सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...
सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...
वृतान्त- डॉ.धोंडोपंत मानतकर
राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंठा तालुक्याच्या सामाजिक न्याय संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी, एक दिवस समाजासाठी' हे घोषवाक्य घेऊन *भव्य एल्गार मोर्चा* चे आयोजन करण्यात आले होते. मंठा तालुक्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार,आदिवासी समाज चाळीस वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनीचे पट्टे १९९१ च्या शासन निर्णयानुसार कसणारांच्या नावे करण्यात यावेत.
तीन पिढ्यांपासून इथला गायरानधारक माणूस गायरान जमिनीचे पट्टे नावावर करण्यासाठी धरणे धरतोय, मोर्चे, आंदोलने करतोय; परंतु आजपर्यंत या गरीब कष्टकरी गायरान धारकांची कोणत्याच सरकारने दखल घेतलेली नाही, हा तीस वर्षापासून भिजत ठेवलेला गायरान जमीन धारकांचा प्रश्न निकाली काढावा. तो प्रश्न आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने निकाली काढलेला नाही, खरेतर तो मुद्दाम सोडवलेला नाही, म्हणूनच बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी या अनुसुचित जाती-जमातीवर मुद्दामच जातीवाचक अन्याय होतोय. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे. हा जातीवाचक अन्याय बंद व्हावा म्हणून आजही अनुसूचित जाती जमातीच्या गरीब लोकांवर धरणे, आंदोलने, मोर्चे करण्याची वेळ येत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे.
लोकशाही असूनही या देशात मागास जातीवर जर हल्ले करून त्यांचे खून होत असतील तर, हे सरकारसुद्धा अप्रत्यक्षरित्या इथल्या हल्लेखोरांचं आणि जातीयवादाचं समर्थन करतंय का? असा प्रश्न पडतोय..!
बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी समाजाला महापुरुषांचे विचार सांगण्याचे या देशात आजही स्वातंत्र्य नाही. आंबेडकरी समाजातील तरूणांचे भरदिवसा खून होत आहेत. अलिकडे नांदेड, लातूर, बीड, मुंबई या ठिकाणी दलितांच्या हत्या झाल्या आहेत, ते हत्याकांड करणारे महाभाग राजरोस फिरत आहेत. त्यांना हे राजकारणी ,सत्ताधारी लोक पाठीशी का घालतात ? 'खून का बदला फाशी' अशी भूमिका सरकारने घ्यावी. अशी भूमिका या मोर्चात मांडण्यात आली. नांदेड, लातूर, बीड, मुंबई येथील हत्याकांडातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हत्याकांडातील आरोपींच्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाव्यात आणि दलितांवर होणारे अन्याय थांबवावेत. असा रोष सर्व मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
या
मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व घोषवाक्यातून सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे ओढले. शासन प्रशासनाच्या रद्दाड कार्यप्रणालीचा खरपूस समाचार घेतला. हा एल्गार मोर्चा मंठा शहरातील राजे छत्रपती संभाजीराजे चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले होते. या सभेत सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यानी पत्रकामध्ये नमूद असलेल्या विषयावर परखडपणे विचार मांडले.
गोरगरिब, दलित, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या मिळू नयेत व त्यांनी हालाखीचे जीवन जगत रहावे. इतर समुहाचे त्यांनी गुलाम होऊन रहावे अशी इथल्या जातीयवादी सत्ताधारी लोकांची भूमिका स्पष्ट आहे म्हणून त्यांनी नोकरभरती कंत्राटी पद्धतीने सुरु केली आहे. ती बंद करावी व गोरगरिबांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण दिले जावे.
अजून या भारतातली गरीबी संपलेली नाही, मात्र इथला गरीब माणूस संपविण्याचा प्रयत्न चालू आहे तो तात्काळ थांबला पाहिजे, खाजगीकरण करणे बंद करावे. नोकऱ्यामधली ही नवीन सुरु केलेली कंत्राटी पद्धती आणि खाजगीकरणाचा खेळ बंद करावा.
गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची खेडोपाडी सोय करण्यात यावी, यासाठी सरकारने बंद पाडलेले निवासी केंद्रीय मॉडर्न स्कूल पुन्हा सुरु करून गोरगरिबांच्या छोट्या छोट्या मुलांवर होणारे शैक्षणिक अन्याय थांबवावेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांचा भविष्यात होणारा छळ थांबला पाहिजे.
रमाई घरकुल योजनेखाली गरीब लोकांना देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे ते वाढत्या महागाईच्या काळात घरकुल बांधकामासाठी पुरेसे नाही, ती रक्कम पाच लाख करण्यात यावी जेणेकरून गोरगरिबांना या योजनांचा खराखुरा लाभ घेता यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करण्यात यावी. गरीबांना देण्यात येणाऱ्या योजनांची केवळ निवडणूकांच्या कालावधीपुरतीच जाहिरातबाजी न होता तिची अखंड अमलबजावणी होऊन गोरगरिबांचे जीवनमान उंचावले पाहिजे. असा सरकारने प्रयत्न करावा. दलित, अल्पसंख्यांक समाजातील लोकांना सुरक्षा देण्यात यावी. गोरगरिबांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नये. निरपराध दलितांच्या मुलांच्या हत्या, छळ होऊ नये यासाठीं सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे. भारतात गोरगरिब लोकांना न्याय मिळत नसेल, त्यांना सुखाने जगण्याची हमीच नसेल... तर भारत हा विश्वगुरू होणार असल्याच्या जाहिराती करणे थांबवले पाहिजे
या मोर्चात अनेक मुद्यावर भाषणातून रोष व्यक्त करण्यात आला या भाषणातील काही मुद्यांचा सारांश इथे देत आहे.
महाराष्ट्रात दलित ,आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले व क्रूर पद्धतीने खून करण्याच्या घटना सुरू आहेत. उदाहरणार्थ खैरलांजी, खेड, जातेगाव, मुंबई लातूर आणि आता नांदेड...बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का केली ? म्हणून खून करण्यात आला. असे हल्ले करण्याची हिम्मत का होते? आमच्या समाजाबद्दल द्वेश पसरवण्याचे काम काही जातीयवादी संघटना करत आहेत व त्या द्वेषातून आज देशात मॉबलिंचिंग होत आहे. इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या संघटना त्या सरकार पुरस्कृत आहेत. त्या संघटनांनी भिमा कोरेगावची दंगल घडवून आणली. आमच्या समाजावर भीमा कोरेगाव येथे दगडफेक करून शांतता भंग करण्याचे काम केले. त्या घटनांचे सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत व ज्यांनी काहीच केलेले नाही, असे लोक सरकारने जेलमध्ये टाकले...म्हणून सरकारने तरुणाची माथी भडकावयला लावणाऱ्या संघटनावर बंदी घालून त्यांना जेलमध्ये टाकावे तरच देशात व महाराष्ट्रात शांतता निर्माण होईल.
अनेक वर्षापासून गायरान जमिनी असणारे आमचे समाज बांधव सतत विनंती अर्ज आंदोलन करतात परंतु अधिकारी शासन निर्णय असताना सुद्धा गायरान जमिनी नावाच्या करत नाही हा आमच्या समाजावर होणारा अन्याय असून हा सरकारी जातीवाद आहे, याची नोंद घेऊन सर्व गायरान कसणाऱ्यांच्या नावे करून सातबाराचे वाटप करावे.
अकोला येथील दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी यांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मौजे पांगरी बुद्रुक तालुका मंठा, जिल्हा जालना येथील गायरान जमीन धारकांचे नावाची करताना गट क्रमांक चुकीचा टाकण्यात आला आहे,तो गटक्रमांक दुरुस्त करून खरा गटक्रमांक सातबारावर टाकण्यात यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करावी, १४ मार्च २०१३ रोजी चा सरकारी नोकरभरती बंद चा शासन निर्णय रद्द करावा. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करावे. स्वाधारच्या नावाखाली शिष्यवृत्ती बंद करण्याचा छुपा डाव बंद करावा. समाज कल्याणच्या वस्तीगृहाचे खाजगीकरण बंद करावे. केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेले निवासी केंद्रीय इंग्लिश स्कूल सुरू करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी विहिरीचे अनुदान रोजगार हमीच्या प्रमाणात चार लाखाचे करावे. महाराष्ट्रातील ६० हजाराच्या वर असलेल्या डी.एड. बी.एड. रिक्त जागांची भरती सुरू करावी. नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण रद्द करावे. विविध महामंडळाच्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द करून मागेल त्या तरुण उद्योजकांना अंदाज पत्रकानुसार कर्जाचे वाटप करावे. अत्याचारग्रस्त कुटुंबावर भा.द.वि. कलम ३२५ अंतर्गत खोट्या केसेस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सवर्ण हत्याकांडाचे बळी पडलेल्या कुटुंबांना ५० लाखाची सरकारी मदत देण्यात यावी. अशा अनेक मागण्या सदरहू मोर्चाच्या होत्या.
