मंगळवार, २९ मार्च, २०२२

ग्रेस - गूढात्म आवर्तनांच्या आशयसूत्राला बंदिस्त करणारा काव्यप्रभू...

गूढात्म आवर्तनांच्या आशयसूत्राला बंदिस्त करणारा महाकवी - ग्रेस


लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर

ग्रेस- जोगिया पुरुषास शब्दाभिवादन..!

१० मे २०२२
ग्रेस" यांना आज जयंतीदिनी विन्रम अभिवादन..!
स्मृतिदिन २६ मार्च.

              गूढार्थ आवर्तनांच्या आशयसूत्रात बंदिस्त करत शब्दांना अर्थालंकाराच्या नादलयींवर झुलवत ठेवणारा जोगिया पुरुष, प्राचीन नदीपरी खोल, दुःखाचा महाकवी "ग्रेस" यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे विनम्र शब्दाभिवादन..!

       "ग्रेस" म्हणजे निसर्ग कृपेची भावाभिव्यक्ती, ग्रेस म्हणजे शब्दांतरीचे गूढात्म संदर्भ शोधू पाहणारी काव्यवृत्ती. ग्रेस म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्दप्रभू. आत्ममग्नतेतून संवेदनाप्रधान आशयाचे पैलू पाडणारा काव्यमहर्षि.
             मराठी वाङ्मयाच्या अन्वयाने मराठी साहित्यसृष्टीच्या कोंदणाला कवितेचा आणि लालित्याचा नवा अर्थालंकार परिधान केला तो कविवर्य ग्रेस यांनी. नवख्या अर्थांतरोपन्यासाचे मर्मभेदी परिमाण धारण करणारी ग्रेस यांची कविता अमूर्त संवेदनेतून शब्दांतीत काव्याशयाचे अवगाहन करते.ती वाचकांना आस्वादाच्या पातळीवर अर्थान्तराच्या परिमितीचे परिघ छेदून जाणारी असल्याने ती दुर्बोध वाटत असली तरी दुर्बोध नसून ती अबोध आहे.कारण कविता कधीच दुर्बोध नसते. 
                  कवीच्या आशयसृष्टीतील लेखनानुभूती मूलतः दोन पदे धारण करणारी असते किंबहुना ती तो जुळवून आणतो किंवा  ती कविच्या प्रतिभेची मजल असते.याचाच प्रत्यय कविवर्य ग्रेस यांच्या कवितेतून यथार्थत्वाने येतो.

              स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
                हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे 

  कवी, कवितेची भूमी अर्थछट्टाच्या बाहुपाशात अडकवतो..तेव्हा त्याचे आशयसुक्त कविच्या मनोभूमीत विषयाचे मर्मभेद निर्माण करत असते.तो वाचकांना आशयाच्या आवर्तांशी रूंजी घालत तिष्ठत ठेवतो..ही "ग्रेस"यांच्या कवितेची परिणती आहे. 

                   समुद्रबंदी काठावरची, दोन पांढरी शहरे
                 गगन निळाईत पार बुडाले, त्यांचे सर्व शहारे

प्रस्तुत काव्यपंक्तीच्या आशयाचे विश्लेषण करताना अभिधाच्या अन्वयाने असे विवेचन करता येईल की, ... समुद्र काठावरच्या दोन शहराला समुद्राच्या भरतीने केव्हा धोका होईल या कल्पनेने आलेले शहारेही आता अंधारलेल्या काळोखात अदृश्य झाले आहेत आणि याच बरोबर लक्षणाच्या अन्वयाने प्रस्तुत काव्यपंक्तीतून अभिव्यक्त झालेला प्रणयभाव हा रुपकात्मक प्रतिमांनी बंदिस्त केलेला दिसतो.हे समजून घेण्यासाठी वाचकांची अनुभूती कवीच्या प्रतिभेइतकी टोकदार,  प्रगल्भआणि चौफेर असतेच असे नाही. 
         सदरहु पंक्तीत आशय आणि अभिव्यक्तीची संदिग्धता आहेच. वाचकांच्या मनःपटलावर अभिधा आणि लक्षणाचे द्वंद्व चालू असते. तेव्हा कवीच्या अर्थविश्वाचा अदमास  वाचकांना केवळ स्पर्शून जातो. ही भावार्थता ग्रेस यांच्या कवितेत आहे. म्हणून कविची भूमिका ही वाचकांकडून विशिष्ट अनुभूती सिध्द करीत असली ; तरी तो कलाकृतीच्या चिकित्सेचा निश्चित अनुबंध ठरत नाही.
  
               भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
               मी संध्याकाळी गातो,  तू मला शिकविली गीते

          ही ग्रेस यांची कविता "महाश्वेता" मालिकेसाठी संगीतकार हृदयनाथ  मंगेशकर यांनी स्वरबद्ध करून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी  गायलेली आहे. तिचे गीत होऊन ती आता लहान थोरांच्या ओठांवर आहे. ग्रेस यांच्या "भय इथले संपत नाही " या पंक्तित प्रश्नही आहे आणि उत्तरही. हा प्रश्न कवी ग्रेस यांना जेव्हा पडतो ; तेव्हा कवीला आईची आठवण येते. आणि लहानपणी जी गीते तू मला शिकविलीस, ती मी संध्याकाळी गातो असे कवी म्हणतो ;  कारण संध्यासमयी मनात काळोख दाटून येतो आणि भोवताली घडणार्या प्रत्येक घटनेने जीव भयव्याकुळ होत जातो, असा भावपूर्ण आशय उपरोक्त गीतपंक्तीतून व्यक्त होताना दिसतो. हा प्रश्न एकट्या कविचा राहत नाही किंवा तो प्रश्न बाळबोध स्वरूपाचाही राहत नाही. तो सार्वत्रिक स्वरूपात रसिक, वाचक, श्रोत्यांचा होऊन जातो. वर्तमानात जगण्याची इच्छा असणारा प्रत्येक जीव. हा जीव मुठीत धरून भयभीत होऊन जगतो आहे म्हणून ही कविता सर्वस्पर्शी होत जाते. 

                तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शूनी गेला
                सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघवशेला

 कवी ग्रेस यांच्या कवितेची भूमी  ही गूढानुभूतीच्या भूमिकेवर आधारित आहे म्हणून ती  तर्कार्थाच्या विश्लेषणास वाचकसापेक्ष असेलच असे नाही कारण कलाकृतीची निर्मितीमूल्ये कलावंताच्या मनोसंवेदनेत दडलेली असतात. म्हणून ग्रेस यांच्या कवितेतील "रसभाव" हा अभिधा किंवा लक्षणा सापेक्ष  राहत नाही तो विविध आशयछट्टांचे अग्रदूत ठरत जातो.   "संध्याकाळच्या कविता"मधून आलेल्या काव्यपंक्ती पाहूया...

                 ही चंद्र-उदयिनी वेळा, घननीळ कांठ मेघांचे
              भरतीच्या क्षितिजावरूनी, घर दूर जसे सजणाचें
                                          किंवा 
                पाऊस कधीचा पडतो,  झाडांची हलती पाने 
               हलकेच जाग मज आली,  दुःखाच्या मंद सुराने

             कवितेचे मूल्य हे भावनानिष्ठ आणि तर्काधिष्ठीत अर्थान्वयाचे भाकीत करत जाते तेव्हा ती नव्या सृजनसृष्टीची प्रस्थापना करीत असते.
कवी ग्रेस यांच्या कवितेतील अर्थघटक प्रतिमांशी पुरक साधर्म्य निर्माण करतात.तोच त्यांच्या कवितेचा मूलाधार आणि स्वाभाविक गाभाघटक आहे आणि यातून निर्माण झालेली आपली वेगळी विशिष्ट शैली आहे. 

            तुला पाहिले मी  नदीच्या किनारी
            तुझे केस पाठीवरी मोकळें 
            इथे दाट छायातुनी रंग गळतात 
            या  वृक्षमाळेतले सावळें 

ही कविता सुद्धा एक कर्णमधुर गीत झालेले आहे.सन्माननीय  संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध करून ते.... गोड गळ्याचे गायक- सुरेशजी वाडकर यांनी गायिले आहे. 

           नव्या उपमा, नवी प्रतिमाने, मात्रावृत्त व गुणवृत्तांच्या आधारभूत काव्यनिर्मितीला नवखे सामर्थ्य देणारी ग्रेस यांची तरल भावकविता आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवेतून आलेल्या विविधरंगी पात्रांच्या माध्यमातूनही त्यांची कविता समाजमनाचे पैलू अधोरेखित करते. त्यांच्या मुक्तछंदातील कवितेतून संयमाधिष्ठित विद्रोह व्यक्त होतो. सामाजिक जाणीव आणि निसर्ग यांच्या मार्गाने जसे चिरंतनाकडे जाता येते.तसेच आत्ममग्नतेतूनही याची जाणीव ग्रेस यांच्या कवितेतून होते. शब्दलालित्य व प्रतिमासृष्टी यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या अंतर्मनात उतरणारी ग्रेस यांची कविता  समाजमनाचा ठाव घेते. तिने मराठी रसिकांच्या मनावर  गारुड केले आहे.  समग्र मराठी साहित्याच्या कक्षेचा परीघ ग्रेस यांच्या कवितेने विस्तीर्ण केला आहे. आणि काव्यस्वादाच्या पातळीवरही त्यांची कविता संकीर्ण प्रश्नांचे तांडव उभे करते.अपरिहार्य आणि  व्यामिश्र घटनांच्या आणि घटकांच्या नोंदी घेत निर्मोही आणि नित्तळ अभिव्यक्तीतून ती सर्वस्पर्शी होत जाते. त्यांची कविता  तरल लयबद्ध भावानुवादासह संगीताजवळ जाणारी आहे.ती सहज यमक साधणारी भावकविता आहे. ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. म्हणून त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचे वैभव आहे, अशा शब्दप्रभूचे साहित्यसृष्टीला मिळालेले योगदान मौलिक आणि उपकारक आहे , हे मराठी सारस्वतांना मान्यच करावे लागते.त्यांच्या स्मृतीदिनी ग्रेस यांना त्रिवार अभिवादन..!🌺
डाॅ.धोंडोपंत मानवतकर, 
कवी, लेखक, समीक्षक 
२६ मार्च, २०२०
■■■
🌼🌼🌼

