शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

|| मंथनाचे पैलू- २७ || डॉ.धोंडोपंत मानवतकर

फुले, शाहू, आंबेडकरी विचारच 

राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो..!

















        देशात सध्या अराजक वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळीकडे अविचारी लोकांचा पुढाकार राष्ट्राला खीळखीळ करण्यास कारणीभूत ठरत आहे; परंतु महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधाराच या अराजकतेला आळा घालू शकते. आतापर्यंत फुले, शाहू,आंबेडकरी विचारधाराच या राष्ट्रात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये टिकवून ठेवण्याचं काम करत होती, ती आजही करत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे आणि महत्वाचे ठरले आहे. विद्यमान भारत अनेक प्रश्नांच्या तावडीत सापडलेला आहे. इथल्या धर्मवादी राजकारणानेच अराजकता माजवली आहे. या अराजकतेला आळा घालण्यासाठी आता तरूणांनी पुढाकार घ्यावा. फुले शाहू बाबासाहेब यांचा समतेचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवावा.  कारण आज ह्या विचारांची अत्यंत गरज आहे.  इथल्या धर्मवादी राजकारणाने जातीवाद पुन्हा उकरून काढला आहे त्याला गाडण्यासाठी भारतात पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारे तरूण तयार झाले पाहिजेत. धर्मवादी सत्तेने बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. म्हणून देशात ह्या धर्मवादी राजकारणाला खीळ घालण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलने केली जात आहेत. स्त्रीयांवर, दलितांवर अन्याय होत आहे.  सर्वधर्मसमभाव मानणारा जातीविहीन समाज पुन्हा निर्माण करण्याची गरज असतांना़ देशातून एकेक सच्चा कार्यकर्ता फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक, विचारवंत काळाच्या पडद्याआड जात आहेत.  महाराष्ट्रातील फुले, शाहू,विचारांचे सच्चे विचारवंत प्रा.हरी नरके यांचे नुकतेच निधन झाल्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीला खिंडार पडले आहे. हरी नरके यांच्या निधनाच्या बातमीवर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अनेकांच्या पायाखालची माती सरकली होती......
        आता महाराष्ट्रातील विकृत राजकारणामुळे धर्मवाद, जातीवाद बोकाळला असतांना विचारवंतांची गरज आहे आणि अशा बिकट परिस्थितीत हरि नरके सारख्या विचारवंतांची गरज होती. मुंबई विद्यापीठातल्या शामलताई गरूड आपल्या फेसबुक वाॅलवर त्या लिहितात,"हरिभाऊ ही जाण्याची वेळ नव्हती..! अजूनही खूप खूप प्रश्न चिघळत आहेत.. सांस्कृतिक राजकारण तुंबलेल्या गटारात परावर्तीत झालं आहे. जातीअंताचा लढा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याची वेळ आहे.. अशावेळी तुमचं जाणं खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. हरीभाऊ तुम्ही फुले, शाहू,आंबेडकर यांचा विचार वारसा चिकित्सक पद्धतीने नेटाने सांगत होता.. आयुष्यभर माणूसपणाच्या प्रतिष्ठेसाठी जातिविहीन, वर्गविहीन समाजाच्या एकोप्यासाठी वैचारिक हस्तक्षेप घेऊन उभे राहिलात." श्यामलताईंचे हे म्हणणे रास्त असले तरी या घटनेला कुणीच रोखू शकत नाही..
          पुरोगामी विचारांचा वारसा नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी जणू हरि नरके सरांनी आपल्या खांद्यावरून झटकून टाकून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत... असं वाटत असलं तरी येणाऱ्या पुरोगामी विचारांच्या तरुणावर ही जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी पेलण्याचं व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम करावं लागणार आहे. इथल्या जातीयवादी, धर्मवादी राजकारणाला भिऊन चालणार नाही. मूठभरांच्या धर्मांध विचारसरणीला विरोध करण्याची आपली जबाबदारी आहे.. ती नेटाने पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
          प्रा.हरि नरके सरांना महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या या व्यासंगाचा पुरोगामी चळवळीला फायदाच झाला. आरक्षणावर परखड भाष्य करणारे प्रा.हरि नरके सर शैक्षणिक आणि सामाजिक जाण आणि भान देणारे विचारवंत होते. ते आज आपल्यात नाहीत.  त्यांच्या जाण्याने बहुजनांच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रा.हरि नरके हे बहुजनांचा आधार होते. बहुजनांच्या विचारवंतांमध्ये त्यांचा उल्लेख केल्याशिवाय चळवळीला पुढे जाता येणे शक्य नाही.
         प्रा. हरि नरके सरांनी संपादन केलेली ग्रंथसंपदा - महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा,  व   "महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ", ही पुस्तके माझ्या पीएच् डी.च्या प्रबंधासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मला घेता आली. तसेच "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हा ग्रंथ त्यांचा   प्रसिद्ध आहे.  समाज माध्यमावरही ते सक्रीय होते. ते आरक्षण, शिक्षण व समाज या विषयांवर परखड भाष्य करत असायचे. विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले होते. प्रा. हरि नरके सर हे महात्मा फुले यांचे विचार बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहिले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी  चळवळीची फार मोठी हानी झाली आहे... पुरोगामी महाराष्ट्रातील एका विचारवंताला बहुजन समाज मुकला आहे... कारण जन्म आणि अंत कुणाच्याही हातात नाही.
                                  ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
                                 संपायची कधी ही  एकाधिकारशाही ?

ही निसर्गाची एकाधिकारशाही कधीच संपणार नाही
तरीही ते साहित्य रुपाने आपल्यात जीवंतच राहणार आहेत.

                                   प्रत्येक दुख माझे शाई बनेल जेव्हा
                                 होतील शब्द सारे साधेसधे प्रवाही
प्रा. हरि नरके सरांच्या परिवर्तनवादी कार्याला सलाम व त्यांना जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली..!
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

११ | ऑगस्ट | २०२३

बुधवार, २८ जून, २०२३

सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा..





सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...








सामाजिक न्याय संघर्ष समितीचा भव्य एल्गार मोर्चा...