मोर्चाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले, नगरसेवक राजेश खंदारे, कॉम्रेड मारोती खंदारे, कॉम्रेड सरिताताई शर्मा, कॉम्रेड नंदकिशोर प्रधान, माजी सभापती दत्ता बनसोडे, नगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीनभैय्या राठोड, उपनगराध्यक्ष जे.के.कुरेशी, अचितनाना बोराडे, विकास सूर्यवंशी, पं.स. सदस्य, अरुणराव प्रधान, बाळासाहेब वांजोळकर, कॉम्रेड भगवान कोळे, तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते, भगवान लहाने, वंचितचे सुभाष जाधव, मोहन सदावर्ते, कॉम्रेड सचिन थोरात, सुनील तुरेराव,मा.सभापती बाळासाहेब अंभिरे, सर्जेराव मगरे, अॅड अनिल मोरे, जिल्हाध्यक्षा असंघटित सौ.सारिका वरणकर, संगिताताई मधुकर मोरे, कासाबाई शिरगुळे, सौ.शीलाताई वाघमारे, शेषाबाई जाधव, सरोदे, शिल्पा बनसोडे, यांच्यासह अनेक महिलांच्या पुढाकारातून हा मोर्चा यशस्वी झाला. मोर्चात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ बापू वटाणे, डॉ.धोंडोपंत मानतकर, वंचितचे भारत उघडे, भीमशक्तीचे दादाराव हिवाळे, चर्मकार संघटनेचे महादेव वाघमारे. दत्ता वाघमारे, अंबादास घायाळ, सुरेश कोळे, अॅड सिद्धार्थ अवसरमोल, सुरेश वाव्हळे, अचितराव खरात, रमेश प्रधान, कय्युमभाई कुरेशी, शगीर पठाण, रावसाहेब खरात, नगरसेवक बाजभाई पठाण, शबाबाभाई कुरेशी, शेख एजाजोद्दीन, ताहेर बागवान,व शरदराव मोरे, अच्युतराव साबळे, विष्णू अण्णा मोरे, नाना वाघमारे, नामदेव देशमाने, नितीन मोरे, रमेश आवारे, अशोक अवचार, बौद्धाचार्य महेंद्र टेकुळे, महेंद्र मोरे, सिद्धार्थ मोरे, अतुल खरात, सरपंच प्रताप जाधव, अर्जुन कांबळे, ,मारोती खनपटे, समाधान शिंदे, गंगा गवळी, सिद्धार्थ देशमाने, धम्मानंद वाघमारे, मारोती कांबळे, प्रसिद्धी प्रमुख महादेव पाखरे, प्रदीप कांबळे, हार्दिक खंदारे, कार्यकर्ते आसाराम चोरमारे, संजय जाधव, विजय चव्हाण, विलास काऊतकर, सुरज प्रधान, प्रभाकर कांबळे, शुभम अंभोरे, सारनाथ ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, जयभीम सेनेचे तालुकाध्यक्ष उद्धवभाई सरोदे, उपाध्यक्ष भीमराव वाघ, शहराध्यक्ष पिराजी पवळे. व त्यांचे इतर सहकारी यांचा सक्रीय सहभाग होता.
तालुक्यातून आलेल्या खेड्यापाड्यातील असंख्य पुरूष व महिलांच्या उपस्थितीने मोर्चाला व्यापक स्वरूप निर्माण झाले होते.
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
२८| जून |२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा