शुक्रवार, ६ मे, २०२२
लोकराजा शाहू महाराजांना कृतज्ञतापर आदरांजली..!
महाराष्ट्र राज्यात ६ मे २०२२ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व साजरे करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर, मा. नगरसेवक अरूणभाऊ वाघमारे, प्रा.राघव गायकवाड, प्रा.सोनाजी कामिटे, कार्यकर्ते शरदराव मोरे, नाना वाघमारे, गंगाराम गवळी, अशोक अवचार, रमेश आवारे,भिमराव वाघ जय भिम सेना जिल्हा उपाध्यक्ष जालना, बी.के.प्रधान, विलास मोरे, सतीश खंदारे, राजू खंदारे, जी.डी.जाधव, रंगनाथ बापू वटाणे, अॅड. अनिल मोरे,पिराजी पवळे,राज खनपटे, यांची आवर्जून उपस्थिती होती.
बुधवार, ४ मे, २०२२
तुम्ही जननायक व्हा; पण आम्हाला माणूस म्हणून जगू द्या.!
तुम्ही जननायक व्हा; पण
आम्हाला माणूस म्हणून जगू द्या.!
राजसाहेब ठाकरे, स. न. वि. वि. --- औरंगाबादमध्ये तुम्ही उत्तर सभा घेतली. अपेक्षेप्रमाणे शरद पवार आणि भोंग्यावर भाष्य केले. पूर्वीच्या सभेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची काही उत्तर दिली. साहेब तुम्ही पुन्हा म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जातिपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुरू झाले.’’ एकवेळ मान्य. पण, राजसाहेब खायला नाही पीठ अन् कशाला हवं विद्यापीठ म्हणून यापूर्वी १९७६ ते १९९४ या दोन दशकांत औरंगाबाद विद्यापीठाचे आंदोलन कुणी चिघळवले? या दोन दशकांत गावोगावी मराठा-नवबौद्ध दंगलीला कुणी खतपाणी घातलं हेही सांगा. दोन दशकं मराठवाडा जळत होता. त्यानंतर तर ९० च्या दशकात आमच्या बालपणी अख्ख्या देशात जाणून बुजून हिंदू-मुसलमान दंगली भडकवल्या गेल्या. त्यासाठी रथयात्रा कुणी काढली? ते जाऊ द्या. त्याही पूर्वी दलितांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं कुणी बांधले? या जातिपातीचं काय? कारण तुम्हीच म्हणाला इतिहास विसरू नका! साहेब असे प्रश्न खूप आहेत. तुम्ही उत्तर देऊच शकणार नाहीत. दिले तरी आज प्रबोधनकारांचे जसे ‘सोयीने’ संदर्भ दिले, तसेच देणार. समग्र प्रबोधनकार तुम्हीही नाही अन् पवार साहेबही सांगणार नाहीत. अन् तो अनेकजण वाचणार नाही; कारण आज त्यांच्या धडावर त्यांचे डोके नाहीच. एक सांगायचे. या दहा वर्षांत अपवादाने का होईना काही गावांमध्ये कांबळे-मेश्रामांच्या बरोबरीने देशमुख-पाटील भीमजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमात एकांब्याचा आर. आर. पठाण बाबासाहेबांवर व्याख्यान देतो आहे अन् त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी-कुलकर्णी करीत आहेत. हे चित्र समृद्ध भारतासाठी नक्कीच आशादायी आहे. मात्र, तुम्ही राजकारणी ‘भोंगे’ लावून यात मिठाचा खडा टाकत आहात. पण, हा भोंग्याचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे; कारण भोंग्यांचा त्रास हा हिंदूंना होत नाही अन् मुसलमानांही होत नाही तर तो होतो आम्हां ‘माणसांना’. आज जरा खेड्यात जाऊन पहा कर्णकर्कश आवाजात मोठा भोंगा लावून सुरू असलेला हरिपाठ मध्यान्ह रात्रीपर्यंत तर काकडा आरती पहाटेपर्यंत झोपूच देत नाही. सप्ताह तर अधूनमधून सुरूच असतात. दुपारची अजाण दुपारी काम करू देत नाही. मध्येच शाळेत प्रेड थांबवावा लागतो. यात सर्वाधिक त्रास होतो ते तान्ह्या बाळाला. ते बिचारे रडते, चिडचिड करते; कारण आपण हिंदू आहोत की, मुस्लिम हे त्याला अजून कळायचे आहे. आम्ही ‘माणसं’ तर गप्पच. कारण धर्मापेक्षा आपल्या संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही गप्प असतो. पण, हा मुद्दा उपस्थित करून हिंदू-मुसलमानांना नव्हे; तर आम्हां ‘माणसांना’ होणाऱ्या त्रासाला तुम्ही वाचा फोडली. पण साहेब, तो हनुमान चालिसाचा मुद्दा खूप खटकला. त्याचाही सर्वाधिक त्रास आम्हां ‘माणसांना’च आहे. हनुमान चालिसाचे उड्डाण तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवेल की नाही, माहीत नाही. पण, याचे जे परिणाम होतील ते नक्कीच धर्मांध हसन अन् किसनला जेलमध्ये पोचवतील. रामाचं घर जळेल अन् रहीमचं डोकं फुटेल. तुम्हाला सत्ता मिळेल, मुलगा मंत्रीही होईल. पण, समीर अनाथ होईल; अमिरच्या आई-वडिलांचा वृद्धापकाळातील सहारा हरवेल. एक पिढी उध्वस्त होईल. पण तुम्हाला त्यांचे काहीच सोयरसुतक नसेल. आणि आणखी एक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विचार आहेत हे तुम्ही सांगितले ते फार बरे केले. पण, हा विचार कृतीत आणला तो फुले-शाहू-आंबेडकरांनी. ‘भोंगे’ लावून हरिपाठ-अजाण म्हणणाऱ्यांनी नव्हे. त्यामुळेच शिवाजी या विचारांची शिकवण देणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. यात भलेही तुम्ही हिंदू जननायक व्हा; पण छत्रपतींच्या स्वराज्यासारखं प्रत्येकाला निर्भय अन् हिंदू-मुस्लिम म्हणून नव्हे; तर माणूस म्हणून जगू द्या. आमचे बाबूराव बागूल माणसाला म्हणतात... ‘वेदा आधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळेच सुंदर झाली ही मही’ ++++✍️
विकास वि.देशमुख
![]() |
| विकास वि.देशमुख - ९८५०६०२२७५ |
बुधवार, २७ एप्रिल, २०२२
इतिहासकार लोकहितवादी- एक मौलिक संदर्भग्रंथ.