वृतान्त- डॉ.धोंडोपंत मानतकर



          राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंठा तालुक्याच्या सामाजिक न्याय संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी, एक दिवस समाजासाठी' हे घोषवाक्य घेऊन *भव्य एल्गार मोर्चा* चे आयोजन करण्यात आले होते. मंठा तालुक्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार,आदिवासी समाज चाळीस वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनीचे पट्टे १९९१ च्या शासन निर्णयानुसार कसणारांच्या नावे करण्यात यावेत.
       तीन पिढ्यांपासून इथला गायरानधारक माणूस गायरान जमिनीचे पट्टे नावावर करण्यासाठी धरणे धरतोय, मोर्चे, आंदोलने करतोय; परंतु आजपर्यंत या गरीब कष्टकरी गायरान धारकांची कोणत्याच सरकारने दखल घेतलेली नाही, हा तीस वर्षापासून भिजत ठेवलेला गायरान जमीन धारकांचा प्रश्न निकाली काढावा. तो प्रश्न आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने निकाली काढलेला नाही, खरेतर तो मुद्दाम सोडवलेला नाही, म्हणूनच बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी या अनुसुचित जाती-जमातीवर  मुद्दामच जातीवाचक अन्याय होतोय. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे.  हा जातीवाचक अन्याय बंद व्हावा म्हणून आजही अनुसूचित जाती जमातीच्या गरीब लोकांवर धरणे, आंदोलने, मोर्चे करण्याची वेळ येत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे.
           लोकशाही असूनही या देशात मागास जातीवर जर हल्ले करून त्यांचे खून होत असतील तर, हे सरकारसुद्धा अप्रत्यक्षरित्या इथल्या हल्लेखोरांचं आणि जातीयवादाचं समर्थन करतंय का?  असा प्रश्न पडतोय..!
         बौद्ध, मातंग, चर्मकार, आदिवासी समाजाला महापुरुषांचे विचार सांगण्याचे या देशात आजही स्वातंत्र्य नाही. आंबेडकरी समाजातील तरूणांचे भरदिवसा खून होत आहेत. अलिकडे नांदेड, लातूर, बीड, मुंबई या ठिकाणी दलितांच्या हत्या झाल्या आहेत, ते हत्याकांड करणारे महाभाग राजरोस फिरत आहेत. त्यांना हे राजकारणी ,सत्ताधारी लोक पाठीशी का घालतात ? 'खून का बदला फाशी' अशी भूमिका सरकारने घ्यावी. अशी भूमिका या मोर्चात मांडण्यात आली.  नांदेड, लातूर, बीड, मुंबई येथील हत्याकांडातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हत्याकांडातील आरोपींच्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाव्यात आणि दलितांवर होणारे अन्याय थांबवावेत. असा रोष सर्व मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
            या 











मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व घोषवाक्यातून सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे ओढले. शासन प्रशासनाच्या रद्दाड कार्यप्रणालीचा खरपूस समाचार घेतला. हा एल्गार मोर्चा मंठा शहरातील राजे छत्रपती संभाजीराजे चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले होते. या सभेत सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यानी पत्रकामध्ये नमूद असलेल्या विषयावर परखडपणे विचार मांडले.  
         गोरगरिब, दलित, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या मिळू नयेत व त्यांनी हालाखीचे जीवन जगत रहावे. इतर समुहाचे त्यांनी गुलाम होऊन रहावे अशी इथल्या जातीयवादी सत्ताधारी लोकांची भूमिका स्पष्ट आहे म्हणून त्यांनी नोकरभरती कंत्राटी पद्धतीने सुरु केली आहे. ती बंद करावी व गोरगरिबांना सरकारी नोकऱ्यात आरक्षण दिले जावे.
       अजून या भारतातली गरीबी संपलेली नाही, मात्र इथला गरीब माणूस संपविण्याचा प्रयत्न चालू आहे तो तात्काळ थांबला पाहिजे, खाजगीकरण करणे बंद करावे. नोकऱ्यामधली ही नवीन सुरु केलेली कंत्राटी पद्धती आणि खाजगीकरणाचा खेळ बंद करावा. 
          गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाची खेडोपाडी सोय करण्यात यावी, यासाठी सरकारने बंद पाडलेले निवासी केंद्रीय मॉडर्न स्कूल पुन्हा सुरु करून गोरगरिबांच्या छोट्या छोट्या मुलांवर होणारे शैक्षणिक अन्याय थांबवावेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांचा भविष्यात होणारा छळ थांबला पाहिजे.
          रमाई घरकुल योजनेखाली गरीब लोकांना देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे ते वाढत्या महागाईच्या काळात घरकुल बांधकामासाठी पुरेसे नाही, ती रक्कम पाच लाख करण्यात यावी जेणेकरून गोरगरिबांना या योजनांचा खराखुरा लाभ घेता यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करण्यात यावी. गरीबांना देण्यात येणाऱ्या योजनांची केवळ निवडणूकांच्या कालावधीपुरतीच जाहिरातबाजी न होता तिची अखंड अमलबजावणी होऊन गोरगरिबांचे जीवनमान उंचावले पाहिजे. असा सरकारने प्रयत्न करावा. दलित,  अल्पसंख्यांक समाजातील लोकांना सुरक्षा देण्यात यावी. गोरगरिबांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ देऊ नये. निरपराध दलितांच्या मुलांच्या हत्या, छळ होऊ नये यासाठीं सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज आहे. भारतात गोरगरिब लोकांना न्याय मिळत नसेल, त्यांना सुखाने जगण्याची हमीच नसेल...  तर भारत हा विश्वगुरू होणार असल्याच्या जाहिराती करणे थांबवले पाहिजे





























