गुरुवार, ३० जून, २०२२

"हूरहूर पाठराखण...!"

























प्रा.छबुराव भांडवलकर

यांच्या हूरहूर यांच्या पुस्तकाची पाठराखण.

----------------------------------------------------------------------------
साहित्यस्नेही छबुराव भांडवलकर यांचा "हूरहूर" हा कथासंग्रह एकूणच ग्रामीण माणसांचा कैवार घेणारा आहे. ग्रामीणांच्या व्यथा- वेदनांची परिक्रमा प्रस्तुत संग्रहात प्रतिबिंबित झाली आहे. दीनदुबळ्या माणसांचा प्रपंच चालवण्यासाठी चाललेला संघर्ष, त्यात होणारी त्याची प्रापंचिक वाताहत, त्यांच्या एकूणच संघर्षाचे पैलू या कथासंग्रहात समर्थपणे चित्रित केले आहेत. कथाकार भांडवलकर यांची ग्रामीण जीवनाशी असलेली आस्था आणि ग्रामीणांचे वास्तवदर्शी ऋणानुबंध त्यांना लेखन करण्यास भाग पाडतात.किंबहुना ते त्यांच्या कथालेखनाचे बलस्थान आहे. 
      कथा आणि कादंबरी लेखनाचे मर्म भांडवलकरांना सापडले असल्यामुळे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे अगदी जीवंत वाटतात. त्यांच्या कथालेखनात काल्पनिकता नसून वास्तववाद ठासून भरलेला आहे. समाजाशी असलेली त्यांची जवळीकता आणि सहानुभूती ही त्यांच्या लेखनानुभूतीला खतपाणी घालते.
      ग्रामीण जीवन जाणिवेतून येणार्या त्यांच्या कथा माणूसकेंद्री आहेत.त्यांच्या कथेतून त्यांनी जणू त्या - त्या पात्रांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच सुरू ठेवला आहे असे वाटते. 
           मानवतादर्शी वास्तववाद हा त्यांच्या कथासूत्राचा गाभा आहे. अर्थात ही सहानुभूतीची अंतस्थ भावुकता कथेच्या रुपाने ती कागदावर सहजपणे आणि  निर्लेप उतरत जाते हे विशेष..! 
           त्यांच्या कथानकात येणारी समयोचित प्रतिके, प्रतिमा आणि म्हणी ह्या दैनंदिन जीवनातील घटकांच्या घडामोडींशी,आणि घटनांशी एकरूप होत जातात आणि कथानकाला सौंदर्य प्राप्त होते. हेच त्यांच्या कथालेखनाचे यश आहे.
     मित्रवर्य, कथाकार- छबुराव भांडवलकर यांच्या आगामी  कथालेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

डाॅ.धोंडोपंत मानवतकर.

सोमवार, २७ जून, २०२२

जालना जिल्ह्यातील साहित्य चळवळ - एक संक्षिप्त आलेख

जालना जिल्ह्यातील साहित्य चळवळ - 

एक संक्षिप्त आलेख..!


लेखक- 

डॉ.धोंडोपंत मानवतकर











संपादकीय....✍️


------------------------------------------------------------------🌺📚


             वावर' ही संमेलनाची स्मरणिका आपल्या हाती देतांना अत्यानंद होत आहे.
      अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मंठ्यासारख्या दुर्गम तालुक्यात होत असून या तालुक्यातच हे संमेलन घेण्याचा आग्रह धरणारे स्नेही अनिल खंदारे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष असले तरी त्यांची जन्मभूमी ही मंठा तालुक्यातील आहे. ग्रामीण भागात अनेक कलावंत, कवी, लेखक दडलेले आहेत त्यांना व्यक्त होण्याकरिता विचारपीठ उपलब्ध व्हावे यासाठी हा आग्रह आहे. 
      ग्रामीण नवोदित साहित्यिक शहरात होणाऱ्या संमेलनात संधी शोधत असतात; परंतु पांढरपेशांची साहित्य चळवळ ही ग्रामीण कवी, लेखकांना विचारपीठावर फिरकूसुद्धा देत नाही. म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष शरदराव गोरे यांनी हे नवोदितांसाठी मुद्दाम विचारपीठ उभे केले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.. शिवाय मंठ्यासारख्या मागास तालुक्यातील नवोदितांना मुद्दाम व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देता यावी यासाठी स्नेही शरद गोरे, अनिल खंदारे व भरत मानकर यांनी हे संमेलन मंठ्यातच व्हावे हा आग्रह धरला आहे त्यासाठी त्यांचे कौतुक व मनस्वी धन्यवाद.
      संमेलनाध्यक्षपदासाठी परिवर्तनवादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉ.श्रीपाल सबनीस सरांनी या दुर्गम भागात होणाऱ्या संमेलनासाठी काहीही आढेवेढे न घेता होकार दिला. त्यांचे आभार शब्दातीत आहे.
     संपादकीय मंडळातील सर्व मित्रांनी वेळेवर खूप महत्वाचे सहकार्य केले त्यांचेही आभार. डीटीपी व डिझाईनचे वेळेवर काम करून देणारे न्यू कलश डीटीपी जॉब वर्कचे आमचे स्नेही प्रसाद मोरे व छपाई करून देणारे स्नेही यांचेही ऋण व्यक्त करतो. 
    ज्यांनी संमेलनासाठी व स्मरणिकेसाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्यांचेही ऋण व्यक्त करून संपादकीय मनोगतास विराम देतो.
                                                                  धन्यवाद..!
✍️
संपादक

डॉ.धोंडोपंत मानवतकर












जालना जिल्ह्यातील साहित्य चळवळ - 

एक संक्षिप्त आलेख..!