इतिहासकार लोकहितवादी- एक मौलिक संदर्भग्रंथ
परिक्षण-डॉ.धोंडोपंत मानवतकर
"इतिहासकार लोकहितवादी" या ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी पीएच.डी.संशोधनाच्या औचित्याने हे लेखन केले असले; तरी हा ग्रंथ इतिहासाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी अत्यंत मौलिक ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ़ लोकहितवादी यांच्या ऐतिहासिक कार्यकर्तृत्वाला इतिहासकार म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी केलेले हे संशोधन निष्कर्षाच्या कसोटीवर उतरले असून सदरहु विषयाला सिद्ध करण्यांत प्रा.डॉ.कमळकर यशस्वी झाले आहेत.
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ़ लोकहितवादी यांची ओळख "लोकहितवादींची शतपत्रे" एवढीच सीमित होती. कदाचित ती द्वेषमूलक असावी,असे वाटते.
गोपाळ हरी देशमुख ऐवजी "लोकहितवादी" या टोपणनावाने लेखन करण्याचे कारण 'गोपाळ हरी देशमुख' यांना अनेक कार्यालयात नोकऱ्या कराव्या लागल्या. नोकरीत व्यत्यय न येता आपणास परखड व रोकठोक लेखन करून सामाजिक परिवर्तन घडवून आणता यावे. म्हणून त्यांनी "लोकहितवादी" हे नाव धारण केले. आपल्या अनेक लेखातून त्यांनी अज्ञानी, आळसी, दुर्व्यसनी व धर्माचे अवडंबर माजविणाऱ्या लोकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
लोकहितवादींचा दृष्टिकोन सार्वजनिक हिताचा होता. लेखनशैलीतून येणाऱ्या शब्दांत वरवर त्यांचा स्वभाव अत्यंत तामस, कठोर वाटत असला तरी तो तसा नव्हता.जसे की.."फणसाअंगी करड काटे। आत साखरेचे गोटे । " अशी त्यांची स्वभाववृती होती. त्यांच्या लेखनातच कठोरपणा होता प्रत्यक्ष बोलण्यात मात्र तो नव्हता, हे त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून लक्षात येते.
गोपाळरावांचा जन्म १८२३. खरे आडनाव सिंधये. चित्पावन. कोकणातले घराणे.पेशव्यांकडून मिळालेल्या देशमुखी वतनावरून देशमुख नाव धारण केलेले. त्यांचे शिक्षण पुण्यातील गव्हर्नमेंट इंग्रजी शाळेतले म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व. संस्कृत, गुजराथी, फारशी भाषेचा अभ्यास. इंग्रजीवर असलेल्या प्रभुत्त्वामुळे इंग्रजांच्या विविध ठिकाणांच्या ऑफिसांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत सामाजिक कार्यात मोलाचा वाटा असलेल्या गोपाळ हरी देशमुखांनी मुंबईच्या "प्रभाकर' पत्रा मधून "लोकहितवादी" नावाने लेखन केले. १८६६ ला निबंधसंग्रह प्रकाशित केला.
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे लोकहितवादींच्या सामाजिक परिवर्तनाच्या लेखनाच्या विरोधात टीका करत राहिले; मात्र लोकहितवादी म्हणायचे.. वेद, पुराणे, स्मृती यांचे प्रामाण्य झुगारून द्या. शास्त्राची आज्ञा मानण्याची गरज नाही. चिकित्सक लिखानातून त्यांनी शास्त्री, पंडितांची निंदा, करून संस्कृत विद्येवर कोरडे ओढले. खोट्या, भाकडकथांवर आधारित ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या अवास्तव पोथी, पुराणाला विरोध दर्शविण्यासाठी करत.चिकित्सावादी,निर्भयी,रोकठोक, वास्तववादी इतिहासाचे लेखन करणारे लोकहितवादी यांना "इतिहासकार" म्हणून कर्मकांडी समुहाने कधीच मान्यता दिली नाही किंवा दिली नसती; परंतु त्यांच्या इतिहास लेखनाचा आवाका व व्यासंग लक्षात घेतल्यास त्यांना इतिहासकार म्हणूनच संबोधने उचित ठरेल, असे ठाम सांगता येते.
"सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास" लंकेचा इतिहास, उदेपूरचा इतिहास, आगमप्रकाश, निगमप्रकाश, सुराष्ट्र देशाचा इतिहास,पृथ्वीराज यांचा इतिहास, राजस्थानचा इतिहास,पानीपतची लढाई,भरतखंडपर्व,गीतातत्व, प्राचीन विद्या आणि रिती, अशा अनेक प्रांताचा इतिहास लिहिणारे लोकहितवादी हे खरे इतिहासकार ठरतात. त्यांनी इतिहासाचे लेखन हे अस्सल संदर्भसाधनाचे पुरावे घेवूनच केलेले आहे.त्यांनी इतिहासाचे लेखन हे ताम्रपट,शिलालेख, यांचा आधार व साक्ष पुरावे, देऊन केले आहे.
वास्तववादी व चिकित्सक असे इतिहासाचे लेखन करणारे लोकहितवादी यांच्याकडे इतिहासाच्या संदर्भसाधनांचा विपुल साठा होता. इतिहासाचे गाढे व्यासंगी असणारे लोकहितवादी हे अनेक वृत्तपत्राचे जनक, व लेखक, निबंधकार, सामाजिक विकृत रूढी परंपरांना फाटा देणारे उच्चविद्याविभूषित होते.
लोकहितवादी हे वेगवेगळय़ा कार्याच्या अग्रणी होते. लोकहितवादीच्या कार्याचा आवाका फार मोठा असल्याचे पुरावे आणि संदर्भ प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी सदरहु ग्रंथात नोंदवून लोकहितवादी कसे इतिहासकार ठरतात हे ठामपणे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी "इतिहासकार लोकहितवादी" या संदर्भग्रंथाद्वारे लोकहितवादींच्या कार्यकर्तृत्वाला इतिहासकार म्हणून
सिद्ध करून इतिहासाच्या ग्रंथ दालनात एका मौलिक अशा नव्या ग्रंथाची भर टाकली आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक विद्यार्थी सदरहु ग्रंथाचे खुल्या दिलाने स्वागतच करतील या अपेक्षेसह प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांच्या आगामी लेखनास मनस्वी शुभेच्छा..!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
गुरुवार, २१ एप्रिल, २०२२
विद्रोही कविसंमेलन, उदगीर
विद्रोही मराठी कविसंमेलन,उदगीर
उदगीर, जि.लातूर
येथे दि.२३ व २४ एप्रिल २०२२ रोजी
संपन्न झालेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात
कविसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. सहभागी होता आलं. एक वेगळा पायंडा..कविसंमेलनात तीन कविंची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
या संमेलनात जवळजवळ ७० कविंचा सहभाग होता.
रात्री ९:१६ ला सुरु झालेले कविसंमेलन
रात्री ११:३० वाजेपर्यंत चालले.
अनेक उपेक्षित, नवोदित कविंना सहभागी होता आले.
________________________________________________
कवीसंमेलन अध्यक्षीय मंडळ
डॉ.धोडोंपत मानवतकर,
संजय घाडगे, एन.डी.राठोड
सूत्रसंचलन : प्रा. डॉ.व्यंकट सूर्यवंशी
सहभागी कवी
प्राचार्य तुकाराम हरगीले, बालोजी वाघमारे, वर्षा माळी, प्रा. भगवान आमलापुरे, मीनाक्षी तौर, शोभा सोळंके, शिवा कराड, डॉ. अकबर लाला, शुद्धोधन कांबळे, शिवाजी नामपल्ले, शमशुद्दीन अहमद पुरी, शा. सुभाष साबळे, विजय पवार, विलास सोळंके, बालाजी मुंडे, सिद्राम सोळंके, वैजनाथ कांबळे, प्रा. संजय भोसले, राजाभाऊ हतागडे, बबन इंगोले, संतोष नारायणकर, अजित सपकाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल साबळे, दिलीप गायकवाड, शेख खुदुस पैगंबर, धनराज भोसले, नागनाथ कलवले, छगन घोडके, किशन उगीले, व्यंकटेश काकणाटे, डॉ. नितीन गायकवाड, प्रकाश कवठेकर, निलेश वाघमारे, मारूती जाधव, संजय बिरादार, गणेश पुंडे, शेषराव शिंदे, उद्धव दुवे, उमेश पवार, चंद्रकला सोनकांबळे, कुमार सातपुते, प्रेमानंद बनसोडे, नारायण जाधव, शिवाजी बांगर, मनोहर बसवंते, वेणू जोगदंड, भगवान पी. गरड, बळीराम जोगदंड, सुभाष दुष्यंत, आशा ढगे, रमेश कांबळे, इम्रान रागिब, जी.डी. माने, अमित कांबळे, मंजुषा काकरे, निलेशकुमार सरवदे
आभार : इरफान शेख
----------------------------------------------------------
|| ऋणनिर्देश ||
विद्रोही साहित्य संमेलनाचे
आयोजन करणाऱ्या आदरणीय
प्रा.प्रतिभाताई परदेशी व
आदरणीय किशोरजी ढमाले
सरांच्या प्रेमामुळेच आम्हांस
एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनात
कविसंमेलनाचे अध्यक्षपदाचा मान मिळाला.
