गूढात्म आवर्तनांच्या आशयसूत्राला बंदिस्त करणारा महाकवी - ग्रेस
लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर
१० मे २०२२
ग्रेस" यांना आज जयंतीदिनी विन्रम अभिवादन..!
स्मृतिदिन २६ मार्च.
गूढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल, दुःखाचा महाकवी "ग्रेस" यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे विनम्र शब्दाभिवादन..!
"ग्रेस" म्हणजे निसर्ग कृपेची भावाभिव्यक्ती, ग्रेस म्हणजे शब्दांतरीचे गूढात्म संदर्भ शोधू पाहणारी काव्यवृत्ती. ग्रेस म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्दप्रभू. आत्ममग्नतेतून संवेदनाप्रधान आशयाचे पैलू पाडणारा काव्यमहर्षि.
मराठी वाङ्मयाच्या अन्वयाने मराठी साहित्यसृष्टीच्या कोंदणाला कवितेचा आणि लालित्याचा नवा अर्थालंकार परिधान केला तो कविवर्य ग्रेस यांनी. नवख्या अर्थांतरोपन्यासाचे मर्मभेदी परिमाण धारण करणारी ग्रेस यांची कविता अमूर्त संवेदनेतून शब्दांतीत काव्याशयाचे अवगाहन करते.ती वाचकांना आस्वादाच्या पातळीवर अर्थान्तराच्या परिमितीचे परिघ छेदून जाणारी असल्याने ती दुर्बोध वाटत असली तरी दुर्बोध नसून ती अबोध आहे.कारण कविता कधीच दुर्बोध नसते.
कवीच्या आशयसृष्टीतील लेखनानुभूती मूलतः दोन पदे धारण करणारी असते किंबहुना ती तो जुळवून आणतो किंवा ती कविच्या प्रतिभेची मजल असते.याचाच प्रत्यय कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतून यथार्थत्वाने येतो.
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
कवी, कवितेची भूमी अर्थछट्टाच्या बाहुपाशात अडकवतो..तेव्हा त्याचे आशयसुक्त कविच्या मनोभूमीत विषयाचे मर्मभेद निर्माण करत असते.तो वाचकांना आशयाच्या आवर्तांशी रूंजी घालत तिष्ठत ठेवतो..ही "ग्रेस"यांच्या कवितेची परिणती आहे.
समुद्रबंदी काठावरची, दोन पांढरी शहरे
गगन निळाईत पार बुडाले, त्यांचे सर्व शहारे
प्रस्तुत काव्यपंक्तीच्या आशयाचे विश्लेषण करताना अभिधाच्या अन्वयाने असे विवेचन करता येईल की, ... समुद्र काठावरच्या दोन शहराला समुद्राच्या भरतीने केव्हा धोका होईल या कल्पनेने आलेले शहारेही आता अंधारलेल्या काळोखात अदृश्य झाले आहेत आणि याच बरोबर लक्षणाच्या अन्वयाने प्रस्तुत काव्यपंक्तीतून अभिव्यक्त झालेला प्रणयभाव हा रुपकात्मक प्रतिमांनी बंदिस्त केलेला दिसतो.हे समजून घेण्यासाठी वाचकांची अनुभूती कवीच्या प्रतिभेइतकी टोकदार, प्रगल्भआणि चौफेर असतेच असे नाही.
सदरहु पंक्तीत आशय आणि अभिव्यक्तीची संदिग्धता आहेच. वाचकांच्या मनःपटलावर अभिधा आणि लक्षणाचे द्वंद्व चालू असते. तेव्हा कवीच्या अर्थविश्वाचा अदमास वाचकांना केवळ स्पर्शून जातो. ही भावार्थता ग्रेस यांच्या कवितेत आहे. म्हणून कविची भूमिका ही वाचकांकडून विशिष्ट अनुभूती सिध्द करीत असली ; तरी तो कलाकृतीच्या चिकित्सेचा निश्चित अनुबंध ठरत नाही.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ही ग्रेस यांची कविता "महाश्वेता" मालिकेसाठी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. तिचे गीत होऊन ती आता लहान थोरांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांच्या "भय इथले संपत नाही " या पंक्तित प्रश्नही आहे आणि उत्तरही. हा प्रश्न कवी ग्रेस यांना जेव्हा पडतो ; तेव्हा कवीला आईची आठवण येते. आणि लहानपणी जी गीते तू मला शिकविलीस, ती मी संध्याकाळी गातो असे कवी म्हणतो ; कारण संध्यासमयी मनात काळोख दाटून येतो आणि भोवताली घडणार्या प्रत्येक घटनेने जीव भयव्याकुळ होत जातो, असा भावपूर्ण आशय उपरोक्त गीतपंक्तीतून व्यक्त होताना दिसतो. हा प्रश्न एकट्या कविचा राहत नाही किंवा तो प्रश्न बाळबोध स्वरूपाचाही राहत नाही. तो सार्वत्रिक स्वरूपात रसिक, वाचक, श्रोत्यांचा होऊन जातो. वर्तमानात जगण्याची इच्छा असणारा प्रत्येक जीव. हा जीव मुठीत धरून भयभीत होऊन जगतो आहे म्हणून ही कविता सर्वस्पर्शी होत जाते.