     जालना जिल्हयातील साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचा ऐतिहासिक आढावा घेताना असे दिसून येते की,अगदी सोळाव्या शतकातही जालना शहराची श्रीमंती दूर दूर ज्ञात होती. जालना शहराचे प्राचीन नाव 'जनकपूर' होते, असे ऐकिवात आहे. जनकपूर पत्रिका नावाने एक नियतकालिकही प्रकाशित होत असे. जनकपूर याचे रुपांतरण जालना झाले असावे.
       पूर्वी जालन्याची ओळख ही एक प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून होती; मात्र अलिकडील काळात जालना जिल्ह्याकडे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून पाहिले जाते.
         या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती १ मे १९८१ रोजी झाली आणि जालना शहराला जिल्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले. तशी जालना शहराची ख्याती सर्वदूर होतीच. शिवरायांच्या काळातही हे शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जात होते. म्हणूनच या शहराला एक उपाधी लागलेली आहे आणि ती सर्वश्रुत आहे. ती म्हणजे "जालना सोने का पालना" ही उपाधी प्रसंगी अगदी लहानथोरांच्याही ओठांवर चट्कन येते.
      जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, बदनापूर, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद आणि घनसावंगी या तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीने जिल्ह्याला समृद्ध केले आहे. जालना जिल्ह्यातील काही तालुक्यात व अनेक गावात साहित्य आणि सांस्कृतिक मंडळे कार्यरत होती. ती काहीअंशी आजही आहेत. जिथे अशा चळवळी झाल्या त्या गावांचे योगदान अगदीच मोलाचे आणि महत्वाचे आहे.
       मराठी साहित्यात सुप्रसिद्ध असलेले "महदंबचे धवळे" हे आद्यकवयित्री महदंबा ऊर्फ़ महादाईसाची ही निर्मिती आहे. मराठी साहित्यातील "महदंबेचे धवळे " टाळून साहित्यविश्वाला पुढे जाताच येत नाही, याच महदंबा आद्यकवयित्रिचा जन्म जालना जिल्ह्यातील (पूर्वीचा अंबड ) व आत्ताच्या घनसावंगी तालुक्यातील 'रामसगाव' येथील आहे. महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी यांच्या 'महदंबा' ह्या आवडत्या शिष्या होत.
      परतूर तालुक्यातील 'जांब समर्थ 'हे गाव 'दासबोध' लिहिणारे संतकवी रामदास स्वामी यांचे जन्मगाव होय. त्यांनी मनाचे श्लोक, दुकांडी रामायण, करुणाष्टके अशी विपुल साहित्यनिर्मिती सोळाव्या शतकात केली आहे. याच परतूर तालुक्यातील आष्टी गावातील संतकवी लक्ष्मण महाराज यांनी पाचशेपेक्षा जास्त अभंगाचे लेखन केले आहे. नंतरच्या काळात १७ व्या शतकातील आनंदी  स्वामी महाराज, रंगनाथ महाराज, मकाजीबुवा यांच्यासह १९ व्या शतकात वळणीचे काळुबुवा महाराज यांनी लिहिलेल्या पारंपारिक व आध्यात्मिक लेखनाची प्रेरणा येथील मराठी साहित्य लेखकांना मिळाली आहे.
      संगमुळी घराण्याकडून लिहिला गेलेला 'व्यंजन भागवत' ग्रंथ त्याचप्रमाणे "शृंगारसागर" हा बाळकृष्णबुवा चिखलकर यांनी लिहिलेला ग्रंथ तसेच - रेणुकादास धुमाळे यांनी 'संत सखुबाई' व 'राजा हरिश्चंद्र ही नाटके लिहिली होती. अॅड. स. कृ.निरखी यांचे 'हस्तलिखित' 'कृष्णमंदिर'. अॅड. श्री द.ग. देशपांडे यांचे 'आत्मोन्नती' हे मासिक तसेच अॅड माणिकराव परळीकरांचा 'मानवेंद्र सावरकर' हा ग्रंथ आणि लेखक श्री.ना. हुधार यांचे आध्यात्मिक लेखन. ही सगळी लेखक मंडळी जालना जिल्ह्यातीलच आहेत. ह्या निवडक नोंदी संक्षेपाने घेतलेल्या आहेत. आणि त्या स्वातंत्र्यपूर्वकालीन आहेत.
       जालना जिल्हयातील व सध्याच्या परतूर तालुक्यातील सातोना हे गाव प्रसिद्ध साहित्यिक, कवी बी.रघुनाथ (भगवान रघुनाथ कुलकर्णी) यांचे असून त्यांचा जन्म १९१३ स्वातंत्र्यपूर्व कालातील आहे. त्यांची प्रसिद्ध पुस्तके म्हणजे "नागझरीचे पाटील, फकिराची कांबळी, राधा, साकी, खाटकाची गाय, 'छागल' हे कथासंग्रह आडगावचे चौधरी, 'जगाला कळले पाहिजे, व 'म्हणे लढाई संपली "आदी कादंबऱ्या प्रसिद्ध. तसेच 'पुन्हा नभाच्या लाल कडा, किंवा 'मराठवाडी लेणे, 'आलाप आणि विलाप' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. बऱ्याच कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी बी. रघुनाथ जालना जिल्ह्यातीलच.
       जालना जिल्ह्याने अनेक नामवंत, कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, कादंबरीकार, कथाकार  दिले. जालना जिल्ह्याने दिलेल्या साहित्यिकांमुळे साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडली ती स्वातंत्र्योत्तर कालखंडात.
       मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्योत्तर कालात लेखन करणारे लेखक, कवी डॉ. शिवाजीराव गऊळकर यांचा 'अपर्णा' काव्यसंग्रह प्रसिद्ध तसेच त्यांचा' 'जालहनापूरचा हकिकतनामा', साधना, उपासना, गोविंदभाई श्रॉफ वरील 'निर्मोही' हा चरित्रग्रंथ' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. जालना शहरातील दिवंगत साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार प्रा.भगवान काळे त्यांची प्रसिद्ध असलेली कादंबरी 'कर्मरेखा' 'संत जगमित्र नागा, 'संदर्भग्रंथ-मराठवाडा सारस्वत, 'मराठवाडा काल आणि आज, 'आपला जालना जिल्हा "तसेच राष्ट्रगुरू समर्थ रामदास, 'श्री महागणपती राजुरेश्वर अशी त्यांची साहित्य संपदा प्रकाशित आहे.
