रविवार, १३ मार्च, २०२२

सुशील बनकर लिखित/दिग्दर्शित "अस्तित्व" एक यशस्वी नाट्यप्रयोग

सुशील बनकर  लिखित/दिग्दर्शित
"अस्तित्व " 
एक मराठी यशस्वी नाट्यप्रयोग..........
 मंचावरील कलावंत- प्रेम- समीर भुईगळ, प्रिया- साक्षी पिसाळ.
कलावंत-साक्षी पिसाळ,समीर भुईगळ, सुबोध जाधव, युवराज सुतार
नाट्य परीक्षण----------------------------------------------------------------
डॉ.धोंडोपंत मानवतकर  

       राज्यातील हौशी कलावंतासाठी २०२१-२२ या वर्षीच्या मराठी नाट्यस्पर्धा... औरंगाबाद येथील तापडिया रंगमंदिरात नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या "अस्तित्व " या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. समाजातील दुर्लक्षित वास्तवाचं संशोधन करणारी एक वेगळी संहिता असणारं हे नाटक आहे.
या दोनअंकी नाटकाचे लेखक व दिग्दर्शक सुशील बनकर हे औरंगाबादमध्ये गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अनेक नवोदित कलावंतांना सोबत घेऊन श्रमशक्ती कला आविष्कार या संस्थेअंतर्गत नाट्यप्रयोग करत असतात. सामाजिक विषयाच्या अनुषंगाने चालू घडामोडींवर आधारित सामाजिक विषयावर त्यांनी अनेक नाट्यप्रयोग सादर केले आहेत.
      इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्या अस्तित्वाविषयीचे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अनेकांगाने तिचे दमन केले जात आहे. स्वतंत्र भारतात अजुनही तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. स्वातंत्र्याच्या प्रश्नातच तिच्या अस्तित्वाचा प्रश्नही तिला बेचैन करत असतो, तरीही तिच्यातील कमालीचा संयम जणू इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणीच घालतोय की,काय ?असे वाटू लागते.
         माणूस कितीही चरित्रहीन असला तरी तो समाजात उजळ माथ्याने फिरत असतो, त्याच्या चारित्र्याविषयी समाज मौन बाळगत असतो ; मात्र तोच समाज शंका, गैरसमज आणि संशयातून स्त्रीच्या चारित्र्याचा ऊहापोह करत असतो. तिचे चारित्र्य हनन करत असतो, यातून निर्माण झालेली तिची वैयक्तिक जीवनातील उद्वेगजनक अवस्था तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करते.
        "अस्तित्व " या नाटकाची संहितासुद्धा याच अंगाने जाणारी आहे. समाजातील स्त्रीच्या अस्तित्वाविषयीचे भाष्य या नाटकाद्वारे करण्यात आले आहे. 
     स्त्रियांचे समाज जीवनातील स्थान किती डळमळीत आहे. तिच्या अस्तित्वाचे प्रश्न तिला रात्रंदिवस सतावणारे आहेत. पुरुषी अहंकाराने तिचे प्रापंचिक प्रश्न जटिल केले आहेत. संशय आणि गैरसमजातूनच पती-पत्नीत कमालीचा दुरावा निर्माण होतो आहे. पती आणि पत्नी हे एकमेकांना समजून घेतांना दिसत नाहीत. पती हा पत्नीला स्वतःची मालमत्ता समजूनच वागणूक देत असेल तर तिचे अस्तित्व एखाद्या वस्तुसारखे होऊन बसते. ते पुरुषी अहंकाराने समजून न घेतल्यामुळे अनेक कुटुंबात घटस्फोटाच्या घटना घडताहेत यामुळे समाज खिळखिळा होऊन बसतो.
        दोन कुटुंबाला जोडणारा दुवा म्हणजे कार्यरत असणाऱ्या विवाह संस्था ह्या सुद्धा अशा वाढत्या घटस्फोटामुळे नष्ट होऊ लागल्या आहेत. आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार न करताच घटस्फोटासारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ नये, हाच संदेश या नाटकाद्वारे देण्यात आला आहे. पुरुषाने स्त्रीच्या अस्तित्वाविषयीचा विचार केल्यास पुरुषी अहंकाराचे दुष्परिणाम व कुटुंबाची होणारी वाताहत थांबवली जाऊ शकते. हे समाजवास्तव उजागर करणे हीच या नाट्यप्रयोगाची मध्यवर्ती कल्पना आहे.
थोडक्यात म्हणजे "अस्तित्व" या नाटकाची संहिता ही प्रबोधनाचाच विचार मांडणारी आहे.
        नाट्यप्रयोगासाठी पात्रांची निवड, नेपथ्य, वेषभूषा, प्रकाशयोजना, समयसीमा, प्रसंगावधान, सांगीतिकबाजू,  प्रासंगिक गीताची निवड..आदी घटनाक्रम प्रयोगात तेवढेच महत्वाचे असतात हेही या प्रयोगात काटेकोरपणे सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे      नवीन लग्न होऊन आलेली वधू... प्रिया (साक्षी पिसाळ) आणि प्रेम नामक वर (समीर भुईगळ) हे वधु-वर नुकतेच लग्न होऊन घरी येतात. आनंदाने जगण्याची सुरूवात होते. प्रेम ला प्रिया सोबत निवांत वेळ मिळावा, मिलनाचा आनंद घेता यावा म्हणून तो प्रयत्न करत असतो; परंतु शेजारच्या काकू ( राजश्री कुलकर्णी ) लगेच या क्षणी काहीतरी मागण्याच्या हेतूने त्यांच्या घरी येतात आणि प्रेम-प्रियाच्या आनंदात विरजन पडते. प्रियाची क्षमा मागण्यासाठी आलेला विजय (सुबोध जाधव ) हे तिघे जेव्हां रंगमंचावर येतात तेव्हा एका अनाकलनीय वादाला सुरूवात होते. विजय, प्रेम आणि प्रिया यांच्या प्रेमाचा गुंता अधिकच जटिल होत जातो. तिघांचा विसंवाद सुरू होतो.अधुनमधून येणारा हवालदार ( युवराज सुतार ) हे पात्र या तिघांसोबत शंका आणि दमदाटी करत विनोद निर्माण करून जाते. प्रेम'चा मित्र सागर (मुकेश ठाकूर) हे पात्र समाजात उशिरा होणाऱ्या लग्नाने प्रपंचात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे लागते या विषयावर प्रकाश टाकते. हे रंगमंचीय कथानक मात्र अधिकतर प्रियाच्या भोवतीच फिरत राहते.
