शनिवार, ९ एप्रिल, २०२२

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद - एक दृष्टिक्षेप

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद - एक दृष्टिक्षेप

           

               डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद या दोन्हीमध्ये खरा राष्ट्रवाद आणि बेगडी राष्ट्रवाद अशी एक कमालीची तफावत आहे. माझ्यामते अलिकडे सत्तारूढ़ असलेल्या राजकर्त्यांच्या राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे ती अत्यंत बेगडी असल्याचे दिसून येते, तर याऊलट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद हा त्यांच्या भारतातील एकुणच महान कार्यातून खरा राष्ट्रवाद दिसून येतो. वर्तमानातील राजकारणाची बदललेली राजकीय व जातीय समीकरणे तसेच सत्तारूढ़ राज्यकर्त्यांचा जनतेविषयीचा खोटा कळवळा, दिशाभूल आणि मतांचे राजकारण याविषयी केलेला हा छोटासा लेखनप्रपंच..!
         भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रवादाची कल्पना ही शोषणमुक्त राष्ट्राची होती. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची होती. बाबासाहेबांच्या कल्पनेतील भारत हा समतावादी असला पाहिजे. जातीयवादमुक्त असला पाहिजे. 
      गरीबीमुक्त भारत. अंधश्रद्धामुक्त भारत. स्त्री- पुरुष समानता असणारा भारत. समाजात बंधुभाव असणारा भारत. सत्याला न्याय देणारा भारत. सर्वांना समान हक्क देणारा भारत. प्रज्ञावंत समाज असणारा भारत, शीलवंत समाज असणारा भारत. दुःखी कष्टी जीवांवर करुणा दाखवणारा....आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला भारत. कृषिप्रधान असणारा सधन भारत. शैक्षणिकदृष्ट्या उच्चस्तर असलेला भारत. अखंड भारत. वैज्ञानिक क्रांती करणारा भारत. प्रत्येक क्षेत्रात इतर राष्ट्राच्या पुढे असणारा भारत. अशा अनेक संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होत्या...एवढेच नाही, तर ह्या सर्व संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी घटनेत तसे नियम व कायदे करून ठेवले होते.व त्यांनीच सांगून ठेवले होते की, आपल्या भारताची ही राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे; मात्र या राज्यघटनेचा अंमल करणारे जर चांगले नसतील, तर त्यांच्यासाठी हे केवळ एक पुस्तक आहे आणि नेमके तेच झाले. एका वर्गाकडून ही सर्वोच्च घटना जाळण्याचाही प्रयत्न केला गेला. अलिकडे तर घटनाच बदलण्याचे मनसुबे सुरू आहेत
आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राऐवजी हिंदुराष्ट्र करण्याचे कारस्थान सुरू आहे. 
             भारतात सध्याची सामाजिक स्थिती भौतिक साधनांच्या अतिरेकी वापराने अत्यंत अलबेल असताना दिसत असली, तरी ती तशी नाही, ती अत्यंत दयनीय आहे. 
       भारतात सध्या लोकशाहीच्या आडून हुकुमशाहीचं राज्य आहे. राजकारण आणि समाजकारण यांचा ताळमेळ बसताना दिसत नाही. भारतीय समाजव्यवस्थेत अराजकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडे वाढीस लागलेली विशिष्ट समुहाची धर्मांधता ही सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. सामाजिक विषमता देशातील समाजव्यवस्था खिळखिळ करणारी आहे. समाजव्यवस्था जर खिळखिळ झाली तर देश कमकुवत होत जाईल आणि देश कमकुवत झाला तर आपल्या देशावर बाहेरील देश आक्रमण करतील. म्हणून देशाच्या सुरक्षिततेसाठी एकमेकांना पूरक असलेले देशाचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे तिनही घटक देशाची सुव्यवस्था राखण्यास कारणीभूत ठरतात. देशाच्या सुव्यवस्थेवर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था राष्ट्राला मजबूत ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावत असतात. 
        देशाचा कायदा हा समाजकारणावर, राजकारणावर आणि अर्थकारणावर अंकुश ठेवत असतो; यामुळे राष्ट्रात सुखशांती नांदत असते... म्हणूनच राष्ट्र मजबूत आणि सुखी राहण्यासाठी लोकशाहीच्या घटनातंत्राचा वापर झाला पाहिजे त्याशिवाय राष्ट्र मजबूत राहणार नाही. 