        जालना शहरातील कवी, कथाकार म्हणून किशोर घोरपडे यांचे 'दलदल आणि 'खळाळ' हे कवितासंग्रह तर 'धग' हा कथासंग्रह व 'मालक', 'आता फसायचं नाही' ह्या एकांकिका. यांसह 'नवे कीर्तन, सोयरीक, 'पिंजरा' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक ठिकाणी कविसंमेनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. यांचेच समकालीन नाटककार डॉ.रुस्तुम अचलखांब यांचे 'गावकी' हे आत्मचरित्र, अभिनयशास्त्र, कैफियत, रंगबाजी, ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा 'अब्राईत' हा कवितासंग्रह आणि "आंबडेकरी शाहीरीचे नवेरंग" ह्या सांगितीकीचे प्रयोग दिग्दर्शन व लेखन. 'कैफियत' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर गाजले. महाराष्ट्राला परिचित असणारे फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे प्रवक्ते प्रा.डॉ.प्रल्हाद जी. लुलेकर हे अंबडचे ते एक वक्ते, लेखक, समीक्षक, वैचारीक लेखक आहेत. त्यांचे 'मोगडा' हे पुस्तक विविध बलुतेदार जाती कामगारांचा वेध घेणारे आहे, 'आले ढग गेले ढग' हा कवितासंग्रह, वेधक आणि वेचक, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, हे समीक्षाग्रंथ, वेदनांचा प्रदेश, जातक (दत्ता भगत यांच्या गौरवग्रंथाचे संपादन, 'प्रतिमेचे प्रदेश, 'पंचधारांचा प्रदेश,' 'मराठवाड्यातील साहित्य (संपादन) 'साहित्याचे सांस्कृतिक संचित'. ही साहित्यसंपदा प्रकाशित असून दलितेत्तरांसाठी डॉ.बाबासाहेब आंबडेकर या पुस्तकाने विक्रीचा विक्रम केला आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा दोन पुस्तकांना पुरस्कारही मिळाला आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाचे, व विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्याने अगदी सामान्य माणसांची वेदना शब्दांकित केली आहे. मराठवाड्यातील साहित्याची आणि साहित्यिकांची दखल घेऊन प्रोत्साहन देणारे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व.
       मूळचे जालन्याचे;परंतु सेलू येथे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरीत झालेले नंतर पुणे येथे रमलेले दिवंगत जेष्ठ साहित्यिक कवी, लेखक, समीक्षक, ललित लेखक प्रकाश कमतीकर यांचा साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. त्यांचे ललित निबंधसंग्रह "समांतर काव्यसमीक्षा, शब्दुली कथासंग्रह, तसेच 'आत्मबिंब' हे नाटक व शब्दांकित काव्यसंग्रह प्रकाशित असून ललित लेखनात त्यांचा चांगला हातखंडा होता.
      रेखा बैजल या जालना शहरातील प्रसिद्ध कथालेखिका, कादंबरीकार, कवयित्री, नाटककार आहेत. त्यांच्या विज्ञानकथा, तपस्या, मानस, किडनॅपिंग, 
स्वप्नस्थ, आदिम, स्पंदन, 'पक्षी जाय दिगंतरा, हे कथासंग्रह तर देवव्रत, अग्निपुष्प, युगावर्त, तृप्ता, प्रकाशाची फुले, जलपर्व, या कादंब-या याशिवाय आकाशओढ, 'भिंत काचेची' ही नाटके आणि मम्मीरोबो व आदिम' या एकांकिका असे विपुल लेखनासह - "काटा रुते कुणाला' या चित्रपटाचे लेखन त्यांनी केलेले आहे. जालना शहरातील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांची ख्याती आहे.
      दिवंगत कवी बलवंत धोंगडे यांनी जालना शहरातील साहित्य चळवळीला
रंग भरला, त्यांच्या 'रंग ओले जपताना,' सावल्या, सांजवनातील कविता हे कवितासंग्रह प्रकाशित असून 'कवितेसाठी एक दिवस 'या कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते. कवितेसाठीचा हा सोहळा अनेक रसिकांच्या ध्यानात आहे. 
      कवी, नाट्यलेखक, अशोक लोणकर
यांचा 'काजळखुणा व "सैराट मनाच्या अपरंपार आभाळात" हे काव्यसंग्रह प्रसिद्ध.
      जयंत आंबेकर यांचा उपदर्शन' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित. लक्ष्मीकांत प्रामाणिक यांचा सरोवर. विद्या अनगरकर' यांचे 'न संपणारं स्वगत, तसेच एहत्तेशाम देशमुख यांचे " कुंपणातील ' प्रकाशित.
       आम्ही कवितेचे देणे लागतो या निख्खळ भूमिकेतून लेखन करणारे व कवितेसाठी चळवळ चालविणारे कवी प्रा. जयराम खेडेकर यांचे ऋतुवंत, मेघवृष्टी हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून ते दरवर्षी "कवितेचा पाडवा" हा कवितेसाठीचा कार्यक्रम आयोजित करतात. कवितेसाठी "ऊर्मी" नावाचे द्विमासिकही ते चालवितात. त्यांच्या 'मेघवृष्टी' कवितासंग्रहाला महाराष्ट्राचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे.
      मराठी विषयाचे व्यासंगी अभ्यासक, समीक्षक, प्रवक्ते डॉ. देवकर्ण मदन हे बदनापूर तालुक्यातील केळी गव्हाण येथील. तसेच साहित्यातले अनेकांनी गुरु मानलेले कुरुंदकर यांचे गुरु प्रा.भालचंद्र महाराज कहाळेकर हे परतूरचे असून 'हरिश्चंद्राख्यान' हे पुस्तक त्यांनी संपादित केले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य भगवंतराव देशमुख यांचा जन्म परतूर तालुक्यातील पारडगाव येथील.
      रंगभूमीवरील अभिनेत्री अनुया दळवी यांचा जन्म जालना शहरातीलच. रुपचंद्र काकडे यांचा' ओंजळ' यासह हिंदी रचनांची अनेक पुस्तके प्रसिद्ध. ऐथानिया निर्मल यांचा भक्तिज्योत. उत्तम वावस्कर यांचा 'हिरवे जग', ल.मा खरात यांचा "गायरानातल्या कविता"प्रकाशित. सिल्वर मुलुकवाड यांचा 'फोकस' हा संग्रह.  महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.जी. ए. उगले यांचे 'महात्मा फुले- एक मुक्तचिंतन, महात्मा फुले आणि ज्ञानोदय हे ग्रंथ. याशिवाय सत्यशोधक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असून सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
      डॉ.संभाजी खराट यांनी 'सत्यशोधकी जलसे, शेतक-याचा कैवारी, लोकरंग' सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि निर्मिक, सत्यधर्म, हुकुमशहा, 'संत गाडगे महाराज' ही ग्रंथसंपदा प्रकाशित. रेवगाव येथील प्रा.राम कदम यांच्या 'पारडं" कथासंग्रहाला 'बाबुराव बागुल पुरस्कार प्राप्त.
