सोमवार, १४ मार्च, २०२२

" जाणजो...छाणजो…पछच माणजो " - संत सेवालाल.
लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर
तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो ।
कोई केनी भजो-पुजो मत ।
कोई केती कमी छेनी ।
सौतार वळख सौता करलीजो ।
भजे-पुजेमं वेळ घालो मत ।
करणी करेर शिको, 
जाणजो…छाणजो…पछच माणजो…।
लीनता ती रेंयणू । सदा सासी बोलंणू ।।
हर वातेनं सोच समजन केवंणू !
✍️
संत सेवालाल महाराज.

          महाराष्ट्रात त्यातही मराठवाडा प्रदेशामध्ये बहुसंख्य बंजारा समाज आहे. बंजारा समाज ज्यांना आपले दैवत मानतो असे थोरपुरूष म्हणजे संत सेवालाल महाराज.
        संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी सध्याच्या तेलंगणा राज्यातील अनंतपूर जिल्हयातील गुथ्थीबेल्लारी या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव धरमणी व वडिलांचे नाव भीमा नाईक असे होते. संत सेवालाल महाराजांचे जन्माचे वेळी आंध्रप्रदेशावर निजामाचे राज्य होते.
..  त्यावेळेचा बंजारा समाज हा गुरेढोरे पाळून आपला उदरनिर्वाह करीत होता. निजामशाहीच्या राज्यकर्त्यांनी जो बंजारा समाजाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता तो बंद पाडला. तो व्यवसाय म्हणजे गुरेढोरे पाळणे, गुरांचे रक्षण करणे म्हणजेच गोरक्षक असणारा.  गो.म्हणजे गाय, र.म्हणजे रक्षक या दोन शब्दाचे संक्षिप्त रूप गोर असा झाला असावा. तर हा गोरक्षक समाज म्हणजेच गोर बंजारा समाज गाईगुरांच्या दूध-दुभत्यामधून व खरेदी विक्रीमधून पैसा मिळवून उदरनिर्वाह चालवत असे. हा त्यांचा मुख्य व्यवसाय बंद पडला. निजामाच्या सैन्यांना खाद्यसामग्री व इतर साहित्य पुरविण्याचाही त्यांचा व्यवसाय बंद पाडला. यामुळें या समाजावर कठीण प्रसंग ओढवला अशा परिस्थितींत अशा ठिकाणी थांबून उदरनिर्वाह करणे अवघड झाले आणि येथूनच बंजारा समाजाची भटकंती सुरू झाली. हा समाज अस्थिर झाला. एका ठिकाणावरून आपले दूधदुभते घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकू लागला. 
     गोर बंजारा समाज हा मुळातच खूप मेहनती अर्थात् कष्टाळू होता. कष्टावर विश्वास ठेवणारा होता. जो समाज कष्टावर विश्वास ठेवतो तो समाज कधीच दैवावर विश्वास ठेवत नाही. दैवावर विश्वास ठेवणारा देवदेव करत राहतो. परंतु बंजारा समाज हा मुळातच निसर्गाचं पूजन करणारा आहे. निसर्गाच्या आप,तेज,वायू ,पृथ्वी,आकाश या पंचतत्वाच्या शक्तीला मानणारा समुह होता. हा समाज अनादिकाळापासून निसर्गाची पूजा करीत आला आहे. आजही प्रत्येक धार्मिक विधीमध्ये अशा पंचतत्वाचीच पूजा केली जाते. आज मात्र तो काही प्रमाणात देववादी झाला आहे.
         गोरबंजारा समाजावर निजामाच्या राज्यकर्त्यांनी  तो प्रदेश सोडण्याची वेळ आणली; परंतु संत सेवालाल महाराजांनी अशा कठीण परिस्थितीतही समाजाला चुकीचा मार्ग दाखवला नाही किंवा तो पत्करायला लावला नाही. कारण संत सेवालाल महाराज म्हणजे एक सत्वशील व्यक्तिमत्त्व होतं. ते एक मानवतावादी, विज्ञानवादी, तत्ववादी आणि बुद्धीवादी संत होते. या महापुरुषाने सोप्या-सोप्या बंजारा भाषेत मानवतावादाचा, अहिंसेच्या मार्गाचा व सर्व मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी कोणत्याच अवडंबराला थारा दिला नाही. कोणताही शिष्य बनविण्यासाठी चमत्कार दाखवला नाही. कधीही मंत्र-तंत्र, जप-जाप्य यांचा पुरस्कार केला नाही की, बुवाबाजीला थारा दिला नाही. याउलट, त्यांनी देवाधर्माच्या पूजनात वेळ घालवू नका, 
"भजे-पुजेमं वेळ घालो मत ।" 
जाणजो..छाणजो..पछच..माणजो..