प्रा.प्रतिभाताई परदेशी व मा.किशोरजी ढमाले सरांचे ऋण आभारातीत आहे.....
त्यांच्या अथक परिश्रमातूनच एवढा मोठा सोहळा पार पडला.
उदगीर जि.लातूर येथे दि.२२,२३,२४ एप्रिल २०२२ रोजी
संपन्न झालेल्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात.भरगच्च कार्यक्रम झाले. दि.२३ एप्रिल रोजी रात्री ठीक ९:१६ वाजता सुरू झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.धोंडोपंत मानवतकर
बुधवार, १३ एप्रिल, २०२२
हे महानायक युगंधरा..! डॉ.धोंडोपंत मानवतकर
हे महानायक युगंधरा..!
बाबासाहेब,
तुम्ही होतात म्हणून
आम्हाला माणूस म्हणून
जगता आलं...
मानवमुक्तीचं स्वातंत्र्य
भोगता आलं...
हे युगनायक,
ज्ञानसागर, क्रांतीदूता....
कशी लिहिता येईल
तुमच्या कर्तृत्वाची संघर्षगाथा
माझ्या कथा कवितेच्या तोकड्या ज्ञानात
आणि कादंबरीच्या चारदोनशे पानात
नाही लिहिता येणार युगंधरा....!
हे करुणासागर
बोधिसत्वा, घटनेच्या शिल्पकारा
कोटीकुळाच्या उद्धारकर्त्या, धुरंधरा
तुमच्या संघर्षाचं क्रांतीपर्व म्हणजे
आमच्या आयुष्याची सोनेरी पहाट
तुमच्या कर्तृत्वानेच आमचे उजळले ललाट
हे विश्ववंद्य महानायका,
भारतमातेच्या सुपुत्रा
तुमच्या कार्यतेजाने दिपून गेल्यात
इथल्या दाही दिशा अन् आमच्या
आयुष्यात उजळली आज ज्ञानरुपी उषा
हे प्रकाशयात्री युगंधरा..
तूज कोटी कोटी प्रणाम.!!
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
शनिवार, ९ एप्रिल, २०२२
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद - एक दृष्टिक्षेप
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद - एक दृष्टिक्षेप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद या दोन्हीमध्ये खरा राष्ट्रवाद आणि बेगडी राष्ट्रवाद अशी एक कमालीची तफावत आहे. माझ्यामते अलिकडे सत्तारूढ़ असलेल्या राजकर्त्यांच्या राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे ती अत्यंत बेगडी असल्याचे दिसून येते, तर याऊलट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद हा त्यांच्या भारतातील एकुणच महान कार्यातून खरा राष्ट्रवाद दिसून येतो. वर्तमानातील राजकारणाची बदललेली राजकीय व जातीय समीकरणे तसेच सत्तारूढ़ राज्यकर्त्यांचा जनतेविषयीचा खोटा कळवळा, दिशाभूल आणि मतांचे राजकारण याविषयी केलेला हा छोटासा लेखनप्रपंच..!
भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रवादाची कल्पना ही शोषणमुक्त राष्ट्राची होती. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची होती. बाबासाहेबांच्या कल्पनेतील भारत हा समतावादी असला पाहिजे. जातीयवादमुक्त असला पाहिजे.
गरीबीमुक्त भारत. अंधश्रद्धामुक्त भारत. स्त्री- पुरुष समानता असणारा भारत. समाजात बंधुभाव असणारा भारत. सत्याला न्याय देणारा भारत. सर्वांना समान हक्क देणारा भारत. प्रज्ञावंत समाज असणारा भारत, शीलवंत समाज असणारा भारत. दुःखी कष्टी जीवांवर करुणा दाखवणारा....आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला भारत. कृषिप्रधान असणारा सधन भारत. शैक्षणिकदृष्ट्या उच्चस्तर असलेला भारत. अखंड भारत. वैज्ञानिक क्रांती करणारा भारत. प्रत्येक क्षेत्रात इतर राष्ट्राच्या पुढे असणारा भारत. अशा अनेक संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होत्या...एवढेच नाही, तर ह्या सर्व संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी घटनेत तसे नियम व कायदे करून ठेवले होते.व त्यांनीच सांगून ठेवले होते की, आपल्या भारताची ही राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे; मात्र या राज्यघटनेचा अंमल करणारे जर चांगले नसतील, तर त्यांच्यासाठी हे केवळ एक पुस्तक आहे आणि नेमके तेच झाले. एका वर्गाकडून ही सर्वोच्च घटना जाळण्याचाही प्रयत्न केला गेला. अलिकडे तर घटनाच बदलण्याचे मनसुबे सुरू आहेत
आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राऐवजी हिंदुराष्ट्र करण्याचे कारस्थान सुरू आहे.
भारतात सध्याची सामाजिक स्थिती भौतिक साधनांच्या अतिरेकी वापराने अत्यंत अलबेल असताना दिसत असली, तरी ती तशी नाही, ती अत्यंत दयनीय आहे.