       जालन्याचे पत्रकारिता क्षेत्रातील आणि साहित्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.डॉ.रावसाहेब ढवळे यांचे 'सत्यशोधक वसा आणि वारसा, शोकात्म प्रेमकहाणी, प्रणयरंग, प्राक्तनाची कोरीव लेणी' ही पुस्तके प्रसिद्ध. त्यांनी जालना जिल्ह्याचे वृत्तांत लेखन आणि वाचन औरंगाबाद आकाशवाणीवरून केलेले आहे. जालना शहरात अनेक वर्षे वास्तव्यास असलेले कवी गीतकार प्रा.डॉ.दासू वैद्य यांचा "तूर्तास' 'हा काव्यसंग्रह व नुकताच 'मेळा 'हा' ललित लेख संग्रह प्रकाशित झाला आहे. चित्रपट गीतकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. साहित्य, नाटक, चित्रपट, चित्रकला अशा विषयात त्यांना रुची आहे. सध्या ते औरंगाबाद विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत. प्रा.डॉ.उत्तम अंभोरे यांचा 'पत्ता बदलत जाणारा गनिम' आणि 'धगीवरची अक्षरं' आणि "गनिम" हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित व "कथा बुद्ध जगाच्या" हा कथासंग्रह प्रकाशित. ते सध्या औरंगाबाद विद्यापीठात इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  मराठी साहित्यात जालन्याचे कवी, समीक्षक- प्रा.डॉ.केशव सखाराम देशमुख यांची साहित्यकृती म्हणजे पाढा' हा कवितासंग्रह, 'भाषा चिंतन, तंतोतंत, अथक, 'चालणारे अनवाणी पाय, गाथा, ' ही पुस्तके प्रसिद्ध असून ते सध्या स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत. या विद्यापिठात सध्या कार्यरत असलेले मराठीचे प्रपाठक प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर है परतूर तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील आहेत. कवी, समीक्षक, कथाकार, अनुवादक, भाषांतकार त्यांचे "गाव आणि शहराच्या मधोमध, 'सृजनपंख, 'जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, 'खजिना आनंद कथांचा, ही पुस्तके प्रकाशित.
   कवयित्री रेखा गतखणे (जाधव) यांचा कुंकू आणि 'माझ्या आठवणीचं गोदण' हे काव्यसंग्रह प्रकाशित.  सौ.रत्नमाला मोहिते (जाधव) यांचा 'गंध ओल्या मातीचा " हा कवितासंग्रह. अॅड. विठ्ठल काष्टे यांचा 'तुझ्या-माझ्यातले' हा काव्यसंग्रह प्रकाशित. सदाशिव जोशी यांचा 'सुगंध.   प्रकाश ताडले यांचा 'स्पर्शुली' प्रल्हाद सोळुंके यांचा 'मळवट 'संभाजीराव भाले याचा "वाटेवर आयुष्याच्या.  शैलेन्द्र टिकारिया यांचा "स्वप्नात, थवे चातकाचे' हे काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांनी अडीचशेच्या पेक्षा जास्त नाटकांना स्वरसाज चढविला आहे.
     कवी आणि गझलकार सुनिल लोणकर यांचा " दिवस कवितेचे' विस्तव, वास्तव आणि ती' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. प्रा. पंढरीनाथ सारके यांचा "मनाचे वारुळ "हा ललित लेखसंग्रह. प्रा. मुरलीधर गोल्हार यांचे 'प्रश्नांकित आणि उध्वस्त' ही नाटके आणि अनेक नाटकामधून भूमिका करणारे हे रंगकर्मी आहेत..प्रा. बसवराज कोरे यांचे 'मन्मथस्वामी गाथा आणि शब्दशिल्प' या  पुस्तकांचे संपादन,अनेक पथनाट्यात महत्वाची भूमिका व प्रबोधन कार्य. अनेक वृत्तपत्रातून स्फुट लेखन प्रकाशित.
       नारायणराव मुंढे यांचे, 'मागे फिरा पतंगांनो" हे पुस्तक. रेखा नाथ्रेकर यांचे 'अक्षर.  राम गायकवाड यांचे 'ठणक' आणि 'उसवताना' हे काव्यसंग्रह व स्फुट लेखन प्रकाशित. कवी, कथाकार, नाटककार म्हणून डॉ.प्रभाकर शेळके यांची ओळख साहित्य क्षेत्रात सर्वदूर आहे. त्याचे 'सारं करपलं रान आणि 'जातीअंताचे हुंकार" हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत या दोन काव्यसंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. व्यवस्थेचा बैल आणि खोसाटा हे कथासंग्रह तर कोरोना राक्षस बालनाट्य व मातेचं लेकरू बालकथासंग्रह आणि आंबेरकरी एकांकिका ही पुस्तके प्रकाशित आहेत. कवी कैलास भाले हे दरवर्षी एक कविसंमेलन घेऊन आपल्या मातोश्रीच्या स्मृतिप्रित्यर्थ चांगल्या साहित्यकृतीला  पुरस्कार देतात, ही सुध्दा कवितेसाठीची एक चळवळ आहे. त्यांच्या नावे 'पोळणाऱ्या सावल्या" अस्वस्थ हे काव्यसंग्रह असून पोळणाऱ्या सावल्या या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला आहे. सदरहु संग्रहातील कवितेचा समावेश विद्यापीठीय अभ्यासक्रमात झालेला आहे.
     कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी कवितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे 'फुटवे, चिगूर, अरुंद दारातून बाहेर पडताना, 'आणि 'झरे मोकळे झाले' ही पुस्तके प्रकाशित आहेत.  प्रा. सुरेखा मत्सावार यांची 'कशिदा, रानपाखरं, कर्दळी, गुलबक्षी, लक्ष्मणरेखा, रानझुला,"राजस्वप्न" किनारा व स्वप्नांच्या अलिकडले' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रा. राजकुमार बुलबुले, कवी एकनाथ शिंदे, कवयित्री ज्योती धर्माधिकारी यांचा साहित्यातील सहभाग मोलाचा आहे.
मोहन हिवाळे, अशोक घोडे, गणेश कंटुले, शंकर बावणे, दिगंबर दाते, साहील पाटील, श्रीकांत गायकवाड,
बाबासाहेब गोन्टे,मिलींद घोरपडे, स्वाती बालूरकर, मारोती घुगे, हनुमंत घोरसड, नारायण खरात, मंगला धुपे, कैलास रत्नपारखे, विजय जाधव, प्रा. रेणुका भावसार, कवी राम सुपारकर, राम रौनेकर,  पंडित रानमाळ,  अजय देसाई, जगन्नाथ काकडे, गोपाळ तुपकर,श्रीमंत ढवळे,मोईनुद्दीन सिद्धिकी, संजय सरदार, कवी-पत्रकार विनोद जैतमहाल, बंडू काळे, कवी गणेश खरात. कवी गीतकार, विनायक पवार, अण्णासाहेब शिकारे, राज माळवदे, मिलींद अवसरमोल, अशा अनेक नवोदितांची व प्रथितयश लेखक, कवीं नावे सांगता येतील.
       प्रा.बी.वाय. कुलकर्णी यांचे वैचारिक लेखन सामाजिक आणि राजकीय निश्लेषण करून व्यवस्थेवर प्रकाश टाकणारे लेखक व व्याख्याते आहेत.
   कवी,चित्रकार, समीक्षक, प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी अनेक लेखकांच्या पुस्तकांची परीक्षणे, मुखपृष्ठे व रेखाटने केलेली आहेत.  प्रा.के.जी.सोनकांबळे, रमाकांत कुलकर्णी, प्रा.दादासाहेब गिऱ्हे "प्रा.सुभाष चव्हाण, सूर्यकांत सराफ, श्रीकृष्ण काळे, मनोहर भारंबे, विजय पाटील, शंकर परचुरे, प्रा.श्रीहरी धोंड ही मंडळी जालना जिल्ह्यातीलच. यांनी दिलेले साहित्यातील विशेष योगदान महत्त्वाचे आहे.
      अक्षय घोरपडे हे नव्या पिढीचे समीक्षक आणि कवी, त्यांचा 'निर्मितीचे मुल्यांकन' हा समीक्षाग्रंथ व 'प्रज्ञेची मुळाक्षरे' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
     कथालेखिका म्हणून सत्यशिला तोर, कवी, कथाकार शिवाजी कायंदे. कवी, वात्रटिकाकार लक्ष्मीकांत दाभाडकर, कवयित्री मंगल धुपे, कवी दिपक राखुंडे, सुनिल पवार, रामराव रिंढे, डॉ.गणेश साबळे, कवी सुहास पोतदार, प्रा.अशोक खेडकर, प्रा.उध्दव थोरवे, प्रा.विद्या भिल्लारे डॉ. राम रौनेकर, ग.कि.मगरे, प्रा.अनिरुद्ध मोरे, कुणाल दहिवले, अर्जून शेज़ुळ, संजय सरदार, संजय काळे, ललितलेखक विनोद वीर, संतोष दह्याळकर, दिनेश पाचारे, प्रा. मुमताज देशपांडे,  प्रा.पंडित रानमाळ, कवी, पत्रकार सुहास सदाव्रते, वैचारिक लेखन करणाऱ्या प्राचार्य डॉ.सुनंदा तिडके, प्रा.डॉ.यशवंत सोनूने, कवी गोवर्धन मूळक, कवयित्री रसना दहेडकर, कवी,  किशोर भालेराव, शिवाजी तेलंग यांच्यासारख्या साहित्यिक मंडळींनी जालना जिल्ह्याच्या साहित्य चळवळीला बळ देऊन जीवंत ठेवले आहे.
       साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, साहित्य मंडळे, प्रतिष्ठाने, प्रसार माध्यमे, साप्ताहिके, दैनिके, मासिके, त्रैमासिके यांची भूमिका साहित्यिक घडविण्यासाठी खूप मोलाची ठरली आहे.
      कवी आणि कथाकारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संपादक विनायक दहातोंडे यांनी १९९१-९२ पासून केले आहे. किंकाळी "नावाचे मासिक हे नवोदितांच्या दर्जेदार साहित्याला प्रसिद्धी देऊन लेखक, कविंना नावारूपाला आणले.  दैनिक आंदोलन, दैनिक दुनियादारी, दैनिक रामविचार, या वृत्तपत्रांनीसुद्धा दिवाळी अंकातून नवोदिताना न्याय दिला आहे.
        जालना जिल्ह्यात केवळ मराठी साहित्याचेच लेखक,कवी निर्माण झाले असे नाही, तर जालना शहरात हिंदी, ऊर्दू, इंग्रजीतून लेखन करणारे लेखक, कवी विचारवंत आहेत. जालन्यात ऊर्दूचा वेगळा आविष्कार गझल, व मुशायऱ्याच्या कार्यकमातून दिसून येतो. यामध्ये फकरे महाराष्ट्र, शम्स जालनवी, शकील जालनवी, मेहरा युसूफ काविश, रज्जाक तालीब, कासीम खालीब, उरुज महमद, अन्वर जालनवी, अब्दुल कदीर, 'लहर, इसाखाँ गाझी, प्रा.अब्दुल रहीम 'अरमा', हमीद अली शरीफ, सुनिल लोणकर 'दर्द' अशी शायर मंडळी गझल लेखन आणि गझल मुशायऱ्यात सहभागी होतात, कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. कवी गझलकार कै.राय हरिश्चंद्रजी दुःखी यांच्या नावाने तर साहनी परिवार साहित्यिकांना गुढी पाडव्याच्या दिवशी पुरस्कार देऊन सन्मान करतात.
     डॉ.राम अग्रवाल व डॉ. ई.व्ही रामकृष्णन यांचे साहित्यलेखन इंग्रजी माध्यमातून होते, तर हिंदी साहित्याचे लेखक अभ्यासक म्हणून डॉ.शांतीलालजी जैन, पंडित गंगाप्रसाद विष्णुजी शर्मा, रामकृष्ण "शोला", प्रा.विजयकुमार शर्मा, शांतीलाल बरलोटा, शिवकुमार बैजल, शशिकांत पटवारी, जगन्नाथ सिंह परिहार, या लेखक, कवींचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो.
       एकपात्री प्रयोगाचे लेखन, सादरीकरण करणारे नाटककार प्रा.संजय लकडे यांनी "धुमील की पटकथा" 'हा एकपात्री नाट्यप्रयोग केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर पं.बंगाल,आसाम, आंध्रप्रदेश, हिमाचल आदी राज्यात जाऊन जालन्याचे नाव गाजवले. प्रा.संजय लकडे यांचे मराठी साहित्यातही योगदान उल्लेखनीय आहे.
           जालना जिल्ह्यात त्रैभाषिक कविसंमेलनांचेही आयोजन केले गेलेले आहे. जालना शहरातील नाट्यांकुर, श्रेयस, मराठवाडा नाट्य परिषद, कैवल्यसंवाद, कलोपासक, न्यायश्री, प्राची मत्स्योदरी थिअटर्स, याच शहरासह जिल्हयात, सेवली, जाफ्राबाद, गुंज, भणंग जळगाव, पारध, नालेवाडी यांच्यासह मंठा, हेलस, पाटोदा, वझर सरकटे, ढोकसाळ, अशा काही गावांची नावे घेता येतील.
        जिल्हयातील बऱ्याचशा गावामध्ये कलावंत मंडळी होती.त्या मंडळींनी नाटक ही कला जपली होती, जोपासली होती. अलिकडे नाटककार म्हणून राजकुमार तांगडे व सतिश खरात यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
        नाटकांपेक्षा साहित्य मंडळे दीर्घकाळ कार्यरत होती, ती आजही आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, बदनापूर, अंबड, घनसावंगी आदी तालुक्यांनी साहित्य संमेलने, कविसंमेलने घेतली. परतूरचे कवी भिवराजी आढाव अगदी १९८५-८६ पासून साहित्य संमेलने, कविसंमेलने, काव्यस्पर्धा घेऊन नवोदितांना प्रोत्साहन देत असत.  भिवराजी आढाव यांनी परतूर येथे आविष्कार साहित्य मंडळाची स्थापना करून ते नियमित कवी संमेलनाचे आयोजन करीत असत. खूप साहित्यिक मंडळी त्यांच्या कार्यक्रमात हजर असायची. प्रा. सुभाष चव्हाण, वि.रा.पवार प्रा.भगवानरान दिरंगे, आर.डी खरात, प्रदीप चव्हाण, अशोक बोर्डे, मंगेश मोरे, अजय देसाई, राजकुमार भारुका आदी नवोदितांच्या सहभागातून परतूर शहरात ही साहित्य चळवळ चालू होती आता भिवराजी यांचे चिरंजीव रमेश आढाव ही चळवळ चालवतात. भिवराजी आढाव यांचे दोन कवितासंग्रह, एक वात्रटिकासंग्रह "आई" सूर्यफूल, लाडीगोडी' हे कवितासंग्रह व एक कथासंग्रह प्रकाशित आहे. कवी भिवराजी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर पदरमोड करून लघुपटाची निर्मिती केली होती. दिवंगत कवी भिवराजी आढावानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रमेश आढाव यांनी अनेक छोटीमोठी साहित्य संमेलने, कविसंमेलने घेऊन वारसा चालवला. त्यांच्या नावे दरवर्षी संमेलन घेतले जाते.
      आविष्कार साहित्य मंडळाची शाखा मंठा शहरात १९९२ ला स्थापन झाली. कवी धोंडोपंत मानवतकर, विवेक सोनटक्के, म.वि.हिंगे, सदाशिव कमळकर, प्राचार्य के.पी. इंगळे, प्रा.शोभा डहाळे, पी.टी प्रधान, प्रा.प्रदीप देशमुख, पी.व्ही.तालीमकर, अरूण चव्हाण, राजकुमार कुलाल, अनिल पांडे, संतोष मोरे, शिवाजी जाधव, बाबुजी तिवारी, बालासाहेब वाघमारे, ओमप्रकाश राठोड, प्रा.अशोक पाठक, प्रा. अशोक खरात आदी साहित्यप्रेमींनी मंठ्यातील आविष्कार साहित्य मंडळाद्वारे दिग्गजांना बोलावून तीन साहित्य संमेलने व दरवर्षी कविसंमेलने घेऊन ३० वर्षे साहित्याची चळवळ जोपासली.