संत सेवालाल महाराज आपल्या बंजारा बोलीच्या भाषेत सांगतात की,कशालाही देव मानू नका, कुठेही डोकं टेकू नका. कारण देव ही जाणुन घेण्याची गोष्ट आहे.. उगाच जाणून न घेताच तिला मानू नका आणि स्वीकारूही नका. एखाद्याला जाणले तर त्याची शहानिशाही करा तरच माना हा अत्यंत विवेकी आणि सत्यवादी विचार संत सेवालाल महाराज सांगतात.
किंवा "कोई केनी भजो-पुजो मत" म्हणजे कुणाचीच पुजा करू नका, थोडक्यात म्हणजे दगडांची तर नाहीच नाही; परंतु व्यक्तीची सुद्धा तुम्ही पुजा करू नका. "कोई केनी भजो मत ! कोई केती कमी छेनी ।" कुणीच मनुष्य इतर मनुष्यापेक्षा मोठा नाही. म्हणजे त्यांचा व्यक्तिपुजेलाही विरोध होता. "लीनता ती रेंयणू । सदा सासी बोलंणू ।। हर वातेनं सोच समजन केवंणू ।
      सदाचारी राहण्याचा, लीन होऊन वागण्याचा,नेहमी खरे बोलण्याचा आणि एवढेंच नाही तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धिवर घासूनपुसूनच स्वीकारली पाहिजे. समजून उमजून तिचा स्वीकार केला पाहिजे. अर्थात् आपण सत्कर्मच केले पाहिजे. सत्कर्माचाच स्वीकार केला पाहिजे.अशीच शिकवण संत सेवालाल महाराजांनी दिली. थोडक्यात म्हणजे संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी होते. विज्ञानवादी असणे म्हणजे बुद्धीवादी असणे, म्हणजेच बुद्धवादी असणे होय..! 
        तथागत गौतम बुद्धाचा अडीच हजार वर्षापूर्वीचा "अत्त दीप भव" चा पुरस्कार करणारे संत सेवालाल महाराज म्हणतात,"तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो । तुम्ही स्वतः स्वयं प्रकाशीत होऊ शकता. म्हणजेच.."सौतार वळख सौता करलीजो ।" तुम्ही अंतर्मुख होऊन स्वत:ला ओळखा. उगाच कुणाच्या भजनी पूजनी लागू नका. अत्यंत विवेकशील असलेली विचारधारा ही संत सेवालाल महाराज यांच्या ठायी होती. हा विवेकी विचार समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार होता.
        कारण संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय हा विचार व ही तत्वप्रणाली फक्त बुद्धाच्या तत्वज्ञानातच दिसून येते म्हणून महात्मा जोतीराव फुले यांचा "सत्यधर्म" आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला "बुद्धधम्म" हे दोन्हीं धर्म मानवतावादाचा पुरस्कार करणारे आहेत. हाच मानवतावादाचा विचार अनेक संतांनी समग्र समाजाला सांगून प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. कोणत्याही समाजात जन्म झालेल्या संतांची विचारधारा ही मानवतावादीच असते. संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्यासाठीच ते अहोरात्र काम करत असतात. "संताची विभूति जगाच्या कल्याणा " म्हणजे संत ही विभूती जगाच्या कल्याणासाठीच जन्म घेते. संताची भूमिका ही मानवजातीच्या कल्याणासाठीच असते आणि ती  भूमिका अत्यंत व्यापक असते. संत सेवालाल महाराज सुद्धा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीची मागणी करतात...
“गोर कोरेन साई वेस,
तांडेपेडेन साई वेस,
खुटा मुंगरीन साई वेस,
किडीमुंगीन साई वेस”
केवळ मानव जातच नव्हें तर पशू पक्षी,गुरे ढोरे, कीडामुंगी, अर्थात् पृथ्वीतलावरच्या सर्वहाराचे कल्याण व्हावे अशी मागणी करणारा संत सेवालाल महाराज हे एकाच समाजाचे महापुरूष नसून ते सपूर्ण मानवजातीचे उद्धारक होते. अशा थोर संताच्या जयंतीदिनी त्यांच्या कल्याणकारी विचारांना कोटी कोटी अभिवादन..!🙏 
✍️📚लेखक---------------------------------------------------------------
डॉ.धोंडोपंत मानवतकर
१५ फेब्रुवारी २०२२
९८९०८२७४१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...