शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

पक्षी दूर देशी गेलं... डॉ.धोंडोपंत मानवतकर

पक्षी दूर देशी गेलं ......

ना.धों.महानोरांना काव्यमय आदरांजली..!
















ज्येष्ठ कवी, गीतकार पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ..."पक्षी दूर देशी गेलं "या सुंदर शीर्षकांतर्गत कविवर्य ना.धों.महानोर यांना काव्यरुपी आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२३  मंगळवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील एम.जी.एम. कॅम्पसच्या "रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची उपस्थिती असल्याने सभागृहात प्रचंड गर्दी होती...कवी महानोरांच्या
कवितेचे दर्दीही तितकेच होते. कविश्रेष्ठ ना.धों.महानोर आणि मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा स्नेह असल्याने मा.पवार साहेब ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, एम.जी.एम.विद्यापीठ,  मराठी विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  मराठवाडा साहित्य परिषद,  मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन आणि अभ्युदय फाऊंडेशन  अशा विविध संस्था व मराठीभाषा प्रेमी मान्यवरांनी केले होते. आमचे स्नेही, डॉ. बा.आं.मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे  प्रा.डॉ.कैलासजी अंभुरे सर यांनी फेसबुकवर पत्रिका टाकून सर्वांना निमंत्रित केले होतेच. या पत्रिकेमुळे अनेक मराठी काव्यप्रेमींना व कवी ना.धों.महानोर प्रेमींना या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
          कविवर्य ना.धों.महानोरांच्या कवितेनेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा आगळा वेगळा कार्यक्रम काव्यरसिकांना पहावयास व ऐकावयास मिळाला, 
ही संभाजीनगरच्या रसिकांसाठी सुंदर पर्वणी होती.
        मी औरंगाबाद येथेच एका पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात अडकल्यामुळे मला ह्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही; याची खंत आहेच; परंतु माझे साहित्यिक मित्र सुदाम मगर यांनी मला हा सुरु असलेला कार्यक्रम फोनवर बराचवेळ ऐकवला. नंतर मी प्रवासात असल्यामुळे तितकासा स्पष्ट ऐकता आला नाही ; परंतु दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचे निवेदनसूत्र ज्यांचेकडे होते ते कलावंतस्नेही जे नुकतेच 'कलासन्मान' पुरस्काराने सन्मानित झाले आहेत असे कॉम्रेड प्रा.डॉ.समाधान इंगळे सर यांच्या फेसबुक वॉलवरून काही छायाचित्रे व चित्रिकरणातून चित्रित झालेला काही संवाद ऐकला. या कार्यक्रमाचा सारांश व  कविवर्य महानोर यांच्या कवितेविषयी मला जे वाटलं ते नोंदवलं आहे. कविवर्य महानोरांच्या एकूण कवितांचा किंवा त्यांच्या एकूण साहित्य प्रवासाचा आलेख शंभर-पन्नास ओळीच्या लेखातून मांडता येणे कसे शक्य आहे? आदरांजलीच्या निमित्ताने फक्त काही नोंदींचा हा लेखनप्रपंच आहे.






