       या मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. धोंडोपंत मानवतकर यांचे अंतरसाक्षी, रुपांतर, 'ओढाळ सुरांच्या देही' व 'लोकशाहीचा जाहीरनामा', हे चार कवितासंग्रह,  'काव्यप्रभा' व विद्रोही साहित्याचा निर्माता' हे दोन संपादित पुस्तके असे एकूण सहा पुस्तके प्रसिद्ध असून त्यांचा अनेक कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे.त्यांनी अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. समाजभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांने ते सन्मानीत आहेत.
           ते 'साहित्य शिरोमणी हे त्रैमासिक चालवितात, त्यांची कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, संपादक,प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ता व सध्या मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. या मंडळाचे प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांचे "अंतरीच्या गूढगर्भी" व "इतिहासकार लोकहितवादी" ही दोन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा नेहमी सामाजिक उपक्रमात सहभाग असतो.  प्रा.प्रदीप देशमुख यांचा 'उतरंड' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून त्यांची सामाजिक विषयावर जिल्ह्यात अनेक व्याख्याने झाली आहेत. सुंदर सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंठा व परतूर शहरात ज्यांची कवी,कलावंत म्हणून ओळख असलेले प्रा.अशोक पाठक यांचे 'मी अंश त्या गर्भाचा', पक्षी उडून जातात व "सलत राहतं काहीतरी" हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. मंगरुळ ता. मंठ्याचे कवी, कथाकार शिरीष पद्माकर देशमुख यांचा  "बारीक सारीक गोष्टी" व 'फरदड ' हे कथासंग्रह प्रसिद्ध असून या कथासंग्रहाला नुकताच कविवर्य नारायण सुर्वे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातून या कथासंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तळणीचे सचिन चौकसकर यांचा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून अ.भा. साहित्य संमेलनाच्या गझल संमेलनात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. तळणीचे दिवंगत कवी पि.यु.सरकटे यांचा 'निळकंठ' 'काव्यसंग्रह प्रकाशित. आविष्कार मंडळाचे सदस्य तळणीचे प्रदीप ईक्कर यांचाही "हिरवा पांडुरंग" हा ग्रामीण काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तळणी परिसरातील दत्ता खुळे, श्रीराम गडदे, डॉ. गोपाळ तुपकर हेही काव्यलेखन करीत आहेत. अनिल उ. खंदारे किर्लेकर यांनीसुद्धा अनेक साहित्यिक कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला आहे. सध्या ते पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
         परतूरचे प्रा.डॉ.भगवान दिरंगे यांचे वैचारिक लेखन, परतूरले प्रा.डॉ.अशोक देशमाने हे सध्या डॉ.बा.आं.मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून असून त्यांचा "वारकरी आविष्कार" हा ग्रंथ प्रकाशित. सध्या डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ.दासू वैद्य ह्यांनी  जालना शहरातल्या साहित्य चळवळीत मोलाची भर घातलेली आहे. 
        प्रा. शरद बोराडे, प्रा. सखाराम टकले, यांचा कविसंमेलनात सहभाग, प्रा.सुभाष चव्हाण यांचा सहभाग आणि परतूरच्या साहित्य संमेलनाचे संयोजन व यातील सक्रीय सहभाग साहित्य-चळवळींना बळ देणारा आहे.
        वाटूर येथे प्रा.रंगनाथ खेडेकर यांनीही एक दिवसीय साहित्य संमेलनाचे व काही वर्ष कविसंमेलनाचे आयोजन केले होते. 
बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथे  पांडुरंग गिराम या कवीने पदरमोड करून चार-पाच साहित्य संमेलने घेतली. प्रा.डॉ.सर्जेराव जिगे, प्रा.शिवाजी हुसे, प्रा.डॉ.शशिकांत पाटील, प्रा.भारतभूषण शास्त्री, कवी राम गायकवाड यांच्या पुढाकारातून आणि कवी पांडुरंग गिराम यांच्या अथक परिश्रमातून शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलने दरवर्षी होत होती. अनेक दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती. कवी पांडुरंग गिराम यांनी रोशणगाव येथे संमेलने घेऊन साहित्य चळवळ जोपासली.
      घनसावंगी येथील ए. एम. जोशी यांनी संमेलनाचे आयोजन केले नवोदिताना याद्वारे ऊर्जा दिली. कवी नारायण खरात, कवी, अशोक डोरले यांनीही कवी संमेलनाचे आयोजन करून नवोदितांना विचारपीठ मिळवून दिले आहे. जालना शहरातील व  जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीमुळे नव्याने लिहिणारे कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, ललितलेखक, समीक्षक पुढे आले. म्हणून कुठल्याही चळवळीत सातत्य आवश्यकच असते.
      या स्मरणिकेसाठी अत्यंत कमी वेळेत  हा साहित्यिक लोकांचा ओझरता घेतला आहे. जालना जिल्ह्यात नव्याने लिहिणाऱ्या किंवा प्रस्थापित लेखक, कवींची नावे या लेखात राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबद्दल मनस्वी दिलगीर आहे. पुढील लेखात आवर्जून सर्वांचा विस्ताराने उल्लेख करण्याचा प्रयत्न राहील.
       मंठा शहरात पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २८ व २९ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन घेत आहेत  अनिल उ. खंदारे व पत्रकारमित्र भरत मानकर यांच्या पुढाकारातून नवोदितांना व्यक्त होण्यासाठी एक हक्कांचे विचारपीठ उपलब्ध होत आहे.
     मंठा शहरात आविष्कार साहित्य मंडळाने १९९४ ते १९९७ या कालावधीत एकदिवसीय तीन साहित्य संमेलने घेतली..त्यानंतर २६ वर्षानंतर हे नवोदितांसाठी होणारे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मंठेकरांसाठी एक ऐतिहासिक दस्तावेज़ ठरावा या प्रांजळ अपेक्षेसह या नवोदितांच्या मराठी साहित्य संमेलनासाठी मनःपूर्वक लाख शुभेच्छा..!