"ग्रेस" यांचा संक्षिप्त परिचय. 
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
     कविश्रेष्ठ माणिक सीताराम गोडघाटे अर्थात कवी"ग्रेस" यांचा आज  २६ मार्च २०१२  स्मृतीदिवस. जन्म -१० मे १९३७, जन्मस्थळ- नागपूर.वडील-सीताराम, आई- सुमित्रा, अपत्ये- मिथिला, माधवी आणि राघव. साहित्यप्रकार-कविता, ललितलेखन. प्रभाव अभिजात उर्दू परंपरा आणि रोमॅन्टिक इंग्रजी काव्य.  
          ■ प्रकाशित साहित्य □ - संध्याकाळच्या कविता-(काव्यसंग्रह १९६७), राजपुत्र आणि डार्लिंग-(काव्यसंग्रह १९७४), चर्चबेल-(ललित लेखसंग्रह १९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश- ( काव्यसंग्रह १९७७), मितवा- (ललित लेखसंग्रह१९८७), सांध्यपर्वातील वैष्णवी -( काव्यसंग्रह-१९९५), संध्यामग्न पुरुषाची लक्षणे-(ललित लेखसंग्रह-२०००),मृगजळाचे बांधकाम-(ललित लेखसंग्रह- २००३ ), सांजभयाच्या साजणी-(काव्यसंग्रह- २००६), वा-याने हलते रान- (ललित लेखसंग्रह- २००८), कावळे उडाले स्वामी- ( ललित लेखसंग्रह- २०१०)
पुरस्कार ■ संध्याकाळच्या कविता-  या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक- १९६८ ■ याच काव्यसंग्रहाला- कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार- २०१० ■ वा-याने हलते रान- या  ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार- २०११.
□□□

डाॅ.धोंडोपंत मानवतकर, 

२६ मार्च, २०२०

आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने कु.गीता बालासाहेब घनवट व कवी प्रदीप ईक्कर यांचा यथोचित सत्कार..!

"आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने 

कु.गीता घनवट व कवी प्रदीप ईक्कर यांचा यथोचित सत्कार...!


        मंठ्याची सुपुत्री कु.गीता बालासाहेब घनवट हीची सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून तिने पंजाब येथे सुरक्षा दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. कु.गीता घनवट  हीच्या सीमा सुरक्षा दलात जाण्याच्या धाडसाबद्दल व यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मंठेकरांनी तिची शहरात भव्य मिरवणुक काढली अनेक ठिकाणीं तिचे सत्कार झाले. 
          दि.२८ मार्च रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीनेही गीता घनवट हीचा मंडळाच्या सदस्या पत्रकार मंजुषा काळे यांनी शॉल पुष्पहार घालून सत्कार केला. व गीताची आई .........घनवट यांचाही  यावेळी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
         याच कार्यक्रमात आविष्कार साहित्य मंडळाचे सदस्य तळणी येथील ग्रामीण कवी प्रदीप ईक्कर यांच्या हिरवा पांडुरंग या पहिल्या कविता संग्रहाला महाराष्ट् साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाल्याबद्दल आविष्कार साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. धोंडोपंत मानवतकर यांनी कवी ईक्कर यांचा शॉल पुष्पहार घालून सत्कार केला. 
यावेळीं गीता घनवट हीची प्रकट मुलाखतही मंजुषा काळे यांनी घेतली. 
याच कार्यक्रमात प्रा.सदाशिव कमळकर यांनी  नवोदित ग्रामीण कवी प्रदीप ईक्कर यांच्या कडून  हिरवा पांडुरंग या आगामी संग्रहातील काही ग्रामीण कविता वदवून घेतल्या.
      यावेळीं आविष्कार साहित्य मंडळाचे सचिव प्राचार्य कुं.पी.इंगळे, सदस्य बाबुजी तिवारी, प्रा.प्रदीप देशमुख, शिवाजी जाधव, उपाध्यक्ष-डॉ.संतोष मोरे,कोषाध्यक्ष - ओमप्रकाश राठोड,विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.

सोमवार, २१ मार्च, २०२२

माझ्या कवितेच्या जन्माची कथा - कवी, लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर

माझ्या कवितेच्या जन्माची कथा-

कवी, लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर


          सकाळीच आजोबानं रेडिओ लावला......"प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती..".......
आकाशवाणीचे सूर घुमत होते. दारी सडा सारवण करणार्या सुवासिनींच्या कंकणांचा मंजुळ आवाज....... गाणं  माझ्या कानात  झिरपत होतं........मी अंथरुणातच मौनात गाणं पकडत  होतो........उगाच  ह्या कुशीवरून त्या कुशीवर.......आज तर  रविवार  म्हणून मरगळ घेऊन पडलेला........ मला  शेतात ज्वारीवरची पाखरं हाणायला  पाठवायचं, हे आई-बाबांनी ठरवलेलं. त्यांची  कुजबूज मी  ऐकत होतो.....
         मी शाळेपेक्षा शेतात जायला नेहमीच उत्साही असायचो.....पण, एक पेन, वही अन् मराठीचं पुस्तक घेऊनच..शेत राखायला जायचो.....
अभ्यासापेक्षा  कविता गळ्यावर म्हणायचा भारी नाद......त्या काळी गुरुजी आमच्याकडून खूप पाठांतर करून घ्यायचे......!
          गप्पा रंगल्या की, आजोबा त्यांच्या समवयस्क मित्रांना सांगायचे...."वाजवणं तर आमच्या पाचवीलाच पुंजलेलं "......आणि गाणं म्हणाल  तर रक्तातच. !....आमची  लेकरं झोपेतून उठून सकाळी रडली तरी ती सुरातच रडतात......
        मला आठवतंय त्या दिवशी मी  शेतातल्या बांधांवर  बसून गोफणीनं पाखरं हाणीत होतो......मलाही  वाटायचं आपण एखादं गाणं, कविता रचून पहावी........ज्या  शेतात ज्वारीचं पीक होतं त्याच शेतात भलं मोठं लिंबाचं झाड होतं......मी आपली गोफण...(अर्थात वडिलांनी करून दिलेली ) फिरवून चार - दोन  वेळा ज्वारीवरून चिमण्या हाकारून लावायचो.....गोफण मोठी आणि  माझा जीव  लहान......म्हणून गोफणीतला दगड चिमण्यांच्या दिशेने जायचाच असं काही नव्हतं ....कधी तो पाठीमागेही पडायचा ; पण आवाज मात्र  मोठ्ठा करून  ओरडायचो.....व्हल्या, व्हल्या, व्हल्या, व्हल्या, व्हल्या... गं~~
            माझा  आवाज शांत झाला की, चिमण्यांचा थवा लिंबाच्या झाडावरून पुन्हा कणसांवर......... दिवसभराची हीच परिक्रमा.....
.....त्याच दिवशी  नाकी डोळी छान, रंग  गोरा गोरा पान,...ह्या दादा कोंडके यांच्या गाण्याच्या ओळी पुनः पुन्हा  उगाळायचो.....पुनः पुन्हा  तेच धृपद....आणि  चिमण्यांच्या  थव्याच्या दिशेने एक दगड गोफणीतून.
........चिमण्यांना हाकारणं झालं की,....त्याच गाण्याचं  तेच धृपद......"नाकी डोळी छान" च्या  चालीवरचं  मला  माझंही धृपद सापडलं....."चिमण्या  आल्या हो,आता चिमण्या आल्या हो....आल्यात चिमण्या कणसांवरी, गोफण फिरवू  माथ्यावरी.".....आणि माझ्या कवितेनं जन्म घेतला.......मला आभाळ ठेंगणं झालं.....ते  गोफणीतले छोटे- छोटे गोटे माझ्या  कवितेचे साक्षीदार  होते......
          १९८०-८१ ला सातवीत असतानाच मला माझ्यातली कविता  सापडली.....पण त्या चिमण्यांचा मी जन्मभर  ऋणाईत आहे. त्या...
बांधावरल्या क्षणांचा मी आभारी आहे....त्या क्षणाने आज मी  धन्य झालो.......आईवडीलांनी शेतात पाठवल्यामुळे त्यांचे ऋण तर शब्दांच्या
आणि मौनाच्याही पलिकडले आहेच........
            त्यांच्या ऋणामुळेच आज माझ्याजवळ हजार पाचशे कवितांचं धन आहे......प्रतिथयश कवी म्हणून.. माझे कवी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले....त्या दिवशीचे भूपाळीचे सूर आणि झोपेतून लवकर उठावं म्हणून रागावलेली आई...आजही माझ्या स्मृतीगंधात आहे.....
         शेताचे खरे मालक पशु, पक्षी, प्राणी असतात.......रानातल्या प्रत्येक घटकांवर त्यांचा जन्मजात अधिकार असतो......आपल्या मालकीचा सातबारा कुठल्यातरी जुन्या सुटकेसमध्ये..तर आपले शेत दहाबारा कोसावर ......मी कसतो म्हणून माझी जमीन.....मी ज्वारी पेरू शकतो ; पण...ज्वारीला कणसं नाही आणू शकत..मी आंब्याचे झाड लावू शकतो ; पण आंबे नाही आणू शकत......ही तर  निसर्गाची किमया......फुलांची निर्मिती  फुलपाखरांसाठी, मधमाशांसाठी झालेली आहे.......फुले झाडावरंच छान दिसतात....फुले आणि दगड  (दगडांचे देव) ....ही कल्पना स्वार्थी  वाटते मला.....फुलांना जीव असतो म्हणून त्यांचा  सुगंध दरवळतो.....तो फुलांचा  गुण आहे.......सुगंधामुळे माणूस फुलांजवळ जातो...फुले माणसांकडे येत नाहीत......चांगल्या गुणवान माणसाचेही असेच असते  त्याच्या  गुणाचे कौतुक होते, त्याचे नाही.......त्याच्या कर्तृत्ववाचे गुणगान होते, त्याच्या अस्तित्वाचे नाही....कर्तृत्वानेच  माणसे मोठी  होतात...जातीपातीने किंवा धर्मभेदाने नव्हे....!
            दैनंदिन जीवनात पावलांपावलांवर ऊर्जा देणारी  माणसे भेटतात.....किंबहुना पशु,पक्षी,झाडे,वेली, प्राणी,दगड , गोटे, फळे, फुले,असे अनेक घटक आणि घटना आपले गुरु असतात.....रस्त्यावर ठेच लागली तर आपण खाली आणि पुढे  पाहून चालतो म्हणजे रस्त्यावरचा दुर्लक्षित  दगडही आपला गुरु होतो.......काही घटना आणि घटक माणसांना प्रेरणा देत असतात.....
              झाडं सावली देतात, फळे,फुले देतात. माणसात किंवा पशुपक्ष्यांमध्ये फरक करत नाहीत.. झाडं आणि पाणी यांच्याकडून भेद  न करणे हा चांगला समानतेचा गुण घेतला पाहिजे......या  निसर्गाने सर्वांसाठी सर्वस्व उधळून दिलंय.......काय घ्यायचे ?...आपण ठरविले पाहिजे......उगाच भयमुद्रा करत मिरवू नये.....तुमच्या चेहर्यावर नेहमीच आनंद ओसंडून वाहत राहिला पाहिजे.....आपला चेहरा
आनंदी पाहून आपल्याला पाहणाराही आनंदी व्हावा..!
         " प्रार्थना करत असाल तर," सगळ्यांचं भलं कर..!" ही वैश्विक प्रार्थना करा., त्या प्रार्थनेतून तुम्हीही सुटणार नाहीत, तुमचंही भलं होईल....पुजा करत असाल तर मानवतेची करा....भक्ती करणार असाल तर आईवडीलांची करा.....चांगले काही करणार असाल तर धाडस करा.
" नो  स्टिअरींग विदाऊट डेअरिंग " अपघात होऊ नये म्हणूनच शिकत असतो...धाडस तर करा, यश तुमची वाट पहात आहे."