      या मोर्चात अनेक मुद्यावर भाषणातून रोष व्यक्त करण्यात आला या भाषणातील काही मुद्यांचा सारांश इथे देत आहे.         
          महाराष्ट्रात दलित ,आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले व  क्रूर पद्धतीने खून करण्याच्या घटना सुरू आहेत. उदाहरणार्थ खैरलांजी, खेड, जातेगाव, मुंबई लातूर आणि आता नांदेड...बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का केली ? म्हणून खून करण्यात आला. असे हल्ले करण्याची हिम्मत का होते? आमच्या समाजाबद्दल द्वेश पसरवण्याचे काम काही जातीयवादी संघटना करत आहेत व त्या द्वेषातून आज देशात मॉबलिंचिंग होत आहे. इतर धर्माबद्दल द्वेष पसरवणाऱ्या संघटना त्या सरकार पुरस्कृत आहेत. त्या संघटनांनी भिमा कोरेगावची दंगल घडवून आणली. आमच्या समाजावर भीमा कोरेगाव येथे दगडफेक करून शांतता भंग करण्याचे काम केले. त्या घटनांचे सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत व ज्यांनी काहीच केलेले नाही, असे लोक सरकारने जेलमध्ये टाकले...म्हणून सरकारने तरुणाची माथी भडकावयला लावणाऱ्या संघटनावर बंदी घालून त्यांना जेलमध्ये टाकावे तरच देशात व महाराष्ट्रात शांतता निर्माण होईल.
       अनेक वर्षापासून गायरान जमिनी असणारे आमचे समाज बांधव सतत विनंती अर्ज आंदोलन करतात परंतु अधिकारी शासन निर्णय असताना सुद्धा गायरान जमिनी नावाच्या करत नाही हा आमच्या समाजावर होणारा अन्याय असून हा सरकारी जातीवाद आहे, याची नोंद घेऊन सर्व गायरान कसणाऱ्यांच्या नावे करून सातबाराचे वाटप करावे.
          अकोला येथील दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी यांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मौजे पांगरी बुद्रुक तालुका मंठा, जिल्हा जालना येथील गायरान जमीन धारकांचे नावाची करताना गट क्रमांक चुकीचा टाकण्यात आला आहे,तो गटक्रमांक दुरुस्त करून खरा गटक्रमांक सातबारावर टाकण्यात यावा. रेशन व्यवस्थेतील डीबीटी रद्द करावी, १४ मार्च २०१३ रोजी चा सरकारी नोकरभरती बंद चा शासन निर्णय रद्द करावा. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करावे.  स्वाधारच्या नावाखाली शिष्यवृत्ती बंद करण्याचा छुपा डाव बंद करावा.  समाज कल्याणच्या वस्तीगृहाचे खाजगीकरण बंद करावे. केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेले निवासी केंद्रीय इंग्लिश स्कूल सुरू करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी विहिरीचे अनुदान रोजगार हमीच्या प्रमाणात चार लाखाचे करावे. महाराष्ट्रातील ६० हजाराच्या वर असलेल्या डी.एड. बी.एड. रिक्त जागांची भरती सुरू करावी. नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण रद्द करावे. विविध महामंडळाच्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द करून मागेल त्या तरुण उद्योजकांना अंदाज पत्रकानुसार कर्जाचे वाटप करावे. अत्याचारग्रस्त कुटुंबावर भा.द.वि. कलम ३२५ अंतर्गत खोट्या केसेस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सवर्ण हत्याकांडाचे बळी पडलेल्या कुटुंबांना ५० लाखाची सरकारी मदत देण्यात यावी. अशा अनेक  मागण्या सदरहू मोर्चाच्या होत्या.
         मोर्चाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले, नगरसेवक राजेश खंदारे, कॉम्रेड मारोती खंदारे, कॉम्रेड सरिताताई शर्मा,  कॉम्रेड नंदकिशोर प्रधान, माजी सभापती दत्ता बनसोडे, नगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीनभैय्या राठोड, उपनगराध्यक्ष जे.के.कुरेशी, अचितनाना बोराडे, विकास सूर्यवंशी, पं.स. सदस्य, अरुणराव प्रधान, बाळासाहेब वांजोळकर, कॉम्रेड भगवान कोळे, तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते, भगवान लहाने, वंचितचे सुभाष जाधव, मोहन सदावर्ते, कॉम्रेड सचिन थोरात, सुनील तुरेराव,मा.सभापती  बाळासाहेब अंभिरे, सर्जेराव मगरे, अॅड अनिल मोरे, जिल्हाध्यक्षा असंघटित सौ.सारिका वरणकर, संगिताताई मधुकर मोरे, कासाबाई शिरगुळे, सौ.शीलाताई वाघमारे, शेषाबाई जाधव, सरोदे, शिल्पा बनसोडे, यांच्यासह अनेक महिलांच्या पुढाकारातून हा मोर्चा यशस्वी झाला. मोर्चात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ बापू वटाणे, डॉ.धोंडोपंत मानतकर, वंचितचे भारत उघडे, भीमशक्तीचे  दादाराव हिवाळे, चर्मकार संघटनेचे महादेव वाघमारे. दत्ता वाघमारे, अंबादास घायाळ,  सुरेश कोळे, अॅड सिद्धार्थ अवसरमोल,  सुरेश वाव्हळे, अचितराव खरात, रमेश प्रधान, कय्युमभाई कुरेशी, शगीर पठाण, रावसाहेब खरात, नगरसेवक बाजभाई पठाण, शबाबाभाई कुरेशी, शेख एजाजोद्दीन, ताहेर बागवान,व शरदराव मोरे, अच्युतराव साबळे,  विष्णू अण्णा मोरे, नाना वाघमारे, नामदेव देशमाने, नितीन मोरे, रमेश आवारे, अशोक अवचार, बौद्धाचार्य  महेंद्र टेकुळे, महेंद्र मोरे, सिद्धार्थ मोरे, अतुल खरात, सरपंच प्रताप जाधव, अर्जुन कांबळे,  ,मारोती खनपटे, समाधान शिंदे, गंगा गवळी, सिद्धार्थ देशमाने, धम्मानंद वाघमारे, मारोती कांबळे, प्रसिद्धी प्रमुख महादेव पाखरे, प्रदीप कांबळे, हार्दिक खंदारे, कार्यकर्ते आसाराम चोरमारे, संजय जाधव, विजय चव्हाण, विलास काऊतकर, सुरज प्रधान, प्रभाकर कांबळे, शुभम अंभोरे,  सारनाथ ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, जयभीम सेनेचे तालुकाध्यक्ष उद्धवभाई सरोदे, उपाध्यक्ष भीमराव वाघ, शहराध्यक्ष पिराजी पवळे. व त्यांचे इतर सहकारी यांचा सक्रीय सहभाग होता. 
       तालुक्यातून आलेल्या खेड्यापाड्यातील असंख्य पुरूष व महिलांच्या उपस्थितीने मोर्चाला व्यापक स्वरूप निर्माण झाले होते.
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