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला
कवी ग्रेस यांच्या कवितेची भूमी ही गूढानुभूतीच्या भूमिकेवर आधारित आहे म्हणून ती तर्कार्थाच्या विश्लेषणास वाचकसापेक्ष असेलच असे नाही कारण कलाकृतीची निर्मितीमूल्ये कलावंताच्या मनोसंवेदनेत दडलेली असतात. म्हणून ग्रेस यांच्या कवितेतील "रसभाव" हा अभिधा किंवा लक्षणा सापेक्ष राहत नाही तो विविध आशयछट्टांचे अग्रदूत ठरत जातो. "संध्याकाळच्या कविता"मधून आलेल्या काव्यपंक्ती पाहूया...
ही चंद्र-उदयिनी वेळा, घननीळ कांठ मेघांचे
भरतीच्या क्षितिजावरूनी, घर दूर जसे सजणाचें
किंवा
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
कवितेचे मूल्य हे भावनानिष्ठ आणि तर्काधिष्ठीत अर्थान्वयाचे भाकीत करत जाते तेव्हा ती नव्या सृजनसृष्टीची प्रस्थापना करीत असते.
कवी ग्रेस यांच्या कवितेतील अर्थघटक प्रतिमांशी पुरक साधर्म्य निर्माण करतात.तोच त्यांच्या कवितेचा मूलाधार आणि स्वाभाविक गाभाघटक आहे आणि यातून निर्माण झालेली आपली वेगळी विशिष्ट शैली आहे.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळें
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळें
ही कविता सुद्धा एक कर्णमधुर गीत झालेले आहे.सन्माननीय संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध करून ते.... गोड गळ्याचे गायक- सुरेशजी वाडकर यांनी गायिले आहे.
नव्या उपमा, नवी प्रतिमाने, मात्रावृत्त व गुणवृत्तांच्या आधारभूत काव्यनिर्मितीला नवखे सामर्थ्य देणारी ग्रेस यांची तरल भावकविता आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून आलेल्या विविधरंगी पात्रांच्या माध्यमातूनही त्यांची कविता समाजमनाचे पैलू अधोरेखित करते. त्यांच्या मुक्तछंदातील कवितेतून संयमाधिष्ठित विद्रोह व्यक्त होतो. सामाजिक जाणीव आणि निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते.तसेच आत्ममग्नतेतूनही याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. शब्दलालित्य व प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ग्रेस यांची कविता समाजमनाचा ठाव घेते. तिने मराठी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. समग्र मराठी साहित्याच्या कक्षेचा परीघ ग्रेस यांच्या कवितेने विस्तीर्ण केला आहे. आणि काव्यस्वादाच्या पातळीवरही त्यांची कविता संकीर्ण प्रश्नांचे तांडव उभे करते.अपरिहार्य आणि व्यामिश्र घटनांच्या आणि घटकांच्या नोंदी घेत निर्मोही आणि नित्तळ अभिव्यक्तीतून ती सर्वस्पर्शी होत जाते. त्यांची कविता तरल लयबद्ध भावानुवादासह संगीताजवळ जाणारी आहे.ती सहज यमक साधणारी भावकविता आहे. ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचे वैभव आहे, अशा शब्दप्रभूचे साहित्यसृष्टीला मिळालेले योगदान मौलिक आणि उपकारक आहे , हे मराठी सारस्वतांना मान्यच करावे लागते.त्यांच्या स्मृतीदिनी ग्रेस यांना त्रिवार अभिवादन..!🌺
कवी, लेखक, समीक्षक
२६ मार्च, २०२०
■■■
🌼🌼🌼
"ग्रेस" यांचा संक्षिप्त परिचय.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
कविश्रेष्ठ माणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी"ग्रेस" यांचा आज २६ मार्च २०१२ स्मृतीदिवस. जन्म -१० मे १९३७, जन्मस्थळ- नागपूर.वडील-सीताराम, आई- सुमित्रा, अपत्ये- मिथिला, माधवी आणि राघव. साहित्यप्रकार-कविता, ललितलेखन. प्रभाव अभिजात उर्दू परंपरा आणि रोमॅन्टिक इंग्रजी काव्य.
■ प्रकाशित साहित्य □ - संध्याकाळच्या कविता-(काव्यसंग्रह १९६७), राजपुत्र आणि डार्लिंग-(काव्यसंग्रह १९७४), चर्चबेल-(ललित लेखसंग्रह १९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश- ( काव्यसंग्रह १९७७), मितवा- (ललित लेखसंग्रह१९८७), सांध्यपर्वातील वैष्णवी -( काव्यसंग्रह-१९९५), संध्यामग्न पुरुषाची लक्षणे-(ललित लेखसंग्रह-२०००),मृगजळाचे बांधकाम-(ललित लेखसंग्रह- २००३ ), सांजभयाच्या साजणी-(काव्यसंग्रह- २००६), वा-याने हलते रान- (ललित लेखसंग्रह- २००८), कावळे उडाले स्वामी- ( ललित लेखसंग्रह- २०१०)
पुरस्कार ■ संध्याकाळच्या कविता- या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक- १९६८ ■ याच काव्यसंग्रहाला- कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार- २०१० ■ वा-याने हलते रान- या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार- २०११.
□□□
डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
२६ मार्च, २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा