गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

आमदार बच्चूभाऊ कडू

आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची भूमिका रास्त.....आणि पवित्रा सकारात्मक. 

प्रासंगिक - डॉ.धोंडोपंत मानवतकर



























          आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व त्यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काल क्रिकेटपट्टू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. ते आंदोलन सचिन तेंडुलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीच्या विरोधात होते. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता. त्यांचे म्हणणे रास्त होते. आणि त्यांची मागणीही रास्त होती. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानणाऱ्यांची संख्या अगणित आहे. म्हणून त्यांनी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करणे गैर नाही. सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमधील योगदान पाहून त्यांना भारताने 'भारतरत्न' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानच केलेला आहे. भारतरत्न ह्या सर्वोच्च सन्मानाचे मानकरी अत्यंत बोटावर मोजण्याइतके आहेत. देशासाठी ज्यांनी फार मोठा त्याग केला आहे, फार मोठी कुर्बानी दिलेली आहे अशांना भारत सरकार 'भारतरत्न' हा पुरस्कार देते. 'भारतरत्न' हा भारत देशाची इभ्रत मोठी करणारा पुरस्कार आहे, तो पुरस्कार भारत सरकारने शहीद भगतसिंग यांना, महात्मा फुले यांना, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांना दिलेला नाही; परंतु तो सचिन तेंडुलकर यांना दिलेला आहे, असे आ.बच्चूभाऊ कडू यांचे म्हणणे आहे.म्हणून  भारतरत्न दिलेल्या सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या, जुगाराच्या जाहिराती करू नये. तो भारतरत्न पुरस्काराचा अपमान आहे, नाहीतर 'भारतरत्न' हा पुरस्कार परत करावा व खुशाल जाहिराती कराव्यात. तुम्हाला भारतरत्न पुरस्कार असल्यामुळे तुम्हाला अशा ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणे शोभणारे नाही. हा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा पवित्रा सकारात्मक होता.आ. बच्चूभाऊंचा हा विचार अतिसामान्य माणसालाही पटणारा आहे. भारतरत्न हे जर पैशासाठीच जाहिराती करत असतील तर येत्या गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी गणपतीजवळ दहा दिवस एक दानपेटी ठेवून तो सर्व निधी सचिन तेंडुलकर यांना देऊ. हा विचार खोचक नसून किंवा विरोधासाठी विरोध नसून समजावणीच्या सुरातला आहे. 
           अगोदरच अनेक कुटुंब या ऑनलाईन गेमींगच्या जाहिरातीमुळे उध्वस्त होत असल्याचे दिसत असताना तरुण पिढीला चांगले विचार देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जेणेकरून 'भारतरत्न' समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून   समाजातील तरुणांना चांगला आदर्श मिळावा, चांगली प्रेरणा मिळावी. भारतरत्न मिळालेला व्यक्ती तरुणपिढ्यांचा आयकॉन ठरावा. आयडॉल ठरावा. क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमींगच्या जुगाराच्या जाहिराती करून तरुणांची आपल्या कर्तृत्वाबद्दल असलेली अस्मिता गमावू नये. अत्यंत सरळ ,साधा, खरा विचार  आ.बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाचा होता. 
         आमदार बच्चूभाऊ कडू हे नेहमी विकृतीवर बोट ठेवत आले आहेत. त्यांची आंदोलने तरुणांचा आणि शेतकरी वर्गाचा कैवार घेणारी असतात. मात्र अनेक पुढारी हे तरुण पिढीचा वापर केवळ मागे मागे फिरण्यासाठी करतात म्हणून आजचा बहुसंख्य तरुण बेरोजगारी व महागाईच्या विळख्यात सापडलेला आहे. शेतकरी वर्ग कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडलेला आहे.
        एकीकडे भारतात कोट्यावधी तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. कमालीच्या महागाईने गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस त्रस्त आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाने गरीबांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजवले आहेत. तरुणांना चांगले शिक्षण घेण्यासाठी तारुण्य गमवावे लागत आहे. उपवर झालेली मुले, मुली कुटुंबाला आपला हातभार लागावा यासाठी नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. देशातल्या तरुणाईपुढे जगण्याचे प्रश्न आहेत. नोकरीच्या, रोजगाराच्या संधी मिळून आयुष्यात स्थैर्य कसे लाभेल यासाठी तरुणवर्ग चिंतातूर आहे.
           आजच्या तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारकडे कोणतेच ठोस कार्यक्रम नाहीत. नोकरीच्या परिक्षेच्या अर्जासाठी कोटी रुपये उकळले जातात आणि ऐनवेळी सांगितले जाते की, परीक्षा रद्द झाल्या. म्हणजे भारत सरकार तरुणवर्गाचे अशाप्रकारे शोषण करत आहे. एकतर डोक्याचा भुगा होईस्तोवर अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी करायची आणि ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्या म्हणून ऐकून घ्यावयाचे. अशा सगळ्या बाजुंनी होणारे शोषण आणि त्या शोषणाचे परिणाम भोगणारे तरुण जीवन संपविण्याचा विचार करणार नाहीत तर काय करतील ?
      कोट्यावधींची संपती असणाऱ्या एखाद्या पुढाऱ्यांने किंवा कोट्याधीश कलावंतांने, किवा एखाद्या उद्योगपतीने किंवा एखाद्या कोट्याधीश क्रिकेट पट्टूने तरुणवर्गासाठी आपल्या मिळकतीतला दहा पाच टक्के हिस्सा तरुणांच्या शिक्षणावर खर्च केला का ? दहा-पाच तरुण दत्तक घेतलेले आहेत का? उलट या तरुणांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत. तरुणांची मने भरकटवली जात आहेत. त्यांना संभ्रमात टाकण्यात येत आहे. त्यांना ऑनलाईन जंगली रम्मी सारख्या आभासी खेळाला बळी पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे समोर केले जातात. 
       जपान, चीन,अमेरिका, कॅनडाचा तरूण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. मोठमोठ्या हुद्यावर जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. मात्र आमच्या भारतातल्या तरुणांना कावडयात्रा, पायीदिंडी काढण्यासाठी पुढारी लोकांकडून पैसा पुरवला जातो. त्यांना शिक्षणापासून, परिवर्तनीय विचारापासून दूर भरकटवले जाते, त्यांच्या डोक्यात धर्मद्वेषाचे, जातीयद्वेषाचे विचार पेरण्याचे काम केले जाते. तरुणांची मने भरकटवण्यामागे सत्ताधारी लोकांचा स्वार्थी विचार असतो.
         अलिकडे अनेक अभिनेते भंकस जाहिराती करत आहेत. त्या जाहिरातीतले ते स्वतः काहीच वापरत नाहीत; मात्र आडमाप पैसा घेऊन जाहिराती करतात. ते स्वतः कोकाकोला, थम्सअप, स्प्राईट सारखे भंगार थंडपेय पीत असतील का ? अजिबात नाही, कारण त्यांना सौंदर्य जपावे लागते आणि सौंदर्य जपण्यासाठी आहारावर खूपच नियंत्रण ठेवावे लागते. मग अभिनेता, अभिनेत्री यांनी स्वतःला जपावे. आणि इतरांनी कसल्याही वस्तु पदार्थ, थंडपेय खरेदी करून आपले आरोग्य बिघडवावे का ? दुसऱ्याबद्दल चांगला विचार या नावलौकिक मिळवलेल्या लोकांच्या मनात येवू नये का ?  एवढा सदसद्विवेकीविचार या जाहिराती करणाऱ्या लोकांच्या डोक्यात यावा. भरकटलेल्या तरुणांनी आभासी जगातील कोणत्याही भूलव्या प्रकाराला बळी पडू नये व  सर्वोच्च न्यायालयानेही अशा भूलव्या जाहिरातींवर, आभासी ऑनलाईन जंगली रमी सारख्या जाहिरातीवर निर्बंध लावावेत. जेणेकरून या देशातल्या तरुणपिढ्यांची फसवणूक होणार नाही; आजचा तरुण हा उद्याच्या विज्ञानवादी, प्रगतीशील मजबूत भारताचा सक्षम नागरिक असावा म्हणून तरुणवर्गाच्या भविष्याचा विचार हाच प्रगतशील राष्ट्राचा विचार असेल !
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर


रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

फुले, शाहू, आंबेडकरी विचारच राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो.

|| मंथनाचे पैलू ||   लेखांक-२७


फुले, शाहू, आंबेडकरी विचारच राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो..


















प्रासंगिक लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर

        देशात सध्या अराजक वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे अविचारी लोकांचा पुढाकार राष्ट्राला खीळखीळ करण्यास कारणीभूत ठरत आहे; परंतु महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधाराच या अराजकतेला आळा घालू शकते. आतापर्यंत फुले, शाहू,आंबेडकरी विचारधाराच या राष्ट्रात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये टिकवून ठेवण्याचं काम करत होती, ती आजही करत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे आणि महत्वाचे ठरले आहे. विद्यमान भारत अनेक प्रश्नांच्या तावडीत सापडलेला आहे. इथल्या धर्मवादी राजकारणानेच अराजकता माजवली आहे. या अराजकतेला आळा घालण्यासाठी आता तरूणांनी पुढाकार घ्यावा. फुले शाहू बाबासाहेब यांचा समतेचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावा.  कारण आज ह्या विचारांची अत्यंत गरज आहे.  इथल्या धर्मवादी राजकारणाने जातीवाद पुन्हा उकरून काढला आहे त्याला गाडण्यासाठी भारतात पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे तरूण तयार झाले पाहिजेत. धर्मवादी सत्तेने बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. म्हणून देशात ह्या धर्मवादी राजकारणाला खीळ घालण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलने केली जात आहेत. स्त्रीयांवर, दलितांवर अन्याय होत आहे.  सर्वधर्मसमभाव मानणारा जातीविहीन समाज पुन्हा निर्माण करण्याची गरज असतांना़ देशातून एकेक सच्चा कार्यकर्ता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, विचारवंत काळाच्या पडद्याआड जात आहेत.  महाराष्ट्रातील फुले, शाहू,विचारांचे सच्चे विचारवंत प्रा.हरी नरके यांचे नुकतेच निधन झाल्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीला खिंडार पडले आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीवर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अनेकांच्या पायाखालची माती सरकली होती......
        आता महाराष्ट्रातील विकृत राजकारणामुळे धर्मवाद, जातीवाद बोकाळला असतांना विचारवंतांची गरज आहे आणि अशा बिकट परिस्थितीत हरि नरके सारख्या विचारवंतांची गरज होती. मुंबई विद्यापीठातल्या शामलताई गरूड आपल्या फेसबुक वाॅलवर त्या लिहितात,"हरिभाऊ ही जाण्याची वेळ नव्हती..! अजूनही खूप खूप प्रश्न चिघळत आहेत.. सांस्कृतिक राजकारण तुंबलेल्या गटारात परावर्तीत झालं आहे. जातीअंताचा लढा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याची वेळ आहे.. अशावेळी तुमचं जाणं खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. हरीभाऊ तुम्ही फुले, शाहू,आंबेडकर यांचा विचार वारसा चिकित्सक पद्धतीने नेटाने सांगत होता.. आयुष्यभर माणूसपणाच्या प्रतिष्ठेसाठी जातिविहीन, वर्गविहीन समाजाच्या एकोप्यासाठी वैचारिक हस्तक्षेप घेऊन उभे राहिलात." श्यामलताईंचे हे म्हणणे रास्त असले तरी या घटनेला कुणीच रोखू शकत नाही..
          पुरोगामी विचारांचा वारसा नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी जणू हरि नरके सरांनी आपल्या खांद्यावरून झटकून टाकून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत... असं वाटत असलं तरी येणाऱ्या पुरोगामी विचारांच्या तरुणावर ही जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी पेलण्याचं व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करावं लागणार आहे. इथल्या जातीयवादी, धर्मवादी राजकारणाला भिऊन चालणार नाही. मूठभरांच्या धर्मांध विचारसरणीला विरोध करण्याची आपली जबाबदारी आहे.. ती नेटाने पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
          प्रा.हरि नरके सरांना महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या या व्यासंगाचा पुरोगामी चळवळीला फायदाच झाला. आरक्षणावर परखड भाष्य करणारे प्रा.हरि नरके सर शैक्षणिक आणि सामाजिक जाण आणि भान देणारे विचारवंत होते. ते आज आपल्यात नाहीत.  त्यांच्या जाण्याने बहुजनांच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रा.हरि नरके हे बहुजनांचा आधार होते. बहुजनांच्या विचारवंतांमध्ये त्यांचा उल्लेख केल्याशिवाय चळवळीला पुढे जाता येणे शक्य नाही.
         प्रा. हरि नरके सरांनी संपादन केलेली ग्रंथसंपदा - महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा,  व   "महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ", ही पुस्तके माझ्या पीएच् डी.च्या प्रबंधासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मला घेता आली. तसेच "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हा ग्रंथ त्यांचा   प्रसिद्ध आहे.  समाज माध्यमावरही ते सक्रीय होते. ते आरक्षण, शिक्षण व समाज या विषयांवर परखड भाष्य करत असायचे. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले होते. प्रा. हरि नरके सर हे महात्मा फुले यांचे विचार बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी  चळवळीची फार मोठी हानी झाली आहे... पुरोगामी महाराष्ट्रातील एका विचारवंताला बहुजन समाज मुकला आहे... कारण जन्म आणि अंत कुणाच्याही हातात नाही.
        ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
        संपायची कधी ही  एकाधिकारशाही ?
ही निसर्गाची एकाधिकारशाही कधीच संपणार नाही
तरीही ते साहित्य रुपाने आपल्यात जीवंतच राहणार आहेत.
          प्रत्येक दुख माझे शाई बनेल जेव्हा
          होतील शब्द सारे साधेसुधे प्रवाही
प्रा. हरि नरके सरांच्या परिवर्तनवादी कार्याला सलाम व 
त्यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली...!🙏
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
११ | ऑगस्ट | २०२३