डॉ.धोंडोपंत मानवतकर

सकाळ "गुडमाॅर्निंग" सदर
चित्र - गुगलवरून साभार.


शनिवार, १९ मार्च, २०२२

एकाच नाण्याच्या तीन बाजू - डॉ.धोंडोपंत मानवतकर

आरक्षण, राजकारण आणि खाजगीकरण 

एकाच नाण्याच्या तीन बाजू

लेखक - डॉ.धोंडोपंत मानवतकर

सामाजिक बदलाचे वारे झपाट्याने वाहू लागले आहेत, मग ते सामाजिक हिताचे किंवा देशहिताचे असतीलच असे नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यवसायिक अशा अनेक क्षेत्रात कमालीचे बदल होऊ लागले आहेत. प्रवाहाबरोबर ते बदलही कालसापेक्ष आहेत किंवा अटळ आहेत. हे सगळे बदल खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीशी निगडीत आहेत अर्थात ह्या खा.उ.जा. धोरणाला आपला देश अपवाद नाही. 
        आपल्या भारत देशात इतर देशाप्रमाणे एकाच धर्माचे लोक राहत नाहीत, तर अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक राहतात. समुहा-समुहात गुण्यागोविंदाने नांदतात. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेत मुद्दामच काळजीपूर्वक स्वातंत्र्य, समता बंधुता, न्याय,आणि धर्मनिरपेक्षता ही आपल्या लोकशाहीची मूल्ये राज्यघटनेत नोंदवून सर्व जाती-धर्माचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. याच मूल्यांवर आधारित आपल्या लोकशाहीची अंमलबजावणी होत आहे; म्हणूनच भारतातील सत्तेच्या राजकारणाची समीकरणे ही छोटया छोटया जातीधर्माच्या मतांवर निर्भर आहेत.      
       या देशात इंग्रजांनी वापरलेली "फोडा आणि राज्य करा" हीच नीती  इथल्या काळ्या इंग्रजांना सुद्धा वापरावी लागत आहे. म्हणूनच या देशात धर्मवाद आणि जातियवाद या दोन गोष्टी आजही टिकून आहेत....कारण राजकारणी लोक या दोन बाबींना जास्त महत्त्व देतात. धर्मवाद आणि जातियवाद या दोन बाबींशी आपल्या देशाची राजकीय समीकरणे अत्यंत निगडीत आहेत.  
     सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धर्मवाद आणि जातियवाद इथल्या राजकारण्यांनी टिकवून ठेवलेला आहे एवढेच नव्हेतर त्याला खतपाणी घालण्याचे कामही केले आहे आणि ते काम आजही अव्याहतपणे चालू आहे.
         हा धर्मवाद आणि जातियवाद निवडणुकीच्यावेळी डोके वर काढतो. भारतात सत्तेच्या प्रस्थापनेसाठी धर्मवादाचा आणि जातीयवादाचाच आधार घ्यावा लागतो.  म्हणूनच इथल्या जातीची आणि धर्माची कट्टरता अतिशय दृढ होताना पहावयास मिळते; धर्माची कट्टरता आणि जातियवादाचे स्तोम टिकवून ठेवण्यासाठी वरचेवर मोर्चे,आंदोलने, जातीय दंगली, घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातात. या प्रकारातून निर्माण होणारे सामाजिक विघटन सत्तेच्या समीकरणाचे यशापयश ठरवते.
       सामाजिक विघटनाचे वेगवेगळे पर्याय  भारतीय जनतेच्या अंगवळणी पडलेले आहेत. अलीकडचा सामाजिक विघटनाचा आरक्षण हा मुद्दा केंद्रातील सत्ताधारी पक्षाने खूप चालवला. त्या निरर्थक मुद्द्याने सर्वच जातीच्या लोकांना उचकून दिले.
महाराष्ट्रातील वेगवेगळया समाजातील जनतेने आरक्षणाच्या मागणीसाठी हज़ारोंच्या संख्येने मोर्चे काढले आंदोलने केली. महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आणि सांगीतले की, ही बाब राज्य सरकारच्याच अख्त्यारीतील आहे आणि राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. वास्तविकपाहता ही बाब केंद्रसरकारच्या व न्यायपालिकेच्या अख्त्यारीतीलच होती, तरीही केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे लोक एवढय़ावरच थांबले नाहीत तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात   विरोधीपक्षानेच मोर्चे,आंदोलने करणे सुरू केले. थोडक्यात म्हणजे जनतेची दिशाभूल करून राज्य सरकारलाच बदनाम करण्याचा कार्यक्रम राबवला. 
        विरोधीपक्षाचा हा आरक्षणाच्या राजकारणाचा कार्यक्रम जनतेच्या लक्षात आल्याने महाराष्ट्रातील विरोधीपक्षाला स्वतःचा माथा उजळ करून घेण्यात अपयश आले. आरक्षणाचे राजकारण करून, लोक रस्त्यावर उतरवून सामाजिक दंगली घडवून आणायच्या आणि शेवटी कोणत्याच समाजाला आरक्षण दिले जाणार नाही.असे जनतेकडूनच वदवून घ्यावयाचे. ही एक आरक्षणाच्या विरोधातील पद्धतशीरपणे चालवलेली खेळी आहे हे जनतेच्या लक्षात आलेले नसावे याच भ्रमात केंद्रातील सत्ताधारी पक्ष  होता.
        कारण आरक्षणाच्या नावाने समाजामध्ये गोंधळ निर्माण करणे,अनेक समाजाला आरक्षणाच्या नावाने रस्त्यावर उतरवणे आणि एकीकडे खाजगीकरण करावयाचा सपाटा लावणे ह्या दोन गोष्टी एकाचवेळेस करता आलेल्या आहेत. 
     आरक्षणाच्या गोंधळा-गोंधळात खाजगीकरणाचे नाट्य रंगवले गेले. देशाच्या सर्वच मालमत्तेचे एकदा खाजगीकरण झाले की, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा प्रश्नच उद्भवणार  नाही. असे आरक्षण संपवण्याच्या बाबतीत  सरकारचे धोरण आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.
    एकीकडे आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरवून दुसरीकडे खाजगीकरण करणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले गेले. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला खाजगीकरण करून राष्ट्रीय संपत्ती विकण्याचा अधिकार कुणी दिला..? काँगेसने देशाच्या संपत्तीचे राष्ट्रीकरण करून देशाच्या संपत्तीत जनतेला वाटा दिला.भारत माझा देश आहे म्हणण्याची फार मोठी ताकद दिली. परकीयांच्या गुलामगिरीतून बाहेर काढले आणि केंद्रातील विद्यमान सरकार खाजगीकरण करून पुन्हा एकदा भारतीय जनतेला खाजगी कंपन्यांचे गुलाम बनविण्याचे स्वप्न साकार करत आहे असे दिसून येते. ते पुन्हा एकदा सत्तेच्या प्रस्थापनेसाठी वेगवेगळया मनसुब्यांचा अवलंब करीत आहे. 
   केंद्रातील सरकारची भूमिका जनतेच्या अत्यंत हिताची आहे, असे भासवण्याचा प्रयत्न "सबका साथ सबका विकास" अशा जाहिरातीतून केला जात आहे. यांद्वारे केवळ दिशाभूल करण्याचाच एककलमी कार्यक्रम सुरू आहे की,काय असे वाटू लागते.
    वरील मुख्य मथळ्यात सांगितल्याप्रमाणे *एकाच नाण्याच्या तीन बाजू* त्या कोणत्या आहेत, त्या पाहुया..!  तर नाण्याच्या दोन बाजू तुम्हां सगळ्यांना माहितच आहेत त्या म्हणजे "छापा आणि काटा" किंवा "चित आणि पट" परंतु नाण्याची तिसरी बाजू असते ती नाणे घरंगळणारी.... किंवा जाड नाणे त्या बाजूवर उभे राहू शकते तीच नाण्याची तिसरी बाजू असते; मात्र ही तिसरी बाजू दुर्लक्षीत असते. तशीच सत्तेच्या राजकारणाची सुद्धा एक तिसरी बाजू असते ती म्हणजे जनतेकडूनच दुर्लक्षीत झालेली, लक्षात न आलेली किंवा लक्षात न येऊ दिलेली आणि ती म्हणजे "दिशाभूल !
          राजकारणाची तिसरी बाजू असते जनतेची दिशाभूल करणे. केंद्रातील सरकारच्या आरक्षण आणि खाजगीकरण  ह्या दोन बाजू जनतेच्या लक्षात आल्या परंतु खाजगीकरण केले की,आरक्षण, आपोआपच संपते ही आहे केंद्रातील सत्ताधारी पक्षाची तिसरी बाजू. म्हणून सगळ्याच समाज बांधवांनी राजकारणाची असो, सत्ताकारणाची असो की, समाजकारणाची असो तिसरी बाजू समजून घ्यावी..! नाहीतर तुमच्या भावनांचे भांडवल करून तुमची नेहमीच दिशाभूल केली जाऊ शकते, एवढे लक्षांत ठेवा..!
✍️
लेखक - डाॅ.धोंडोपंत मानवतकर

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मंठ्यात रंगली "पौर्णिमा कवितेची".......!