    याचे कारण स्त्री जीवनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा दाखविलेला प्रभाव इथे दिसून येतो. स्त्री ही स्वतःविषयी स्वतंत्रपणे विचार न करता पुरुषाच्या सोयीनुसार विचार करते. तिचे विचारस्वातंत्र हे पुरुषाच्या मक्तेदारीवर अवलंबून असते. त्याला हवं असेल तेव्हा तो तिला घरात ठेवू शकतो किंवा घरातून हाकलून देवू शकतो.
       प्रेम आणि विजय या दोघांनी दाखवलेल्या तिच्यावरच्या हक्काने तिच्या  मनाची झालेली उद्विग्न अवस्था अनेक विचारांचा गुंता निर्माण करते..हा मनाचा गुंता सादर करण्यासाठी दिग्दर्शकाने "मन" नावाच्या क्रियेटीव्ह पात्राची निर्मिती केली आहे. प्रियाच्या मनातील भावना, ताण तणाव, विचार, संभ्रम दाखवणारे ब्लॅक/ व्हाईट (सतीश पाटील) "मन" हे स्त्रिच्या द्विधा अवस्थेतील अंतर्द्वद्व बोलून दाखवते. याद्वारे स्त्री ही पुरूषाच्याच अंगाने किती विचार करते. यात तिच्या मनातला राग, उलघाल आणि तिच्या विचारमग्न मेंदुतील निराकार, बहुरंगी आवर्तने ही सतीश पाटील यांनी ताकदीने सादर केली आहेत. हे पात्र अगदी अफलातूनच आहे. प्रियाची घालमेल दर्शवून प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करुन जाते.        
विजय हा प्रियाचा पूर्वाश्रमीचा पती असून तो केवळ प्रियाची क्षमा मागण्यासाठी येतो..यातून क्षणार्धात अविश्वास निर्माण होऊन लगेच प्रेम आणि प्रियाच्या वितंडवादातून गोष्ट घटस्फोटापर्यंत येते. प्रेम हा प्रियाच्या चारित्र्यावर टोकाचे आरोप करून तो घटस्फोटाचा निर्णय घेतो. तेवढ्यात पूर्वाश्रमीचा पती विजय म्हणतो की, प्रेम ने प्रियाला घटस्फोट देऊ नये ; म्हणून मी प्रेमला विनंती करण्याकरीता आणि प्रियाची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. यावेळी प्रियाची द्विधा अवस्था होते आणि तिने नेमके विजय की, प्रेम या दोघांपैकी कोणासोबत रहावे, हा तिचा प्रश्न लेखकाने अनुत्तरीतच ठेवला आहे. ती तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करते. यातून शेवटी खरंच स्त्रीला तिचं तिला स्वतंत्र अस्तित्व असतं का? असा प्रश्न प्रेक्षकासमोर उभा राहतो आणि नाटकाचा शेवट होतो.
   "अस्तित्व" या नाट्यप्रयोगातून  सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील स्त्रीचे स्थान,तिचे स्वातंत्र्य यातून निर्माण होणारे तिचे अस्तित्व. यावर लेखकाने भाष्य केले आहे.
         या नाट्यप्रयोगातून नवीन वर-वधूच्या भावना, प्रेम, उत्साह, भय, रहस्य, संशय, नृत्य, विनोद, दुःख आदी पैलूंची मांडणी, निर्मिती आणि प्रसंगावधानाची समयोचितता दर्शवणारे सर्व घटक आणि घटना संहितेतून सादरीकरणात उतरविण्यात लेखक,दिग्दर्शक सुशील बनकर यशस्वी झाले आहेत. नाट्यगृहातील तांत्रिक बाजुसुद्धा तेवढयाच महत्वपूर्ण असतात. वातावरण निर्मितीसाठी संगीत संयोजनाची बाजू सुमित सिरसाठ यांनी सांभाळली असून तेवढीच महत्वाची प्रकाश योजना सांभाळणारे सागर बोधनकर व नेपथ्यकार राजेश पितृभक्त यांचा वाटा या नाट्यप्रयोगाला सौदर्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
डावीकडून साहित्यिक- डॉ.धोंडोपंत मानवतकर,लेखक दिग्दर्शक सुशील बनकर, साक्षी पिसाळ, समीर भुईगळ व इतर
-----------------------------------------------------------------------------
औरंगाबाद येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक सुशील बनकर यांनी या प्रयोगाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अत्यंत जोखमीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून पुणे-मुंबईकरांच्यानाट्यप्रयोगाच्या मक्तेदारीला आव्हान दिल्यासारखे वाटते.
✍️📚------------------------------------------------------------------
नाट्य परीक्षण
डॉ.धोंडोपंत मानवतकर
७ मार्च २०२२

२ टिप्पण्या:

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...