        ज्यादिवशी कविवर्य ना.धों.महानोर गेल्याची फेसबुकवर पोस्ट वाचली तसं काळजात धस्स झालं, मन अस्वस्थ झालं. एका कवीला महाराष्ट्राने गमावलं असल्याची भीती, चिंता आणि चिंतनाचं त्रिवेणी मिश्रण सुरू झालं. नैसर्गिक आपत्तीपुढे मानवाला हारच मानावी लागते हे मात्र त्रिवार खरं आहे.
         कवी किंवा कलावंत हे त्या त्या काळाचं अपत्य असतात, ते त्या राज्यातील लोकांनी राज्यकर्त्यांनी त्यांना जपलं पाहिजे. कलावंतांना जपणारी माणसं आता बोटावर मोजण्याइतकी शिल्लक आहेत. कलावंत हा आपल्या राज्याचं वैभव असतो असं ज्यांना वाटतं तेच कलावंतांची कदर करतात. महाराष्ट्रभूमीने या देशाला अनेक कलावंत देऊन देशाच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा खोवला आहे. काही ठराविक माणसांचा जन्म केवळ एखाद्या कार्यासाठीच झालेला असतो म्हणून त्यांच्या अंगी निसर्गाने बहाल केलेले ते उपजत कलागुण असतात.
         एका हॉटेलमध्ये चहा घेत असतांना आमचे मित्र के.टी.उपदेशे म्हणाले कवी महानोर हे केवळ कवितेसाठीच जन्माला आलेले कवी होते, ते सहज बोलले आणि ते मान्यही करावं लागलं. कवी ग्रेस, ना.घ.देशपांडे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबुडकर, भा.रा.तांबे, बहिणाबाई चौधरी, बा.भ.बोरकर, ग.दि. माडगुळकर, फ.मु. शिंदे, ना.धो.महानोर अशी अनेक नावे सांगता येतील. अशा कितीतरी कवींनी केवळ कवितेसाठीच जन्म घेतला होता, किंवा घेतला आहे असं वाटतं. कारण या महान कवींच्या कवितांनी इथले काव्यविश्व समृद्ध केलं आहे. 
         कविवर्य महानोरांनी मराठी रसिकांच्या मनोरंजनासाठी एकापेक्षा एक सरस अशी गीते दिली. भावगीते दिली, लावण्या दिल्या. त्यांच्या शब्दमाधुर्याने रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे, हे "पक्षी दूर देशी गेलं" या भावस्पर्शी संगीतमय आदरांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या दर्दीच्या उपस्थितीने लक्षात आले.
        कवी महानोर म्हणजे 'हिरव्या रानाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं' असं वाटू लागलं. रानाची, रानातल्या पानाची हिरवी बोली बोलणारा कवी काळाने हिरावून नेला, हिरव्या बोलीचा शब्द मुका झाला.. जे महानोरांना अंत्यदर्शनासाठी गेले त्यांना त्या शिवाराच्या अनावर हुंदक्यानं सांगितलं असेलच..."ना.धों.महानोर नावाचं हिरव्या रानाला पडलेलं ते एक स्वप्न होतं." पळसखेड्यातील हिरवे रान ह्या हळव्या, संवेदनशील कविला मुकले. तसे मराठी साहित्यविश्वही या रानकवीला मुकले आहे. कवी महानोर हे मराठी साहित्यविश्वाची कवितेनं ओटी भरून गेले. त्यांचे मराठी काव्यविश्वाला मोलाचे योगदान लाभले आहे, हे मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही.
         शेतीमातीशी आपले नाते घट्ट करून तिचे सौंदर्य आयुष्यभर शब्दात मांडणारा सृजनशील रानकवी आता कायमचा प्रवासाला निघून गेला आहे, तो पुन्हा कधीच परत न येण्यासाठी... आता महाराष्ट्र या कवीला मुकला आहे. पळसखेड्यातील जीव लावलेले रान या कवीला मुकले आहे. आता हिरव्या निसर्गाच्या, प्रिती प्रेमाच्या... प्रतिमा, प्रतिकांना सहज सुंदर,तरल, वेल्हाळ शब्दांत गुंफणाऱ्या सकवार कवीच्या आठवणी केवळ काव्यातून,गीतातून जागवाव्या लागतील...
                          आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या
     कवी महानोरांच्या पळखेड्यातील रानात घुमणारी गोड शब्दांची धून कायमची शांत झाली. कवी महानोरांचा प्राण पळसखेड्यातील रानात विसावला. या रानाला लळा लावलेल्या मातीचा कण न् कण.. वृक्ष वेलींचे पान न् पान आता महानोर दिसत नाहीत म्हणून अश्रू ढाळत असतील. गायीगुरांच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघळ कायम सुरू असतील..गायीगुरांच्या हंबरण्यातल्या सांकेतिक भाषेतून असाही प्रश्नार्थक विचार येत असेल की, "या नभाने या भूईला दान द्यावे" असं ईश्वराकडे आता कोण पसायदान मागेल..! 
   ही माती या रानाच्या कानात कवी महानोरांंविषयी कुजबुज करत असेल...! की,