मणिपूर...स्त्रीयांची विटंबना आणि सरकारची नैतिक जबाबदारी.

|| मंथनाचे पैलू ||   लेखांक -२६

मणिपूर...स्रियांची विटंबना आणि सरकारची नैतिक जबाबदारी

प्रासंगिक लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर






















       संभाजीनगर येथे दि.२६ जुलै रोजी विविध समुहातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता ते बॅनर होते, मणिपूर घटनेचा तीव्र निषेध " शांतता रॅली "
         मणिपूर येथे ४ मे रोजी घडलेली घटना जुलैमध्ये जनतेला कळते म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी ती उघडी पडते.  कमालीची संवेदनशील असलेली पोलीस यंत्रणा आणि त्याहूनही संवेदनशील असलेली पत्रकारिता....यांच्या नजरेतून ही घटना का व कशी निसटते ? हे प्रकरण
 निसटण्याच्या पाठीमागे कोणती कारणे आहेत, कोणती शक्ती आहे..ह्या शक्तीने स्त्रियांच्या वस्त्रहरणाचा, बलात्काराचा आणि खूणाचा इतका क्रूर आणि विकृत प्रकार का उघडा पडू दिला नाही ? यामागे कोणतं विशेष कारण आहे ? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला गेला ? तो कोणी केला ?  याकडे मणिपूरच्या प्रशासनाने किंवा केंद्र सरकारने लक्ष न देण्याची कारणे काय आहेत ? याबाबत अनेक प्रश्न जनतेला पडलेले आहेत. ती कारणे हळहळू समोर येऊ लागली आहेत. अनेक स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक स्त्रिया परखडपणे बोलत आहेत. सरळसरळ  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेच का तुमचे अच्छे दिन वर बोलत आहेत. एकेरी बोलत आहेत. कारण स्त्रियांचा अब्रू चे धिंडवडे काढणाऱ्या घटनेने भारत देश पेटून उठला आहे.
        स्त्रियांना नग्न करून धिंड काढणाऱ्या देशात स्त्री ही सुरक्षित नसल्याची जाणीव आता समस्त स्त्री वर्गाला झाली आहे. तिची अब्रु चव्हाट्यावर आणून देश कोणत्या विकासाच्या गप्पा मारत आहे, कोणत्या संस्कृतीचे मॉडेल समाजासमोर ठेवत आहे. कोणत्या संस्कृतीचे मॉडेल जगासमोर ठेवत आहे, अशी क्रूरकृत्ये करणारा देश विश्वगुरू कसा बनेल..?  असे अनेक प्रश्न स्त्रीयांना पडत आहेत. 
         औरंगाबाद येथील मोर्चातील स्रियां सवाल करत आहेत की, आम्ही शाळेच्या प्रार्थनेत रोज म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ह्या प्रार्थनेतील बांधव कुठे आहेत? आपल्या भगिनींना नग्न करून त्यांची धिंड काढली जाते, हा प्रकार देशाची प्रतिमा मलीन करणारा आहे....प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी आई असते, कुणाची बहीण असते, कुणाची भावजय, कुणाची चुलती, काकू असते ह्यावेळी ह्या लोकांना स्त्रीची अब्रू चव्हाट्यावर आणतांना लाज वाटली नाही का ? ही केवळ  मणिपूर राज्यातील स्रीची अब्रू चव्हाट्यावर आलेली नाही तर भारत देशाची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे.
           मणिपूर राज्य हे भारताचा भाग आहे. म्हणून भारतातील केंद्र सरकारने या राज्यातील जनतेत होणारा सततचा संघर्ष कसा टाळता येईल. मणिपूरच्या प्रशासनाने स्त्रीची अब्रू घेणारे प्रकार, बलात्काराचे प्रकार, खूणाचे प्रकार  असे विकृत प्रकार थांबविण्यासाठी कठोर पावले उचलावीत.
आणि देशाची अब्रू वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. हा अत्यंत विकृत प्रकार लोकशाही देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारा आहे. 
         भारत हा अनेक जातीधर्माचा देश आहे. अनेक जातीधर्माच्या लोकांना संविधानाने त्यांचे हक्क दिलेले आहेत. प्रत्येक धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे असा
कायदा असताना विद्यमान केंद्रसरकारने स्वतःचा धर्मच श्रेष्ठ  आहे आणि तो इतरांनी स्वीकारावा अशा प्रकारच्या हिंदुराष्ट्राची कल्पना जनतेवर लादण्याचे प्रयत्न करत आहेत.
        परंतु उद्याच्या हिंदूराष्ट्रात अशाच घटना घडणार असतील तर या देशातील स्त्रिया व पुरूष हिंदूराष्ट्र ही संकल्पना स्वीकारतील का ?   
        विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे भारताला आधुनिक भारत किंवा नवाभारत करण्याचे स्वप्न पहात असताना एकिकडे  अशांतता आहे. भांडण तंटे, जाळपोळ, मोर्चे, दंगली...हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या विरोधात उतरविण्याच्या प्रकारांना थाबवणे नव्या भारतासाठी गरजेचे आहे.
         या देशात तर सर्व धर्म समभावाची शिकवण दिली जाते. एकतेची, समतेची, बंधुत्वाची शिकवण दिली जाते. इथली न्यायव्यवस्था समन्यायी धोरणाचा स्वीकार करते. ज्यांची या देशावर आज सत्ता आहे तेच सांगतात,"आम्ही बुध्दाच्या देशातून आलोय..! असा बाहेरच्या देशात बुध्दाचा दिंडोरा पिटवला जातोय..बुद्ध म्हणजे  प्रज्ञा,शील, करूणा,शांती, संयम, माणुसकी, जिव्हाळा, समता, बंधुता, एकता, स्वातंत्र्य, न्याय, मानवी हक्क होय.!.....आणि हे तर कधीच नष्ट झाले आहे. ते  राजकारण्यांनी नष्ट केले आहे. सत्तेसाठी केले आहे. सध्या बुद्धाच्या देशात अशांती निर्माण झालेली आहे. अशा अशांती निर्माण करणाऱ्या लोकांच्या मुस्क्या का आवळल्या जात नाहीत ?  या देशात दंगली का घडवल्या जातात? ह्या देशात स्त्रिया का असुरक्षित आहेत..?  स्त्रीयांची नग्न धिंड कोणत्या शासनाच्या काळात काढली जात आहे ? ती मुगलाच्या शासनकाळात काढली गेली नाही, ती इंग्रजी शासनाच्या काळात काढली गेली नाही किंवा गेल्या पंचाहत्तर वर्षात काढली गेली नाही हा प्रकार कोणाच्या सत्ता काळात होतोय ? 
       हे का घडतंय ? अशा विकृत प्रवृत्तीसाठी फाशी, जन्मठेप, काळेपाणी, अशी शिक्षा असेल तरच लोकांना या सरकारची भीती असेल..! नसता.. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर सरकारचा अंकुशच नसल्याचा मॅसेज समाजात फिरेल. मणिपूरात सामाजिक संघर्षातून होणाऱ्या अशा कृतीला वेळीच आळा घालवून थांबवले तरच देशात शांतता नांदेल...!          
      संभाजी ब्रिगेड मुंबईचे प्रदेश प्रवक्ते व कवी श्री प्रमोद शिंदे यांनी मणिपूरच्या स्त्रियांच्या घेतलेल्या अब्रूबाबत आपल्या एका कवितेतून सोशल मिडीयावर आक्रोश व्यक्त केला आहे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे "ती बाई होती म्हणून..." या शीर्षकाच्या कवितेतून कवी प्रमोद शिंदे यांनी हा आक्रोश मणिपूर येथे स्त्रीच्या अब्रुचे धिंडवडे काढणाऱ्या जमावाला उद्देशून केला आहे.