मंठ्यात रंगली " पौर्णिमा कवितेची "......

बहरलेल्या कविसंमेलनात रसिकांची मनमुराद हसवणूक..

 आस लागली संसाराची मनी गं
 रानात राबतंय कुनबीनीचा धनी गं

      मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने संपन्न झालेल्या पौर्णिमा कवितेची या कविसंमेलनाला बहुसंख्य रसिकांची उपस्थिती आणि उस्फुर्त दाद.
      जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात २० ऑक्टो. रोजी सायं. ७ वाजता सुरु झालेल्या "पौर्णिमा कवितेची" या कार्यक्रमाचे प्रारंभी प्रमुख पाहुणे व कविंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. काव्यमंचावरील उपस्थित मान्यवरांच्या व निमंत्रित कवींच्या सत्कारानंतर आविष्कार गौरव- २०२१ या पुरस्काराने प्रसिद्घ कथाकार व कादंबरीकार प्रा.छबुराव भांडवलकर, कवी, कथाकार शिरीष देशमुख व नाट्यकलावंत सतिश खरात या त्रयींचा  मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व विशेष मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मुखोद्गत काव्यवाचन करणाऱ्या परतूरच्या श्रावणी बरकुले हीचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी काव्यमंचावर उद्घाटन करताना माजी
 आमदार धोंडीरामजी राठोड,
कृ.उ.बा. समितीचे उपसभापती राजेश मोरे, माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, मंगलम् सुपर मार्केटचे संचालक आनंदराम सोमाणी व महेश भांगडिया यांची उपस्थिती होती. 
     यावेळी माजी आमदार धोंडीरामजी राठोड मा.राजेश मोरे यांची आविष्कार साहित्य मंडळाच्या प्रदीर्घ अशा वाटचालीचा व तीन दशकांच्या कारकिर्दीत सुरू असलेल्या साहित्यिक उपक्रमाचा  गौरव करणारी भाषणे झाली.. यानंतर "आविष्कार गौरव-२०२१" च्या पुरस्कारप्राप्त तिन्ही मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून सत्काराला उत्तर देऊन मंडळाचे ऋण व्यक्त केले. रात्री ९ वाजता निमंत्रितांच्या कविसंमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात कवियित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, हास्यसम्राट गौतम गुळदे,कवी केशव खटींग व हास्यव्यंग कवी बजरंग पारीख यांचा सहभाग होता.. 
    संमेलनारंभी कोजागरी पौर्णिमेच्या शब्दाचा मथितार्थ सांगून कवियित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांनी..
चांदणे नेसून आले दु:ख माझे कोवळे 
मांडले मी काळजाच्या अक्षरांचे सोहळे  
              
जगण्याचे जगणे जगून झाले बाई
समजून उमजले तरी मज कळले नाही
मागून जोगवा भरत गेली ओटी 
संपल्या दु:खाचे अश्रु दाटले पोटी
अवस्येची होऊन पुनव आली दारी 

     अशा गेय रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कवी केशव खटिंग यांनी   खास आपल्या शैलीतून ग्रामीण भाषेची महती सांगत काव्यरसिकांचा नूर खुलवला...

" आस लागली संसाराची मनी गं
  रानात राबतंय कुनबीनीचा धनी गं "

आपल्या वेगळया ढंगात ग्रामीण शैलीतील रचना सादर करून केशव खटिंग यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. अमरावतीचे हास्यसम्राट कवी गौतम गुळदे यांनी "आजकालच्या जमान्यात भले भले चयले", "बुढा म्हणे बुढीला", व निंदन" या  वैदर्भीय बोलीतील व आपल्या खास विनोदी शैलीत कविता ऐकवून आणि प्रासंगिक विनोद सांगून रसिकांना मनमुराद हसविले.
     नांदेडचे हिंदीभाषिक हास्यव्यंग कवी बजरंग पारीख यांनी आपल्या खास व्यंगात्मक शैलीत हिंदीभाषेत चुटकुले सांगत वर्तमानातल्या सामाजिक विकृतीचा व पुढाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी कोजागिरीनिमित्त उपस्थित रसिकांनी दुग्धप्राशनासह कवितेचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या कविसंमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले, तर उद्घाटन आणि
 सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन ओमप्रकाश राठोड प्रा.डॉ.सदाशिव कमळकर यांनी केले. या कविसंमेलनास परतूरहून प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे; विष्णू बरकुले,रमेश आढाव, सेलूहून डॉ.अशोक पाठक, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, यांच्यासह मंठा शहरातील अनेक प्रतिष्ठीत व जाणकार नागरिकांसह प‌त्रकार व बहुसंख्य महिलांची आवर्जून उपस्थिती होती.
 
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आविष्कार साहित्य मंडळाचे पदाधिकारी1 कुं.पी. इंगळे, बाबुजी तिवारी, पि.टी.प्रधान, सौ.शोभा डहाळे, डॉ.संतोष मोरे, शिवाजी जाधव, ओमप्रकाश राठोड, सौ.मंजुषा काळे, प्रदीप इक्कर, शत्रुघ्न तळेकर, विजय गायकवाड़ राजू वाघमारे आदींनी खूप परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------
संकलन 
डॉ.धोंडोपंत मानवतकर
अध्यक्ष-आविष्कार साहित्य मंडळ,मंठा.

अण्णाभाऊंचा लढा हा शोषित माणसांच्या हितासाठी होता."...

"अण्णाभाऊंचा लढा
हा शोषित माणसांच्या हितासाठी होता "

डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांचे प्रतिपादन... 

--------------------------------------------------------------------
   
                  साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा लढा हा कष्टकरी,शेतकरी, शेतमजुर,दलित, पीडित, दुबळ्या अशा शोषित माणसांच्या हितासाठी होता ; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,राजर्षि शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं महान कार्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी केलेलं आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक,कवी डाॅ. धोंडोपंत मानवतकर यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत दहावे पुष्प गुफतांना केले.
     म.स.शि.प्र.मंडळाचे स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे वतिने आयोजित कार्यक्रमात ते " साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीतून आलेल्या वर्गीय जाणिवा : एक विश्लेषण या विषयावर ते बोलत होते. या राष्ट्रीय व्याख्यानमालेत पुढे  बोलताना डाॅ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ वेदना मांडणारे साहित्यिक किंवा नायक नव्हते; तर दुःख वेदनांवर उपाय सांगणारे साहित्यिक होते...त्यांच्या शाहिरीतून आलेल्या वर्गीय  जाणीवांचा परामर्श घेत सामाजिक वर्गीकरणातून येणार्या टोकाच्या विदारक विषमतेचे विश्लेषण करून अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक लढ्याद्वारे शोषणव्यवस्थेवर कडाडून हल्ला केल्याचा प्रत्यय अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यातून येतो असेही डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांनी स्पष्ट केले. 
       स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित केलेल्या साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय व्याख्यानमालेत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज, प्रज्ञावंत मान्यवर मंडळी या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालेली होती.
      या दहाव्या पुष्प व्याख्यानमालेच्या प्रमुख व्याख्यात्यांचे आभार प्रा.के.एम.कांबळे यांनी मानून मागील नऊ व्याख्यानाच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकला.
            सदरहु कार्यक्रमाचे मुख्यआयोजक प्राचार्य डॉ. भारत खंदारे तसेच उपप्राचार्य प्रा.डाॅ. सदाशिव कमळकर,उपप्राचार्य प्रा.डाॅ.बापुराव  सरोदे, रा.से.यो.चे जिल्हा समन्वय प्रा. डाॅ. सुभाष वाघमारे यांचे सहकार्य मोलाचे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ.जितेंद्र जगताप, प्रा.डाॅ. भरत धोत्रे व प्रा. रविंद्र गायके यांनी परिश्रम घेतले.

गुरुवार, १७ मार्च, २०२२

"अस्वस्थ मनाचे किनारे."...✍️ डॉ.धोंडोपंत मानवतकर

अस्वस्थ मनाचे किनारे...

अस्वस्थ मनाचे किनारे....