भारतात सध्या लोकशाहीच्या आडून हुकुमशाहीचं राज्य आहे. राजकारण आणि समाजकारण यांचा ताळमेळ बसताना दिसत नाही. भारतीय समाजव्यवस्थेत अराजकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडे वाढीस लागलेली विशिष्ट समुहाची धर्मांधता ही सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. सामाजिक विषमता देशातील समाजव्यवस्था खिळखिळ करणारी आहे. समाजव्यवस्था जर खिळखिळ झाली तर देश कमकुवत होत जाईल आणि देश कमकुवत झाला तर आपल्या देशावर बाहेरील देश आक्रमण करतील. म्हणून देशाच्या सुरक्षिततेसाठी एकमेकांना पूरक असलेले देशाचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे तिनही घटक देशाची सुव्यवस्था राखण्यास कारणीभूत ठरतात. देशाच्या सुव्यवस्थेवर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था राष्ट्राला मजबूत ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावत असतात.
देशाचा कायदा हा समाजकारणावर, राजकारणावर आणि अर्थकारणावर अंकुश ठेवत असतो; यामुळे राष्ट्रात सुखशांती नांदत असते... म्हणूनच राष्ट्र मजबूत आणि सुखी राहण्यासाठी लोकशाहीच्या घटनातंत्राचा वापर झाला पाहिजे त्याशिवाय राष्ट्र मजबूत राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेला जगात तोड नाही.. एवढी ती परिपूर्ण आहे. भारतीय घटनेत मुद्दाम नोंदवलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय' ही भारतीय लोकशाहीची मूल्ये ही देशाचे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावतात; परंतु ती मूल्ये रूजू द्यावयाची की नाही हे राज्यकर्त्यांच्या नीतीवर व राजनीतीवर अवलंबून आहे.
राज्यकर्त्यांच्या शासनप्रणालीखाली संपूर्ण देशाची सूत्रे हलत असतात. शासनकर्त्यांनी देशाच्या जनतेला जी वागणूक द्यावयाची असते ती देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या नियमांचे पालन करूनच द्यावयाची असते. त्याशिवाय देशातील जनतेला त्यांच्या स्वातंत्र्याचा हक्क किंवा अधिकार मिळणार नाहीत.
राज्यकर्त्यांनी देशातील जनतेचे हित लक्षात घेतले पाहिजे. जनता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सुखी, समाधानी आणि सुरक्षित असल्याशिवाय राष्ट्र सुखी,समाधानी आणि सुरक्षित असणार नाही. हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सद्सद्विवेकबुद्धीमध्ये असल्यामुळेंच त्यांनी लिहिलेल्या घटनेत तो उतरला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रवादाविषयीच्या भूमिकेत दूरदर्शीपणा होता. कारण भारतीय समाजव्यवस्थेचा बाबासाहेबांनी सांगोपांग अभ्यास केला होता. भारतीय समाजव्यवस्थेत असणारी जाती- जातींची उतरंड आणि या उतरंडीमुळे समाजात असणारी वर्णभेदाची आणि वर्गभेदाची तफावत आणि याच तफावतीमुळे समाजव्यवस्थेत निर्माण झालेला जातीभेदाचा व वर्णभेदाचा कळस. यात असलेली स्पृश्य- अस्पृश्यता यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता ही राष्ट्राच्या हितासाठी बाधक ठरत होती. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते. म्हणून भारतातील एकुणच समाज रचनेत समता निर्माण व्हावी. उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य हे भेद कायमचे नष्ट व्हावेत म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत समता,स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये मुद्दाम समाविष्ट केलेली आहेत. राज्यघटनेची ही जी मूल्ये आहेत ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या अठरापगड जातींना लक्षात घेऊनच नोंदवलेली आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत राहून एकमेकांत मिसळून स्वाभिमानाने जगता यावे. यातूनच विषमता नष्ट होईल. समाजातील स्पृश्य -अस्पृश्य हे भेद नष्ट होतील आणि एकसंध राष्ट्र निर्माण होईल हा दूरदृष्टीकोन बाबासाहेबांचा होता.
१९४७ च्या नंतर अर्थात स्वातंत्र्योत्तर कालखंडात राज्यघटनेतील कायद्यांनुसार समाजव्यवस्था बदलू लागली. अस्पृश्यता कमी होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर ३० वर्षाचा कालावधी लोटला. पुन्हा भारतीय राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी धर्माचे आणि जातीचे राजकारण सुरू केले. "फोडा आणि राज्य करा" हया इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करीत निवडून येण्यासाठी जातीबद्दलची, धर्मांबद्दलची खोटी अस्मिता दाखवून निवडणूका लढल्या जाऊ लागल्या. राजकीय मंडळी जातीय समिकरणातून आपापली पोळी भाजू लागले. जातीयवाद पुन्हा दृढ होऊन रुपांतरित झाला. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रप्रेमाची भावना कमी होऊन राष्ट्रप्रेमाऐवजी राजकीय मंडळी स्वतःवर प्रेम करू लागली. स्वतःच्या जातीचा पक्ष काढू लागली. राष्ट्रावरचे प्रेम स्वतःच्या पक्षावर करू लागली. जाती जातीचे पक्ष निर्माण झाले. धर्माचे पक्ष निर्माण झाले. राष्ट्राप्रती असलेले प्रेम पक्षावर रुपांतरित झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जाती पातीचे अनेक पक्ष निर्माण झाल्यामुळें जनता जाती जातीच्या पक्षात विभागली गेली. प्रत्येक पक्षाचा नेता एकाच जातीचा कैवार घेऊ लागला. म्हणून राष्ट्रप्रेमाऐवजी अलिकडे पक्षप्रेम जवळचे वाटू लागले. अलीकडे पक्षावर असलेले प्रेम केवळ निवडून येऊन जनतेवर राज्य करण्यासाठी होते. पक्षावरचे खोटे प्रेम अलिकडे उघडे पडू लागले. आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षावरच जर खोटे प्रेम असेल तर राष्ट्रप्रेम तर खोटेच असणार आणि मग राष्ट्रवाद तर खूपच दूरची गोष्ट आहे.