"ती बाई होती म्हणून...."

ती बाई होती म्हणून देश पेटला नाही,
जर का गाय असती तर, देश पेटला असता !
गल्लीतला सो कोल्ड हिंदू नेता चेतला असता!
भगवे झेंडे घेवून रस्त्यावर उतरला असता ! 
धर्म रक्षणासाठी दोन चार पुतळे जाळले असते,
काहींच्या फोटोला चपलाचे हार घातले असते, 
जय हिंदुराष्ट्र म्हणत किंचाळला असता, ओरडला असता!
पण; आता ते होणार नाही
कारण ती बाई होती,
गाय असती तर देश पेटला असता!

इथे बाईला बाप्याच्या गर्दीत नागवं फिरवणं 
शूरपणाचं मेडल ठरतं!
इथे पोरीला मंदिरातच पुजाऱ्याने बलात्कार 
करणं पुण्य समजलं जातं!
इथे बलात्काऱ्यांना तुरुंगातून सन्मानाने 
बाहेर काढून औक्षण केलं जातं!
बलात्कार हे वीर योध्यासाठी राजकीय 
हत्यार मानलं जातं!
त्या देशात आणखीन काय होणार!
कारण ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश पेटला असता!

कुठे गाय कापली म्हणून रान उठवणारे गांडू!
कुठे गायीचं मांस भेटलं म्हणून हत्याकांड घडवणारे भडवे!
ब्रिजभूषणला पाठीशी घालणारे लंडचडे!
बाईला विधवा म्हणून हिणवणारे चौकीदार!
गांडीखालची लाल दिव्याची गाडी अन तुरुंगाची बेडी वाचविण्यासाठी कमरेचं सोडून देणारे नेते !
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश नक्कीच पेटला असता!.....
सैतानाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी 
रात्रीचं कोर्ट चालवणारी 
सन्यासाला ट्रायलच्या नावाखाली तुरुंगात
खितपत ठेवणारी,चांडाळ न्यायव्यवस्था,
पत्रकारितेचा धंदा करून स्वतःचं शील विकणारी पत्रकारिता!
लोकशाहीला बाजारात बसवून पोटाची खळगी भरणारी निवडणूक व्यवस्था,
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती,
गाय असती ना तर देश पेटला असता,
देश पेटला असता !.........
✍️
प्रमोद शिंदे भ्रमणध्वनी ९९६७०१३३३६

           अनेक स्त्रियानी व पुरूषांनी मोर्चे काढून मणिपूरच्या घटनेवर आक्रोश व्यक्त केलेला आहे, करत आहेत. केंद्र सरकार या मणिपूर घटनेबाबत काय ठोस निर्णय घेणार आहे याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

डॉ.धोंडोपंत मानवतकर

२८ जुलै २०२३

काळ्या मातीशी करी हितगुज हिरवा श्रावण...

काळ्या मातीशी करी हितगुज हिरवा श्रावण...
कळ्या-फुलांशी करी हितगुज हिरवा श्रावण...





