२८| जून |२०२३

गुरुवार, २२ जून, २०२३







पडरं पान्या, पडरं पान्या, कर पानी पानी 

शेत माझं लय तहान्हेलं, चातकावानी



          मृग नक्षत्र कोरडं गेलं, रोहिणी,भरणी नक्षत्रंही कोरडी गेली. आषाढ लागून चार दिवस झाले...तरी पावसाचा पत्ता नाही...उन्हाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही.  काळी आई  चैत्र, वैशाख, ज्येष्ठासह आषाढाच्याही उन्हाची तलखी सोसत आहे.  आमच्या लहानपणी आषाढी एकादशीला खूप पाऊस असायचा. पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्या भिजत भिजत, वादळ, वारा पाऊस झेलत पंढरपूरात पोहचायच्या आणि एकादशीनंतर परत फिरायच्या. आता मात्र पाऊससुद्धा जनधनच्या खात्यात पंधरा लाख टाकणार असल्याच्या आश्वासनासारखा वागू लागलाय..!
        सर्वच शेतकऱ्यांनी उन्हातान्हात आपापली शेतं नांगरुन, वखरून काळीशार करून ठेवलीत. काहींनी कापसाच्या नावानं फुल्या काढून ठेवल्यात. काहींनी सोपं वपं नगदी पीकच घेऊया म्हणून सोयाबीनच्या नावानं कास्या,काडी-कचरा वेचून वावर तळहातासारखं करून ठेवलंय. नव्या नवरीने नटून थटून सेज सजवलेल्या पलंगावर जाऊन पतीच्या आगमनाची वाट पहात पहात तिला झोप लागावी...तिच्या नव्या पतीने मित्रांसोबत त्यानेच दिलेल्या लग्नाच्या पार्टीत दारू ढोसून अगदी उशीराने लेझीम खेळत घरात यावे आणि कुठेतरी कान्याकोपऱ्यात विना अंथरूणाचे झोपून जावे... तशीत अवस्था पावसाची वाट पाहण्यात काळ्यामातीची झालेली आहे. ती नटून थटून फक्त पावसाची वाट पहात आहे. पेरणीचा काळ निघून जातोय आणि पाऊस येण्याचा नुसताच बोभाटा ऐकू येतोय...कुठे चक्रीवादळ, तर कुठे मान्सून कोकणात अडकला. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसणार ! ....असा पावसाच्या आगमनाच्या नावानं नुसता बोभाटा ऐकायला मिळतोय..! नव्या नवरीवाणी पावसाची गत झालीय...माझ्या 'ओढाळ सुरांच्या देही' या संग्रहातील काव्यपंक्ती अशा...
                         किती पाहिली मी वाट
                          सांज ढळली रे सारी
                          हुंदक्यात दाटल्या रे
                         आज पावसाच्या सरी

                           तरी नाही तुझं येणं
                           अंगी वणवा पेटला
                          नुसत्याच बोभाट्यानं 
                           जीव उगाच बाटला
हवामान खाते पावसाच्या नावाचा नुसता बोभाटा करत आहे.
पाऊस मात्र अजून किती दिवस येणार नाही, याची काही हमी नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवकाळी पावसाने मे महिन्यातच पावसाळा सुरू केला होता; मात्र आता पेरणीसाठी त्याची गरज आहे, तर तो आभाळाकडे पहायला लावतोय, पेरणीची वेळ निघून गेली आहे तरी तो अजून कसा  पडत नाही. पावसाच्या घोरानं शेतकऱ्यांचा बीपी वाढतोय..!
              आकाशात काळे ढग जरी दिसले तरी... आता लवकरच पाऊस येईल असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात तयार होतोय ; उन्हाच्या तलखीने जीवाची काहिली होतेय.
        काल दुपारी आकाशात ढग जमत होते,स थोड्या वेळाने ऊन चटकत होतं. आषाढ लागूनही अजून पावसाचा पत्ता नाही म्हणून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागून आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पाऊस उशिरा का होईना येईलही; परंतु उशिरा आलेल्या पावसाचा पिकांवर अनिष्ट परिणाम होणार. पिकांवर महागामोलाची औषधी खते वापरूनही पिकांचा उतार येणार नाही. खर्च खूप होऊन तो खर्चही निघणार नाही. उशीर झालेल्या खरीपाच्या पिकांची काढणी उशिरा होईल. रब्बीच्या पीकाची वेळेवर पेरणी करता येणार नाही. म्हणजे रब्बीचे पीकही शेतकऱ्यांचा तोटाच करेल की काय ? अशा चिंतातूर शेतकऱ्यांच्या मनाची अवस्था कोणत्याच डॉक्टरांना कळणार नाही...ती शेतकऱ्याच्या मनालाच ठाऊक असेल. त्याच्या मनाची घालमेल ही वरुणराजाबाबतचीच असणार. फक्त पाऊस लवकर यावा ! मनातल्या मनात त्याची अस्मिता असलेल्या ईश्वराला साकडं घालून पावसाला शेतकरी काय काय विनवणी करत असेल.
कवीच्या भाषेत हेच वाक्य त्याच्या तोंडी असेल की...
          
 पड रं पान्या, पड रं पान्या, कर पानी पानी
 शेत माझं लय तहान्हेलं , चातकावानी.....
 
       जून महिना लागून संपतही आला आहे, अजून पेरणी कुठेच नाही, या दिवसात शेतकऱ्यांना आपल्या मुलांला शाळेत टाकण्याचा घोर, शाळेचा ड्रेस घेण्याचा, पाटी दप्तर घेण्याचा घोर, काहींना मुलाची हजारोने फीस भरण्याची काळजी, बी-भरणासाठी, खत औषधीसाठी पैसा उभा करण्याची काळजी, पेरणी करण्यासाठी पुरेसा पाऊस कधी पडेल याची काळजी, अनेक प्रश्नांचं काहूर शेतकऱ्यांच्या डोक्यात थैमान घालू लागतंय, तरी तो ह्या सगळ्या गोष्टी विस्मरणात टाकून किंवा ही भावी काळजी विसरता यावी म्हणून पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतोय. कोसो दूर पायी चालू लागतो. शेतकऱ्यांच्या अंगात अशी सहनशक्ती येतेच कुठून ? असाही प्रश्न पडतो.
          एक बरं झालं पावसाचं येणं न येणं निसर्गाच्या हातात आहे, नाहीतर ते प्रत्येक मतदार संघाच्या आमदार, खासदारांच्या  हातात असतं तर पावसासाठी सुद्धा आमदार खासदारांच्या घरासमोर धरणे ,आंदोलनं करावी लागली असती. "अगोदर आमच्या मतदार संघात पाऊस पाडा. नाहीतर आम्ही निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकू." "आमच्या मतदार संघात  पाऊस पाडा, नाहीतर खुर्ची खाली करा." अशा अनेक घोषणांची निर्मिती झाली असती. नेत्यांनी सुद्धा शेतकरी वर्गाला मतदार संघात पाऊस पाडण्यासाठी वेठीस धरलं असतंं...परंतु बरे झाले पावसाची सूत्रे दयाळू निसर्गाने स्वतः कडे ठेवून घेतली.

डॉ.धोंडोपंत मानवतकर
२१ जून २०२३

नको नको सांगू माये...!