ललित लेखन- 
डॉ.धोंडोपंत मानवतकर 
✍️----------------------------------------------------
        रात्रीचे अकरा वाजलेले...भयान शांतता. मनात कमालीची अस्वस्थता.... तुडुंब काळोखासह अवकाश डोळ्यात साठवून गच्चीवर निःशब्द निपचित पडलेला मी... जीव गुदमरून जावा एवढा भयग्रस्त... डोक्यात प्रश्नांचे काहूर घेऊन मनाच्या  गर्तेतल्या अथांग दरीत कोसळलेला मी..!
       'आठवणींच्या पारंब्यांना लोबकळत राहणारी माझी अवस्था...अगदीच अनकॉन्सिअसमध्ये गेलेल्या पेशंटसारखी.... बेवारस पेशंटभोवती कुणीच नसावे.. तसा वाराही अवतीभवती फिरकत नव्हता... अर्ध्या तासानंतर एक थंड झुळूक दिलासा देणारी...
     ती अमावस्येची रात्र.... अस्वस्थ मनाच्या विविधांगी प्रस्तरातून उलगडत गेलेली... तिच्या गोड आवाजातली अनेक गाणी अनुवंशिकतेने माझ्यात साठवलेली...तिच्या आवाजातले त्या गाण्याचे सूर कधी मांडीवर झोपून ऐकलेले.. कधी जात्यावर दळताना ऐकलेले...तर कधी निंदताना , खुरपतांना.. पण तिचा आवाज अगदी लताबाईच्या आवाजासारखा मिळताजुळता.... तिला तिच्या माहेरातूनच मिळालेली ही आवाजाची देणगी...!
      तिच्या सगळया खानदानीतलं एखादं मूल जरी रडलं तरी सुरातच रडणार...! अंजनीच्या साठ्यांचं घराणं म्हणजे स्वरगंगेचं माहेरघर... सरखाराम साठ्यांची क्लोरेनेट ऐकली आणि संपतराव साठ्यांचे ट्रम्पेट ऐकले की, मला वाटायचं मी सुरेल मामाचा एकुलता एक भाचा... एका सुरेल इंद्रायणांचं लेकरू..अर्थात माझी आई  इंद्रायणी विठोबा साठे. म्हणजेच  ती साठ्यांची लेकबाळ....! तिच्या आठवणीने
दाटून कंठ येतो नि फुटू लागतो बांध मनाचा...!
        मध्यरात्र.... पेंगलेले नेत्र....अनेक हात कुशीत शिरलेले... या निरव शांततेत माझ्या कानावर रेडिओत एका जुन्या गाण्याची धून आदळताच मनाचा बांध फुटला.... ते गाणं कधीही आणि कुठेही ऐकलं की, माझ्या मनाचा बांध फुटतोच.... आणि तिच्या आठवणीने मी एकांतात हुमसून हुमसून रडू लागतो... तिच्या आवाजाचं आणि त्या गाण्याचं काहीतरी नातं असल्याचा मला भास होतो... गाण्याच्या सुरुवातीलाच राव्याचं कुजबुजणं नि लगेच.....आलाप.. आ.....

" स‌ुनो सजना पपिहेने कहां सबसे पुकारके.. 
संभल जाओ चमनवालों केे आये दिन बहारके..."

      माझ्या मनाची अवस्था.. इंद्रायणीच्या डोहाचे कंगोरे ढवळल्यागत झालेली...मी जणू संध्यासुक्तात बुडालेला... अवघ्या इंद्रियांसह.. .! 

अवघीच इंद्रिये गाती तिच्याच दु:खाची गाथा
स्मरणाच्या काललयीवर हा देहच होई माथा ! 

हा संपूर्ण देहच माथा होऊन मी घालू लागतो लोटांगण....तिच्या अदृश्य पदकमलावर...तिला पाहण्यासाठी माझ्या समस्त देहाला डोळे लगडलेत.
आणि माझ्या नसानसातून अश्रुंचे पाट वाहताना... मी अनुभवतोय..! या देहाला बैचन करणारी ती रात्र.... मला त्याच गीताचा अंतरा ताललयीत गुणगुणायला भाग पाडते....

देखो ना ऐसे देखो, मर्जी है क्या तुम्हारी, 
बेचैन करना देना, तुमको कसम हमारी.. 
हमी दुश्मन ना बन जाएँ कहीं अपने करार के...

या अंतऱ्यात तिने माझ्यावर केलेल्या संस्कारांचे उल्लंघन होऊ देऊ नये..असा भावार्थ मी लावत राहतो...!
     आई माझ्या बेचैन मनावर मला ताबा मिळवून दे, "तुला माझी शपथ.". मला तुझ्या आठवणीने एवढे अस्वस्थ करू नकोस..! अनावर अश्रुंना वाट करून देतांना उसासे मागे झरू लागतात...

"ओंजळीत माझ्या माझे उसासे 
आणि भोवताली आभाळ भासे"

     इंद्रायणीच्या कुशीतून बाहेर आलेला मी... पुन्हा इंद्रायणीच्या आठवणीत डुंबत जातो... अनावर आठवांचे शल्य इतके बोचरे की, अख्ख्या देहालाच आठवणींच्या जखमा होऊन जाव्या.....तिने आयुष्यभर भोगलेल्या दुःखाची गाथा तुकारामाच्या गाथेप्रमाणेच तरंगणारी..माझ्या मनगंगेच्या डोहावर..!              प्रपंचाच्या अनेक प्रश्नांचे तांडव सुरु असूनही तिची आठवण एका गाण्याच्या स्वरलयीतून पाझरत जाणारी......

"किती प्रश्न भोवती आणि मन रिकामे
कशाचे करावे स्वतःशी खुलासे....."

       जीवनसंचिताच्या साचेबंद स्वप्नांना कितिदा हुलकावणी देत जातो मी....आई त्यांपेक्षा मला कुठल्यातरी कारागृहात बंदिवान व्हावं वाटतं गं.. अनेक स्वप्नांना कवेत घेऊन उगाचच दिलासे देत जगण्यापेक्षा.....!
      तसा मी गर्दीतही एकटाच असतो.... गर्दीतून अनेकांचे धक्के पचवूनही जपत असतो एकलेपण....  हिंस्त्र आणि मतलबी माणसांचे बेगडी रूप न्याहाळण्यासाठी..!
      दाखवायचे वेगळे नि खायचे वेगळे.. ह्या वृत्तीची आता भीती वाटू लागली आहे ; कारण जखमांचे उत्सव साजरे करणारांचे काफिले सुद्धा खोट्या प्रतिष्ठेशिवाय जगूच शकत नाहीत...म्हणून 'मला नकोसा वाटतोय हा उद्विग्न वर्तमान'.."खोट्या आवर्तनात बेगडी आनंद शोधणारा."...यापेक्षा माझ्या आरसपानी स्वप्नांना कवेत घेऊनच जगावे वाटते तुझ्या आठवणींच्या प्रदेशात...!.............................................................................
✍️

डॉ.धोंडोपंत मानवतकर

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची औरंगाबाद कार्यकारिणी.

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची औरंगाबाद कार्यकारिणी - 
सहसचिव -डॉ.धोंडोपंत मानवतकर
डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची औरंगाबाद शाखेच्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रा.शिवाजी वाठोरे सर सत्कार करताना...
----------------------------------------------------------------------------
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद 
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे विभागीय अध्यक्ष प्रा.शिवाजी वाठोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.यशवंत खडसे,डॉ.भीमराव सरवदे व डॉ. भगवान धांडे यांची उपस्थिती हो

       औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीची मतदान पद्धतीने निवड करण्यांत आली. अध्यक्ष- डॉ.नवनाथ गोरे, उपाध्यक्ष- प्राचार्य डॉ. वामनराव जगताप, सचिव - मा.सुनिल डोके, सहसचिव -डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून एकनाथ खिल्लारे, प्र. म. धोडपकर,डी.बी. जगत्पुरिया, डी.एन.जाधव, टी.एस.चव्हाण, प्रा.रमेश मेंढे, जनाबाई गि-हे, सुदाम मगर, डॉ.राजेश कांबळे, गजानन मगरे , देविदास अंभोरे, पंकज शिंदे, दशरथ सुरडकर.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन मकासरे यांनी तर सूत्रसंचलन पंकज शिंदे यांनी केले, शेवटी डी.एन.जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मंगळवार, १५ मार्च, २०२२

गावकऱ्यांची फसवणूक - लघुकथा

 गावकऱ्यांची फसवणूक   (लघुकथा )