ललित लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर


             श्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न.  वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण.... नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण...या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच...परंतु श्रावणाच्या आगमनाची वाट पाहता पाहता चार महिने उन्हाच्या आगीने अंगाची लाही लाही झालेल्या काळ्या मातीला आठवताना जीवच लाही लाही होतो...चैत्र-वैशाखात जेव्हा सूर्य आग ओकू लागतो तेव्हा माणसं, पशु, पक्षी झाडाच्या सावलीचा आधार घेऊ लागतात आणि त्याचवेळी जिवाची लाही लाही होत असूनही पाण्यासाठी तरसत असलेली धरित्री आपल्याच पोटातील पाण्याची ओल अनंतकोटी झाडांना पुरवत असते..
                                              किती तरसली माती
                                            तेव्हा बरसलं नभ 
                                            कैक युगांचा जुनाच
                                            आज कामी आला लोभ 
इथल्या माणसांना, पशु पक्षांना, झाडांना, वेलींना, पाना -फुलांना जगवण्याचं काम ही काळी माती अखंड करत असते. काळ्यामातीचं सगळ्या सजीवांवर असलेलं ऋण शब्दातीत आहे.......     
         यावर्षी मृग तर बरसलाच नाही.. रोहिणी भरणीच्या ओलाव्यानंतर अनंत दिसांची तृष्णा अधरात घेऊन तरसल्या धरित्रीने प्राशून घेतले धो-धो बरसल्या पावसाचे टपोरे थेंब. श्रावणसरीने पानाफुलांचा गंध चौफेर उधळला... तिने मधाळ अधरांवर खट्याळ श्रावणसरींची सळसळ गोंदून घेतली....चंदनगंधी शिरशिरी आली तिच्या सावळ्याकुशीला....श्रावणचिंब वेलींना बिल्गले ऋतुरंगाचे   नक्षत्र.. सावळी काया न्हाली ऋतुरंगात.... तसं..तिनं भूलवलेलं.. झुलवतांना पेलवलं आभाळ....मग धरित्रीचे रंगअनंग उधळून गेला पक्षी..ओठांदेठांवर विसरून गेला...गोंदलेली नक्षी. श्रावणाने थेंब थेंब उधळून सुगंध पेरला मातीच्या कणाकणात...
                                          गंध ओल्या मातीचा
                                        दरवळे  रानोवनी
                                        पाखरांच्या ओठी आली
                                        नव्या पावसाची गाणी
        पशुपक्ष्यांची किलबिल त्यांच्या सांकेतिक बोलींच्या शब्दांत श्रावणसरींचे ऋण व्यक्त करत असते... पाना-फुलांचे, फळांचे आभार मानत असते.... माणूस मात्र बेईमान आहे.. इथल्या प्रत्येक घटकांशी तो बेईमानी करीत आला आहे... त्याचा कमालीचा स्वार्थ त्याला ही बेईमानी करावयास भाग पाडतो...माणूस स्वतःच.. स्वतःशी बेईमानी करत असतो. स्वार्थासाठी माणसं आपला स्वभाव बदलतात...झाडं, वेली,पशू,पक्षी मात्र आपला स्वभाव बदलत नाहीत. निसर्ग आपला स्वभाव बदलत नाही...  निसर्गाचा स्वभाव बदलायला भाग पाडले माणसाने.... माणसं झाडे लावत तर नाहीतच; परंतु ते तोडतात...झाडे लावण्यात पशुपक्ष्यांचा मोलाचा वाटा आहे...तुम्ही म्हणाल कसा...?  तर तो असा की,..पक्षी फळे खाऊन दूर रानात इतरत्र उडून जातात, भटकतात त्यांनी खाल्लेल्या फळांतील बिया त्यांच्या विष्ठेवाटे रानात अनेक ठिकाणी पडतात, गायी गुरं व इतर प्राणीसुद्धा अशाच प्रकारे झाडांची फळे , शेंगा खाऊन रानोमाळ दूरदूर हिंडतात रानात वेगवेगळ्या ठिकाणी विष्ठा करतात...त्या विष्ठेतून फळांच्या, शेंगाच्या बिया पडतात.. उदा.शेळ्या बाभळीच्या वाळलेल्या शेंगा खाऊन चरण्यासाठी दोन चार किलोमीटर रानात फिरत राहतात. त्या बाभळीच्या शेंगा खाऊन धामुके म्हणजे बाभळीच्या शेंगातील बिया इतरत्र टाकत फिरतात. कधी तोंडावाटे तर कधी विष्ठेवाटे बिया टाकत असतात. त्या बिया पावसाळ्यात रुजतात आणि रानात अनेक ठिकाणी झाडे उगवतात. पशुपक्ष्यांची ही झाडे लावण्याची प्रक्रिया सहज घडते...मात्र माणसाला झाडाचे महत्त्व कळलेले असूनही तो कुणाच्यातरी प्रबोधनानंतर एखादं झाड लावतो...तो पीके घेतो ती पैसा करण्यासाठी..जगण्यासाठी.  तो रोपटे लावतो घराच्या शोभेसाठी; मात्र स्वतःला किंवा इतरांना सावली मिळावी शुद्ध हवा मिळावी असा निर्मोही उद्देश ठेवून माणसं झाडं लावतात का ? याचे उत्तर नाही, असेच आहे.
         अनेक कवींनी पाना-फुलांवर झाडांवर, पशुपक्ष्यांच्या विहार करण्यावर कविता, गीते लिहून अनेकांची मने रिझवली  आहेत. क्षणभर अनेकांच्या दुःखाची तीव्रता कमी केली आहे. काहींच्या मरण यातनांवर शब्दातून सुखाची फुंकर घातली आहे. मानसन्मानाने सुख मिळते म्हणून पुष्पगुच्छ किंवा फुले देऊन त्याचा सत्कार केला जातो व सुख दिले जाते. हे माणसाचं चांगुलपण त्यांने दाखवून दिले आहे.
         पानाफुलांची तोरणं बांधली जातात... अनेक वनस्पतीची औषधं करून अनेक रोग दुरूस्त करता येतात. झाडांपासून फुले, फळे मिळतात....या निसर्गाने सजीवांना बरंच काही उधळून दिलेलं आहे... मात्र मनुष्यप्राण्याने त्याच्यावर मालकी गाजवून वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाचा ऱ्हास केला आहे.... अनेकप्रकारचे प्रदुषण केले आहे... हिरोशिमा नागासाकी या ठिकाणी बॉम्ब टाकून तेथील जमीनच जाळून टाकली. तेथील जमीनीत कधीच एक गवताचे पाते सुद्धा उगवणार नाही...अशी नैसर्गिक हानी करणारा स्वार्थी प्राणी कोणता असेल तर तो आहे माणूस..!
        आम्हाला निसर्गाने भरभरून दिलंय...पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केलाय; परंतु त्या स्वर्गाचा उपभोग आम्हाला घेता आला नाही... घेता येत नाही.... श्रावणात सगळीकडे सृष्टीवर  स्वर्ग अवतरलेला असतो. तो आज अवतरलेला आहे. कवींनी श्रावण महिन्यावर अनेक गीते, कविता लिहिल्या आहेत...श्रावणात अनेक श्रद्धाळू लोक भक्तीकडे वळलेले असतात. सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात. या शाकाहारी व सात्विक राहण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. त्या कारणाला आपण शास्त्रीय कारण समजतो.
          पूर्वी खूप पाऊस होत असायचा. पावसाच्या सततच्या पाण्यामुळे सगळीकडे घाण साचली जायची त्या घाणीवरच्या मास्या, जीव, जंतू येऊन अन्नावर बसायचे म्हणून रोगराई सुरू रहायची... म्हणून श्रावण महिन्यात मांस,मच्छी अशा प्रकारचे अन्न वर्ज्य करण्याला शास्त्रोक्त आधार दिला गेला. भाव आणि भक्ती हे शास्त्राचे मूळ आधार आहेत म्हणून श्रावण महिन्यात भक्तीभाव, श्रद्धा अशा गोष्टी रूजवल्या त्या काही प्रमाणात आजही सुरु आहेत.
         रम्य आणि प्रणयरम्य गीतांची निर्मितीसुद्धा याच श्रावण महिन्यात होते. बहरलेल्या निसर्गाची, बहरलेल्या पानाफुलांची, दरवळलेल्या गंधाची, श्रावणसरींची प्रतिमा प्रतीके वापरूनच गीतंची कवितेची निर्मिती झालेली आहे. 
असा हा तनामनात घर करून राहणारा श्रावण, काळ्या मातीशी हितगुज करणारा, पानाफुलांशी हितगुज करणारा श्रावण... सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो.