अलीकडील राजकारणात राष्ट्रवादाची जागा पक्षवादाने, स्वार्थवादाने, धर्मवादाने आणि जातीयवादाने घेतली. याही पलीकडे जाऊन धर्म आणि जात तोंडी लावून जनतेचा वापर केवळ मतदानापुरता झाला. मतदानासाठी जाती जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे वेगवेगळे मनसुबे रचले जात आहेत. एवढेच नव्हे; तर जातीय दंगली घडवून आणणारे राजकीय नेते राष्ट्रप्रेमाची भाषा किंवा राष्ट्रवादाची भाषा विसरून गेले आहेत. म्हणून सत्तारूढ़ पक्षांनी भारतातील जनतेच्या तोंडी लावलेला राष्ट्रवाद हा बेगडी आहे.
अलिकडे सत्ताधारी पक्ष तर धर्माला पुढे करून, देवाला पुढे करून महापुरुषांना पुढे करून राष्ट्रावर प्रेम असल्याचे दाखवत आहेत. त्यांचे ते खोटे प्रेम जनतेच्या लक्षात आले आहे. त्यांचा निवडून येण्यासाठीचा खोटा राष्ट्रवाद उघडा पडला आहे.
विद्यमान राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. जनतेला महागाईच्या दरीत ढकलून दिले आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी सत्तारूढ़ आणि विरोधी पक्षातील किळसवाण्या कहलाने उच्छाद मांडला आहे. राष्ट्रांतर्गत होणाऱ्या कलहामुळे प्रत्येक माणूस उद्विग्न झालेला आहे. राजकारणी व भांडवलदारांव्यतिरिक्त कोणताच समाज या देशात सुखी नाही. सत्तारूढ़ पक्ष जनतेला खूप कांही दिल्याच्या खोट्या जाहिराती करत आहे. सत्तारूढ़ राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद हा कमालीचा खोटा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत जे कायदे केले आहेत ते केवळ जनतेच्या हिताचे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांनी स्वतः भोगला, अनुभवला आहे; म्हणून त्यांनी आपले आयुष्य केवळ समाजाच्या हितासाठीच खर्ची घालून इथल्या भयंकर अशा धर्मवादी, जातीयवादी, विषमतावादी,मनुवादी व्यवस्थेला वेगवेगळ्य़ा ढंगाने जेरीस आणून कितीतरी कोटी जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क निर्माण करून दिला. धर्माच्या ठेकेदारांची ठेकेदारी मोडकळीस आणली. माणूस म्हणून जगण्याचे, आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचे,बोलण्याचे,संस्काराचे स्वातंत्र्य, प्रत्येकाला दिले जावे, जनतेला केंद्रस्थानी ठेऊन बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. विदेशी आक्रमणाच्या शोषणापेक्षा भारतीय समाजव्यवस्थेतील विषमतेने जनतेचे केलेले शोषण थांबले असेल ते केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारामुळे.. हीच राज्यघटना जर एखादया मनुवादी विचारांच्या सवर्णाने लिहिली असती तर त्याने एकाच जातीला, धर्माला प्राधान्य दिले असते. पुन्हा राज्यघटनेऐवजी दुसरी मनुस्मृति लिहिली गेली असती आणि इतर सर्व जातीधर्मातील लोकांवर अन्याय करणारे कायदे लिहिले गेले असते. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेला उदारमतवादी स्वभाव, भारतातील संपूर्ण जातीधर्मातील जनतेविषयी असलेला कळवळा, त्यांचे राष्ट्राविषयी असलेले निस्सिम प्रेम, त्यांनी सर्व जातीधर्मातील स्त्री- पुरुषांच्या हक्काची आणि स्वातंत्र्याची राज्यघटनेतून घेतलेली दखल हाच बाबासाहेबांचा खरा राष्ट्रवाद आपल्याला दिसून येतो.
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि विद्यमान सत्ताधारी राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद यामध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येते.
✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर
१० एप्रिल २०२२मंगळवार, २९ मार्च, २०२२
ग्रेस - गूढात्म आवर्तनांच्या आशयसूत्राला बंदिस्त करणारा काव्यप्रभू...
गूढात्म आवर्तनांच्या आशयसूत्राला बंदिस्त करणारा महाकवी - ग्रेस
लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर
१० मे २०२२
ग्रेस" यांना आज जयंतीदिनी विन्रम अभिवादन..!
स्मृतिदिन २६ मार्च.
गूढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल, दुःखाचा महाकवी "ग्रेस" यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे विनम्र शब्दाभिवादन..!