आईची आठवण म्हणून ही कविता आईला
समर्पित......






















आईचा सासुरवास आणि तिच्या जिंदगीची तिनेच सांगीतलेली कथा....माझ्या कवितेतून..!🌼

--------------------------------------------------

नको नको सांगू माये..!


नको नको सांगू माये,  तुही करमकहानी
ऐकताना डोळ्यांमधीं, येतं पसाभर पानी


राब-राबली कष्टली,    तुव्हा फाटका संसार
तुव्हं खोटं खोटं भाग्य, दैवाचाही खोटा सार


मायबापाची गरीबी, नाही बोळवण साधी
सासरीही कष्ट केले, नाही धूसफूस कधी


बारा गाड्या गरिबीत, कशी जन्मली तू माय
कसायाच्या घरी जणू, गुणी जन्मली तू गाय


तुह्या बापाची गरिबी, तशी गेली शेवटाला
सासरीही फाटकाचं, तू  गं  संसार थाटला 


कामामधी जलम गेला, तुही सुद् तुला नाही  
जातं, चुलं  नि  वावर , देई  कामाची गवाही


कोंबड्यानं बांग द्यावा, तव्हा तुह्या हाती जातं
नव-याचं तुह्यासंग ,  गाय कसायाचं नातं 


उठे तांबडं फुटता,    तशी बसे जात्यावर
उपाशी न राहे कुणी, तुव्हा जीव नात्यावर


तुह्या मांडीवर डोकं,  मला येई गाढ झोप 
कणी कोंड्याचं दळण, चार पायल्याचं माप


दिसं निघायच्या आधी, बारा घागरी नदीच्या 
तुह्या कष्टामुळं येई, पानी डोळ्यात नदीच्या 


कोसभर गावनदी, तुह्या चोवीस चकरा
रांजणाला येई कीव, माय बळीचा बकरा


गव-याबी थापल्या तू, रोज सारवण केलं
तुह्या सासुबाईच्या तं, कधी मना नाही आलं


मोठी सून मनू मनू, रातं दिन काम केलं
सास-यानं तुह्या तुला, नाही अंतर गं दिलं 


सासू होती कैदासीन, सासरा  तं बापावानी
त्याला ठाऊकच होती, तुह्या जुल्माची कहानी


तुह्या पोटामधीं भूक, आतड्याला पडे पीळ
माय करायची कामं, उपाशी ती  ईळ ईळ 


पाचविला पुंजलेला, तुला कष्टाचा डोंगर 
बापाच्या मागं..मागं, तुवा हाकिला नांगर


चार वरसाचा होतो,  तव्हा कलली सावली 
घास खुंटला मुखात,  मही दुःखात मावली 


जावा पोटामधीं घास, माय तडफडे भारी
पोटाच्याच दुखापायी, नाही मिळाली भाकरी 


माय गरोदर  तरी ,खायी पाथरीची भाजी
खाण्यापिण्याच्या नावानं, करी परपूस आजी


असं कसं भाग्य तुव्हं, किती नशीब फाटकं
संसारात नाही केलं, कधी खोटं तू नाटकं 


तुह्या गळ्यामधी होता, लताबाईचा गोडवा
मह्या कवितेला आला, तुह्या ओवीचा गोडवा


तुह्या नशिबाचे गिर्हे, कसे उलटे फिरले 
तुह्या दैवाचे उखाणे, कसे दुःखाने चोरले


कसं निखरट दैवं, त्याला नाही आली कीव
जलमभर सोसलेल्या, दुखण्यानं गेला जीव 


तुझा मुलगा 

धोंडोपंत मानवतकर, 


रविवार, ४ जून, २०२३

सामाजिक न्याय, संघर्ष कृती समितीची बैठक संपन्न

सामाजिक न्याय, संघर्ष कृती समितीची बैठक संपन्न  
       सामाजिक न्याय व संघर्ष कृती समितीच्या बैठकीत बोलतांना साहित्यिक                       डॉ.धोंडोपंत मानवतकर

मंठा प्रतिनिधी :

       मंठा तालुका सामाजिक न्याय व संघर्ष कृती समितीच्या वतीने बौद्ध, मातंग, आदीवासी समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचारांबाबत तसेच सरकारच्या अन्यायकारक धोरणाबाबत एक व्यापक बैठक ३ जून रोजी मंठा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
         या बैठकीत बौद्ध, मातंग,आदिवासी या समाजावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय,अत्याचाराबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी यांच्यात महत्वपूर्ण चर्चा होऊन वाढलेल्या सामाजिक,  अन्याय, अत्याचाराविरोधात तसेच राज्य व केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात भव्य मोर्चाचे लवकरच आयोजन करण्याबाबतची चर्चा झाली. या बैठकीत अनेक वर्षापासून मागासवर्गीय समाज करत असलेल्या गायरान जमीनचे पट्टे वाहणाराच्या नावे करावेत. या प्रमुख प्रश्नासह १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सरकारी भरती बंदचा निर्णय मागे घ्यावा. सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेले आरक्षण बंद करू नये. स्वाधारच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करू नये. समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या मागासवर्गीय वसतीगृहाचे खाजगीकरण करू नये. एस्.सी प्रवर्गासाठीचे निवासी केंद्रीय मॉडर्न इंग्लिश स्कूल सुरु ठेवावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी विहीरीचे अनुदान कमीतकमी विहीर खोदकामासाठी लागणाऱ्या रोजगार खर्चाच्या दुप्पट तरी देण्यात यावे. महाराष्ट्रात ६० हजाराच्यावर रिक्त असलेल्या डी.एड.,बी.एड्.जागा भरून सुशिक्षित बेकारांना न्याय द्यावा. शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येऊ नये. या व इतर समाजाच्या समस्यांवर दीर्घ चर्चा करण्यात आली. 
         या बैठकीला मा.दत्ताभाऊ बनसोडे, परतूरचे कॉम्रेड- मारोती खंदारे, ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ बापू वटाणे, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, भीमशक्तीचे जि.अ. प्रकाश अण्णा घुले, कामगार युनियनचे कॉम्रेड नंदकिशोर प्रधान, वंचित आघाडीचे सुभाष जाधव, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब वांजोळकर, भारत उघडे, अंबादास खरात सर,भीमराव वाघ, नितीन मोरे, गंगाराम गवळी, अचितराव खरात, एड.सुमेध आवारे, उद्धव सरोदे, महेंद्र टेकुळे,  सुनील तुरेराव, सुशील जाधव, आप्पासाहेब सदावर्ते, ढाकरगे बापू, सचिन थोरात, दिगंबर कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       या बैठकीला तालुक्यातील अनेक महिला व पुरूष कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते.
३ जून २०२३

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर लेखांक-४

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर



















अहंकार हा आपला शत्रूच..! 