डॉ.धोंडोपंत मानवतकर
२४ ऑगस्ट २०२३

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

|| मंथनाचे पैलू- २७ || डॉ.धोंडोपंत मानवतकर

फुले, शाहू, आंबेडकरी विचारच 

राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो..!

















        देशात सध्या अराजक वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे अविचारी लोकांचा पुढाकार राष्ट्राला खीळखीळ करण्यास कारणीभूत ठरत आहे; परंतु महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधाराच या अराजकतेला आळा घालू शकते. आतापर्यंत फुले, शाहू,आंबेडकरी विचारधाराच या राष्ट्रात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये टिकवून ठेवण्याचं काम करत होती, ती आजही करत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे आणि महत्वाचे ठरले आहे. विद्यमान भारत अनेक प्रश्नांच्या तावडीत सापडलेला आहे. इथल्या धर्मवादी राजकारणानेच अराजकता माजवली आहे. या अराजकतेला आळा घालण्यासाठी आता तरूणांनी पुढाकार घ्यावा. फुले शाहू बाबासाहेब यांचा समतेचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावा.  कारण आज ह्या विचारांची अत्यंत गरज आहे.  इथल्या धर्मवादी राजकारणाने जातीवाद पुन्हा उकरून काढला आहे त्याला गाडण्यासाठी भारतात पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे तरूण तयार झाले पाहिजेत. धर्मवादी सत्तेने बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. म्हणून देशात ह्या धर्मवादी राजकारणाला खीळ घालण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलने केली जात आहेत. स्त्रीयांवर, दलितांवर अन्याय होत आहे.  सर्वधर्मसमभाव मानणारा जातीविहीन समाज पुन्हा निर्माण करण्याची गरज असतांना़ देशातून एकेक सच्चा कार्यकर्ता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, विचारवंत काळाच्या पडद्याआड जात आहेत.  महाराष्ट्रातील फुले, शाहू,विचारांचे सच्चे विचारवंत प्रा.हरी नरके यांचे नुकतेच निधन झाल्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीला खिंडार पडले आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीवर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अनेकांच्या पायाखालची माती सरकली होती......
        आता महाराष्ट्रातील विकृत राजकारणामुळे धर्मवाद, जातीवाद बोकाळला असतांना विचारवंतांची गरज आहे आणि अशा बिकट परिस्थितीत हरि नरके सारख्या विचारवंतांची गरज होती. मुंबई विद्यापीठातल्या शामलताई गरूड आपल्या फेसबुक वाॅलवर त्या लिहितात,"हरिभाऊ ही जाण्याची वेळ नव्हती..! अजूनही खूप खूप प्रश्न चिघळत आहेत.. सांस्कृतिक राजकारण तुंबलेल्या गटारात परावर्तीत झालं आहे. जातीअंताचा लढा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याची वेळ आहे.. अशावेळी तुमचं जाणं खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. हरीभाऊ तुम्ही फुले, शाहू,आंबेडकर यांचा विचार वारसा चिकित्सक पद्धतीने नेटाने सांगत होता.. आयुष्यभर माणूसपणाच्या प्रतिष्ठेसाठी जातिविहीन, वर्गविहीन समाजाच्या एकोप्यासाठी वैचारिक हस्तक्षेप घेऊन उभे राहिलात." श्यामलताईंचे हे म्हणणे रास्त असले तरी या घटनेला कुणीच रोखू शकत नाही..
          पुरोगामी विचारांचा वारसा नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी जणू हरि नरके सरांनी आपल्या खांद्यावरून झटकून टाकून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत... असं वाटत असलं तरी येणाऱ्या पुरोगामी विचारांच्या तरुणावर ही जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी पेलण्याचं व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करावं लागणार आहे. इथल्या जातीयवादी, धर्मवादी राजकारणाला भिऊन चालणार नाही. मूठभरांच्या धर्मांध विचारसरणीला विरोध करण्याची आपली जबाबदारी आहे.. ती नेटाने पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
          प्रा.हरि नरके सरांना महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या या व्यासंगाचा पुरोगामी चळवळीला फायदाच झाला. आरक्षणावर परखड भाष्य करणारे प्रा.हरि नरके सर शैक्षणिक आणि सामाजिक जाण आणि भान देणारे विचारवंत होते. ते आज आपल्यात नाहीत.  त्यांच्या जाण्याने बहुजनांच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रा.हरि नरके हे बहुजनांचा आधार होते. बहुजनांच्या विचारवंतांमध्ये त्यांचा उल्लेख केल्याशिवाय चळवळीला पुढे जाता येणे शक्य नाही.
         प्रा. हरि नरके सरांनी संपादन केलेली ग्रंथसंपदा - महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा,  व   "महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ", ही पुस्तके माझ्या पीएच् डी.च्या प्रबंधासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मला घेता आली. तसेच "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हा ग्रंथ त्यांचा   प्रसिद्ध आहे.  समाज माध्यमावरही ते सक्रीय होते. ते आरक्षण, शिक्षण व समाज या विषयांवर परखड भाष्य करत असायचे. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले होते. प्रा. हरि नरके सर हे महात्मा फुले यांचे विचार बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी  चळवळीची फार मोठी हानी झाली आहे... पुरोगामी महाराष्ट्रातील एका विचारवंताला बहुजन समाज मुकला आहे... कारण जन्म आणि अंत कुणाच्याही हातात नाही.
                                  ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
                                 संपायची कधी ही  एकाधिकारशाही ?

