहातल्या दु:खाची कविता लिहिली. काही कविंनी इथल्या समाज व्यवस्थेवर भाष्य केले आहे. काहींनी राज्यकर्त्या जमातीच्या भ्रष्टतेवर भाष्य केले आहे.
        काहींनी विद्रोही रुपाने भाष्य केले आहे, तर काहींच्या अभिव्यक्तीत संयत विद्रोह आहे. काहीं कविंनी इथल्या समाजव्यवस्थेला अनेक प्रश्न विचारले आहेत. साहित्यविश्वाने ज्या कविला दुर्बोध ठरवले त्या ग्रेसांनी सुद्धा अनेक प्रश्न केले आहेत. ते आपल्या आईला म्हणतात,'भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते.' म्हणजे .. या माणसांच्या जगातही मला माणसाची भीती वाटते आहे. अशी इथल्या मानवी संस्कृतीची ग्रेस ओळख करून देतात. कवी ग्रेसांच्या कवितेची भाषा दुर्बोध नाही तर ती समजण्यास कसोटी लागते, म्हणून ती समजण्याइतकी सराईत . सोनाराची भूमिका हवी असते, कवी ग्रेसचा प्रश्न स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारा विषयीचा आहे. महाभारतातील कथेत द्रोपदी नावाच्या जिंकून आणलेल्या एखाद्याच्या लेकीला, एका निष्पाप स्त्रीला पाच भावांचा संसार का करावा लागतो ? इथली व्यवस्था किती विकृत आहे, स्वतःच्या पोटच्या गोळ्याला सुद्धा लेक म्हणायची सोय नाही, तिच्यासाठी येणारा हुंदका दाबून ठेवायचा, भिक्षा म्हणून आणलेल्या एकाच स्त्रीला पाच लोकांनी भोगायचे हा कुठला न्याय आहे? ही कोणती नीती आहे ?
असा प्रश्न कवी ग्रेस आपल्या कवितेत करतात...ते लिहितात,
         मोडीत लेक मोडावी, तोडावे गहिवर सगळे
         पुरुषाची एकट भिक्षा, का वाटुनि खाती सगळे ? 
पौराणिक कथा वाङ्मयातही कमालीची विषमता आढळून येते. त्यावर अनेक साहित्यिकांनी भाष्य केलेले आहे.
             कवी अशोक पाठक यांची कविताही अनेक विषयावर भाष्य करणारी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे मानवी जीवनातील वास्तवावर भाष्य करणे हेच काव्याचे प्रयोजन असावे. यामध्ये साहित्याचा प्रकार किंवा कवितेची शैली मात्र भिन्न असू शकते, जसे कविता, कथा, कादंबरी, लघुकथा, अभंग, अंगाईगीत, भक्तिगीत, आर्या, ओवी, गज़ल चारोळी, नाटक, खंडकाव्ये, महाकाव्ये, प्रहसन, असे वेगवेगळे साहित्यप्रकार आहेत हे सगळे साहित्यप्रकार मानवी जीवनातील निर्माण होणारे प्रश्न मांडण्याचे वेगवेगळी माध्यमे आहेत. हे प्रश्न मानवी समुहात प्रत्येक ठिकाणी आहेत..त्या प्रश्नाविषयी तळमळ हवी असते आणि 'आपण समाजाचे देणे लागतो ह्या भावनेसह कवीमध्ये दया व कारुण्यभाव असावा लागतो तेव्हाच त्याच्या लेखनीतून उतरणारे काव्य हे समाजमनाचा ठाव घेत असते.
         साहित्यकृती हा लेखकाच्या, कविच्या आत्मशोधाचा एक भाग असतो, तो एक मार्ग असतो. याच शोधातून त्याला अनुभवसमृद्धी प्राप्त होत असते. त्याच्या अनुभवाचे हे रूप म्हणजे लेखकाला गवसलेल्या अनुभव-बीजाचा विस्तार होय.
लेखकाने त्या बीजानुभवाशी प्रामाणिक राहून त्याचा विस्तार आणि आविष्कार करणे हे सुद्धा लेखनाचे एक प्रयोजन मानले गेले आहे. यालाच मर्ढेकरांनी वाङमयीन आत्मनिष्ठा म्हटले आहे. तर भालचंद्र नेमाडे याला लेखकाची नैतिकता मानतात.
            कवी अशोक पाठक हे माझे जीवलग मित्र असल्यामुळे मी त्यांच्या काव्यचिंतनाच्या कक्षा जाणतो. त्यांच्या काव्य लेखनाची शैली स्वतंत्र आहे. ती वरवर सहज वाटत असली तर गुढात्म आहे. जीवनवादाच्या आणि कलावादाच्या आत्मद्वंद्वात त्यांची काव्यसंहिता जन्म घेते. त्या संहितेला नीतितत्वांचे मूल्यधर्मी अधिष्ठान आहे.
          कवी अशोक पाठक यांचा "उजेडाला पंख फुटले" हा पाचवा कवितासंग्रह आपल्या हाती आहे. या संग्रहाचं शीर्षक "उजेडाला पंख फुटले" असं आहे. हा उजेड म्हणजे कवीची प्रतिभा आणि प्रतिभेलाही पंख फुटणे म्हणजे कविला मिळालेली अधिकची दिव्यदृष्टी होय.  कवीकडे प्रतिभा असते म्हणजे दिव्यदृष्टी असतेच. म्हणूनच म्हणतात,"जेथे न जाय रवी तेथे जाय कवी" जिथे सूर्याची किरणे पोहचत नाहीत अशा ठिकाणी कवीची दृष्टी पोहचते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास कवीचे निरिक्षण अतिसूक्ष्म असते, मन कमालीचे संवेदनशील असते आणि कविचा दृष्टिकोनही अत्यंत व्यापक असतो म्हणून कवीच्या चिंतनगर्भात नेहमी नवसृजनता जन्म घेत असते.
            कवी अशोक पाठक यांचे या अगोदर चार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्या चारही संग्रहातील कविता वेगळ्या धाटणीच्या आहेत. त्या चिंतनगर्भ आहेत; मात्र 'उजेडाला पंख फुटले' या संग्रहातील कविता सहज स्पष्ट होत गेलेली आहे.  प्रस्तुत संग्रहात पहिल्याच शीर्षक काव्यात कविने कवितेविषयी भाष्य केले आहे. कविने कवितेच्या निर्मिर्तीप्रक्रियेविषयी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांना कवितेची वास्तवदर्शी व्याख्या अभिप्रेत आहे. त्यांचे म्हणणे असे की, कविता लिखितच असते असे नव्हे, तर ती दैनंदिन जीवनात जगलेली, भोगलेली, अनुभवलेलीही असते. याबाबतचा सविस्तार उलगडा कवी अशोक पाठक यांनी केला आहे. त्यांनी 'उजेडाला पंख फुटले' या पहिल्या दीर्घ कवितेतून जणू कवितेची  व्याख्याच सांगितली आहे.                 
         अनेकांना 
         कविता सोपी वाटते
         एकाने दुसऱ्याला
         दुसऱ्याने तिसऱ्याला
         घातलेली टोपी वाटते
          डॉ. अशोक पाठक यांनी कवितेचा उलगडा करतांना लिहिले आहे की, काहीजणांना कविता करणे म्हणजे याची टोपी त्याला, त्याची टोपी याला किंवा 'र ला ट' लावणे इतके सोपे असते. नवोदित कविंच्या किंवा वाचकांच्या मनातील काव्यनिर्मितीबाबतचा हा गैरसमज व भ्रम कवीने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.  कविता खरंच कशी असते ती समजून घेतली पाहिजे....याबाबत कवी विस्तारानं लिहितात की, प्रत्येक माणसाचं जगणं, भोगणं, दुःख, त्याच्या व्यथा, वेदना, त्याची वाताहत, त्याच्या विविधांगी समस्या, त्याची घुस्मट, त्याची आसक्ती, त्याच्या भावना, त्याने त्याच्या दाबलेल्या इच्छा-आकांक्षा, त्याचे भय-अभय त्याची फसवणूक, त्याचे शोषण एकूणच त्याच्या जिंदगीचा अव्यक्त आणि अलिखित असा भोगवटा म्हणजे कविता होय. ती कागदावरच उतरलेली असावी असं काही नाही... बऱ्याचदा ती कागदावर उतरलेलीच नसते, परंतु ती असते.. न लिहिलेली, न सादर केलेली कविता आणि ती प्रत्यक्षदर्शी दररोज सादर होत असते.