               माणूस हा भयंकर अहंकारी प्राणी आहे.. छोट्या छोट्या गोष्टींचा तो अहंकार करत असतो. अहंकाराला लोक इगो म्हणतात. माणूस स्वतःच्या अहंकारी वृत्तीमुळे दुसऱ्याला खूप त्रास देत आला आहे... तेवढेच त्याने स्वतःचेही नुकसान करून घेतले आहे.
           अहंकार बाळगून माणूस स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेत असतो..म्हणून निरहंकारी लोकांची तसेच संतांची संगत महत्वाची असते; परंतु कोणत्या संतांची ? तर जे परोपकारी आहेत त्यांची. रंजल्या गांजलेल्यांना आपलं म्हणणारे आहेत त्यांची. जे सर्वज्ञ आहेत त्यांची. ज्यांचे पड्विकार गळून पडलेले आहेत त्यांची.
          आज स्वतःला महाराज म्हणवून घेत समाजाला लुबाडणारे खूप आहेत.  अनेक महाराज स्वतःला संत म्हणून घेणारे आहेत. अशाच एका संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापू यांना आपल्या दुष्कृत्याबद्दल नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अशा विकृत साधूंपासून समाजाने लवकर सावध झाले पाहिजे.
          ज्याला आपल्या ज्ञानाचाच गर्व होतो तो साधू नव्हे. "संतांची विभूती जगाच्या कल्याणा"  संतांचं आयुष्य जगाच्या कल्याणासाठी झिजलं पाहिजे.. परंतु अलिकडे तसे न होता अनेकांना आपल्या चमत्काराचा अहंकार झालेला आहे.. आणि या चमत्काराच्या माध्यमातून ते जनतेला वेठीस धरत आहेत.
                  गर्व, अहंकार, अभिमान बाळगणाऱ्या वृत्तीची माणसं इतरांसोबत नेहमीच तुलनात्मक वागत असतात. अशी माणसं भयंकर स्वार्थी असतात..ती माणसं अत्यंत गर्विष्ठ असतात.. ते आपल्या  'मनावर आणि डोक्यावर' अहंकाराचं ओझं घेऊन फिरत असतात. 
            तसा प्रत्येकाच्याच ठायी कमी जास्त प्रमाणात कशाचा ना कशाचा अहंकार असतोच..!
             काही लोकांना स्वतःजवळ असलेल्या संपतीचा अहंकार असतो तर, कुणाला ताकदीचा अहंकार, कुणाला सौंदर्याचा अहंकार, कुणाला गोऱ्या रंगाचा, कुणाला ज्ञानाचा, काहींना चांगल्या गुणवत्तेचा, काहींना प्रतिभेचा, काहींना जातीचा, काहींना धर्माचा, काहींना साहेब असल्याचा. काहींना प्रतिष्ठेचा. काहींना अंगावर असलेल्या दागदागिन्यांचा, काहींना गळ्यातल्या सोनसाखळ्यांचा. काहींना स्वतःच्या कर्तृत्वाचा, काहींना  संततीच्या कर्तृवाचा, कुणाला बिल्डिंगचा.. कुणाला आपल्याकडे सगळ्यात भारी गाडी असल्याचा. कुणाला आपल्याकडे असलेल्या पदाचा. राजकारणातल्या सत्तेचा. काहींना सर्वाेच्च पदाचा. असे अहंकाराचे अगणित प्रकार सांगता येतील ; परंतु मित्रांनो.! या जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही..म्हणजे टिकून राहणारी नाही; म्हणून कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नका....निसर्ग हा   तुमचा अहंकार काही सेकंदात संपवून टाकतो. 
                   नुकत्याच झालेल्या तुर्की आणि सिरियाच्या भूकंपाचे उदाहरण घ्या. निसर्गाने केवळ नव्वद सेकंदात हजारो  गगनचुंबी इमारती जमिनदोस्त करून टाकल्या. होत्याचे नव्हते केले...अनेक निर्दोष, निष्पाप जीव गुदमरून मरून पडले...सगळ्याच प्रकारच्या अहंकारी, निरहंकारी लोकांना या निसर्गाने आपली जागा दाखवली. 
                 माणूस हा या जगात पाहुणा आहे, हे विसरू नका. या पाव्हण्याने  कसलाच मोह करू नये. तो अनेक गोष्टींच्या मोहात अडकतोय आणि त्या नश्वर गोष्टींचा अहंकार करू लागतो.
                मला आठवते माझे आजोबा संत कबिरांची आणि संत दुनियादास महाराजांची एकतारीवर भजने म्हणत असत. संत दुनियादास महाराजांच्या एका भजनाचे धृपद माझ्या अजूनही स्मरणात आहे ते असे...

 "बोल गर्वाचा बोलू नको रे उणा |
 दोन दिवसाचा दुनियेत तू पाव्हणा ||

            हा अभंग माणसाला आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे.. की, या दुनियेत आपण दोन दिवसाचे पाव्हणे आहोत हे नेहमी लक्षात ठेवा ! मनातून, डोक्यातून, हृदयातून मीपणा काढून टाका. कुणालाही गर्वाने बोलून दुखवू नका. तुमचा एकही बोल (शब्द) गर्वाने भरलेला, अहंकारमिश्रीत नसावा. कारण "गर्वाचे घर नेहमीच खाली "असते..
              मित्रांनो, आयुष्य खूप छान आहे; परंतु आयुष्य खूप मोठं आहे.. असं कधीच समजू नका. आयुष्याची व्याख्या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी एकाच वाक्यात केलेली आहे. त्या म्हणतात," अरे जगणं मरणं एका श्वासाचं अंतर " हेच तर आहे जीवनाचं खरं तत्वज्ञान. आपण पहिला श्वास घेतो; परंतु दुसरा श्वास घेऊच याची शास्वती नाही...दुसरा श्वास घेण्याअगोदर तो निघून जाऊ शकतो म्हणजे बंद पडू शकतो. म्हणून हा जीव सुद्धा आपला नाही..आपली वाचा कधीही जाऊ शकते..संत तुकाराम महाराज म्हणतात, "आपुलिया बळे | नाही मी बोलत || सखा भगवंत | वाचा त्याची || आपल्या कर्तृवाचा कधीच अहंकार करू नका. सत्तेचा कधीच अहंकार करू नका; कारण सत्ता ही फक्त पाच वर्षासाठीच असते. जनतेसोबत वाईट वागले की, जनता सत्ताधारी लोकांना आपली जागा दाखवून देते.... म्हणतात ना..! "गाव करी ते राव  ना करी" म्हणून कोणतीही सत्ता ही चिरकाल टिकून राहणारी नसते; परंतु आमच्या देशात सत्ता हाती आली की, ती जाणारच नाही अशा भ्रमात राजकारणी लोक वावरत असतात. प्रत्येक घटकाला आणि घटनेला  एक मर्यादा असते हे कुणीच विसरू नये.
        माणूससुद्धा असाच एक प्राणी आहे, तो मरण विसरून जगत असतो. जणू तो अमृत पिऊन आलेला आहे. असे त्याला वाटू लागते. आपण कधीच  मरणार नाही असा अहंकार घेऊन तो इतरांसोबत वाईट वागून खूप मोठी स्वप्ने पाहत असतो. तो ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी सत्ता, संपती जमवत असतो..आणि त्या नश्वर संपतीलाच तो आपले आपले म्हणत असतो; परंतु तो भ्रमात जगत असतो. त्याचा भ्रम फक्त निसर्गच काढून टाकू शकतो .
          नुकत्याच तुर्की आणि सिरियाच्या भूकंपाने हाहाकार केला.. लाखों सजीवांचा जीव घेतला. ही निसर्गाने केलेली भयंकर हानी कधीच भरून न निघणारी आहे.    
           "निसर्ग" हा फार मोठा जादूगार आहे...त्याची किमया अनाकलनीय आहे....परंतु माणूसप्राणी एवढा अहंकारी बनला आहे की, तो निसर्गाला चॅलेंज करू लागला आहे..खरेतर तो याच निसर्गाच्या पंचतत्वापासून निर्माण होतो आणि त्याच पंचतत्वातच विलीन होत असतो..तरीही तो निसर्गालाच आव्हान करू लागलाय.! केवळ त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या, विज्ञानाच्या अहंकारावर.!
             हो, तर मला सांगायचं होतं.. माणूस हा अहंकाराचा बळी आहे.. तो रात्रंदिवस अहंकार घेऊन फिरत असतो...तो रस्त्याने जात असताना त्याला एखादा माणूस भेटला की, त्याला वाटते समोरच्याने अगोदर मला नमस्कार घालावा.. समोरच्यालाही तेच वाटते. दोघांचाही इगो हर्ट होतो आणि ते एकमेकांना न पाहता जवळून निघून जातात. इथूनच दोघात दरी निर्माण होते..आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.
              मोबाईल फोनवर बोलत असतानासुद्धा हाच प्रकार घडत असतो. अगोदर कुणी नमस्कार घालावा..? त्यावेळी कुणा एकाला स्वतःची प्रतिष्ठा मोठी वाटते, तर कुणा एकाला आपल्या वयाचा अहंकार असतो..किंवा धन संपतीचा अहंकार, असतो. दोघेही आपापल्या अहंकारात अडकून पडतात आणि निर्माण होते दरी आणि सुरू होतो विसंवाद आणि द्वेष हा द्वेष कधी  कधी कायमचा टिकून राहतो. मी का अगोदर बोलू..?  अरे बोलना.! काय फरक पडणार आहे..तू अगोदर बोलला तर.!
           असू दे तुझ्याजवळ खूप संपती; परंतु ज्याच्याकडे संपतीच नाही तो निर्धन आहे म्हणून जर त्याला अगोदर बोलला.. तर तू लगेच निर्धन होशील का?  नाही ना होणार.! तरीही त्याचा इगो त्याला संपतीच्या अहंकारातून बाहेर पडू देत नाही. 
          असे वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार माणसाला माणसापासून तोडून टाकतात. नात्यातला विश्वास तोडून टाकतात. मुलांचे आणि आईवडीलांचे असेच जमत नाही. सख्या भावा- बहिणीमध्ये दुरावा निर्माण होतो. मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होतो यातून अनेक प्रकारे नुकसान होत असते..म्हणून मित्रांनो अहंकाराला स्वतःजवळ कधीच थारा देऊ नका.! अहंकार हा आपला शत्रू आहे.
✍️
 डॉ.धोंडोपंत मानवतकर
९ | फेब्रुवारी | २०२३

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

|| मंथनाचे पैलू || डॉ.धोंडोपंत मानवतकर













....बाकी सगळं अलबेल आहे !"