ही निसर्गाची एकाधिकारशाही कधीच संपणार नाही
तरीही ते साहित्य रुपाने आपल्यात जीवंतच राहणार आहेत.

                                   प्रत्येक दुख माझे शाई बनेल जेव्हा
                                 होतील शब्द सारे साधेसधे प्रवाही
प्रा. हरि नरके सरांच्या परिवर्तनवादी कार्याला सलाम व त्यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली..!
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

११ | ऑगस्ट | २०२३

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

पक्षी दूर देशी गेलं... डॉ.धोंडोपंत मानवतकर

पक्षी दूर देशी गेलं ......

ना.धों.महानोरांना काव्यमय आदरांजली..!
















ज्येष्ठ कवी, गीतकार पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ..."पक्षी दूर देशी गेलं "या सुंदर शीर्षकांतर्गत कविवर्य ना.धों.महानोर यांना काव्यरुपी आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२३  मंगळवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील एम.जी.एम. कॅम्पसच्या "रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तथा खासदार पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची उपस्थिती असल्याने सभागृहात प्रचंड गर्दी होती...कवी महानोरांच्या
कवितेचे दर्दीही तितकेच होते. कविश्रेष्ठ ना.धों.महानोर आणि मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा स्नेह असल्याने मा.पवार साहेब ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, एम.जी.एम.विद्यापीठ,  मराठी विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  मराठवाडा साहित्य परिषद,  मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन आणि अभ्युदय फाऊंडेशन  अशा विविध संस्था व मराठीभाषा प्रेमी मान्यवरांनी केले होते. आमचे स्नेही, डॉ. बा.आं.मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे  प्रा.डॉ.कैलासजी अंभुरे सर यांनी फेसबुकवर पत्रिका टाकून सर्वांना निमंत्रित केले होतेच. या पत्रिकेमुळे अनेक मराठी काव्यप्रेमींना व कवी ना.धों.महानोर प्रेमींना या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
          कविवर्य ना.धों.महानोरांच्या कवितेनेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा आगळा वेगळा कार्यक्रम काव्यरसिकांना पहावयास व ऐकावयास मिळाला, 
ही संभाजीनगरच्या रसिकांसाठी सुंदर पर्वणी होती.
        मी औरंगाबाद येथेच एका पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात अडकल्यामुळे मला ह्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही; याची खंत आहेच; परंतु माझे साहित्यिक मित्र सुदाम मगर यांनी मला हा सुरु असलेला कार्यक्रम फोनवर बराचवेळ ऐकवला. नंतर मी प्रवासात असल्यामुळे तितकासा स्पष्ट ऐकता आला नाही ; परंतु दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचे निवेदनसूत्र ज्यांचेकडे होते ते कलावंतस्नेही जे नुकतेच 'कलासन्मान' पुरस्काराने सन्मानित झाले आहेत असे कॉम्रेड प्रा.डॉ.समाधान इंगळे सर यांच्या फेसबुक वॉलवरून काही छायाचित्रे व चित्रिकरणातून चित्रित झालेला काही संवाद ऐकला. या कार्यक्रमाचा सारांश व  कविवर्य महानोर यांच्या कवितेविषयी मला जे वाटलं ते नोंदवलं आहे. कविवर्य महानोरांच्या एकूण कवितांचा किंवा त्यांच्या एकूण साहित्य प्रवासाचा आलेख शंभर-पन्नास ओळीच्या लेखातून मांडता येणे कसे शक्य आहे? आदरांजलीच्या निमित्ताने फक्त काही नोंदींचा हा लेखनप्रपंच आहे.






