पूर्व प्रसिद्धी 
२९ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, 
वावर स्मरणिका-पृ क्र.१४ ते १८
मंठा, जि.जालना...
✍️

 डॉ.धोंडोपंत मानवतकर

लेखक जालना जिल्ह्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक, व सामाजिक चळवळीचे  सक्रीय साक्षीदार आहेत.

शनिवार, १८ जून, २०२२

पुस्तक परीक्षण


पुस्तक परीक्षण


स्त्रीच्या अभिज्ञ जाणिवांचे मर्मसंचित- 

'प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे '

डॉ.धोंडोपंत मानवतकर

 


कवयित्री आशा अशोक डांगे यांचा " *प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे'* हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या अगोदरच्या 'परिघाबाहेर' या काव्यसंग्रहातील कविता अभ्यासकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
        स्वानुभूतीच्या जाणिवांची स्पंदने अंतर्मनाच्या गाभाऱ्यात अनेकांगी आवर्तने निर्माण करतात तेंव्हा कविच्या मनोभूमीत हुंकाराचं शब्दसंचित नोंदवलं जातं आणि तीच असते कविच्या कवितेची निर्मिती.
      आशा डांगे यांच्या 'प्रिय,हा कण गॉड पार्टिकल आहे" या दुसऱ्या संग्रहातील कविता वाचतांना कवितेचे अभ्यासक आणि समीक्षकांना कवयित्री अनुराधा पाटील आणि वृषाली किन्हाळकर यांच्या कवितेची आठवण व्हावी अशा धाटणीच्या कविता प्रस्तुत संग्रहात समाविष्ट आहेत.
        अलीकडे संहितानिष्ठ भाषेच्या अंगाने जाणारी दर्जेदार कविता लिहिणारा वर्ग संख्येने कमीच असला; तरीही गेल्या तीन चार दशकांपासून मराठवाड्यातील अनेक कवी, कवयित्रींच्या नवकवितेने मराठी काव्यसृष्टीला नवा आयाम आणि नवे परिमाण दिले आहे. अनेक कवयित्रींकडून नव्या जाणिवांसह नवा सृजनाविष्कार उत्कटतेने शब्दबद्ध होतांना दिसतो आहे.
         आशा डांगे यांच्या या संग्रहातील कविता समाजातील अविवेकी व स्वार्थी वृत्तीचा शोध आणि वेध घेणाऱ्या आहेत. वर्तमानाच्या हलकल्लोळात आजही स्त्री ही परंपरेने घालून दिलेल्या जोखडाचीच पाठराखण करताना दिसते आहे..म्हणून कवयित्री लिहिते...
     "चतुर्थीचा चंद्रही तू
      उपवास सोडण्याकरिता
      असलेला विधी म्हणून
      शोधत असतेस  !"
            का नाही भरून घेत 
            दोन्ही कवेत 
            खिडकीबाहेरून
            दिसणारं हे 
            अनंत आकाश..?

अनेक कविंच्या कवितेतून केवळ प्रश्नांचीच मालीका उभी केली जाते; मात्र कवयित्री आशा डांगे आपल्या कवितेमधून परंपरावादी जोखड झुगारून मुक्त होण्यासाठीचा सल्ला आणि तेवढ्याच ताकदीचा पर्यायही देतात,स्त्रीच्या स्वत्वशोधाची पायवाट सांगणारी परिभाषा उपरोक्त  कवितेत दिसून येते. 
      प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या शीर्षककाव्याच्या काव्यपंक्ती अशा...

       माझा पैस तुझ्यासाठी

       विस्तीर्ण करत गेले मी...

       तुझा कण आपोआप

       पसरत गेला माझ्यात

      ..............

       'प्रिय, हा कण

       अनादिकालापासून

       गॉड पार्टिकल आहे

       हे कसं 

       विसरतोस तू..!

'प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे' हे या संग्रहाचे नामाभिधान वाचकांना वरवर भ्रमित करणारे वाटेल; त्याबाबतचा उलगडा करणे अपरिहार्यच वाटतो.  सृष्टीची निर्मिती जशी एका सूक्ष्म कणापासून झाल्याचे संशोधनात आढळले..तीच प्रक्रिया सृष्टी आणि सजीवसृष्टी यांच्या बाबतीत साम्य दर्शविते. सजीवांची निर्मितीसुद्धा एकाच सूक्ष्म कणापासूनची आहे, म्हणून ती गॉड पार्टिकल आहे' असा मथितार्थ प्रस्तुत संग्रहाच्या नामाभिधानाशी अनुबंधित होतो.
       संग्रहातील बहुतांशी कवितेतील भावाभिव्यक्ति ही स्त्रीच्या अभिज्ञ जाणिवांचे मर्मसंचित होय.!  जे स्त्रीच्या संयमी आणि शोषिक मनाचे मर्मबंध उलगडून दाखविते. 
          'वेदनेचे रसायन
          साऱ्या अंगभर 
          अभिसरत असताना
          शाश्वत त्यागाचं तू
          समीकरण मांडलंस..!

सिद्धार्थाच्या गृहत्यागानंतर यशोधरेची झालेली विरहावस्था सदोदीत होणाऱ्या विखारी दंशापेक्षा कमी नव्हती जी सिद्धार्थासारख्या पुरुषानेसुद्धा समजून घेतली नाही.. असा आशय व्यक्त करणारी कविता...
          सिद्धार्थापासून
          तथागतापर्यंतचा प्रवासही
          तुझ्या करुणेच्या
          संपृक्त वाटेवरूनच 
          झाला आहे ना यशोधरे..!

यशोधरेच्या संयमातली, शोषिक वृत्तीतली, तिच्या समर्पणातली अर्धांगिणीची वेदना सिद्धार्थच काय आजवर कोणताही पुरुष समजून घेऊ शकला नाही. कवयित्री एवढेच सांगून थांबत नाही, लोकांचा आदर्श ठरवलेल्या रामालासुदधा ती प्रश्न विचारते..
           'तू कसा रे 
           ओळखू शकला नाहीस
           अग्निपरिक्षेला' सामोरी जाणारी
           ती रामभार्या
           निष्कलंकीत आहे म्हणून...!

कवयित्रीने ऐतिहासिक व पौराणिक मिथकांच्या प्रतिमांचा आधार घेत अविवेकी वृत्तीचा खरपूस समाचार घेतला आहे.
         स्त्री पावित्र्याबाबतच्या संकल्पनाच खोट्या ठरवतांना कवयित्री आपल्या 'कवच कुंडल' या कवितेतून पुरुषांच्या स्वभावधर्माचे वाभाडे काढते. या कवितेतील कवयित्रीचा शब्दप्रहार झोंबणारा आहे.
         बाईचं नुसतं शरीर पाहून
         स्खलित होणारा तुमचा पुरूषार्थ
         मला नेहमीच जाणीव करून देतो
         मी असुरक्षीत असल्याचं...