  लेखक -डॉ.धोंडोपंत मानवतकर

---------------------------------------------
          रात्रीचे आठ वाजले होते. भागुजीच्या डबड्या मोबाईलची बेल वाजत होती. भागुजीनं ताटावरून उठून फोन घेतला.
"हं, हालव..! "
"हं, कोन बोलतंय ?"
"मी,बाजीराव घोडे बोलतोय,आमदाराचा पीए. कोन,भागुजी तात्या का?"
"हो सायब, मीच बोलतूय.!"
"आरं तात्या, तुजं घरकुल मंजुर करून घेतलंय बरं का."
"बरं बरं मालक; लय बरं झालं बगा !"
"पर ते सायबाला ईस हजार म्या कबुल केलेतं..ते दोनच्यार दिसांत द्यावं लागतील..!"
"मालक सद्या त् जहेर खाला पैसा नाई."
"आरं तात्या,याजागिजानं काड की. आसी संदी येनार नाही बग. नाईतर घरकुल वापस जाईन. हं,अन् पुन्हा सांगतो हे आपल्या गावच्या सरपंचाला कळू देऊ नकू. आमदार सायबाचं अन् सरपंचाचं लय वाकडं हाय बग. घरकुल वापस गेलं मून समज" असं बोलून बाजीरावानं फोन ठेवला. घरकुल मंजुर झालं म्हणून भागुजी आनंदी झाला होता.
       दुसऱ्या दिवशी भागुजी गावात सगळ्या पैसेवाल्याकडे जाऊन आला;पण  वीस रुपये शेकड्यानेसुद्धा त्याला कुणी पैसे दिले नाही. 
        त्याच दिवशी रात्री भागुजीने बाजीरावला जाऊन सांगितले,"मालक नाई मिळालं पैसं."  बाजीराव म्हणाला," ठीके.! मी सकाळीच  गेनू सावकाराला सांगून जातो..पर त्याचा भाव तीस रुपये शेकडा हाय.! चालंल ना.?"  
"चालंल की. मंग काय करावं, घेऊत की."
 "बरं बरं " म्हणत बाजीरावने भागुजीला न कळत घरातून वीस हजार खिशात घालून फट्फटीवर गेणू सावकाराकडे नेऊन दिले. बाजीराव आणि गेणूचं जुगाड अगोदरच ठरलेलं होतं. 
       दुपारी भागुजीनं गेणू सावकारांकडून ठरल्याप्रमाणे वीस हजार रूपये आणले आणि रात्री बाजीरावच्या घरी नेऊन दिले.तेव्हा बाजीरावने भागुजी देखत साहेबाला  लटकेच दोन-तीन शिव्या हासडल्या. तेवढ्यात भागुजी बोलला,"मालक  त्यान्लाबी कामाचं दाम नकु का ? 'तळं राखल ते पानी चाखल." बाजीरावालाही हेच ऐकायचं होतं .
        बाजीरावाने गावातून घरकुल योजनेच्या नावानं बरेच पैसे उकळले होते. शे-सव्वाशे लोकांना अशाच प्रकारे गेणू सावकाराचेच म्हणून व्याजाने वाटले होते. गेेणूला येणाऱ्या व्याजातून पाच टक्के देत होता. दोघेजण गावातल्या गरीबांना लुटत होते.
            बाजीराव हा आपल्या 'खांडेवाडी' गावात आमदार सोमनाथ ढेकळेचा पीए म्हणून सांगत असायचा. बाजीरावने जवळजवळ दोनशे लोकांचे घरकुलाचे खोटे खोटे फॉर्म भरले होते. लोक त्याला रोजच विचारू लागले, 'कधी येईल घरकुल?'  तो म्हणायचा, "ह्या महिन्यात चेक येईल, नाहीतर पुढच्या महिन्यात येईल" असं म्हणत एक वर्ष लोटलं. 
       चैत्र महिन्यात एकेदिवशी खांडेवाडीत तहसिलदार आणि विस्तार अधिकारी आले. सरपंचाला घेऊन गावातून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या पटांगणात खुर्च्या टाकून बसले. सरपंचासोबत गावातील घरकुलांबाबत चर्चा चालू होती. गावातील बरेच लोक जमा झाले होते. जमलेल्या सर्व लोकांना विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले की,"तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांची घरकुलं मंजूर करायची आहेत. तुम्ही सरपंचाकडे फॉर्म भरून द्या..!" लोकं अचंबित झाले. बाजीरावाने फसवल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. लोकं एकमेकांकडे पाहू लागले. तेवढयात भागुजी बोलला," सायब,आमी तर वरीस झालंय फारम भरून." बरेचजण म्हणू लागले." हो सायब, आमीबी भरलेतं आन्  ईस ईस हजारबी देलेतं." लगेच सरपंच पांडुअण्णा  म्हणाले,"कोनाकडं देले रे ?" त्यावर लोक एकाच सूरात म्हणाले," बाजीराव घोड्याकडं." तेवढयात भागुजी तोंडातल्या तोंडात पुटपुटला " यानं समद्यायलाच घोडे लावले वाट्टंय." साहेब म्हणाले,"कोण बाजीराव घोडे ? बोलवा त्याला."  एक वृद्ध म्हणाला," साहेब, तुमची गाडी गावात शिरली अन् बाज्या गावातून निसटला." बाजीरावाने गावकऱ्यांची  फसवणूक केल्याचे उघड झाले. तहसिलदार आणि विस्तार अधिकारी यांनी सरपंचाला ताकीद दिली की, "या गरीब लोकांचे बाजीरावकडून पैसे परत मिळाले पाहिजे, या सर्वांना घरकुलही मिळाले पाहिजे आणि "गावकऱ्यांची फसवणूक" केल्याबद्दल  त्याला तुरुंगवासही झाला पाहिजे. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू" साहेब असं बोलले नि गाडी निघून गेली. 
       लगेच सरपंचाने गावातल्या सगळ्या लोकांना सांगितले, "बाजीराव गावात घुसला की, त्याला घेराव घाला. बेदम मारा. मी पोलिसांची गाडी बोलावली आहे." असं बोलून सरपंच पांडुअण्णा ढोले आणि सर्व गावकरी आपापल्या घरी गेले. 
       तरूणांनी गावकऱ्यांना सांगितले की, बाजीराव गावात शिरताच आम्ही पाचजण मिळून एक मोठी आरोळी ठोकू तेव्हा गावकऱ्यांनी गोळा व्हायचं, काहींनी त्याला मुक्कामार द्यायचा.
       बाजीरावच्या वाटेत कडक पहारा लावला. त्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास बाजीराव गावात शिरला. ठरल्याप्रमाणे मोठी आरोळी झाली. गाव जमा झालं. लोकांनी बाजीरावला घेराव घालून बेदम मारला. त्याच्या तोंडून गेणू सावकाराचंही नाव पुढं आलं.
       गावात येऊन थांबलेले पोलीस त्या ठिकाणी आले. पोलीसांनी गेणू आणि बाजीरावला बेड्या ठोकल्या."गावकऱ्यांचा जेवढा पैसा मी घेतलेला आहे तेवढया किंमतीची माझी शेती विकण्याचा व लोकांची रक्कम देण्याचा अधिकार मी सरपंच पांडुअण्णा ढोले यांना देत आहे." अशा प्रकारचे शपथपत्र सरपंचाने आणलेल्या बॉंडवर लिहून घेतले. बाजीरावाची स्वाक्षरी झाली. पोलीस म्हणाले, "बाजीराव घोडे आणि गेणू घोगरे या दोघांना सहा महिने तुरूंगात ठेवले जाईल."  असं म्हणताच लोकांंनी टाळ्या वाजवल्या. दोघांना गाडीत बसवले आणि गाडी तालुक्याच्या दिशेने धावू लागली...














डॉ.धोंडोपंत मानवतकर

(सदरहु कथेतील सर्व पात्रे आणि कथानक काल्पनिक असून ही कथा कुठे मिळतीजुळती वाटल्यास तो योगायोग समजावा.)

सोमवार, १४ मार्च, २०२२

लहुजी साळवे हे बहुजनाच्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचे आद्यशिल्पकार - डॉ.धोंडोपंत मानवतकर

' लहुजी साळवे हे बहुजनाच्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचे आद्यशिल्पकार ' - डॉ.धोंडोपंत मानवतकर
आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी म.जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाची मदत करून संरक्षण तर दिलेच शिवाय त्यांनी उमाजी नाईक यांच्यासोबत भारताला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी सशस्त्र आंदोलन चालविले ; देशातील या क्रांतीपर्वात अशा महत्वाच्या दोन आघाड्या सांभाळणाऱ्या आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास भारतीयांना सांगितला गेला नाही, हे फार मोठे दुर्दैव आहे. त्यांचे क्रांतिकारी आंदोलन पुढे त्यांच्या अनुयायांनी चालविले म्हणून लहुजी साळवे हे बहुजनाच्या सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक क्रांतीचे आद्यशिल्पकार ठरतात असे प्रतिपादन डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले.
      मंठा येथील साठे नगरात दि. १७ फेब्रुवारी रोजी आद्यक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या १४१ व्या स्मृतिदिनानिमित्त  ते बोलत होते. डॉ मानवतकर पुढे म्हणाले की, मुक्त्ता साळवेंच्या रुपाने त्यांनी आधुनिक भारतात पहिल्यांदा धर्म चिकित्सा करून सत्यशोधक संस्कृतीला जन्म दिला. समाजाला शोषणमुक्त करण्यासाठीच त्यांनी "सार्वजनिक सत्यधर्मा"ची स्थापन केली.ज्या धर्माची  समाजाला आजही गरज आहे. महाराष्ट्रच्या सामाजिक, सांस्कृतिक परिघावर जे परिवर्तन घडून येत आहे. त्या परिवर्तनाचा आरंभ बिन्दू म्हणजे लहुजी साळवे होय. हिमालयासारखे धैर्य बाळगून परिवर्तनाची ललकारी देणारे लहुजी साळवे हे बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचे व भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे ते मुख्य प्रवर्तक होते त्यांच्यासारख्या सर्वच महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा व आदर्श    घेण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी कय्युमभाई कुरेशी (माजी पं.स.सदस्य  मंठा) हे होते, तर नगरसेवक अरुणभाऊ वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रताप चाटसे, डॉ.प्रविण माळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री.मारोतराव खनपटे यांची प्रमुख उपस्थिती होती
       प्रारंभी आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साठे नगरात मातंग समाज मंदिरासाठी एक भव्य जागा दान केल्याबद्दल हाजी कय्युमभाई कुरेशी यांचा विशेष सत्कार करून समाज बांधवांनी त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.प्रताप चाटसे, अरुण वाघमारे, डॉ.प्रवीण माळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक मारोतराव खनपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाचे अभ्यासक, प्रचारक श्री संदीप इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राजेश एम. खनपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज खनपटे, प्रदीप कांबळे, विजय खनपटे, सतीश खनपटे,चंद्रकांत खनपटे,अहिलाजी खनपटे, अजय गायकवाड, नंदकिशोर, विलास खनपटे, योगेश गायकवाड, लखन कांबळे, पंकज अडागळे, नाना खनपटे, यांनी अथक परिश्रम घेतले.
" जाणजो...छाणजो…पछच माणजो " - संत सेवालाल.
लेखक- डॉ.धोंडोपंत मानवतकर
तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो ।
कोई केनी भजो-पुजो मत ।
कोई केती कमी छेनी ।
सौतार वळख सौता करलीजो ।
भजे-पुजेमं वेळ घालो मत ।
करणी करेर शिको, 
जाणजो…छाणजो…पछच माणजो…।
लीनता ती रेंयणू । सदा सासी बोलंणू ।।
हर वातेनं सोच समजन केवंणू !
✍️
संत सेवालाल महाराज.