       भारतीय माणसाला सोहळे प्रिय आहेत... तो नेहमीच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी (स्मृतीदिन) त्याच बरोबर नवस, कंदुरी, भंडारे, वाढदिवस आणि वर्षभरात येणारे सगळेच पारंपरिक सण साजरे करतो.. तेही अगदी आनंदाने....! परंतु ह्या सगळ्याच सोहळ्यांचं तो स्वतःला कधीच आऊटपुट मागत नाही...! 
      अलिकडे सोहळ्यांना चांगले दिवस आले आहेत. आम्हां सगळ्यांना सोहळे प्रिय वाटू लागले आहेत. आम्ही सोहळ्यांना अतिरिक्त महत्व देऊ लागलो आहोत....परंतु सोहळा का करायचा ? कशासाठी करायचा ? की,केवळ भूतकालीन इतिहासाचा  जागर करायचा..! की, नुसत्या भूतकालीन स्मृती जागृत ठेवायच्या..? की, भूतकालीन घटनांना नुसता उजाळा द्यायचा..? की, या कार्यक्रमातून, सोहळ्यातून काही आदर्श घ्यायचा,? की काही प्रेरणा घ्यायची ? की, यातून काटेकोरपणे काही आचरण करायला शिकायचे.? याबाबत आमच्याकडे काहीच उद्देश नसतो. म्हणजे "वाळूत मुतलं फेस ना पाणी" सारं निर्रथक.
        मला वाटतं या सर्व घटना, कार्यक्रम, उपक्रम, शाळेतील प्रतिज्ञा, प्रार्थना किंवा समाजात चाललेले कीर्तन, प्रवचन, सप्ताह किंवा शासनाद्वारे निघणारे उपक्रमाचे आदेश.. हे नुसते सोहळे होऊ लागले आहेत ते केवळ सोहळे न होता त्यांचे काटेकोरपणे पालन आणि आचरण व्हावे..!
      शालेय विद्यार्थ्यांकडून गेल्या सत्तर वर्षापासून दररोज राष्ट्रगीत, प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते....लहानपणी शाळेत दररोज आमच्याकडूनही राष्ट्रगीताचा दर्जा असलेलं एक प्रसिद्ध गीत वदवून घेत असत...*'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा "* कवी पुढे लिहितो *"मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* लाहोरचे कवी मुहम्मद इकबाल यांनी हे गीत १९०५ साली लिहिलं होतं. तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांना भारतातील अनेक जातीजातीत, धर्माधर्मात सलोखा,भाईचारा आहे, हे दाखवण्यासाठी हे गीत
लिहिलं होतं...एक मुस्लीम शायर म्हणतो," *मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना"* आणि आम्ही सत्तेसाठी हिंदुमुस्लीम दंगली घडवून आणतो... जातीजातीत भांडणे लावतो....निवडून येण्यासाठी भावाभावात भांडणे लावतो आणि आमची पोरं पोरी दररोज प्रतिज्ञेत म्हणतात, " *सारे भारतीय माझे बांधव आहेत.* किती कमालीचा विरोधाभास आहे हा. म्हणजे प्रतिज्ञा केवळ तोंडपाठ करण्यापूरतीच असते का ?  की तिचे आचरणही करायला पाहिजे. प्रियजनहो तुम्हीच ठरवा...आम्ही एकमेकांना भाऊ का समजत नाहीत..? आम्ही जातीचा धर्माचा, प्रतिष्ठेचा अहंकार घेऊन का भांडत राहतो..? अलिकडे तर जातीयवाद बोकाळला आहे तो स्पृश्य - अस्पृश्य असा नसून रुपांतरीत झाल्याचे दिसून येत आहे...महाराष्ट्रातील अनेक संतांनी जातीभेदांवर, अंधश्रद्धेवर लोकांच्या खोटारडेपणावर, अभंग व भारुडे रचली आहेत.. ती आम्हाला तोंडपाठसुद्धा आहेत; परंतु आम्ही त्यातील तत्वज्ञान आचरणात आणत नाही.
       इथे प्रत्येक समाज आपापल्या धर्माचे सोहळे करत आहे; मात्र ते फक्त सोहळेच होताहेत...आचरण मात्र शून्य आहे...
      दरवर्षी 'मराठी भाषा दिन' व 'मराठी भाषा पंधरवाडा' साजरा केला जातो; कार्यक्रमाला दहाबारा लोक उपस्थित असतात. माझ्यासारख्या मानधन न घेणाऱ्या गावातल्याच प्रमुख वक्त्याला बोलावून एक हार आणि त्याचं पंधरा मिनिटाचं भाषण असतं.. मी सांगत असतो, *"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी* 
 *खरेच धन्य जाहलो ऐकतो मराठी* पुढे मी सांगत असतो," मराठी लँग्वेज ही आपली मदरटंग आहे. मराठी लँग्वेजवर अनेक लँग्वेजने आपल्या मराठी लँग्वेजवर आक्रमण केलेलं आहे, आपल्याला ते हाणून पाडावे लागेल..! (टाळ्या ) माझ्या पंधरा मिनिटाच्या भाषणात हिंदी, इंग्रजीचे पाचपन्नास शब्द आलेले असतात यावर कुणीच काही बोलत नाही; कारण मी असतो गावातलाच विनामानधन वक्ता...म्हणून तेही काही बोलत नाहीत...शेवटी चहापाण्यावर कार्यक्रमाची सांगता होते....बस्स. झाला मराठी भाषा दिन साजरा...  अर्थात ही सुद्धा एक प्रासंगिक औपचारिकताच असते..  परंतु मराठी भाषेविषयी चिंतनशील चिकित्सक अशी चर्चा होत नाही...चर्चा होते ती शहरांची नावे बदलण्यावर....तो असतो सत्ताकारणाचा भाग, सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न... चर्चेत राहण्याचा..मुद्दा..!
          देशातले राज्यकर्तेसुद्धा श्रेय घेण्यासाठी अनेक कार्यक्रमाची उद्घाटने करतात; काम मात्र करत नाहीत...एक सत्त्य उदाहरण असे की, आम्ही गेल्या एप्रिलमध्ये एका आमदारांना वाचनालयाच्या उद्घाटनासाठी बोलावले त्यांनी तिथेच त्याप्रसंगी वाचनालयाला सहालाख रुपये देतो म्हणून जाहीर केले.. आज वर्ष होत आहे...अजून कृती नाही... दुसऱ्या एका प्रसिद्ध व्यक्तीने पंचवीस वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी अकरा हजार रुपये देतो म्हणून भरसभेत जाहीर केले होते. तो बिचारा कोरोनामधी मरण पावला; परंतु त्याचे आश्वासन आम्ही विसरलो नाही... आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा असंच आहे ह्यांच्या आश्वासनासारखं.....प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येऊन पडल्यासारखं...!
     पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला आम्हाला फक्त सगळीकडे स्वातंत्र्यदिनाचे भरगच्च कार्यक्रम दिसतात, ज्याची महिन्याभरापासून ,वाजवण्याची पीटीची, कवायतीची रंगीत तालीम सुरु असते... अनेक राज्यकर्तेही लिहून दिलेल्या आपापल्या सकारात्मक भाषणाचा सराव करत असतात
.....आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ऐकू येतात सगळीकडे स्वातंत्र्याचे गाणे, शहीदांची करुणरसातली कवने,
भाषणांची रेलचेल, सगळीकडे तिरंगा फडफडतांना...!  जल्लोष होताना..! जयजयकार होताना...!
        सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या धर्मनिरपेक्षतावादी आमच्या देशात लोकशाही स्वातंत्र्याचा जयघोष करतो आहोत, सोहळे करतो आहोत..मात्र लोकशाही अजून भारतातील दुर्बलांच्या, कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या झोपडीत शिरलेली नाही, की..शिरू दिली नाही..यावर आपण खुशाल चिंतन करू शकता..! लोकशाहीच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या मूल्यांचा फक्त भास होतोय..! जाहिरातींचे बळी ठरलेल्या भारतीय माणसाला फक्त  राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही...बाकी सगळं अलबेल आहे.
✍️
 डॉ.धोंडोपंत मानवतकर
लेखक- सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे अभ्यासक आहेत.

अण्णाभाऊ साठे लेख -

महामुंबई महाराष्ट्र देश-विदेश राजकारण पर्यावरण अग्रलेख संपादकीय अर्थभारत आमचे लेखक आमची प्रकाशने ई-पेपर मनोरंजन विविध रा.स्व.संघ आणि परिवार ...