"ग्रेस" म्हणजे निसर्ग कृपेची भावाभिव्यक्ती, ग्रेस म्हणजे शब्दांतरीचे गूढात्म संदर्भ शोधू पाहणारी काव्यवृत्ती. ग्रेस म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्दप्रभू. आत्ममग्नतेतून संवेदनाप्रधान आशयाचे पैलू पाडणारा काव्यमहर्षि.
मराठी वाङ्मयाच्या अन्वयाने मराठी साहित्यसृष्टीच्या कोंदणाला कवितेचा आणि लालित्याचा नवा अर्थालंकार परिधान केला तो कविवर्य ग्रेस यांनी. नवख्या अर्थांतरोपन्यासाचे मर्मभेदी परिमाण धारण करणारी ग्रेस यांची कविता अमूर्त संवेदनेतून शब्दांतीत काव्याशयाचे अवगाहन करते.ती वाचकांना आस्वादाच्या पातळीवर अर्थान्तराच्या परिमितीचे परिघ छेदून जाणारी असल्याने ती दुर्बोध वाटत असली तरी दुर्बोध नसून ती अबोध आहे.कारण कविता कधीच दुर्बोध नसते.
कवीच्या आशयसृष्टीतील लेखनानुभूती मूलतः दोन पदे धारण करणारी असते किंबहुना ती तो जुळवून आणतो किंवा ती कविच्या प्रतिभेची मजल असते.याचाच प्रत्यय कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतून यथार्थत्वाने येतो.
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
कवी, कवितेची भूमी अर्थछट्टाच्या बाहुपाशात अडकवतो..तेव्हा त्याचे आशयसुक्त कविच्या मनोभूमीत विषयाचे मर्मभेद निर्माण करत असते.तो वाचकांना आशयाच्या आवर्तांशी रूंजी घालत तिष्ठत ठेवतो..ही "ग्रेस"यांच्या कवितेची परिणती आहे.
समुद्रबंदी काठावरची, दोन पांढरी शहरे
गगन निळाईत पार बुडाले, त्यांचे सर्व शहारे
प्रस्तुत काव्यपंक्तीच्या आशयाचे विश्लेषण करताना अभिधाच्या अन्वयाने असे विवेचन करता येईल की, ... समुद्र काठावरच्या दोन शहराला समुद्राच्या भरतीने केव्हा धोका होईल या कल्पनेने आलेले शहारेही आता अंधारलेल्या काळोखात अदृश्य झाले आहेत आणि याच बरोबर लक्षणाच्या अन्वयाने प्रस्तुत काव्यपंक्तीतून अभिव्यक्त झालेला प्रणयभाव हा रुपकात्मक प्रतिमांनी बंदिस्त केलेला दिसतो.हे समजून घेण्यासाठी वाचकांची अनुभूती कवीच्या प्रतिभेइतकी टोकदार, प्रगल्भआणि चौफेर असतेच असे नाही.
सदरहु पंक्तीत आशय आणि अभिव्यक्तीची संदिग्धता आहेच. वाचकांच्या मनःपटलावर अभिधा आणि लक्षणाचे द्वंद्व चालू असते. तेव्हा कवीच्या अर्थविश्वाचा अदमास वाचकांना केवळ स्पर्शून जातो. ही भावार्थता ग्रेस यांच्या कवितेत आहे. म्हणून कविची भूमिका ही वाचकांकडून विशिष्ट अनुभूती सिध्द करीत असली ; तरी तो कलाकृतीच्या चिकित्सेचा निश्चित अनुबंध ठरत नाही.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ही ग्रेस यांची कविता "महाश्वेता" मालिकेसाठी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. तिचे गीत होऊन ती आता लहान थोरांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांच्या "भय इथले संपत नाही " या पंक्तित प्रश्नही आहे आणि उत्तरही. हा प्रश्न कवी ग्रेस यांना जेव्हा पडतो ; तेव्हा कवीला आईची आठवण येते. आणि लहानपणी जी गीते तू मला शिकविलीस, ती मी संध्याकाळी गातो असे कवी म्हणतो ; कारण संध्यासमयी मनात काळोख दाटून येतो आणि भोवताली घडणार्या प्रत्येक घटनेने जीव भयव्याकुळ होत जातो, असा भावपूर्ण आशय उपरोक्त गीतपंक्तीतून व्यक्त होताना दिसतो. हा प्रश्न एकट्या कविचा राहत नाही किंवा तो प्रश्न बाळबोध स्वरूपाचाही राहत नाही. तो सार्वत्रिक स्वरूपात रसिक, वाचक, श्रोत्यांचा होऊन जातो. वर्तमानात जगण्याची इच्छा असणारा प्रत्येक जीव. हा जीव मुठीत धरून भयभीत होऊन जगतो आहे म्हणून ही कविता सर्वस्पर्शी होत जाते.
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शूनी गेला
सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला
कवी ग्रेस यांच्या कवितेची भूमी ही गूढानुभूतीच्या भूमिकेवर आधारित आहे म्हणून ती तर्कार्थाच्या विश्लेषणास वाचकसापेक्ष असेलच असे नाही कारण कलाकृतीची निर्मितीमूल्ये कलावंताच्या मनोसंवेदनेत दडलेली असतात. म्हणून ग्रेस यांच्या कवितेतील "रसभाव" हा अभिधा किंवा लक्षणा सापेक्ष राहत नाही तो विविध आशयछट्टांचे अग्रदूत ठरत जातो. "संध्याकाळच्या कविता"मधून आलेल्या काव्यपंक्ती पाहूया...