        ज्यादिवशी कविवर्य ना.धों.महानोर गेल्याची फेसबुकवर पोस्ट वाचली तसं काळजात धस्स झालं, मन अस्वस्थ झालं. एका कवीला महाराष्ट्राने गमावलं असल्याची भीती, चिंता आणि चिंतनाचं त्रिवेणी मिश्रण सुरू झालं. नैसर्गिक आपत्तीपुढे मानवाला हारच मानावी लागते हे मात्र त्रिवार खरं आहे.
         कवी किंवा कलावंत हे त्या त्या काळाचं अपत्य असतात, ते त्या राज्यातील लोकांनी राज्यकर्त्यांनी त्यांना जपलं पाहिजे. कलावंतांना जपणारी माणसं आता बोटावर मोजण्याइतकी शिल्लक आहेत. कलावंत हा आपल्या राज्याचं वैभव असतो असं ज्यांना वाटतं तेच कलावंतांची कदर करतात. महाराष्ट्रभूमीने या देशाला अनेक कलावंत देऊन देशाच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा खोवला आहे. काही ठराविक माणसांचा जन्म केवळ एखाद्या कार्यासाठीच झालेला असतो म्हणून त्यांच्या अंगी निसर्गाने बहाल केलेले ते उपजत कलागुण असतात.
         एका हॉटेलमध्ये चहा घेत असतांना आमचे मित्र के.टी.उपदेशे म्हणाले कवी महानोर हे केवळ कवितेसाठीच जन्माला आलेले कवी होते, ते सहज बोलले आणि ते मान्यही करावं लागलं. कवी ग्रेस, ना.घ.देशपांडे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबुडकर, भा.रा.तांबे, बहिणाबाई चौधरी, बा.भ.बोरकर, ग.दि. माडगुळकर, फ.मु. शिंदे, ना.धो.महानोर अशी अनेक नावे सांगता येतील. अशा कितीतरी कवींनी केवळ कवितेसाठीच जन्म घेतला होता, किंवा घेतला आहे असं वाटतं. कारण या महान कवींच्या कवितांनी इथले काव्यविश्व समृद्ध केलं आहे. 
         कविवर्य महानोरांनी मराठी रसिकांच्या मनोरंजनासाठी एकापेक्षा एक सरस अशी गीते दिली. भावगीते दिली, लावण्या दिल्या. त्यांच्या शब्दमाधुर्याने रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे, हे "पक्षी दूर देशी गेलं" या भावस्पर्शी संगीतमय आदरांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या दर्दीच्या उपस्थितीने लक्षात आले.
        कवी महानोर म्हणजे 'हिरव्या रानाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं' असं वाटू लागलं. रानाची, रानातल्या पानाची हिरवी बोली बोलणारा कवी काळाने हिरावून नेला, हिरव्या बोलीचा शब्द मुका झाला.. जे महानोरांना अंत्यदर्शनासाठी गेले त्यांना त्या शिवाराच्या अनावर हुंदक्यानं सांगितलं असेलच..."ना.धों.महानोर नावाचं हिरव्या रानाला पडलेलं ते एक स्वप्न होतं." पळसखेड्यातील हिरवे रान ह्या हळव्या, संवेदनशील कविला मुकले. तसे मराठी साहित्यविश्वही या रानकवीला मुकले आहे. कवी महानोर हे मराठी साहित्यविश्वाची कवितेनं ओटी भरून गेले. त्यांचे मराठी काव्यविश्वाला मोलाचे योगदान लाभले आहे, हे मराठी माणूस कधीच विसरू शकणार नाही.
         शेतीमातीशी आपले नाते घट्ट करून तिचे सौंदर्य आयुष्यभर शब्दात मांडणारा सृजनशील रानकवी आता कायमचा प्रवासाला निघून गेला आहे, तो पुन्हा कधीच परत न येण्यासाठी... आता महाराष्ट्र या कवीला मुकला आहे. पळसखेड्यातील जीव लावलेले रान या कवीला मुकले आहे. आता हिरव्या निसर्गाच्या, प्रिती प्रेमाच्या... प्रतिमा, प्रतिकांना सहज सुंदर,तरल, वेल्हाळ शब्दांत गुंफणाऱ्या सकवार कवीच्या आठवणी केवळ काव्यातून,गीतातून जागवाव्या लागतील...
                          आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या
     कवी महानोरांच्या पळखेड्यातील रानात घुमणारी गोड शब्दांची धून कायमची शांत झाली. कवी महानोरांचा प्राण पळसखेड्यातील रानात विसावला. या रानाला लळा लावलेल्या मातीचा कण न् कण.. वृक्ष वेलींचे पान न् पान आता महानोर दिसत नाहीत म्हणून अश्रू ढाळत असतील. गायीगुरांच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघळ कायम सुरू असतील..गायीगुरांच्या हंबरण्यातल्या सांकेतिक भाषेतून असाही प्रश्नार्थक विचार येत असेल की, "या नभाने या भूईला दान द्यावे" असं ईश्वराकडे आता कोण पसायदान मागेल..! 
   ही माती या रानाच्या कानात कवी महानोरांंविषयी कुजबुज करत असेल...! की,
                             या शेताने लळा लावला असा असा की,
                             सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
                             आता तर हा जीवच अवघा असा जखडला
                             मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहला
 कवी या पंक्तीतून असे म्हणाले होते, मला ह्या शेताने असा लळा लावला की,आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात हसलो, रडलो.... कारण मातीचे दुःख म्हणजे कोरडा दुष्काळ. मातीच्या जीवाची तलखी.... आणि शेतकऱ्याचे दुःख म्हणजे दुष्काळ पडल्यावर पीक करपून जाणे , पीक न येणे आणि शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणे हे कवीचे आणि शेतकऱ्यांचे दुःख...कवी महानोर रानाशी एकरूप झाल्यावर म्हणतात...आता तर या दुःखाचे काहीच वाटत नाही, हा जीवच असा जखडून गेला की, रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..!
          कवी महानोर वयाच्या अठराव्या वर्षांपासून शेती करत होते. त्यांचे पहिले प्रेम शेतीवर आहे असं ते म्हणायचे.
       मराठी काव्यविश्वाला ना.धों.महानोर यांच्या कवितेने अशी मोहिनी घातली की, त्यांच्या अमोघ वाणीतून अनेक कवितांची गीते झाली अन् ती मराठी माणसांच्या ओठांवर आली.. त्यांची गीते, लोकगीते आणि लावण्या आजही मराठी माणसांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या कवितेवर रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या "पक्षी दूर देशी गेलं" ह्या कार्यक्रमात गायिका मालविका दीक्षित आणि गायक राहुल खरे यांनी " चिंब पावसानं रान झाल आबादानी " माझ्यासह अनेकांच्या आवडीचं हे गीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.
        या कार्यक्रमात कवी दासू वैद्य, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर, व शिव कदम या निमंत्रित कवींनी महानोरांच्या अनेक कवितांचे वाचन करून काही कविता गाऊन ना.धों. महानोर यांना आदरांजली अर्पण केली. 
      ना.धों.महानोरांनी लिहिलेल्या आम्ही ठाकर ठाकर, जांभूळ पिकल्या झाडाखाली, नभ उतरू आलं,  चिंब पावसानं रान झालं आबादानी", किती जीवाला राखायाचं राखलं,  राजसा जवळी जरा बसा, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं. ,  मी काट्यातून चालून थकले, किंवा श्रावणाचं उन्हं मला झेपेना... अशा काही लावण्यांनी व गीतांनी रसिकांच्या मनावर गारूड करून जाणारे कवी ना.धों. महानोर यांनी एका लहानशा खेड्यात राहून सुंदर शेती केली. शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजात शेतीचा आदर्श निर्माण केला. कवितेने कवी महानोरांना आमदार केलं. पद्मश्री उपाधी दिली. समाजात प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी दिली. महानोरही आयुष्यभर कविताच जगले. त्यांच्याकडे असलेली निसर्गदत्त प्रतिभा आणि चारित्र्यसंपन्न जीवन हे त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी कारणीभूत ठरले.
       खेडेगावाविषयीचा जिव्हाळा, रानाविषयीचे प्रेम, तेथील निसर्ग, लोकपरंपरा, लोकसाहित्य, लोकसंगीत यांच्याशी कवी महानोरांची सलगी होती, अतूट नाळ होती, ऋणानुबंध होते. कविता, लोकगीते, कथा, व्यक्तिचित्रे, गोष्टी, दीर्घकथा, शेतीविषयक लेखन, गीतलेखन अशा विविध क्षेत्रातील त्यांची व्यापक स्वरुपाची मुशाफिरी ही वाखाणण्याजोगी आहे. 
      कवी महानोरांनी पाच ते सहा दशके महाराष्ट्रभूमीत आपल्या प्रतिभासंपन्न लेखणीचा दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या अनेक सुंदर रचना त्यांचे नाव अजरामर करून गेल्या आहेत..त्या कविता रसिकांच्या ओठांवर रेंगाळत राहणार आहेत...परंतु त्या कवितांची निर्मिती करणारा वेल्हाळ पक्षी दूर देशी उडून गेल्याची खंत कायम मनात आणि हृदयात घर करून राहणार आहे...  कविश्रेष्ठ ना.धों.महानोर यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली..!
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

१८| ऑगस्ट |२०२३

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...