        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेला जगात तोड नाही.. एवढी ती परिपूर्ण आहे. भारतीय घटनेत मुद्दाम नोंदवलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय' ही भारतीय लोकशाहीची मूल्ये ही देशाचे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावतात; परंतु ती मूल्ये रूजू द्यावयाची की नाही हे राज्यकर्त्यांच्या नीतीवर व राजनीतीवर अवलंबून आहे.
      राज्यकर्त्यांच्या शासनप्रणालीखाली संपूर्ण देशाची सूत्रे हलत असतात. शासनकर्त्यांनी देशाच्या जनतेला जी वागणूक द्यावयाची असते ती देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या नियमांचे पालन करूनच द्यावयाची असते. त्याशिवाय देशातील जनतेला त्यांच्या स्वातंत्र्याचा हक्क किंवा अधिकार मिळणार नाहीत. 
      राज्यकर्त्यांनी देशातील जनतेचे हित लक्षात घेतले पाहिजे. जनता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सुखी, समाधानी आणि सुरक्षित असल्याशिवाय राष्ट्र सुखी,समाधानी आणि सुरक्षित असणार नाही. हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सद्सद्विवेकबुद्धीमध्ये असल्यामुळेंच त्यांनी लिहिलेल्या घटनेत तो उतरला आहे.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रवादाविषयीच्या भूमिकेत दूरदर्शीपणा होता. कारण भारतीय समाजव्यवस्थेचा बाबासाहेबांनी सांगोपांग अभ्यास केला होता. भारतीय समाजव्यवस्थेत असणारी जाती- जातींची उतरंड आणि या उतरंडीमुळे समाजात असणारी वर्णभेदाची आणि वर्गभेदाची तफावत आणि याच तफावतीमुळे समाजव्यवस्थेत निर्माण झालेला जातीभेदाचा व वर्णभेदाचा कळस. यात असलेली स्पृश्य- अस्पृश्यता यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता ही राष्ट्राच्या हितासाठी बाधक ठरत होती. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते. म्हणून भारतातील एकुणच  समाज रचनेत समता निर्माण व्हावी. उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य हे भेद कायमचे नष्ट व्हावेत म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत समता,स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये मुद्दाम समाविष्ट केलेली आहेत. राज्यघटनेची ही जी मूल्ये आहेत ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या अठरापगड जातींना लक्षात घेऊनच नोंदवलेली आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत राहून एकमेकांत मिसळून स्वाभिमानाने जगता यावे. यातूनच विषमता नष्ट होईल. समाजातील स्पृश्य -अस्पृश्य हे भेद नष्ट होतील आणि एकसंध राष्ट्र निर्माण होईल हा दूरदृष्टीकोन बाबासाहेबांचा होता. 
        १९४७ च्या नंतर अर्थात स्वातंत्र्योत्तर कालखंडात राज्यघटनेतील कायद्यांनुसार समाजव्यवस्था बदलू लागली. अस्पृश्यता कमी होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर ३० वर्षाचा कालावधी लोटला. पुन्हा भारतीय राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी धर्माचे आणि जातीचे राजकारण सुरू केले. "फोडा आणि राज्य करा" हया इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करीत निवडून येण्यासाठी जातीबद्दलची, धर्मांबद्दलची खोटी अस्मिता दाखवून निवडणूका लढल्या जाऊ लागल्या. राजकीय मंडळी जातीय समिकरणातून आपापली पोळी भाजू लागले. जातीयवाद पुन्हा दृढ होऊन रुपांतरित झाला. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रप्रेमाची भावना कमी होऊन राष्ट्रप्रेमाऐवजी राजकीय मंडळी स्वतःवर प्रेम करू लागली. स्वतःच्या जातीचा पक्ष काढू लागली. राष्ट्रावरचे प्रेम स्वतःच्या पक्षावर करू लागली. जाती जातीचे पक्ष निर्माण झाले. धर्माचे पक्ष निर्माण झाले. राष्ट्राप्रती असलेले प्रेम पक्षावर रुपांतरित झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जाती पातीचे अनेक पक्ष निर्माण झाल्यामुळें जनता जाती जातीच्या पक्षात विभागली गेली. प्रत्येक पक्षाचा नेता एकाच जातीचा कैवार घेऊ लागला. म्हणून राष्ट्रप्रेमाऐवजी अलिकडे पक्षप्रेम जवळचे वाटू लागले. अलीकडे पक्षावर असलेले प्रेम केवळ निवडून येऊन जनतेवर राज्य करण्यासाठी होते. पक्षावरचे खोटे प्रेम अलिकडे उघडे पडू लागले. आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षावरच जर खोटे प्रेम असेल तर राष्ट्रप्रेम तर खोटेच असणार आणि मग राष्ट्रवाद तर खूपच दूरची गोष्ट आहे.