ही चंद्र-उदयिनी वेळा, घननीळ कांठ मेघांचे
भरतीच्या क्षितिजावरूनी, घर दूर जसे सजणाचें
किंवा
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
कवितेचे मूल्य हे भावनानिष्ठ आणि तर्काधिष्ठीत अर्थान्वयाचे भाकीत करत जाते तेव्हा ती नव्या सृजनसृष्टीची प्रस्थापना करीत असते.
कवी ग्रेस यांच्या कवितेतील अर्थघटक प्रतिमांशी पुरक साधर्म्य निर्माण करतात.तोच त्यांच्या कवितेचा मूलाधार आणि स्वाभाविक गाभाघटक आहे आणि यातून निर्माण झालेली आपली वेगळी विशिष्ट शैली आहे.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळें
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळें
ही कविता सुद्धा एक कर्णमधुर गीत झालेले आहे.सन्माननीय संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध करून ते.... गोड गळ्याचे गायक- सुरेशजी वाडकर यांनी गायिले आहे.
नव्या उपमा, नवी प्रतिमाने, मात्रावृत्त व गुणवृत्तांच्या आधारभूत काव्यनिर्मितीला नवखे सामर्थ्य देणारी ग्रेस यांची तरल भावकविता आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून आलेल्या विविधरंगी पात्रांच्या माध्यमातूनही त्यांची कविता समाजमनाचे पैलू अधोरेखित करते. त्यांच्या मुक्तछंदातील कवितेतून संयमाधिष्ठित विद्रोह व्यक्त होतो. सामाजिक जाणीव आणि निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते.तसेच आत्ममग्नतेतूनही याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. शब्दलालित्य व प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ग्रेस यांची कविता समाजमनाचा ठाव घेते. तिने मराठी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. समग्र मराठी साहित्याच्या कक्षेचा परीघ ग्रेस यांच्या कवितेने विस्तीर्ण केला आहे. आणि काव्यस्वादाच्या पातळीवरही त्यांची कविता संकीर्ण प्रश्नांचे तांडव उभे करते.अपरिहार्य आणि व्यामिश्र घटनांच्या आणि घटकांच्या नोंदी घेत निर्मोही आणि नित्तळ अभिव्यक्तीतून ती सर्वस्पर्शी होत जाते. त्यांची कविता तरल लयबद्ध भावानुवादासह संगीताजवळ जाणारी आहे.ती सहज यमक साधणारी भावकविता आहे. ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचे वैभव आहे, अशा शब्दप्रभूचे साहित्यसृष्टीला मिळालेले योगदान मौलिक आणि उपकारक आहे , हे मराठी सारस्वतांना मान्यच करावे लागते.त्यांच्या स्मृतीदिनी ग्रेस यांना त्रिवार अभिवादन..!🌺
कवी, लेखक, समीक्षक
२६ मार्च, २०२०
■■■
🌼🌼🌼
"ग्रेस" यांचा संक्षिप्त परिचय.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
कविश्रेष्ठ माणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी"ग्रेस" यांचा आज २६ मार्च २०१२ स्मृतीदिवस. जन्म -१० मे १९३७, जन्मस्थळ- नागपूर.वडील-सीताराम, आई- सुमित्रा, अपत्ये- मिथिला, माधवी आणि राघव. साहित्यप्रकार-कविता, ललितलेखन. प्रभाव अभिजात उर्दू परंपरा आणि रोमॅन्टिक इंग्रजी काव्य.
■ प्रकाशित साहित्य □ - संध्याकाळच्या कविता-(काव्यसंग्रह १९६७), राजपुत्र आणि डार्लिंग-(काव्यसंग्रह १९७४), चर्चबेल-(ललित लेखसंग्रह १९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश- ( काव्यसंग्रह १९७७), मितवा- (ललित लेखसंग्रह१९८७), सांध्यपर्वातील वैष्णवी -( काव्यसंग्रह-१९९५), संध्यामग्न पुरुषाची लक्षणे-(ललित लेखसंग्रह-२०००),मृगजळाचे बांधकाम-(ललित लेखसंग्रह- २००३ ), सांजभयाच्या साजणी-(काव्यसंग्रह- २००६), वा-याने हलते रान- (ललित लेखसंग्रह- २००८), कावळे उडाले स्वामी- ( ललित लेखसंग्रह- २०१०)
पुरस्कार ■ संध्याकाळच्या कविता- या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक- १९६८ ■ याच काव्यसंग्रहाला- कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार- २०१० ■ वा-याने हलते रान- या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार- २०११.
□□□
डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
२६ मार्च, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
गावकऱ्यांची फसवणूक - लघुकथा
गावकऱ्यांची फसवणूक लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर रात्रीचे आठ वाजले होते. भागुजीच्या डबड्या मोबाईलची बेल वाजत होती. भागुजीनं ताटा...
-
‘मामं’ म्हणजे काय ? इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक मा.मं.देशमुख यांचे दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले...
-
गावकऱ्यांची फसवणूक लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर रात्रीचे आठ वाजले होते. भागुजीच्या डबड्या मोबाईलची बेल वाजत होती. भागुजीनं ताटा...
-
चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर मंठा /प्रतिनिधी "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...