          महाराष्ट्रात त्यातही मराठवाडा प्रदेशामध्ये बहुसंख्य बंजारा समाज आहे. बंजारा समाज ज्यांना आपले दैवत मानतो असे थोरपुरूष म्हणजे संत सेवालाल महाराज.
        संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी सध्याच्या तेलंगणा राज्यातील अनंतपूर जिल्हयातील गुथ्थीबेल्लारी या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव धरमणी व वडिलांचे नाव भीमा नाईक असे होते. संत सेवालाल महाराजांचे जन्माचे वेळी आंध्रप्रदेशावर निजामाचे राज्य होते.
..  त्यावेळेचा बंजारा समाज हा गुरेढोरे पाळून आपला उदरनिर्वाह करीत होता. निजामशाहीच्या राज्यकर्त्यांनी जो बंजारा समाजाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता तो बंद पाडला. तो व्यवसाय म्हणजे गुरेढोरे पाळणे, गुरांचे रक्षण करणे म्हणजेच गोरक्षक असणारा.  गो.म्हणजे गाय, र.म्हणजे रक्षक या दोन शब्दाचे संक्षिप्त रूप गोर असा झाला असावा. तर हा गोरक्षक समाज म्हणजेच गोर बंजारा समाज गाईगुरांच्या दूध-दुभत्यामधून व खरेदी विक्रीमधून पैसा मिळवून उदरनिर्वाह चालवत असे. हा त्यांचा मुख्य व्यवसाय बंद पडला. निजामाच्या सैन्यांना खाद्यसामग्री व इतर साहित्य पुरविण्याचाही त्यांचा व्यवसाय बंद पाडला. यामुळें या समाजावर कठीण प्रसंग ओढवला अशा परिस्थितींत अशा ठिकाणी थांबून उदरनिर्वाह करणे अवघड झाले आणि येथूनच बंजारा समाजाची भटकंती सुरू झाली. हा समाज अस्थिर झाला. एका ठिकाणावरून आपले दूधदुभते घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकू लागला. 
     गोर बंजारा समाज हा मुळातच खूप मेहनती अर्थात् कष्टाळू होता. कष्टावर विश्वास ठेवणारा होता. जो समाज कष्टावर विश्वास ठेवतो तो समाज कधीच दैवावर विश्वास ठेवत नाही. दैवावर विश्वास ठेवणारा देवदेव करत राहतो. परंतु बंजारा समाज हा मुळातच निसर्गाचं पूजन करणारा आहे. निसर्गाच्या आप,तेज,वायू ,पृथ्वी,आकाश या पंचतत्वाच्या शक्तीला मानणारा समुह होता. हा समाज अनादिकाळापासून निसर्गाची पूजा करीत आला आहे. आजही प्रत्येक धार्मिक विधीमध्ये अशा पंचतत्वाचीच पूजा केली जाते. आज मात्र तो काही प्रमाणात देववादी झाला आहे.
         गोरबंजारा समाजावर निजामाच्या राज्यकर्त्यांनी  तो प्रदेश सोडण्याची वेळ आणली; परंतु संत सेवालाल महाराजांनी अशा कठीण परिस्थितीतही समाजाला चुकीचा मार्ग दाखवला नाही किंवा तो पत्करायला लावला नाही. कारण संत सेवालाल महाराज म्हणजे एक सत्वशील व्यक्तिमत्त्व होतं. ते एक मानवतावादी, विज्ञानवादी, तत्ववादी आणि बुद्धीवादी संत होते. या महापुरुषाने सोप्या-सोप्या बंजारा भाषेत मानवतावादाचा, अहिंसेच्या मार्गाचा व सर्व मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी कोणत्याच अवडंबराला थारा दिला नाही. कोणताही शिष्य बनविण्यासाठी चमत्कार दाखवला नाही. कधीही मंत्र-तंत्र, जप-जाप्य यांचा पुरस्कार केला नाही की, बुवाबाजीला थारा दिला नाही. याउलट, त्यांनी देवाधर्माच्या पूजनात वेळ घालवू नका, 
"भजे-पुजेमं वेळ घालो मत ।" 
जाणजो..छाणजो..पछच..माणजो..
संत सेवालाल महाराज आपल्या बंजारा बोलीच्या भाषेत सांगतात की,कशालाही देव मानू नका, कुठेही डोकं टेकू नका. कारण देव ही जाणुन घेण्याची गोष्ट आहे.. उगाच जाणून न घेताच तिला मानू नका आणि स्वीकारूही नका. एखाद्याला जाणले तर त्याची शहानिशाही करा तरच माना हा अत्यंत विवेकी आणि सत्यवादी विचार संत सेवालाल महाराज सांगतात.
किंवा "कोई केनी भजो-पुजो मत" म्हणजे कुणाचीच पुजा करू नका, थोडक्यात म्हणजे दगडांची तर नाहीच नाही; परंतु व्यक्तीची सुद्धा तुम्ही पुजा करू नका. "कोई केनी भजो मत ! कोई केती कमी छेनी ।" कुणीच मनुष्य इतर मनुष्यापेक्षा मोठा नाही. म्हणजे त्यांचा व्यक्तिपुजेलाही विरोध होता. "लीनता ती रेंयणू । सदा सासी बोलंणू ।। हर वातेनं सोच समजन केवंणू ।
      सदाचारी राहण्याचा, लीन होऊन वागण्याचा,नेहमी खरे बोलण्याचा आणि एवढेंच नाही तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बुद्धिवर घासूनपुसूनच स्वीकारली पाहिजे. समजून उमजून तिचा स्वीकार केला पाहिजे. अर्थात् आपण सत्कर्मच केले पाहिजे. सत्कर्माचाच स्वीकार केला पाहिजे.अशीच शिकवण संत सेवालाल महाराजांनी दिली. थोडक्यात म्हणजे संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी होते. विज्ञानवादी असणे म्हणजे बुद्धीवादी असणे, म्हणजेच बुद्धवादी असणे होय..! 
        तथागत गौतम बुद्धाचा अडीच हजार वर्षापूर्वीचा "अत्त दीप भव" चा पुरस्कार करणारे संत सेवालाल महाराज म्हणतात,"तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो । तुम्ही स्वतः स्वयं प्रकाशीत होऊ शकता. म्हणजेच.."सौतार वळख सौता करलीजो ।" तुम्ही अंतर्मुख होऊन स्वत:ला ओळखा. उगाच कुणाच्या भजनी पूजनी लागू नका. अत्यंत विवेकशील असलेली विचारधारा ही संत सेवालाल महाराज यांच्या ठायी होती. हा विवेकी विचार समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार होता.
        कारण संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय हा विचार व ही तत्वप्रणाली फक्त बुद्धाच्या तत्वज्ञानातच दिसून येते म्हणून महात्मा जोतीराव फुले यांचा "सत्यधर्म" आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला "बुद्धधम्म" हे दोन्हीं धर्म मानवतावादाचा पुरस्कार करणारे आहेत. हाच मानवतावादाचा विचार अनेक संतांनी समग्र समाजाला सांगून प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. कोणत्याही समाजात जन्म झालेल्या संतांची विचारधारा ही मानवतावादीच असते. संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्यासाठीच ते अहोरात्र काम करत असतात. "संताची विभूति जगाच्या कल्याणा " म्हणजे संत ही विभूती जगाच्या कल्याणासाठीच जन्म घेते. संताची भूमिका ही मानवजातीच्या कल्याणासाठीच असते आणि ती  भूमिका अत्यंत व्यापक असते. संत सेवालाल महाराज सुद्धा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीची मागणी करतात...
“गोर कोरेन साई वेस,
तांडेपेडेन साई वेस,
खुटा मुंगरीन साई वेस,
किडीमुंगीन साई वेस”
केवळ मानव जातच नव्हें तर पशू पक्षी,गुरे ढोरे, कीडामुंगी, अर्थात् पृथ्वीतलावरच्या सर्वहाराचे कल्याण व्हावे अशी मागणी करणारा संत सेवालाल महाराज हे एकाच समाजाचे महापुरूष नसून ते सपूर्ण मानवजातीचे उद्धारक होते. अशा थोर संताच्या जयंतीदिनी त्यांच्या कल्याणकारी विचारांना कोटी कोटी अभिवादन..!🙏 
✍️📚लेखक---------------------------------------------------------------
डॉ.धोंडोपंत मानवतकर
१५ फेब्रुवारी २०२२
९८९०८२७४१४

' माता रमाईचा त्याग आणि साहस समाजाला प्रेरणादायी ' - डॉ.धोंडोपंत मानवतकर.

" माता रमाईचा त्याग आणि साहस समाजाला प्रेरणादायी "- 
डॉ.धोंडोपंत मानवतकर
डॉ.धोंडोपंत मानवतकर,कार्यकर्ते मारोती खनपटे,भीमराव वाघ.
.
मंठा प्रतिनिधी:- 
    त्यागमूर्ती माता रमाई यांचा त्याग, बलिदान, साहस, संयम आणि सात्विक वृत्ती समाजातील प्रत्येक कुटुंबातील स्त्रीसाठी  प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले.
     मंठा येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानवतकर म्हणाले की,रमाबाईंच्या संसारात अनेक मोठी संकटे आली, तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट अनेक संकटातही त्या बाबासाहेबांची सावली होऊन राहिल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ ठेवलेल्या माता रमाईच्या प्रतिमेस सर्व उपस्थीत मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
याप्रसंगी परतूर येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराव भांडवलकर, प्रा.डॉ.सदाशिव कमळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप चाटसे, पत्रकार राजेश भूतेकर, प्रा.प्रदीप देशमुख, रंगनाथ वटाणे बापू, अॅड अनिल मोरे, हरिभाऊ चव्हाण, सरपंच तानाजी शेंडगे, अशोक अवचार, भीमराव वाघ, मारोती खनपटे, महादेव पाखरे, संजय धुळे, बी.के.प्रधान यांची उपस्थिती होती.