याहीपुढे जाऊन याच कवितेत कवयित्री म्हणते........
          एक तर 
          झुगारून द्याव्या वाटतात
          योनी पावित्र्याच्या 
          निरर्थक संकल्पना..किंवा
          नेहमीसाठी षंढ कराव्या वाटतात
          वासनांध नजरा.....
या दोन्हींपैकी काहीच जमत नाही म्हणून
स्त्री तशीच गुद्मरत जगते एखाद्या कवच कुंडलाच्या शोधात प्रत्येकवेळी अंग- प्रत्यंगावरून फिरणाऱ्या नजरा झेलत..स्त्रीच्या स्वातंत्र्याचे तर सोडाच तिला तिच्या सुरक्षिततेची हमी घेणाराचीच हमी वाटत नाही... म्हणून कवयित्री म्हणते
                माझ्यातील ती
                वेळप्रसंगी
                होत असते पुरुषी

हा कवयित्रीच्या तक्रारीचा निर्भयी हुंकार आहे. तो प्रातिनिधिक स्वरूपात शब्दांकित केला आहे. 
              ही आदीम भूक
              पोटाबरोबरच बुद्धीची
              भावनेची, मनाची, तनाची
              सामाजिकतेची, प्रतिष्ठेची,
              प्रेमाची, मायेची, पैशाची,
              सुखाची, वर्चस्वाची
              ही भूक जाणीव करून देते
              अपुर्णत्वाची,
              खूप सारं असून
              खूप काही नसल्याची

या समग्र जाणीवांचे सत्व आणि स्वत्व या संग्रहातील कवितेत दिसून येते.
         तिच्या उल्हासाचे,आनंदाचेही दमन केलेल्या असतात कांही रात्री, कांही दिवस.  सुखोपभोगातला आनंदही तिच्या वाट्याला येतोच असं नाही.. 
             प्रत्येक लाटेलाच 
             कुठे जमतो किनाऱ्यावर
             तिचा इतिहास 
             कोरून ठेवायला..!

कवयित्रीने काही घटनांना नैसर्गिकवभाव नांचे घटकांच्या प्रक्रियेची प्रतिके आणि उपमा देऊन अर्थच्छटांचे भावविश्व अभ्यासकांसमोर ठेवले आहे. जे  अर्थान्वेषणालाही आव्हान देते.
        स्त्रीच्या कुस्करलेल्या भावनांचे अनेकांगी प्रस्तरं उलगडणाऱ्या कांही कवितेत पुरुषांबद्दल तक्रारीचा सूरही आढळतो. यावर कवयित्री लिहिते..."
               "माझ्या आसवांचे 
                कोणतेच संदर्भ कधीच
                उजागर होऊ दिले नाहीत मी."
हा कवयित्रीचा आंतरिक हुंकार आहे. ती पुरुषासोबत सार्वत्रिक पातळीवर लढत राहते..स्वतःची इच्छा मारून ती समर्पित होतांना त्याच्यातल्या पराभूत पौरुषी अभिनिवेषाची जाणीवही ती निर्भयपणे करून देते...
            निमूट समर्पित होताना
            तिच्यातील आंदोलनं
            कधीच जाणवू देत
            नाही बाई
                विजयाचा अविर्भाव
                मिरवणारा तो खरंतर 
                झालेला असतो 
                पराभूत स्वतः मध्येच

        स्त्री-पुरुषांच्या नैतिक,अनैतिक, सामाजिक,सांस्कृतिक बांधिलकीच्या अनुबंधाची परिमिती आणि परिणती रूपकात्मक मुखवटा धारण करते तेव्हा त्या रचनाबंधाला नियम आणि संयमाचे सात्त्विक आणि तात्विक अधिष्ठान असते.
     सामाजिक बांधिलकीच्या अन्वयासह   प्रापंचिक सहजीवनाचे गीतही ती होऊ इच्छिते...जे सजीवांच्या निरंतर ओठांवर असेल..!
         कदाचित...
         आपल्या नंतरही असेल
         आपलीच गोष्ट,      
         आपलीच गाणी गायली जातील
         सृजनाच्या उत्क्रांतीनंतर
         सृष्टीतील प्रत्येक जीवांच्या
         ओठांवर..!

    कवयित्री आशा डांगे ह्या नावाप्रमाणेच आशावादी आणि सकारात्मक ऊर्जेने काव्य लेखन करत आहेत. त्यांच्या कविता काव्यसृष्टीचा परीघ विस्तारीत करणाऱ्या आहेत. प्रस्तुत संग्रहात एकूण अठ्ठेचाळीस दर्जेदार कविता आहेत. 
      कवयित्रीच्या भावनांची ही अतुट शृंखला शब्दसंचिताच्या प्रमेयाशी सलगी करते. या काव्यसंग्रहासाठी प्रसिद्घ समीक्षक डॉ.ऋषिकेश कांबळे यांची पाठराखण लाभलेली असून डॉ.कविता मुरूमकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. कवितांचा काव्याशय चित्रबद्ध करणारी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची रेखाटने तसेच चित्रकार संतुक गोळेगावकर यांचे सुंदर मुखपृष्ठ या संग्रहाच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. कवयित्री आशा डांगे यांच्या या साहित्यकृतीचे वाचक, कवी, समीक्षक स्वागतच करतील या अपेक्षेसह त्यांच्या आगामी साहित्यकृतीसाठी मनस्वी शुभेच्छा..!

✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर



शुक्रवार, १७ जून, २०२२

तुझ्यासारख्या लबाडाचे मी गोडवे गात नाही...








तुझ्यासारख्या लबाडाचे...


मी कशाला मित्रा तुला उगाच डंख मारू,
माझी विंचवाची जात नाही 
तुझ्यासारख्या लबाडाचे, मी गोडवे गात नाही 

किती बेगडी चेहरा आहे, तुझा गड्यारे
मुखात मात्र कधी तुझ्यारे, खरी बात नाही

हप्ता घेण्याची तुझी ती, मी रीत वेगळी पाहिली 
अन् तू खुशाल म्हणतो आपला, भ्रष्टाचारात हात नाही 

अरे काल का ? तू शपथ घातली, गळ्यातल्या माळेची 
आज म्हणतो ढाब्यावरचे चालते मजला, मी घरी खात नाही 

तू रम, रमा, रम्मीने, लुटलास पुरता परंतु
पिकातल्या ओढाळ ढोरापरी, तुझी खोड जात नाही.

याला त्याला थापा मारणे, हा रोजचा धंदा तुझा
तूच तुझे का बूड बडवितो, जी तुझी अवकात नाही

डॉ.धोंडोपंत मानवतकर 



चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...