         कविता असते बळ
         पाठीवरचे वळ
         सोसलेली कळ
         सैनिकांचा तळ 
डॉ.अशोक पाठक यांनी संग्रहातील पहिल्याच कवितेतून कवितेचे कंगोरे उलगडले आहेत. अनेक कवी हे केवळ कविता लिहित असतात ; मात्र कविता जगत नाहीत याउलट बराचसा गरीब, उपेक्षित समाज कविता लिहित नसतो, परंतु तो कविताच जगत असतो... म्हणून प्रत्येकाच्या जगण्यात, भोगण्यात कविताच असते; मात्र ते कवी असतातच असे नाही.
       कविता कॅमेऱ्यासारखी असते आणि कवी असतो त्या कॅमेऱ्याचा ऑपरेटर... काहींच्याच वाट्याला येतो कॅमेरा आणि निघतात फोटो; मात्र काहींच्या वाट्याला आयुष्यभर कॅमेरा येतच नाही... आणि फोटोही निघत नाहीत; परंतु त्यांचे कष्टत राहणे अखंड सुरू असते. ते त्यांना चुकत नाही. 
खालील कविता अत्यंत चिंतनगर्भ आहे.
         विझलेले डोळे घेऊन
         येशू उभा आहे अजूनही
         माझ्या दारात 
         आणि.....
         डोळ्यात कारुण्य घेऊन
         बुद्ध बसला आहे अजूनही
         माझ्या दारात 
कवी अशोक पाठक यांनी 'माझ्या दारात' या कवितेतून येशु ख्रिश्ताची सहनशीलता, तथागताच्या डोळ्यातील कारण्यभाव, महावीराचा अहिंसाभाव...कबीराचे दोह्यातील तत्वज्ञान माझ्या दारात सांडत आहे ते वेचण्यासाठी मी माझे हात पसरले आहेत; कारण कविला ह्या सर्व घटकांकडून थोडी थोडी का होईना त्यांची गुणवत्ता अंगिकारायची आहे...
         'कठपुतली' या कवितेत कवी अशोक पाठक इथल्या धर्मव्यवस्थेवर घाव घालतात ते लिहितात,
            मेंदूला जखडून ठेवलंय त्यांनी,
            धर्माच्या नावावर
            माणसांना
            पकडून ठेवलंय त्यांनी
स्वार्थी माणसांनी निर्माण केलेली इथली परंपरा देवाच्या, धर्माच्या, जातीच्या नावाने माणसांचे शोषण करत आली आहे... 'पायरीचे दगड' .या कवितेत कवी सहज तत्वज्ञान सांगून जातात ते म्हणतात,
                      पायरीचे दगड
                      बोलत नाहीत काहीच
                      मौन असतात सदैव
                      त्यांना माहित असतं सगळं
मंदिराच्या पायरीच्या दगडावर पाय ठेवून जाणारी माणसे
मंदिरातही दगडाच्याच पाया पडणार आहेत, हे पायरीच्या दगडांना माहित असतं म्हणून ते मौन असतात. कवी याच विषयाला अनुसरून  'शतकानुशतकाची पताका' या कवितेत वारकरी धर्मावरही बोलतात...
                हे विठ्ठलाचे भक्त
                इथे मिरवत राहतात
                शतकानुशतकाची पताका

                तू का झालासे कळस ?
                या प्रश्नाचे उत्तर न सापडलेले
                सगळे वारकरी
                फिरत राहतात
                झुरत राहतात
वारकऱ्यांच्या नेणीवधर्मी अस्मितेविषयी कवी सरळ सरळ व्यक्त होतात, ते म्हणतात   'तुकाराम कळस का झाला ? वारकऱ्यांना अजून याचाच उलगडा झालेला नाही म्हणूनच ते उपासी तापासी राहून विठ्ठल भक्ती करत वर्षानुवर्षे पंढरीच्या चकरा मारत असतात. वारकऱ्यांनी तुकारामाचा अतोनात झालेला छळ समजून घेतलेला नाही.. 
               मरण गाथा तुकाची
               सोसणाऱ्या दुःखाची
वरील पंक्ती 'जाणे येणे' या कवितेतील आहेत...इथल्या भूमीच्या माणसांचा इतिहास विकृत असल्याने तो दखलपात्र आहे."कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या भगवतगीतेतील श्लोकाच्या विरोधी आहे
                       दुसऱ्यांच्या
                       बसलेल्या घड्यांची
                       मढ्यांची, चौघड्यांची
                       पाडापाडी करून
                       स्वतःची गुढी
                       उभी करणारा
                       माणसांचा इतिहास
कवी अशोक पाठक माणसांच्या विकृतीचा इतिहास सांगत इथल्या आधुनिक संस्कृतीची विकृतीही सांगतात.
                        तिच्या मुक्त हसण्याचे 
                        हजार अर्थ काढणारी आणि...
                        त्याच्या मौनाला पाठीशी घालणारी
किंवा एखाद्याने बलात्कार केला तर त्याला निर्दोष सोडले जाते; मात्र जिच्यावर बलात्कार झाला आहे अशा स्त्रीवर करडी नजर ठेऊन तिचे चारित्र्य हनन करणे अशी आहे इथली संस्कृती.. अशा अनेक विषयावर कवीचे चिंतन आहे. कवी इथल्या राजकारणावर, समाजकारणावर, समाजकारणातल्या व्यवहारवादावर, आणि व्यवहारवादाने संपवलेल्या माणुसकीवरही बोलतात,
                      माझं तुझं
                      करू नको
                      खोट्यासाठी 
                      झुरु नको
राजकारणात आणि समाजकारणात अशा बऱ्याच गोष्टी घडत राहतात...की,
                      कोण
                      कुणाचे हस्तक
                      कोण चालवते
                      कुणाचे मस्तक
पक्षाच्या झेंड्याचे राजकारणही असेच आहे ते खूर्चीभोवती फिरत असते 'झेंडा' नावाच्या कवितेतील पंक्ती अशा...
                      झेंडा असा कसा हा
                      पक्षांना भेटलेला
                      स्वार्थाने मढलेल्या
                      खूर्चीला खेटलेला
कवी 'सावड' या कवितेत अभिजनांच्या आणि बहुजनांच्या संघर्षाचं गुपीत उघड करतांना म्हणतात,
                        त्यांना कुणालाच इथे
                        सूर्याच्या दिशेने चालू द्यायचं नाही
                        हे आता नक्की झालंय
                      .......आता उद्या या मातीतल्यांनी
                       पुन्हा सावड करायची वेळ आली आहे.
इथल्या परंपरावाद्यांनी ठरवलेलं आहे की,बहुजनांना ज्ञानी होऊ द्यायचं नाही.
ज्ञानसूर्याच्या म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालू द्यायचं नाही, कारण त्यात परंपरावाद्यांचे अहित आहे.
             उत्खनन' या कवितेत कवी मार्मिक भाष्य करतांना दिसतात
                           वस्तुंच्या गराड्यात 
                           आपण झाकून गेलोत
                           जणू वस्तुंचेच झालोत...

                           या उत्खननात 
                           अजून माणसं सापडायची आहेत
कवी अशोक पाठक यांच्या कवितेचे विषय साधे सरळ वाटत असले तरी लक्षवेधी आणि उद्बोधक आहेत... 'एक पाऊल' या कवितेत तर अगदी वास्तवाला उजागर  करून कवी विद्रोह व्यक्त करतांना दिसतात,
                           याही काळात
                           सुरूच आहेत बघ
                           सत्य सांगणारांच्या
                           अमानुषपणे
                           कत्तली करणं
                           आणि पुरावे
                           गाडून टाकणं
                          ...
                           आता 
                           टाकावंच लागेल
                           त्यांच्या विरोधात
                           एक पाऊल
माणसांमाणसात वाढलेला स्वार्थीपणा, जातीयद्वेष,धर्मांधता आणि एकमेकांबद्दल असलेली कमालीची असुया माणसे संपवण्यापर्यंत येऊन ठेपली आहे. ही मनोवृत्ती
कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून कवी आपल्या 'कुणी कुणाचे' या कवितेत माणसाने आपली वृत्ती बदलली पाहिजे...माणूस म्हणून माणसाच्या कामी आले पाहिजे. असा आशावाद व्यक्त करतात....
                               कुणी कुणाचे मन व्हावे
                               धुळीतले कण व्हावे
                               ओंजळीतले धन व्हावे
                               पडत्या काळातले क्षण व्हावे !
         प्रस्तुत संग्रहात बाप आणि लेक या शेवटच्या कवितेपूर्वी तीन कविता आईविषयी आहेत, आईच्या मायेचा महिमा आणि तिने दुधासोबतच संस्काराचा पाजलेला पान्हा आयुष्यभर पुरत असतो, तिचे उतराई होण्यासाठी आपण आपला जीवही उगाळून लावला तरी कमी पडत असतो... म्हणूनच कवी आईच्या अस्तित्वाला आकाशाची उपमा देतात...
                       आकाशाची 
                       आकाशाला
                       उपमा कशी देऊ 
                       आई तुझी माया
                       शब्दांत कशी गाऊ
आईवरील तीन कवितानंतर संग्रहात शेवटच्या 'बाप आणि लेक' या कवितेत आलेले वर्णन अत्यंत भावूक करणारे आहे. बाप आणि लेकमधील वर्णन केलेला जिव्हाळा हळव्या हृदयाला पाझर फोडणारा आहे. नेत्रपाकळया ओला करणारा आहे.
        बालपणी अंगाखांद्यावर खेळवलेली लेक कधी लग्नाला आली बापाला कळत नाही; कारण बापाला लेक कधीच मोठी झाली असे वाटत नाही, लेकीच्या लग्नाचा विचार आणि लेक घर सोडून परक्याचं धन होणार हा विचारच बापाचं काळीज चिरणारा आहे.
                         लेकीला पसंती येते
                         सगळ्यांना आनंद होतो
                         तसा बाप आतल्या खोलीत जावून
                         एकटाच ढसाढसा रडून घेतो.                        
बाप आणि लेक या कवितेत आलेले चित्रण अत्यंत हदयस्पर्शी आहे, ही कविता . जगातल्या सर्व बापाच्या आणि लेकीच्या जिव्हाळ्याचे ऋणानुबंध सांगणारी व जिव्हाळ नात्याचे प्रतिनिधित्व अधोरेखित करणारी आहे. 
कवी अशोक पाठक यांच्या सर्वच कविता नोंद घेण्यासारख्या आहेत; परंतु
विस्तारभयास्तव सगळ्याच कवितांवर भाष्य करणे शक्य नाही, तरीसुद्धा प्रस्तुत संग्रहातील अधिकाधिक कवितांचा परामर्ष घेऊन बहुतांश कवितांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहातील कवितेत प्रतिमा आणि प्रतिकांचा ..नवा सृजनाविष्कार पहायला मिळतो, 
            कवी अशोक पाठक यांच्या काव्यलेखनामागे न्यायाची भूमिका आणि समताधिष्ठीत दृष्टीकोन आहे, सामाजिक तळमळ आहे, समाजातील दुःखी, पीडित, गरीब, वंचित, व्याकुळ पांथस्थासाठी त्यांच्या हृदयात एक हळवा कोपरा आहे. त्यांच्याठायी  ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती असा संत तुकारामाचा गुण आहे, 'निगुर्णाचे भेटी आलो सगुणांसंगे म्हणणाऱ्या गोरा कुंभाराचे मन आहे कारण'हा कवी माणसामध्ये देव पाहणारा आहे. त्यांच्या करणी आणि कथनीत साम्य आहे. दलितांचे, उपेक्षितांचे, बहिष्कृतांचे जीवन त्यांनी जवळून बघितले असल्याने त्यांची कविता सामाजिक समतेची अपेक्षा करते. ती केवळ अपेक्षाच करीत नाही तर   सामाजिक विषमतेच्या, विकृतीच्या आणि दंभाच्या विरोधात तात्विक अधिष्ठानावर आधारित सात्विक स्वरूपाचा विद्रोह करते. 
       कवी अशोक पाठक यांच्या  'उजेडाला पंख फुटले ' या संग्रहामधील कवितेकडे अभिज्ञ जाणिवेच्या परिप्रेक्षातून पाहिल्यास ती आपले वेगळपण सिद्ध करताना दिसते.  कवी अशोक पाठक यांच्या अनुभूतीला सहानुभूतीची जोड असल्यामुळे त्यांनी समाज समुहातील विदारक जीवनवास्तवाला शब्दांकित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  मराठी काव्यवाङ्मय सृष्टीत समृद्ध कवितेची भर घालण्यात एका संवेदनशील कवीचे योगदान मोलाचे ठरावे या अपेक्षेसह ' कवी अशोक पाठक यांच्या आगामी साहित्यकृतीसाठी मनस्वी खूप शुभेच्छा..!

 डॉ.धोंडोपंत मानवतकर

उजेडाला पंख फुटले - प्रस्तावना - डॉ.धोंडोपंत मानवतकर

जीवनवादाच्या आणि कलावादाच्या आत्मद्वंद्वातील  नीतितत्वांची मूल्यधर्मी काव्यसंहिता - उजेडाला पंख फुटले प्रस्तावना | डॉ.धोंडोपंत ...