शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मंठ्यात रंगली "पौर्णिमा कवितेची".......!

मंठ्यात रंगली " पौर्णिमा कवितेची "......

बहरलेल्या कविसंमेलनात रसिकांची मनमुराद हसवणूक..

 आस लागली संसाराची मनी गं
 रानात राबतंय कुनबीनीचा धनी गं

      मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने संपन्न झालेल्या पौर्णिमा कवितेची या कविसंमेलनाला बहुसंख्य रसिकांची उपस्थिती आणि उस्फुर्त दाद.
      जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात २० ऑक्टो. रोजी सायं. ७ वाजता सुरु झालेल्या "पौर्णिमा कवितेची" या कार्यक्रमाचे प्रारंभी प्रमुख पाहुणे व कविंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. काव्यमंचावरील उपस्थित मान्यवरांच्या व निमंत्रित कवींच्या सत्कारानंतर आविष्कार गौरव- २०२१ या पुरस्काराने प्रसिद्घ कथाकार व कादंबरीकार प्रा.छबुराव भांडवलकर, कवी, कथाकार शिरीष देशमुख व नाट्यकलावंत सतिश खरात या त्रयींचा  मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व विशेष मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मुखोद्गत काव्यवाचन करणाऱ्या परतूरच्या श्रावणी बरकुले हीचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी काव्यमंचावर उद्घाटन करताना माजी
 आमदार धोंडीरामजी राठोड,
कृ.उ.बा. समितीचे उपसभापती राजेश मोरे, माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, मंगलम् सुपर मार्केटचे संचालक आनंदराम सोमाणी व महेश भांगडिया यांची उपस्थिती होती. 
     यावेळी माजी आमदार धोंडीरामजी राठोड मा.राजेश मोरे यांची आविष्कार साहित्य मंडळाच्या प्रदीर्घ अशा वाटचालीचा व तीन दशकांच्या कारकिर्दीत सुरू असलेल्या साहित्यिक उपक्रमाचा  गौरव करणारी भाषणे झाली.. यानंतर "आविष्कार गौरव-२०२१" च्या पुरस्कारप्राप्त तिन्ही मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून सत्काराला उत्तर देऊन मंडळाचे ऋण व्यक्त केले. रात्री ९ वाजता निमंत्रितांच्या कविसंमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात कवियित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, हास्यसम्राट गौतम गुळदे,कवी केशव खटींग व हास्यव्यंग कवी बजरंग पारीख यांचा सहभाग होता.. 
    संमेलनारंभी कोजागरी पौर्णिमेच्या शब्दाचा मथितार्थ सांगून कवियित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी..
चांदणे नेसून आले दु:ख माझे कोवळे 
मांडले मी काळजाच्या अक्षरांचे सोहळे  
              
जगण्याचे जगणे जगून झाले बाई
समजून उमजले तरी मज कळले नाही
मागून जोगवा भरत गेली ओटी 
संपल्या दु:खाचे अश्रु दाटले पोटी
अवस्येची होऊन पुनव आली दारी 

     अशा गेय रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कवी केशव खटिंग यांनी   खास आपल्या शैलीतून ग्रामीण भाषेची महती सांगत काव्यरसिकांचा नूर खुलवला...

" आस लागली संसाराची मनी गं
  रानात राबतंय कुनबीनीचा धनी गं "

आपल्या वेगळया ढंगात ग्रामीण शैलीतील रचना सादर करून केशव खटिंग यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. अमरावतीचे हास्यसम्राट कवी गौतम गुळदे यांनी "आजकालच्या जमान्यात भले भले चयले", "बुढा म्हणे बुढीला", व निंदन" या  वैदर्भीय बोलीतील व आपल्या खास विनोदी शैलीत कविता ऐकवून आणि प्रासंगिक विनोद सांगून रसिकांना मनमुराद हसविले.
     नांदेडचे हिंदीभाषिक हास्यव्यंग कवी बजरंग पारीख यांनी आपल्या खास व्यंगात्मक शैलीत हिंदीभाषेत चुटकुले सांगत वर्तमानातल्या सामाजिक विकृतीचा व पुढाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी कोजागिरीनिमित्त उपस्थित रसिकांनी दुग्धप्राशनासह कवितेचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले, तर उद्घाटन आणि
 सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन ओमप्रकाश राठोड प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी केले. या कविसंमेलनास परतूरहून प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे; विष्णू बरकुले,रमेश आढाव, सेलूहून डॉ.अशोक पाठक, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, यांच्यासह मंठा शहरातील अनेक प्रतिष्ठीत व जाणकार नागरिकांसह प‌त्रकार व बहुसंख्य महिलांची आवर्जून उपस्थिती होती.
 
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आविष्कार साहित्य मंडळाचे पदाधिकारी1 कुं.पी. इंगळे, बाबुजी तिवारी, पि.टी.प्रधान, सौ.शोभा डहाळे, डॉ.संतोष मोरे, शिवाजी जाधव, ओमप्रकाश राठोड, सौ.मंजुषा काळे, प्रदीप इक्कर, शत्रुघ्न तळेकर, विजय गायकवाड़ राजू वाघमारे आदींनी खूप परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------
संकलन 
डॉ.धोंडोपंत मानवतकर
अध्यक्ष-आविष्कार साहित्य मंडळ,मंठा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...