रविवार, १३ मार्च, २०२२

सुशील बनकर लिखित/दिग्दर्शित "अस्तित्व" एक यशस्वी नाट्यप्रयोग

सुशील बनकर  लिखित/दिग्दर्शित
"अस्तित्व " 
एक मराठी यशस्वी नाट्यप्रयोग..........
 मंचावरील कलावंत- प्रेम- समीर भुईगळ, प्रिया- साक्षी पिसाळ.
कलावंत-साक्षी पिसाळ,समीर भुईगळ, सुबोध जाधव, युवराज सुतार
नाट्य परीक्षण----------------------------------------------------------------
डॉ.धोंडोपंत मानवतकर  

       राज्यातील हौशी कलावंतासाठी २०२१-२२ या वर्षीच्या मराठी नाट्यस्पर्धा... औरंगाबाद येथील तापडिया रंगमंदिरात नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या "अस्तित्व " या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. समाजातील दुर्लक्षित वास्तवाचं संशोधन करणारी एक वेगळी संहिता असणारं हे नाटक आहे.
या दोनअंकी नाटकाचे लेखक व दिग्दर्शक सुशील बनकर हे औरंगाबादमध्ये गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अनेक नवोदित कलावंतांना सोबत घेऊन श्रमशक्ती कला आविष्कार या संस्थेअंतर्गत नाट्यप्रयोग करत असतात. सामाजिक विषयाच्या अनुषंगाने चालू घडामोडींवर आधारित सामाजिक विषयावर त्यांनी अनेक नाट्यप्रयोग सादर केले आहेत.
      इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्या अस्तित्वाविषयीचे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अनेकांगाने तिचे दमन केले जात आहे. स्वतंत्र भारतात अजुनही तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. स्वातंत्र्याच्या प्रश्नातच तिच्या अस्तित्वाचा प्रश्नही तिला बेचैन करत असतो, तरीही तिच्यातील कमालीचा संयम जणू इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणीच घालतोय की,काय ?असे वाटू लागते.
         माणूस कितीही चरित्रहीन असला तरी तो समाजात उजळ माथ्याने फिरत असतो, त्याच्या चारित्र्याविषयी समाज मौन बाळगत असतो ; मात्र तोच समाज शंका, गैरसमज आणि संशयातून स्त्रीच्या चारित्र्याचा ऊहापोह करत असतो. तिचे चारित्र्य हनन करत असतो, यातून निर्माण झालेली तिची वैयक्तिक जीवनातील उद्वेगजनक अवस्था तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करते.
        "अस्तित्व " या नाटकाची संहितासुद्धा याच अंगाने जाणारी आहे. समाजातील स्त्रीच्या अस्तित्वाविषयीचे भाष्य या नाटकाद्वारे करण्यात आले आहे. 
     स्त्रियांचे समाज जीवनातील स्थान किती डळमळीत आहे. तिच्या अस्तित्वाचे प्रश्न तिला रात्रंदिवस सतावणारे आहेत. पुरुषी अहंकाराने तिचे प्रापंचिक प्रश्न जटिल केले आहेत. संशय आणि गैरसमजातूनच पती-पत्नीत कमालीचा दुरावा निर्माण होतो आहे. पती आणि पत्नी हे एकमेकांना समजून घेतांना दिसत नाहीत. पती हा पत्नीला स्वतःची मालमत्ता समजूनच वागणूक देत असेल तर तिचे अस्तित्व एखाद्या वस्तुसारखे होऊन बसते. ते पुरुषी अहंकाराने समजून न घेतल्यामुळे अनेक कुटुंबात घटस्फोटाच्या घटना घडताहेत यामुळे समाज खिळखिळा होऊन बसतो.
        दोन कुटुंबाला जोडणारा दुवा म्हणजे कार्यरत असणाऱ्या विवाह संस्था ह्या सुद्धा अशा वाढत्या घटस्फोटामुळे नष्ट होऊ लागल्या आहेत. आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार न करताच घटस्फोटासारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ नये, हाच संदेश या नाटकाद्वारे देण्यात आला आहे. पुरुषाने स्त्रीच्या अस्तित्वाविषयीचा विचार केल्यास पुरुषी अहंकाराचे दुष्परिणाम व कुटुंबाची होणारी वाताहत थांबवली जाऊ शकते. हे समाजवास्तव उजागर करणे हीच या नाट्यप्रयोगाची मध्यवर्ती कल्पना आहे.
थोडक्यात म्हणजे "अस्तित्व" या नाटकाची संहिता ही प्रबोधनाचाच विचार मांडणारी आहे.
        नाट्यप्रयोगासाठी पात्रांची निवड, नेपथ्य, वेषभूषा, प्रकाशयोजना, समयसीमा, प्रसंगावधान, सांगीतिकबाजू,  प्रासंगिक गीताची निवड..आदी घटनाक्रम प्रयोगात तेवढेच महत्वाचे असतात हेही या प्रयोगात काटेकोरपणे सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे      नवीन लग्न होऊन आलेली वधू... प्रिया (साक्षी पिसाळ) आणि प्रेम नामक वर (समीर भुईगळ) हे वधु-वर नुकतेच लग्न होऊन घरी येतात. आनंदाने जगण्याची सुरूवात होते. प्रेम ला प्रिया सोबत निवांत वेळ मिळावा, मिलनाचा आनंद घेता यावा म्हणून तो प्रयत्न करत असतो; परंतु शेजारच्या काकू ( राजश्री कुलकर्णी ) लगेच या क्षणी काहीतरी मागण्याच्या हेतूने त्यांच्या घरी येतात आणि प्रेम-प्रियाच्या आनंदात विरजन पडते. प्रियाची क्षमा मागण्यासाठी आलेला विजय (सुबोध जाधव ) हे तिघे जेव्हां रंगमंचावर येतात तेव्हा एका अनाकलनीय वादाला सुरूवात होते. विजय, प्रेम आणि प्रिया यांच्या प्रेमाचा गुंता अधिकच जटिल होत जातो. तिघांचा विसंवाद सुरू होतो.अधुनमधून येणारा हवालदार ( युवराज सुतार ) हे पात्र या तिघांसोबत शंका आणि दमदाटी करत विनोद निर्माण करून जाते. प्रेम'चा मित्र सागर (मुकेश ठाकूर) हे पात्र समाजात उशिरा होणाऱ्या लग्नाने प्रपंचात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे लागते या विषयावर प्रकाश टाकते. हे रंगमंचीय कथानक मात्र अधिकतर प्रियाच्या भोवतीच फिरत राहते.
    याचे कारण स्त्री जीवनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा दाखविलेला प्रभाव इथे दिसून येतो. स्त्री ही स्वतःविषयी स्वतंत्रपणे विचार न करता पुरुषाच्या सोयीनुसार विचार करते. तिचे विचारस्वातंत्र हे पुरुषाच्या मक्तेदारीवर अवलंबून असते. त्याला हवं असेल तेव्हा तो तिला घरात ठेवू शकतो किंवा घरातून हाकलून देवू शकतो.
       प्रेम आणि विजय या दोघांनी दाखवलेल्या तिच्यावरच्या हक्काने तिच्या  मनाची झालेली उद्विग्न अवस्था अनेक विचारांचा गुंता निर्माण करते..हा मनाचा गुंता सादर करण्यासाठी दिग्दर्शकाने "मन" नावाच्या क्रियेटीव्ह पात्राची निर्मिती केली आहे. प्रियाच्या मनातील भावना, ताण तणाव, विचार, संभ्रम दाखवणारे ब्लॅक/ व्हाईट (सतीश पाटील) "मन" हे स्त्रिच्या द्विधा अवस्थेतील अंतर्द्वद्व बोलून दाखवते. याद्वारे स्त्री ही पुरूषाच्याच अंगाने किती विचार करते. यात तिच्या मनातला राग, उलघाल आणि तिच्या विचारमग्न मेंदुतील निराकार, बहुरंगी आवर्तने ही सतीश पाटील यांनी ताकदीने सादर केली आहेत. हे पात्र अगदी अफलातूनच आहे. प्रियाची घालमेल दर्शवून प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करुन जाते.        
विजय हा प्रियाचा पूर्वाश्रमीचा पती असून तो केवळ प्रियाची क्षमा मागण्यासाठी येतो..यातून क्षणार्धात अविश्वास निर्माण होऊन लगेच प्रेम आणि प्रियाच्या वितंडवादातून गोष्ट घटस्फोटापर्यंत येते. प्रेम हा प्रियाच्या चारित्र्यावर टोकाचे आरोप करून तो घटस्फोटाचा निर्णय घेतो. तेवढ्यात पूर्वाश्रमीचा पती विजय म्हणतो की, प्रेम ने प्रियाला घटस्फोट देऊ नये ; म्हणून मी प्रेमला विनंती करण्याकरीता आणि प्रियाची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. यावेळी प्रियाची द्विधा अवस्था होते आणि तिने नेमके विजय की, प्रेम या दोघांपैकी कोणासोबत रहावे, हा तिचा प्रश्न लेखकाने अनुत्तरीतच ठेवला आहे. ती तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करते. यातून शेवटी खरंच स्त्रीला तिचं तिला स्वतंत्र अस्तित्व असतं का? असा प्रश्न प्रेक्षकासमोर उभा राहतो आणि नाटकाचा शेवट होतो.
   "अस्तित्व" या नाट्यप्रयोगातून  सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील स्त्रीचे स्थान,तिचे स्वातंत्र्य यातून निर्माण होणारे तिचे अस्तित्व. यावर लेखकाने भाष्य केले आहे.
         या नाट्यप्रयोगातून नवीन वर-वधूच्या भावना, प्रेम, उत्साह, भय, रहस्य, संशय, नृत्य, विनोद, दुःख आदी पैलूंची मांडणी, निर्मिती आणि प्रसंगावधानाची समयोचितता दर्शवणारे सर्व घटक आणि घटना संहितेतून सादरीकरणात उतरविण्यात लेखक,दिग्दर्शक सुशील बनकर यशस्वी झाले आहेत. नाट्यगृहातील तांत्रिक बाजुसुद्धा तेवढयाच महत्वपूर्ण असतात. वातावरण निर्मितीसाठी संगीत संयोजनाची बाजू सुमित सिरसाठ यांनी सांभाळली असून तेवढीच महत्वाची प्रकाश योजना सांभाळणारे सागर बोधनकर व नेपथ्यकार राजेश पितृभक्त यांचा वाटा या नाट्यप्रयोगाला सौदर्य निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
डावीकडून साहित्यिक- डॉ.धोंडोपंत मानवतकर,लेखक दिग्दर्शक सुशील बनकर, साक्षी पिसाळ, समीर भुईगळ व इतर
-----------------------------------------------------------------------------
औरंगाबाद येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक सुशील बनकर यांनी या प्रयोगाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अत्यंत जोखमीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून पुणे-मुंबईकरांच्यानाट्यप्रयोगाच्या मक्तेदारीला आव्हान दिल्यासारखे वाटते.
✍️📚------------------------------------------------------------------
नाट्य परीक्षण
डॉ.धोंडोपंत मानवतकर
७ मार्च २०२२

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...