         अलीकडील राजकारणात राष्ट्रवादाची जागा पक्षवादाने, स्वार्थवादाने, धर्मवादाने आणि जातीयवादाने घेतली. याही पलीकडे जाऊन धर्म आणि जात  तोंडी लावून जनतेचा वापर केवळ मतदानापुरता झाला. मतदानासाठी जाती जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे वेगवेगळे मनसुबे रचले जात आहेत. एवढेच नव्हे; तर जातीय दंगली घडवून आणणारे राजकीय नेते राष्ट्रप्रेमाची भाषा किंवा राष्ट्रवादाची भाषा विसरून गेले आहेत. म्हणून सत्तारूढ़ पक्षांनी भारतातील जनतेच्या तोंडी लावलेला राष्ट्रवाद हा बेगडी आहे.
       अलिकडे सत्ताधारी पक्ष तर धर्माला पुढे करून, देवाला पुढे करून महापुरुषांना पुढे करून राष्ट्रावर प्रेम असल्याचे दाखवत आहेत. त्यांचे ते खोटे प्रेम जनतेच्या लक्षात आले आहे. त्यांचा निवडून येण्यासाठीचा खोटा राष्ट्रवाद उघडा पडला आहे. 
         विद्यमान राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. जनतेला महागाईच्या दरीत ढकलून दिले आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी सत्तारूढ़ आणि विरोधी पक्षातील किळसवाण्या कहलाने उच्छाद मांडला आहे. राष्ट्रांतर्गत होणाऱ्या कलहामुळे प्रत्येक माणूस उद्विग्न झालेला आहे. राजकारणी व भांडवलदारांव्यतिरिक्त कोणताच समाज या देशात सुखी नाही. सत्तारूढ़ पक्ष जनतेला खूप कांही दिल्याच्या खोट्या जाहिराती करत आहे. सत्तारूढ़ राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद हा कमालीचा खोटा आहे. 
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत जे कायदे केले आहेत ते केवळ जनतेच्या हिताचे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी स्वतः भोगला, अनुभवला आहे; म्हणून त्यांनी आपले आयुष्य केवळ समाजाच्या हितासाठीच खर्ची घालून इथल्या भयंकर अशा धर्मवादी, जातीयवादी, विषमतावादी,मनुवादी व्यवस्थेला वेगवेगळ्य़ा ढंगाने जेरीस आणून  कितीतरी कोटी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क निर्माण करून दिला. धर्माच्या ठेकेदारांची ठेकेदारी मोडकळीस आणली. माणूस म्हणून जगण्याचे, आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचे,बोलण्याचे,संस्काराचे स्वातंत्र्य, प्रत्येकाला दिले जावे, जनतेला केंद्रस्थानी ठेऊन बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. विदेशी आक्रमणाच्या शोषणापेक्षा भारतीय समाजव्यवस्थेतील विषमतेने जनतेचे केलेले शोषण थांबले असेल ते केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारामुळे.. हीच राज्यघटना जर एखादया मनुवादी विचारांच्या सवर्णाने लिहिली असती तर त्याने एकाच जातीला, धर्माला प्राधान्य दिले असते. पुन्हा राज्यघटनेऐवजी दुसरी मनुस्मृति लिहिली गेली असती आणि इतर सर्व जातीधर्मातील लोकांवर अन्याय करणारे कायदे लिहिले गेले असते. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेला उदारमतवादी स्वभाव, भारतातील संपूर्ण जातीधर्मातील जनतेविषयी असलेला कळवळा, त्यांचे राष्ट्राविषयी असलेले निस्सिम प्रेम, त्यांनी सर्व जातीधर्मातील स्त्री- पुरुषांच्या हक्काची आणि स्वातंत्र्याची राज्यघटनेतून घेतलेली दखल हाच बाबासाहेबांचा खरा राष्ट्रवाद आपल्याला दिसून येतो.
      म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान सत्ताधारी राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद यामध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येते.  
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

१० एप्रिल २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...