गुरुवार, १७ मार्च, २०२२

"अस्वस्थ मनाचे किनारे."...✍️ डॉ.धोंडोपंत मानवतकर

अस्वस्थ मनाचे किनारे...

अस्वस्थ मनाचे किनारे....

ललित लेखन- 
डॉ.धोंडोपंत मानवतकर 
✍️----------------------------------------------------
        रात्रीचे अकरा वाजलेले...भयान शांतता. मनात कमालीची अस्वस्थता.... तुडुंब काळोखासह अवकाश डोळ्यात साठवून गच्चीवर निःशब्द निपचित पडलेला मी... जीव गुदमरून जावा एवढा भयग्रस्त... डोक्यात प्रश्नांचे काहूर घेऊन मनाच्या  गर्तेतल्या अथांग दरीत कोसळलेला मी..!
       'आठवणींच्या पारंब्यांना लोबकळत राहणारी माझी अवस्था...अगदीच अनकॉन्सिअसमध्ये गेलेल्या पेशंटसारखी.... बेवारस पेशंटभोवती कुणीच नसावे.. तसा वाराही अवतीभवती फिरकत नव्हता... अर्ध्या तासानंतर एक थंड झुळूक दिलासा देणारी...
     ती अमावस्येची रात्र.... अस्वस्थ मनाच्या विविधांगी प्रस्तरातून उलगडत गेलेली... तिच्या गोड आवाजातली अनेक गाणी अनुवंशिकतेने माझ्यात साठवलेली...तिच्या आवाजातले त्या गाण्याचे सूर कधी मांडीवर झोपून ऐकलेले.. कधी जात्यावर दळताना ऐकलेले...तर कधी निंदताना , खुरपतांना.. पण तिचा आवाज अगदी लताबाईच्या आवाजासारखा मिळताजुळता.... तिला तिच्या माहेरातूनच मिळालेली ही आवाजाची देणगी...!
      तिच्या सगळया खानदानीतलं एखादं मूल जरी रडलं तरी सुरातच रडणार...! अंजनीच्या साठ्यांचं घराणं म्हणजे स्वरगंगेचं माहेरघर... सरखाराम साठ्यांची क्लोरेनेट ऐकली आणि संपतराव साठ्यांचे ट्रम्पेट ऐकले की, मला वाटायचं मी सुरेल मामाचा एकुलता एक भाचा... एका सुरेल इंद्रायणांचं लेकरू..अर्थात माझी आई  इंद्रायणी विठोबा साठे. म्हणजेच  ती साठ्यांची लेकबाळ....! तिच्या आठवणीने
दाटून कंठ येतो नि फुटू लागतो बांध मनाचा...!
        मध्यरात्र.... पेंगलेले नेत्र....अनेक हात कुशीत शिरलेले... या निरव शांततेत माझ्या कानावर रेडिओत एका जुन्या गाण्याची धून आदळताच मनाचा बांध फुटला.... ते गाणं कधीही आणि कुठेही ऐकलं की, माझ्या मनाचा बांध फुटतोच.... आणि तिच्या आठवणीने मी एकांतात हुमसून हुमसून रडू लागतो... तिच्या आवाजाचं आणि त्या गाण्याचं काहीतरी नातं असल्याचा मला भास होतो... गाण्याच्या सुरुवातीलाच राव्याचं कुजबुजणं नि लगेच.....आलाप.. आ.....

" स‌ुनो सजना पपिहेने कहां सबसे पुकारके.. 
संभल जाओ चमनवालों केे आये दिन बहारके..."

      माझ्या मनाची अवस्था.. इंद्रायणीच्या डोहाचे कंगोरे ढवळल्यागत झालेली...मी जणू संध्यासुक्तात बुडालेला... अवघ्या इंद्रियांसह.. .! 

अवघीच इंद्रिये गाती तिच्याच दु:खाची गाथा
स्मरणाच्या काललयीवर हा देहच होई माथा ! 

हा संपूर्ण देहच माथा होऊन मी घालू लागतो लोटांगण....तिच्या अदृश्य पदकमलावर...तिला पाहण्यासाठी माझ्या समस्त देहाला डोळे लगडलेत.
आणि माझ्या नसानसातून अश्रुंचे पाट वाहताना... मी अनुभवतोय..! या देहाला बैचन करणारी ती रात्र.... मला त्याच गीताचा अंतरा ताललयीत गुणगुणायला भाग पाडते....

देखो ना ऐसे देखो, मर्जी है क्या तुम्हारी, 
बेचैन करना देना, तुमको कसम हमारी.. 
हमी दुश्मन ना बन जाएँ कहीं अपने करार के...

या अंतऱ्यात तिने माझ्यावर केलेल्या संस्कारांचे उल्लंघन होऊ देऊ नये..असा भावार्थ मी लावत राहतो...!
     आई माझ्या बेचैन मनावर मला ताबा मिळवून दे, "तुला माझी शपथ.". मला तुझ्या आठवणीने एवढे अस्वस्थ करू नकोस..! अनावर अश्रुंना वाट करून देतांना उसासे मागे झरू लागतात...

"ओंजळीत माझ्या माझे उसासे 
आणि भोवताली आभाळ भासे"

     इंद्रायणीच्या कुशीतून बाहेर आलेला मी... पुन्हा इंद्रायणीच्या आठवणीत डुंबत जातो... अनावर आठवांचे शल्य इतके बोचरे की, अख्ख्या देहालाच आठवणींच्या जखमा होऊन जाव्या.....तिने आयुष्यभर भोगलेल्या दुःखाची गाथा तुकारामाच्या गाथेप्रमाणेच तरंगणारी..माझ्या मनगंगेच्या डोहावर..!              प्रपंचाच्या अनेक प्रश्नांचे तांडव सुरु असूनही तिची आठवण एका गाण्याच्या स्वरलयीतून पाझरत जाणारी......

"किती प्रश्न भोवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वतःशी खुलासे....."

       जीवनसंचिताच्या साचेबंद स्वप्नांना कितिदा हुलकावणी देत जातो मी....आई त्यांपेक्षा मला कुठल्यातरी कारागृहात बंदिवान व्हावं वाटतं गं.. अनेक स्वप्नांना कवेत घेऊन उगाचच दिलासे देत जगण्यापेक्षा.....!
      तसा मी गर्दीतही एकटाच असतो.... गर्दीतून अनेकांचे धक्के पचवूनही जपत असतो एकलेपण....  हिंस्त्र आणि मतलबी माणसांचे बेगडी रूप न्याहाळण्यासाठी..!
      दाखवायचे वेगळे नि खायचे वेगळे.. ह्या वृत्तीची आता भीती वाटू लागली आहे ; कारण जखमांचे उत्सव साजरे करणारांचे काफिले सुद्धा खोट्या प्रतिष्ठेशिवाय जगूच शकत नाहीत...म्हणून 'मला नकोसा वाटतोय हा उद्विग्न वर्तमान'.."खोट्या आवर्तनात बेगडी आनंद शोधणारा."...यापेक्षा माझ्या आरसपानी स्वप्नांना कवेत घेऊनच जगावे वाटते तुझ्या आठवणींच्या प्रदेशात...!.............................................................................
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...