गुरुवार, २२ जून, २०२३







पडरं पान्या, पडरं पान्या, कर पानी पानी 

शेत माझं लय तहान्हेलं, चातकावानी



          मृग नक्षत्र कोरडं गेलं, रोहिणी,भरणी नक्षत्रंही कोरडी गेली. आषाढ लागून चार दिवस झाले...तरी पावसाचा पत्ता नाही...उन्हाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही.  काळी आई  चैत्र, वैशाख, ज्येष्ठासह आषाढाच्याही उन्हाची तलखी सोसत आहे.  आमच्या लहानपणी आषाढी एकादशीला खूप पाऊस असायचा. पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्या भिजत भिजत, वादळ, वारा पाऊस झेलत पंढरपूरात पोहचायच्या आणि एकादशीनंतर परत फिरायच्या. आता मात्र पाऊससुद्धा जनधनच्या खात्यात पंधरा लाख टाकणार असल्याच्या आश्वासनासारखा वागू लागलाय..!
        सर्वच शेतकऱ्यांनी उन्हातान्हात आपापली शेतं नांगरुन, वखरून काळीशार करून ठेवलीत. काहींनी कापसाच्या नावानं फुल्या काढून ठेवल्यात. काहींनी सोपं वपं नगदी पीकच घेऊया म्हणून सोयाबीनच्या नावानं कास्या,काडी-कचरा वेचून वावर तळहातासारखं करून ठेवलंय. नव्या नवरीने नटून थटून सेज सजवलेल्या पलंगावर जाऊन पतीच्या आगमनाची वाट पहात पहात तिला झोप लागावी...तिच्या नव्या पतीने मित्रांसोबत त्यानेच दिलेल्या लग्नाच्या पार्टीत दारू ढोसून अगदी उशीराने लेझीम खेळत घरात यावे आणि कुठेतरी कान्याकोपऱ्यात विना अंथरूणाचे झोपून जावे... तशीत अवस्था पावसाची वाट पाहण्यात काळ्यामातीची झालेली आहे. ती नटून थटून फक्त पावसाची वाट पहात आहे. पेरणीचा काळ निघून जातोय आणि पाऊस येण्याचा नुसताच बोभाटा ऐकू येतोय...कुठे चक्रीवादळ, तर कुठे मान्सून कोकणात अडकला. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसणार ! ....असा पावसाच्या आगमनाच्या नावानं नुसता बोभाटा ऐकायला मिळतोय..! नव्या नवरीवाणी पावसाची गत झालीय...माझ्या 'ओढाळ सुरांच्या देही' या संग्रहातील काव्यपंक्ती अशा...
                         किती पाहिली मी वाट
                          सांज ढळली रे सारी
                          हुंदक्यात दाटल्या रे
                         आज पावसाच्या सरी

                           तरी नाही तुझं येणं
                           अंगी वणवा पेटला
                          नुसत्याच बोभाट्यानं 
                           जीव उगाच बाटला
हवामान खाते पावसाच्या नावाचा नुसता बोभाटा करत आहे.
पाऊस मात्र अजून किती दिवस येणार नाही, याची काही हमी नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवकाळी पावसाने मे महिन्यातच पावसाळा सुरू केला होता; मात्र आता पेरणीसाठी त्याची गरज आहे, तर तो आभाळाकडे पहायला लावतोय, पेरणीची वेळ निघून गेली आहे तरी तो अजून कसा  पडत नाही. पावसाच्या घोरानं शेतकऱ्यांचा बीपी वाढतोय..!
              आकाशात काळे ढग जरी दिसले तरी... आता लवकरच पाऊस येईल असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात तयार होतोय ; उन्हाच्या तलखीने जीवाची काहिली होतेय.
        काल दुपारी आकाशात ढग जमत होते,स थोड्या वेळाने ऊन चटकत होतं. आषाढ लागूनही अजून पावसाचा पत्ता नाही म्हणून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पाऊस उशिरा का होईना येईलही; परंतु उशिरा आलेल्या पावसाचा पिकांवर अनिष्ट परिणाम होणार. पिकांवर महागामोलाची औषधी खते वापरूनही पिकांचा उतार येणार नाही. खर्च खूप होऊन तो खर्चही निघणार नाही. उशीर झालेल्या खरीपाच्या पिकांची काढणी उशिरा होईल. रब्बीच्या पीकाची वेळेवर पेरणी करता येणार नाही. म्हणजे रब्बीचे पीकही शेतकऱ्यांचा तोटाच करेल की काय ? अशा चिंतातूर शेतकऱ्यांच्या मनाची अवस्था कोणत्याच डॉक्टरांना कळणार नाही...ती शेतकऱ्याच्या मनालाच ठाऊक असेल. त्याच्या मनाची घालमेल ही वरुणराजाबाबतचीच असणार. फक्त पाऊस लवकर यावा ! मनातल्या मनात त्याची अस्मिता असलेल्या ईश्वराला साकडं घालून पावसाला शेतकरी काय काय विनवणी करत असेल.
कवीच्या भाषेत हेच वाक्य त्याच्या तोंडी असेल की...
          
 पड रं पान्या, पड रं पान्या, कर पानी पानी
 शेत माझं लय तहान्हेलं , चातकावानी.....
 
       जून महिना लागून संपतही आला आहे, अजून पेरणी कुठेच नाही, या दिवसात शेतकऱ्यांना आपल्या मुलांला शाळेत टाकण्याचा घोर, शाळेचा ड्रेस घेण्याचा, पाटी दप्तर घेण्याचा घोर, काहींना मुलाची हजारोने फीस भरण्याची काळजी, बी-भरणासाठी, खत औषधीसाठी पैसा उभा करण्याची काळजी, पेरणी करण्यासाठी पुरेसा पाऊस कधी पडेल याची काळजी, अनेक प्रश्नांचं काहूर शेतकऱ्यांच्या डोक्यात थैमान घालू लागतंय, तरी तो ह्या सगळ्या गोष्टी विस्मरणात टाकून किंवा ही भावी काळजी विसरता यावी म्हणून पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतोय. कोसो दूर पायी चालू लागतो. शेतकऱ्यांच्या अंगात अशी सहनशक्ती येतेच कुठून ? असाही प्रश्न पडतो.
          एक बरं झालं पावसाचं येणं न येणं निसर्गाच्या हातात आहे, नाहीतर ते प्रत्येक मतदार संघाच्या आमदार, खासदारांच्या  हातात असतं तर पावसासाठी सुद्धा आमदार खासदारांच्या घरासमोर धरणे ,आंदोलनं करावी लागली असती. "अगोदर आमच्या मतदार संघात पाऊस पाडा. नाहीतर आम्ही निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू." "आमच्या मतदार संघात  पाऊस पाडा, नाहीतर खुर्ची खाली करा." अशा अनेक घोषणांची निर्मिती झाली असती. नेत्यांनी सुद्धा शेतकरी वर्गाला मतदार संघात पाऊस पाडण्यासाठी वेठीस धरलं असतंं...परंतु बरे झाले पावसाची सूत्रे दयाळू निसर्गाने स्वतः कडे ठेवून घेतली.

डॉ.धोंडोपंत मानवतकर
२१ जून २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...