                             या शेताने लळा लावला असा असा की,
                             सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
                             आता तर हा जीवच अवघा असा जखडला
                             मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहला
 कवी या पंक्तीतून असे म्हणाले होते, मला ह्या शेताने असा लळा लावला की,आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात हसलो, रडलो.... कारण मातीचे दुःख म्हणजे कोरडा दुष्काळ. मातीच्या जीवाची तलखी.... आणि शेतकऱ्याचे दुःख म्हणजे दुष्काळ पडल्यावर पीक करपून जाणे , पीक न येणे आणि शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणे हे कवीचे आणि शेतकऱ्यांचे दुःख...कवी महानोर रानाशी एकरूप झाल्यावर म्हणतात...आता तर या दुःखाचे काहीच वाटत नाही, हा जीवच असा जखडून गेला की, रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..!
          कवी महानोर वयाच्या अठराव्या वर्षांपासून शेती करत होते. त्यांचे पहिले प्रेम शेतीवर आहे असं ते म्हणायचे.
       मराठी काव्यविश्वाला ना.धों.महानोर यांच्या कवितेने अशी मोहिनी घातली की, त्यांच्या अमोघ वाणीतून अनेक कवितांची गीते झाली अन् ती मराठी माणसांच्या ओठांवर आली.. त्यांची गीते, लोकगीते आणि लावण्या आजही मराठी माणसांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या कवितेवर रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या "पक्षी दूर देशी गेलं" ह्या कार्यक्रमात गायिका मालविका दीक्षित आणि गायक राहुल खरे यांनी " चिंब पावसानं रान झाल आबादानी " माझ्यासह अनेकांच्या आवडीचं हे गीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.
        या कार्यक्रमात कवी दासू वैद्य, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर, व शिव कदम या निमंत्रित कवींनी महानोरांच्या अनेक कवितांचे वाचन करून काही कविता गाऊन ना.धों. महानोर यांना आदरांजली अर्पण केली. 
      ना.धों.महानोरांनी लिहिलेल्या आम्ही ठाकर ठाकर, जांभूळ पिकल्या झाडाखाली, नभ उतरू आलं,  चिंब पावसानं रान झालं आबादानी", किती जीवाला राखायाचं राखलं,  राजसा जवळी जरा बसा, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं. ,  मी काट्यातून चालून थकले, किंवा श्रावणाचं उन्हं मला झेपेना... अशा काही लावण्यांनी व गीतांनी रसिकांच्या मनावर गारूड करून जाणारे कवी ना.धों. महानोर यांनी एका लहानशा खेड्यात राहून सुंदर शेती केली. शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजात शेतीचा आदर्श निर्माण केला. कवितेने कवी महानोरांना आमदार केलं. पद्मश्री उपाधी दिली. समाजात प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी दिली. महानोरही आयुष्यभर कविताच जगले. त्यांच्याकडे असलेली निसर्गदत्त प्रतिभा आणि चारित्र्यसंपन्न जीवन हे त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी कारणीभूत ठरले.
       खेडेगावाविषयीचा जिव्हाळा, रानाविषयीचे प्रेम, तेथील निसर्ग, लोकपरंपरा, लोकसाहित्य, लोकसंगीत यांच्याशी कवी महानोरांची सलगी होती, अतूट नाळ होती, ऋणानुबंध होते. कविता, लोकगीते, कथा, व्यक्तिचित्रे, गोष्टी, दीर्घकथा, शेतीविषयक लेखन, गीतलेखन अशा विविध क्षेत्रातील त्यांची व्यापक स्वरुपाची मुशाफिरी ही वाखाणण्याजोगी आहे. 
      कवी महानोरांनी पाच ते सहा दशके महाराष्ट्रभूमीत आपल्या प्रतिभासंपन्न लेखणीचा दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या अनेक सुंदर रचना त्यांचे नाव अजरामर करून गेल्या आहेत..त्या कविता रसिकांच्या ओठांवर रेंगाळत राहणार आहेत...परंतु त्या कवितांची निर्मिती करणारा वेल्हाळ पक्षी दूर देशी उडून गेल्याची खंत कायम मनात आणि हृदयात घर करून राहणार आहे...  कविश्रेष्ठ ना.धों.महानोर यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली..!
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

१८| ऑगस्ट |२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...